अंतरी जपावा गोडवा

रथसप्तमी हा वसंत ऋतूच्या आरंभाचा काळ असतो. नुकतीच वसंत पंचमी साजरी झालेली असते.
अंतरी जपावा गोडवा

-स्वाती पेशवे

प्रासंगिक

संक्रांतीपासून सुरू झालेल्या सणांचे पर्व रथसप्तमीला संपते. हा सगळा संक्रमणकाळ अनेकविध कारणांमुळे महत्त्वाचा मानला जातो. वसंत ऋतूचे आगमन झाल्यामुळे वातावरणात वेगळे चैतन्य दाटलेले असते. सृष्टीतील बहर आता अवघ्या काही दिवसांमध्ये अनुभवास मिळणार असतो. मात्र हे सगळे निखळ, निर्व्याज मनाने अनुभवण्यासाठी वृत्तीमध्ये गोडवा असणे गरजेचे असते. संक्रातीच्या पर्वाचा हा संकेत आवर्जून लक्षात घेण्याजोगा असतो.

रथसप्तमी जवळ येतेय... याचाच दुसरा अर्थ गोड बोलण्याचे आवाहन, आर्जव करण्याचा काळ आता संपतोय..! काहींनी याबाबत मोठा सुस्काराही सोडला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. खरेतर मानवी स्वभावाच्या आणि वर्तणुकीच्या सगळ्या कळांचा सखोल अभ्यास करूनच आपल्या पूर्वजांनी अनेक सणांची परंपरा निर्माण केली. पण कधी कधी कोणाला या सर्वांगसुंदर परंपरांचे जोखडही वाटू शकते... आता हेच बघा, अगदी संक्रांतीपासून वडी वा लाडूच्या स्वरूपात तीळगूळ बरोबर बाळगायचा. भेटतील त्यांना वा घरी येणाऱ्यांना आठवणीने तो द्यायचा, तसेच समोरच्याने त्यातील एक तुकडा मोडून आपल्याला दिला तर सुहास्यवदनाने तो स्वीकारायचा आणि तोंडदेखले का होईना पण गोड बोलण्याचे आवाहन करायचे, हा खरे तर आजच्या रोख-ठोक संस्कृतीला न मानवणारा विचार अथवा कृती आहे. कशाला असले काही करत बसायचे? पटत असेल तर ठीक, नाहीतर अ‍ॅडजस्ट करण्याची गरज नाकारून ‘एक घाव दोन तुकडे’ करत ब्रेकअप करण्याची सवय लावणारा आजचा हा काळ... ‘आला अंगावर तर घेतला शिंगावर’ हे विचार म्हणजे सामर्थ्य दाखवण्याचा सध्याचा एकमेव मार्ग... अगदी शाळकरी वयापासूनच वृत्तीत अशी मग्रुरी भिनवली जात असताना एका तिळागुळाचे आमिष दाखवून संपूर्ण वर्षभर एकमेकांशी गोड बोलण्याचे वचन देणे-घेणे म्हणजे जरा ‘टू मच’ होते नाही..! महिलावर्गाच्या तर अडचणीच वेगळ्या... किटीपार्टीमध्ये वा इमारतीमध्ये एक करते म्हणून आपणही संक्रांतीचे हळदीकुंकू करा, वाण देण्याच्या पहिलीपेक्षा सरस वस्तू आणा, तीळगुळाच्या जोडीला एखादी डिश करा... केवढा तो व्याप! संक्रांतीच्या निमित्ताने नव्या जोडप्याचे वा छोट्यांचे सोहळे आणखी वेगळे. एखादे पाकीट जवळ ठेवावेच लागते ना अशावेळी... साधे बोरनहाण असले तरी खर्च होतोच. खेरीज त्यासाठी चांगल्यातली काळी साडी घेण्यापासून साजेशी ज्वेलरी खरेदी करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी साधाव्या लागतात... पण आता रथसप्तमी जवळ येतेय म्हटल्यावर सुटका होणार या सगळ्यातून...

पण मंडळी, तुमचाही असा विचार असेल तर वेळीच दूर सारा, कारण रथसप्तमी हा एक सुमंगल सण तर हे सगळेच पर्व अत्यंत पावन आहे. रथसप्तमी हा तर सूर्यदेवाचा उत्सव आहे. पूर्वी तो आस्थापूर्वक साजरा होत असे. घरासमोर काढली जाणारी खास रांगोळी, दूध ऊतू घालवत केलेली सूर्योपासना, सूर्याच्या रथाची पूजा करून घेतलेले आशीर्वाद आणि चराचराला प्रकाश, ऊर्जा देणाऱ्या या तेजोनिधीप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता हे तेव्हाचे सार्वत्रिक चित्र होते. आजही काही घरांमध्ये वा भारताच्या काही भागांमध्ये यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन होते. त्यात आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम शहरात अरसावल्लीतल्या मंदिराचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तिथे माघ सप्तमीचा हा उत्सव अनुभवण्याजोगा असतो. हा भगवान सूर्याचा जन्मदिवस मानला जात असल्यामुळे या दिवसाला सूर्य जयंती असेही म्हणतात. दरवर्षी या दिवसापासून आपला देश अंधारातून प्रकाशाकडे जात असल्याचे मानले जाते. हिवाळा संपतो आणि वसंत ऋतू सुरू होतो. सूर्यकिरणांमुळे आपल्या शरीराला नवऊर्जा प्रदान होते आणि निरोगी तसेच संपन्नतेकडील पर्व सुरू होते. अशी श्रद्धा असल्यामुळेच रथसप्तमीनिमित्त या मंदिर परिसरात विशेष किरणे आणि कंपने उपस्थित असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या दिवशी तीर्थप्रसाद घेणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. भगवान सूर्यनारायण स्वामींचा एक चाकाचा रथ आहे आणि त्यात सात घोडे आहेत जे प्रकाशाच्या सात रंगांचे प्रतिनिधित्व करतात.

रथसप्तमी हा वसंत ऋतूच्या आरंभाचा काळ असतो. नुकतीच वसंत पंचमी साजरी झालेली असते. या वसंताचा महिमा काय वर्णावा...एकूणच ऋतूच्या बदलाचा आणि कापणीचा हंगाम सुरू होण्याचा हा काळ रम्य असतो. अशा या रम्य, विधायक काळात जुन्या रुसव्या-फुगव्यांना तिलांजली देऊन नव्याने, सकारात्मकतेने जगण्याला सामोरे जाणे सूचित करते ती रथसप्तमी... म्हणूनच संक्रांती तसेच रथसप्तमीच्या निमित्ताने एकमेकांना गोड बोलण्याविषयी सूचित करणे, यानिमित्ताने परंपरागत विधींची धुरा वाहणे नकोसे वाटत असले तरी वैयक्तिक मते म्हणून त्याकडे एकवेळ दुर्लक्ष करावे, पण स्वत:च्या वृत्तीतील गोडवा मात्र नक्की जपावा. कारण मधासारखा वृत्तीतला हा गोडवा हळूहळू आचरणात उतरतो आणि अवघे दिवस मकरंदासारखे मधाळ होऊन जातात. स्वभावात गोडवा असेल तर वाणी मधुर आणि लाघवी होते. भावनेत गोडवा असेल तर शब्दांचे फटकारेही गोड वाटतात. गोडवा स्वयंभू आहे. कुठलेही संस्कार न झालेले ते दैवी वरदान आहे. गोडी थोडी कमी-जास्त झाली तर पदार्थाची चव बदलणार. गोडीचा अतिरेक झाला तर मिट्टी बसणार. कारण गोडीवर संस्कार झालेले आहेत. कशाचा ना कशाचा संयोग साधत गोडी निर्माण केली आहे. हा संयोग भावेल, रुचेल आणि पटेल त्यालाच त्या गोडीची किंमत. बाकीच्यांना त्याच्याशी काय घेणं देणं? आता तर मधुमेहींची वाढती संख्या गोडीपासून अनेकांना विलग करणारी... थोडक्यात गोडी काळानुरूप कमी-जास्त होते पण गोडवा आहे तसाच राहतो.

ज्ञानेश्वरांच्या वृत्तीतला गोडवा शब्दात उतरला म्हणून त्यांची प्रत्येक ओळ अमृतमय झाली. कबीराच्या मनातला गोडवा दोह्यात उतरला आणि गोडी मनामनापर्यंत पोहोचली. मीरेची आर्तता, विराण्या गोडव्यामुळेच प्रत्येकाच्या मनाला भावल्या. परखड असूनही गोडवा असल्याने रामदासांच्या रचना काळजावर कोरल्या गेल्या. तुकारामांचे अभंग काळाला पुरून उरले. सुरेल गळ्याच्या गायकांच्या स्वरात गोडवा होता म्हणूनच काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांची गाणी आपल्या ओठांवर आहेत. गोडीचं मात्र काहीसं वेगळं. गोडीच्या गर्भात किती कडवटपणा दडलेला असेल ते सांगता येत नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, स्वार्थ, लंपटता यातील कुठल्या भावनेनं गोडीचा बुरखा पांघरला असेल ते कळत नाही. म्हणून कधी कधी भीती वाटते या गोडीची.

खरं तर आपली इंद्रियं या गोडव्याच्या सतत शोधात असतात. साधा भाकरीचा घास चावून चावून खाल्ला तरी त्यातील गोडवा जाणवायला लागतो. कितीही क्लिष्ट वाटलं तरी वारंवार ऐकल्यानंतर संगीतातला गोडवा मनाला भिडतो. कळत नसला तरी लोकसंगीतातील ठेका मनाला भिडतो. रानमेव्याचा गोडवा हवाहवासा वाटतो. थोडा वेळ पाहिल्यावर डोळ्याला थकवा देणारा, कृत्रिम आणि घातक प्रकाशशलाका सोडून डोळ्यातील आर्द्रताही सुकवून टाकणारा, जगाच्या जवळ आणताना आपल्या माणसांपासून तोडणारा... उलटपक्षी निसर्गाच्या या स्क्रीनजवळ जावं त्याच्या दुप्पट वेगानं आणि आवेगानं तो तुम्हाला स्वत:मध्ये सामावून घेतो. हा गोडवा अनुभवून तुमचा देह थरथरतो, पंचेंद्रिये सुखावतात, समाधानानं डोळ्याच्या कडा पाणावतात. म्हणून संक्रांतीपासून रथसप्तमीच्या संपूर्ण पर्वात तिळगुळाच्या गोडीसवे वृत्तीतला गोडवा वाढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा.

सध्या आपण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत. पण यामुळेच अनेकांनी जगण्यातला गोडवा हरवला आहे. क्षणिक सुखाच्या मागं धावताना जीवाभावाची नाती निर्दयीपणे बाजूला सारल्याचे अनेकांना जाणवत आहे. एकीकडे विज्ञान यंत्रमानवाला मानवी भावनांनी परिपूर्ण बनवण्याच्या प्रयत्नात आहे. हे साध्य होईल अथवा न होईल ते काळानुरूप कळेलच, पण आपण मात्र कारण नसताना यंत्रमानवासारखं जगू पाहिले तर ती सगळ्यात मोठी घोडचूक ठरेल. आज आपल्याकडे संपन्नता आली, सामर्थ्य आले, वित्तीय सबलता आली... कोणी याला प्रगती म्हणतो तर कोणी विकास म्हणतो. पण माझ्या मते, या सर्व अर्थशास्त्रातील संकल्पना झाल्या. माणूस म्हणून जगताना तुम्ही किती आनंद लुटता यावर खरी आत्मसंतुष्टी अवलंबून आहे आणि आत्मसंतुष्टी देऊ करेल, तोच खरा प्रवास आहे. तेव्हा वाढत्या सूर्यतेजाच्या साक्षीने आपणही जगण्यातील ही संतुष्ट अवस्था मिळवण्याचा प्रयत्न करू, या आणि संक्रमणाच्या नवी पर्वाला सुरुवात करू या.

logo
marathi.freepressjournal.in