पुन्हा आगीशी खेळ धोक्याचा…!

राजकीय किंवा अन्य कारणांसाठी पंजाबमधील धोक्याकडे पुरेसे गांभीर्याने न पाहणे म्हणजे पुन्हा एकदा आगीशी खेळ केल्यासारखे होईल.
पुन्हा आगीशी खेळ धोक्याचा…!
Published on

गेल्या काही दिवसांत ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालय, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि अन्य ठिकाणी खलिस्तानी पाठीराख्यांनी जी आंदोलने केली, तसेच या संदर्भात पंजाबमध्ये ज्या घडामोडी होत आहेत त्यातून पंजाब पुन्हा १९८०च्या दशकातील हिंसाचाराकडे चालला आहे, असा निष्कर्ष काढणे थोडे आततायीपणाचे ठरेल. पण, म्हणून या सर्व घटनांकडे दुलर्क्षही करून चालणार नाही. राज्य आणि केंद्र सरकारने या कारवायांना वेळीच आवर घातला नाही, तर त्यातून गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. राजकीय किंवा अन्य कारणांसाठी पंजाबमधील धोक्याकडे पुरेसे गांभीर्याने न पाहणे म्हणजे पुन्हा एकदा आगीशी खेळ केल्यासारखे होईल. आता तसे करणे देशाला परवडणारे नाही.

शिखांसाठी स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीपायी पंजाबमध्ये १९८०च्या दशकात जो रक्तपात झाला तो आज चाळिशीत असलेल्या आणि त्याहून जुन्या पिढीला अद्याप चांगलाच स्मरणात आहे. राजकारणाच्या खेळात जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे उभे केलेले भूत, त्याच्या दहशतवाद्यांनी पवित्र सुवर्ण मंदिरालाच अड्डा बनवून केलेल्या काळ्या कारवाया, त्यातून पंजाबात दशकभराहून अधिक काळ चाललेला हिंसाचार, या सर्व नाट्याला शेजारील पाकिस्तान आणि अन्य देशांकडून मिळालेली फूस, अखेर लष्कराला ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ नावाने १९८४ साली सुवर्ण मंदिरात करावी लागलेली कारवाई, त्यानंतर इंदिरा गांधी आणि माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या झालेल्या हत्या, दिल्लीतील शीखविरोधी दंगली आदी घटना म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. जे. एफ. रिबेरो आणि के. पी. एस. गिल यांसारख्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खंबीर धोरणामुळे अखेर पंजाबमधील दहशतवादाला उतार पडला. मात्र, तोपर्यंत काश्मीरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली होती.

हा इतिहास फार जुना झालेला नसतानाच भारताच्या शत्रूंकडून पंजाबमधील वातावरण पुन्हा एकदा अशांत करण्याचा प्रयत्न होत आहे. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला पुन्हा हवा देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या बाह्य शक्ती देशातील राजकारणाचा त्यांच्या फायद्यासाठी पुरेपूर लाभ उठवत आहेत. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या शेतीविषयक विधेयकांना विरोधासाठी दिल्लीत दोन वर्षांपूर्वी जे आंदोलन झाले त्या माध्यमातून खलिस्तानचा अंगार पुन्हा पेटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर दुबईमध्ये वास्तव्यास असलेला तिशीतील युवक अमृतपाल सिंग हा गेल्या काही महिन्यांपूर्वी अचानक भारतात परतला. अमृतपाल सिंग हा ‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारस) नावाच्या संघटनेचा नेता आहे. त्याच्या संघटनेने सुरुवातीला पंजाबमधील युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनातून सोडवण्याच्या नावाखाली व्यसनमुक्ती केंद्रे चालू केली. मात्र, त्या केंद्रांवर खलिस्तानी विचारसरणीचा प्रसार, भारतविरोधी प्रचार आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण आदी उद्योग चालत असल्याचे आता पोलीस तपासात दिसून आले आहे. अमृतपाल सिंग याचा साथीदार लव्हप्रित सिंग याला पोलिसांनी अपहरण आणि हल्ल्याच्या आरोपांखाली १७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्याला सोडण्याच्या मागणीसाठी अमृतपाल सिंग याने २३ फेब्रुवारी रोजी अजनाला पोलीस ठाण्यावर बंदुका, तलवारी आदी शस्त्रधारी सहकाऱ्यांसह मोठा मोर्चा नेला आणि पोलिसांवर दबाव आणला. परिसरात तोडफोड करत दहशत माजवली. त्यावेळी त्याने शीखांचा पवित्र धर्मग्रंथ ‘गुरू ग्रंथसाहिब’ पालखीतून आणला होता. त्यामुळे पोलीस त्याच्याविरुद्ध धडक कारवाई करू शकले नाहीत. आता पोलिसांनी त्याच्या समर्थकांची धरपकड सुरू केली आहे. पण अमृतपाल सिंग अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

अजनाला येथील घटनेवेळी पोलीस अमृतपाल सिंग याच्यावर थेट कारवाई करू शकले नाहीत, हा राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेचा दुबळेपणा मानला जात आहे. तर त्यावेळी परिस्थिती संवेदनशील असल्याने कारवाई करता आली नाही. याचा अर्थ पोलीस यंत्रणा कमकुवत आहे असा होत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. राज्य आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणा या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सरकारचे सांगणे आहे. अमृतपाल सिंग स्वतःची प्रतिमा भिंद्रनवालेसारखी करू पाहत आहे. त्याला प्रसारमाध्यमांत मोठी प्रसिद्धी मिळत आहे. दुबईमधील वास्तव्यादरम्यान पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ने (‘आयएसआय’) त्याच्याशी संपर्क साधून त्याच्या डोक्यात खलिस्तानचे खूळ भरले असण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी खऱ्या असल्या तरीही त्याला पंजाबच्या जनतेतून फारसा पाठिंबा नाही. त्याचे पाठीराखे मोजके आहेत. पंजाबच्या एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकण्याइतकाही त्यांचा प्रभाव नाही. त्यामुळे त्यांच्याकडून खलिस्तानी चळवळीचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगत आहेत.

तसे असले तरी देशातील या घटनांचे पडसाद परदेशांत अनेक ठिकाणी उमटले आहेत. ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयाबाहेरील तिरंगा उतरवून तेथे खलिस्तानी झेंडा फडकावण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात तशाच स्वरूपाच्या घटना अमेरिका, कॅनडा आणि अन्यत्र घडल्या. परदेशांत शीखांवरील हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण करून माहिती घेण्याची वेळ भारतीय अधिकाऱ्यांवर आली. त्यानंतर ब्रिटन, अमेरिका आदी देशांनी तेथील भारतीय वकिलातींना पुरेसे संरक्षण देण्याची हमी दिली. देशभक्त शिखांनी देशात आणि परदेशांत तिरंग्यासह जाहीर मोर्चे काढून या घटनांचा निषेध केला आणि देशाप्रति निष्ठा व्यक्त केल्या. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आदी देशांनी खलिस्तान समर्थकांना थारा मिळू देणार नाही, असे आश्वासन भारताला दिले आहे. पण तेवढ्याने भारताचे समाधान होणे शक्य नाही. या देशांच्या कृतींमधूनच तो विश्वास भारताला मिळू शकतो. भारताच्या परराष्ट्र खात्याकडूनदेखील ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे.

खलिस्तान प्रश्नावरून जेव्हा पंजाबमध्ये हिंसाचार भडकला होता तेव्हा अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या देशांचे धोरण काय होते, त्यांनी पंजाबमधील दहशतवाद्यांना कसा छुपा पाठिंबा दिला होता, हे भारत आणि भारतीय जनता विसरलेली नाही. तेथे आजही खलिस्तानचे समर्थक आणि दहशतवादी अस्तित्वात आहेत. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चे नेतृत्व करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्यावर काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये शीख दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यातून ते शिताफीने मुकाबला करून बचावले. त्यामुळे खलिस्तानी समर्थक पुरते संपले आहेत, असे मानण्याचे कारण नाही. आज त्यांची शक्ती फार मोठी नाही. पण कॅनडासारख्या देशात कमी संख्येने असलेले खलिस्तानवादीही निवडणुकीच्या राजकारणावर पुरेसा प्रभाव टाकू शकतात. पाकिस्तानसारखे शेजारी खलिस्तान चळवळ पुन्हा पेटवण्याच्या तयारीतच आहेत. गेल्या काही वर्षांत पंजाबमध्ये अमली पदार्थांचा व्यापार, त्यात राजकारण्यांचा सहभाग, तरुणांमधील व्यसनाधीनता, बंदुका-पिस्तुले आदी लहान शस्त्रांचा प्रसार आदी गोष्टी वाढल्या आहेत. त्यातून पंजाबच्या मातीत दहशतवादाला पोषक तत्वांची मशागत झालेली आहे. कोत्या राजकारणासाठी भिंद्रनवालेचा भस्मासूर कसा उभा केला गेला हा इतिहास देशवासीयांना ज्ञात आहे. त्याची थोडी जरी पुनरावृत्ती झाली तर परिस्थिती हातातून निसटण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा पुरेशी खबरदारी घेऊन हा आगीशी खेळ वेळीच थांबवलेला बरा…!

logo
marathi.freepressjournal.in