ग्राहक मंच
- उदय पिंगळे
देशात आर्थिक विषमता अधिकाधिक तीव्र होत आहे. या विषमतेचा परिणाम बचतीवर होतो. अल्प उत्पन्न असलेल्यांना इच्छा असूनही बचत करता येत नसल्याने निवृत्तीनंतर काय? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. अशांसाठी स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी हा एक सोपा पर्याय आहे. या योजनेत सहभागी होऊन निवृत्तीनंतरच्या आर्थिक आधाराची तरतूद करता येईल.
प्रत्येकाच्या मासिक उत्पन्नात आज खूप तफावत आहे. यातील अनेकजण अतिशय कमी म्हणजे मासिक २० ते ४० हजार रुपये उत्पन्न मिळवतात. हाती आलेल्या पैशांतून बदलत्या राहाणीमानाशी जमवून घेणे ही त्याच्या दृष्टीने तारेवरची कसरतच असते. त्यामुळे इच्छा असूनही काही रकमेची बचत करणे त्यांना जमत नाही, तेव्हा गुंतवणूक करणे दूरच राहिले. सध्या शिक्षण आणि आरोग्य यावरील खर्चात झपाट्याने वाढ होत असल्याने अचानक अधिक खर्च उद्भवल्यास कनिष्ठ मध्यमवर्गीयांसमोर कर्ज घेण्याशिवाय गत्यंतर नसते. या गटात मोडणारे जे कर्मचारी भविष्य निर्वाहनिधीचे (EPF) सभासद आहेत अशा लोकांसाठी स्वेच्छा भविष्यनिर्वाह निधी (VPF) हे वरदान आहे. ज्यांचे उत्पन्न अधिक आहे त्यांनाही येथे सहभागी होऊन आपल्या निवृत्तीसाठी अधिक निधी जमवता येईल. कमी जोखीम आणि उच्च परतावा देणाऱ्या या बचत योजनेला सरकारचे समर्थन आहे.
स्वेच्छा भविष्यनिर्वाह निधी ही एक अशी योजना आहे ज्यात कर्मचारी कायद्याने आवश्यक असलेल्या दराहून (१०% ते १४%) अधिक रक्कम जमा करू शकतो. ही रक्कम भविष्यनिर्वाह निधीचाच भाग मानली जाते. त्यावर इपीएफवर मिळणारे व्याज दिले जाते. यात जमा केलेली रक्कम इपीएफ मधील नियमांनुसार काढता येते. योजनेत सहभागी होण्यासाठी इपीएफचे खाते असणे आवश्यक आहे.
योजनेची वैशिष्ट्ये-
> कर्मचारी त्याच्या खात्यात महागाई भत्यासह जास्तीत जास्त १००% पर्यंत योगदान देऊ शकतो.
> हे खाते ईपीएफ खात्याचा उपभाग आहे दोन्ही खात्यात फक्त जमा होणाऱ्या योगदानाचा फरक आहे. यासाठी वेगळे खाते नसते.
> योजनेचा लाभ ईपीएफओचे सभासदच घेऊ शकतात. स्वयंरोजगार असलेल्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती या व योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
> योजना पूर्णपणे ऐच्छिक असून त्यातील योगदानही ऐच्छिक आहे.
> याचा लॉक इन कालावधी पाच वर्षांचा असून त्यापूर्वी त्यातून सहजासहजी रक्कम
काढता येत नाही.
> जुन्या करप्रणालीनुसार यावर ८० सी च्या मर्यादेत आयकर सवलत मिळते. रक्कम
पगारातून कापली जात असल्याने कर्मचारी आणि मालक यांना करनियोजन करणे सोपे
जाते.
> रक्कम कर्मचाऱ्यांच्या हातात न पडता थेट जमा होत असल्याने आपोआपच बचत होते.
> व्हीपीएफ आणि ईपीएफ यावर मिळणारे व्याज सारखेच असून सध्या हे व्याज ८.२५%
आहे (सन २०२४-२०२५ साठी) राजीनामा आणि निवृत्तीच्यावेळी कर्मचाऱ्यांस पूर्ण रक्कम व्याजासह मिळते.
त्याचप्रमाणे नोकरीत बदल झाल्यास नव्या ठिकाणी हस्तांतरित होऊ शकते.
> कर्ज किंवा आंशिक रक्कम ईपीएफ नियमानुसार मिळते. पाच वर्षापूर्वी रक्कम काढून घेतल्यास त्यावर कर द्यावा लागतो.
> खातेदाराचे दुर्दैवाने निधन झाल्यास जमा रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला किंवा कायदेशीर वारसाला दिली जाते.
> व्हीपीएफ खाते कसे उघडावे ?
> व्हीपीएफमध्ये सहभागी होण्यासाठी मालकास पत्र अथवा विहित नमुन्यात अर्ज द्यावा. त्यात आवश्यक तपशील देऊन मासिक योगदान म्हणून विशिष्ट रक्कम पगारातून कापून घेऊन जमा करण्याची विनंती करावी. आर्थिक वर्षात कधीही खाते उघडता येईल.
> यातील गुंतवणूक बंद करता येत नाही. कमी अधिक करता येईल.
> कोणी गुंतवणूक करावी ?
> ज्यांची कोणतीही अतिरिक्त बचत / गुंतवणूक नाही त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगी, मी पूर्वी काम करीत असलेल्या अस्थापनेतील सर्व तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कामगारांना वेतनकरार होऊन पगारवाढ झाली की मी त्यातील काही रक्कम या खात्यात जमा करण्याची सक्तीची नम्र विनंती करत असे. (म्हणजे त्याचे या योजनेतील योगदानाचे फॉर्म भरून त्याच्या सह्या किंवा अंगठे घेऊन एकगठ्ठा सर्व फॉर्म खातेप्रमुखांची शिफारस घेऊन अकाउंट डिपार्टमेंटकडे पाठवत असे किंवा स्वतः नेऊन देत असे.) यात अतिरिक्त जमा झालेली रक्कम त्याच्या परिवाराच्या शिक्षण, लग्न यासाठी त्याचप्रमाणे निवृत्ती नंतर उपयोगी पडल्याने, आजही अनेक लोक किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य भेटल्यावर 'तुमच्यामुळे आमचे पैसे वाचले आणि वाढले' असे म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात.
> ज्यांना कोणताही धोका न पत्करता सर्वाधिक व्याज मिळवायचे आहे त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम योजना आहे. सध्या व्याजदर ८.२५% आहे. त्यात बदल होऊ शकतो.
> ज्यांना मोठ्या प्रमाणात पेन्शन फंड निर्माण करायचा आहे त्याच्यासाठीही ही योजना उपयुक्त आहे. सध्या मिळत असलेला दर हा अन्य योजनांच्या तुलनेत सर्वोच्च आहे. स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी, व्याज गणना -
■ ईपीएफनुसार, दरवर्षी व्याजाचे पुनरावलोकन केले जाते.
■ सध्याचा व्याजदर ८.२५% असून प्रत्येक
वर्षाच्या शेवटच्या दिवसापासून मासिक शिल्लक रकमेवर तो दिला जातो.
■ व्याजाची रक्कम पूर्ण रुपयात दिली जाते.
■ जमा रकमेच्या पुढील महिन्यापासून
आर्थिक वर्ष पूर्ण होईपर्यंत व्याज दिले जाते.
वार्षिक योगदान अडीच लाखपर्यंतच करमुक्त आहे. अधिक व्याजावर कर आकारला जातो.
व्हीपीएफमधून पैसे काढण्याचा पात्रता निकष -
■ खात्यास पाच वर्षे पूर्ण झालेली असावीत.
■ आजारपण, घरबांधणी, मुलांचे शिक्षण, विवाह अशा विशिष्ट कारणांसाठीच पैसे काढता येतात.
किती व्हीपीएफ शिल्लक आहे, हे कुठे पाहता येईल ? -
आपण जमा करीत असलेले पैसे आपल्या ईपीएफ खात्यात जमा होतात का ते ईपीएफओच्या संकेतस्थळावर जाऊन पाहावे.
■ ईपीएफओच्या वेबसाईटवर जा आणि कर्मचाऱ्यांसाठीच्या पर्यायावर क्लिक करा. सेवा शीर्षकांर्गत सदस्य क्रमांक टाकून पासबुकवर जा. ■ येथे आपला यूएएन (UAN) आणि पासवर्ड टाका.
■ पुढे येणाऱ्या पानावर आपल्या खात्याच्या सर्व नोंदी असतील. त्यातील व्हीपीएफ जमा रक्कम तपासून पहा.
आपला भविष्यनिर्वाह निधी बनवण्याचे पीपीएफ, ईपीएफ, व्हीपीएफ, म्युच्युअल फंडाच्या पेन्शन फंड योजना, इन्शुरन्स कंपन्यांच्या पेन्शन योजना, अटल पेन्शन योजना, एनपीएस असे अनेक पर्याय आहेत. प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य आणि फायदे - तोटे आहेत. तेव्हा सभासद ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार सुयोग्य जोखीम स्वीकारून यातील एक अथवा अनेक पर्यायांची निवड करावी.
मुंबई ग्राहक पंचायत
Email: mgpshikshan@gmail.com