
भवताल
ॲड. वर्षा देशपांडे
ज्याचा धर्म त्याने पाळावा, असे छत्रपती शिवरायांनी सांगितले आहे. शिवरायांनी संघर्ष केला तो मोगल सत्तेच्या जुलुमाविरुद्ध. तरीही छत्रपतींचे प्रतीक धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी, राजकारणासाठी वापरले जाते. आज गरज आहे ती शिवरायांनी ३५० वर्षांपूर्वी दिलेल्या आज्ञेला अनुसरून महाराष्ट्र घडविण्याची. शिवरायांची सर्वसमावेशक वृत्ती अंगी बाणवण्याची.
दोन नोव्हेंबर १६६९ च्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेचा उल्लेख केला आहे. “श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कोणी बखेडी करू नये असे फर्मावले आहे.” असे या आज्ञेचे स्वरूप आहे. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या आपल्या पुस्तकाच्या आणि विविध व्याख्यानांच्या माध्यमातून खऱ्या इतिहासाचे दाखले देत लोकांना छत्रपती शिवरायांचे ‘रयतेचा राजा’ हे रूप सांगितले. ज्याचा जो धर्म असेल त्यांनी तो करावा, त्यात भांडणे निर्माण करू नयेत, असा स्पष्ट आदेश देणारे सहिष्णु शिवाजी महाराज म्हणूनच महाराष्ट्रातील अठरापगड जातींना, हिंदू- मुस्लिमांना आपलेसे वाटतात. नुकतीच त्यांची ३९५ वी जयंती महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी माणसांनी साजरी केली.
हे कोणी फरमान काढले म्हणून झाले नाही, तर शिवाजी महाराजांबरोबर मराठी माणसांचे थेट भावनिक नाते आहे. म्हणूनच दरवर्षी १९ फेब्रुवारीला उत्साहात महाराजांची जयंती साजरी होते. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही हिंदू-मुस्लिम सर्व जाती धर्मातील स्त्रियांचा सन्मान आणि आदर करण्याची आहे. हिंदू-मुस्लिम सर्वांच्या धार्मिक स्थळांचा आणि ग्रंथांचा श्रद्धेने संरक्षण करण्याचा विचार ते देतात. राजे स्वतः हिंदू होते, धर्मश्रद्ध होते. पण त्यांनी आपल्या धर्मातील माणसाला एक वागणूक आणि दुसऱ्या धर्मातील माणसाला दुजी वागणूक कधीही दिली नाही. परंतु आज शिवाजी महाराजांच्या विषयी मराठी माणसांच्या मनात असणाऱ्या भावना आपल्या राजकारणासाठी वापरल्या जात आहेत. आपल्या धर्मा इतकाच इतरांचा धर्म श्रेष्ठ आणि उच्च आहे. उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा उद्देश एकच आहे, हे महत्त्वाचे तत्त्व शिवाजी महाराजांनी मांडले. जुलमी, शोषण करणाऱ्या मोगल सत्तेविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि स्वराज्य संरक्षक संभाजी महाराजांनी सातत्याने उभा संघर्ष केला. त्यांनी स्वराज्य उभारले ते जुलमी सत्तेविरुद्ध, मोगल हे मुस्लिम होते म्हणून नव्हे, हे स्पष्ट असताना धर्मांध, जातीअंत राजकारणासाठी शिवाजी महाराजांची मोठमोठी स्मारके उभी करण्याच्या घोषणा करायच्या, या ना त्या मार्गाने निवडून आलेल्या आपल्या आमदार- खासदारांना महाराजांची जयंती त्यांना हवी तशी (मुस्लिमविरोधी) साजरी करण्यासाठी पैसा पुरवायचा, हे होत आहे. ज्या प्रवृत्तीने शिवाजी महाराजांच्या कार्यकालात त्यांना विरोध केला तेच आज त्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. अनैतिहासिक सिनेमे काढून ते सिनेमे फुकट दाखविण्याची व्यवस्था करून आपले घाणेरडे राजकारण साधण्यासाठी शिवाजी आणि संभाजी महाराज मुस्लिमविरोधी होते, हे दाखवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र धर्म संपवणाऱ्या राजकारणाविरुद्ध संघटित झालेल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये पुन्हा एकदा फूट पाडून आपल्या राजकारणासाठी भावनिक आवाहन करून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा आक्रमकपणे प्रयत्न केला जात आहे. या पद्धतीने आपल्या मुद्द्यावर लोक आपल्या बाजूने आल्याची खात्री होईपर्यंत मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे लांबणीवर टाकल्या आहेत. कार्पोरेटच्या हिताचे राजकारण करणाऱ्या, हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असणाऱ्या राजकारण्यांनी शिवाजी महाराज, संभाजीराजे यांचा प्रतीक म्हणून आक्रमकपणे वापर सुरू केला आहे. जगण्याचे प्रश्न सोडविण्यामध्ये अपयशी ठरलेली मंडळी आता लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. महागाई, बेकारी, शिक्षणाचे बाजारीकरण, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, एसटी महामंडळासह सर्वच महामंडळांचे चाललेले वाटोळे, आर्थिक दिवाळखोरी या सगळ्यामुळे वाढत असलेल्या क्षोभावर भावनिक उन्मादाचा उतारा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अरबी समुद्रातील शिवस्मारकाविषयी बोलले जात नाही. महाराजांचा अलीकडे मालवण इथे जो पुतळा पडला त्यातील भ्रष्टाचाराचे काय झाले? हे सांगितले जात नाही. आग्रा येथे स्मारक उभारण्याच्या घोषणा केल्या जातात. पण पुढे काही होत नाही. मराठी माणसांच्या हृदयाजवळ असणाऱ्या शिवाजी महाराजांचा आपल्या राजकारणासाठी वापर करणाऱ्या प्रवृत्तीचा कावेबाजपणा मराठी माणसाने वेळीच ओळखावा आणि जगण्याच्या समस्यांवर प्रश्न विचारण्यासाठी सज्ज व्हावे. स्त्रियांना सुरक्षा आणि सन्मान देणे, धार्मिक सलोखा राखणे, भ्रष्टाचार करणाऱ्यांना वेळीच शिक्षा देणे आवश्यक आहे. अठरापगड जातींच्या आणि सर्व जाती-धर्मातील मराठी माणसाने शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी केलेल्या आज्ञेनुसार महाराष्ट्र घडवावा. महाराष्ट्र धर्माप्रमाणे आपले वर्तन ठेवणे हीच महाराजांना कृतिशील अभिवादन असेल.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक