कुरघोडीचे राजकारण!

निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपच्या वर्चस्वासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले
कुरघोडीचे राजकारण!

भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यामध्ये भाजपचे नेते आणि पदाधिकारी यांच्यापुढे बोलताना, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेला जागा दाखवून देण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन केले. शिवसेनेने भाजपचा; तसेच जनतेचा कसा विश्वासघात केला, यावर आपल्या भाषणातून त्यांनी प्रकाश टाकला. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, याचा पुनरुच्चार अमित शहा यांनी केला. शिवसेनेने केलेल्या विश्वासघाताबद्दल, त्या पक्षास त्यांची जागा दाखवून द्यायला हवी, असे ते म्हणाले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपच्या वर्चस्वासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. राजकारणामध्ये सर्व काही सोसा; पण दगाबाजी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे सांगून २०१९च्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे आणि आपल्यात जी चर्चा झाली, त्या चर्चेचा तपशील पदाधिकाऱ्यांपुढे उघड केला. तसेच २०१४च्या निवडणुकीच्या दरम्यान केवळ दोन जागांवरून शिवसेनेने युती तोडल्याची आठवण अमित शहा यांनी करून दिली. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये भाजपने १५० जागा मिळविण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला जास्त जागा मिळाल्या असतानाही शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगितला होता. ‘मातोश्री’वर बंद खोलीत अमित शहा यांनी तसा शब्द आपणास दिला होता, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपशी प्रदीर्घ काळ असलेली युती मोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याशी युती करून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणले. या मार्गाने राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार, हे उद्धव ठाकरे यांनी सत्यात आणून दाखविले. अमित शहा यांनी शिवसेनेने विश्वासघात केला, असे म्हटले आहे तर उद्धव ठाकरे हे भाजपने विश्वासघात केला, असे म्हणत आहेत. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, कोणती आश्वासने दिली गेली, याबद्दल हे दोघेच खरे काय ते सांगू शकतील; पण त्यानंतर राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. ते अडीच वर्षे सत्तेवर राहिले; पण शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्याने ठाकरे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आले. शिवसेनेत जी फूट पडली, त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही. उद्धव ठाकरे यांना असलेल्या सत्तेच्या लालसेमुळे त्यांचा पक्ष फुटला, हे अमित शहा यांनी लक्षात आणून दिले; पण अमित शहा यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याची, जागा दाखवून देण्याची जी भाषा वापरली, त्या भाषेस शिवसेना नेत्यांनी तेवढ्याच प्रखर शब्दात उत्तर दिले आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते अरविंद सावंत यांनी, शिवसेनेने धोका दिल्याचा कांगावा अमित शहा करीत असले, तरी कोणी कोणाला धोका दिला आहे हे देशाने पहिले आहे, असे सांगून भाजप सध्या हवेत असून लवकरच त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे म्हटले आहे. भाजपच्या घोषणांना मुंबईचा नागरिक भुलणार नाही. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप भुईसपाट होणार असल्याचे भाकित त्यांनी व्यक्त केले. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी, अमित शहा यांच्या विधानावर शिवसेनेला धोका देणाऱ्या ४० आमदारांनी भाष्य करावे, मी यावर काही भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली; पण अमित शहा यांचे वक्तव्य लक्षात घेता, आम्हाला वेगळे पाडण्याचे कारस्थान रचले गेले होते, ते यानिमित्ताने बाहेर आले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी, शिवसेनेने याआधीच मुंबई महापालिका निवडणुकीत १५० जागा जिंकण्याची घोषणा केली होती. भाजपनेते अमित शहा यांनी त्याची ‘कॉपी’ केली, असे म्हटले आहे. अमित शहा यांचे वक्तव्य, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अभी नहीं, तो कभी नहीं’, या आवेशात मुंबई महापालिका निवडणुका लढण्याचे केलेले आवाहन पाहता, मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून खेचून घेण्याचा निर्धार भाजपने केला असल्याचे दिसून येते. मुंबईत खरी शिवसेना आपल्यासमवेत असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. सध्या राज्यात शिंदे गट आणि भाजप सत्तेवर आहे. त्या जोरावर मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकेल, असे भाजपला वाटत आहे; पण यासंदर्भात ज्या कायदेशीर लढाया सुरू आहेत, त्याचे निष्कर्ष काय येतात, त्यावर खूप काही अवलंबून आहे. तोपर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे हे राजकारण असेच सुरू राहणार आहे!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in