विशेष
- शिवराजसिंह चौहान
गेल्या १०० दिवसांत ११ लाख महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अथक परिश्रम घेत आहे. बचत गटाच्या माध्यमातून या महिला राष्ट्र उभारणीच्या कामात आपला मोलाचा वाटा उचलत आहेत. देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठीच ‘बँक सखी’, ‘कृषी सखी’, ‘पशु सखी’, ‘नमो ड्रोन दीदी’ यासारखे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘सुकन्या समृद्धी’ यासारख्या योजनांच्या माध्यमातून क्रांतिकारी बदल घडून येत आहेत.
प्रिय भगिनींनो, कोणत्याही महिलेच्या डोळ्यात अश्रू असू नयेत, हाच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यासाठीच तर त्यांनी 'लखपती दीदी' ही मोहीम सुरू केली. आता देशभरात वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या भगिनींची संख्या एक कोटींपेक्षा जास्त झाली आहे, तर गेल्या १०० दिवसात अशाच प्रकारच्या ११ लाख महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या अभियानात विशेषत: ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरांमधील महिला सातत्याने जोडल्या जात आहेत. आणि बचत गटांच्या माध्यमातून त्या राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत आपला सहभाग देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने लवकरच आणखी तीन कोटी महिला 'लखपती दीदी' बनतील. सरकार सातत्याने काम करत आहे आणि गेल्या दहा वर्षांत महिलांच्या कल्याणाच्या बाबतीत तर सरकारने निश्चितच अभूतपूर्व प्रगती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाला लाभलेले असे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी महिलांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरण सुनिश्चित केले आहे.
महिला या खऱ्या अर्थाने समाजाची आणि राष्ट्राची धुरा आहेत. त्या आपल्या वैभवशाली आणि समृद्ध भविष्याचा पाया आहेत. म्हणूनच तर महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय समृद्ध राष्ट्राची कल्पनाही आपण करू शकत नाही. या जाणिवेनेच तर आपले पंतप्रधान महिला सक्षमीकरणाच्या मुद्याचा वारंवार उल्लेख करतात. इतकेच नाही तर त्यांनी महिलांचा सर्वंकष विकासाला आणि महिलांचे जीवनमान उंचावण्याला आपल्या जगण्याचेच ध्येय बनवले आहे. 'लखपती दीदी' हे पंतप्रधानांच्या याच संकल्पाचे फलित आहे.
जर महिला सक्षम झाल्या तरच कुटुंब सक्षम होईल. आणि कुटुंब सक्षम झाले तरच समाज सक्षम होईल. जेव्हा समाज सक्षम होईल तेव्हा राज्य आणि देश सक्षम होईल. आणि आता ‘लखपती दीदी अभियाना’च्या माध्यमातून असंख्य पिढ्या समृद्धीला स्पर्श करू लागल्या आहेत, सक्षम होऊ लागल्या आहेत आणि त्यामुळेच तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांनी बचत गटांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये इतका निधी ‘फिरता निधी’ म्हणून जमा केला आहे. इतकेच नाही, तर आपल्या भगिनी लवकर ‘लखपती दीदी’ व्हाव्यात, यादृष्टीने या भगिनींना बँकांकडून कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून पाच हजार कोटी रुपयांचा कर्ज निधीही वितरीत केला आहे.
आपले पंतप्रधान नेहमीच सांगत असतात की, आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी देशातील प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणे खूपच गरजेचे आहे. याची जाणीव ठेवूनच आपले सरकार देशभरातील महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी शक्य त्या सर्व दिशेने काम करत आहे. ‘बँक सखी’, ‘कृषी सखी’, ‘पशु सखी’, ‘नमो ड्रोन दीदी’ हे सर्व उपक्रम म्हणजे याच दिशेने उचलण्यात आलेली काही महत्त्वाची पावले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्या जोडीनेच महिलांसाठी स्वयंरोजगारासह सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबतीत सक्षम होण्यासाठीच्या नवीन संधीही निर्माण होतात. खरे तर, या उपक्रमांमधून महिलांची प्रगती करण्याच्या सरकारच्या संकल्पाचे प्रतिबिंबच दिसत आहे, असेही निश्चितच म्हणता येईल. आज आपल्या ‘लखपती दीदी’ शेती सोबतच बिगर कृषी व्यवसाय तसेच कुटीर उद्योगांकडे वळू लागल्या आहेत. इतकेच नाही तर त्या पोषण, स्वच्छता मोहिमा, वाहतूक क्षेत्र आणि इतर व्यवसायांशी जोडल्या जाऊन अधिक सक्षम होऊ लागल्या आहेत.
खरे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हापासूनच ते महिलांच्या कल्याणासाठी काम करत आले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी आपल्या भगिनींच्या, मुलींच्या सर्वंकष विकासासाठी ‘नारी गौरवनीती’ नावाची एक योजना सुरू केली होती. आपल्या भगिनी स्वतंत्र, स्वावलंबी, सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला हव्यात यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. यामुळेच तर या भगिनींनी स्वतःच सिद्ध करुन दाखवले आहे की, त्या अबला नाहीत तर सबला आहेत. त्या कुणावरचे ओझे नाहीत, तर त्या वरदान आहेत. आजच्या घडीला देशभरातील सुमारे ९२ लाख बचत गटांसोबत तब्बल दहा कोटी भगिनी जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून आपल्या बहिणींनी स्वत:च्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे आणि आता त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू लागल्या आहेत.
आपले पंतप्रधान कायमच आपल्या भगिनींच्या जीवनात आनंद आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. म्हणूनच तर त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने महिलांसाठी कितीतरी योजना सुरू केल्या आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘सुकन्या समृद्धी’ यासारख्या मोहिमांच्या माध्यमातून तर आपल्या देशातले लिंगगुणोत्तर प्रमाण लक्षणीयरित्या सुधारून या बाबतीत देशात क्रांतिकारी बदल घडून आले असल्याचे आपल्या कोणालाही नाकारता येणारच नाही.
‘उज्ज्वला योजने’च्या माध्यमातून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशभरातील दहा कोटी भगिनींना आनंदाच्या क्षणांचा प्रत्यक्ष अनुभव दिला आणि स्वयंपाकघरातील धुरापासून त्यांना खऱ्या अर्थाने मुक्ती मिळवून दिली. आणि आजच्या घडीला ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ आणि ‘जनधन योजने’च्या माध्यमातून हाच आनंद थेट कोट्यवधी भगिनींच्या बँक खात्यांपर्यंत पोहोचला आहे. ‘जलजीवन अभियाना’सारख्या अभूतपूर्व प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातल्या आपल्या बहिणींना देखील नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळू लागले आहे. या अभियानामुळेच आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आणि स्वच्छ पाणी मिळणे आता त्यांच्यासाठी सुलभ झाले आहे. गरोदरपणाच्या काळात महिलांना दिल्या जाणाऱ्या रजेचा कालावधी वाढवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय अभूतपूर्वच आहे आणि त्याचा थेट लाभ आता नोकरदार महिलांना होतो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, हे मला इथे मुद्दाम नमूद करावे लागेल. त्यापैकीच एक म्हणजे त्यांनी आपल्या मुलींसाठी सैनिकी शाळांची दारे खुली केली आणि अशा प्रकारच्या निर्णयांमुळेच तर आपल्या लष्करात महिलांचे प्रतिनिधित्व वाढू लागले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळेच भारतीय लष्करात उच्च पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊन नवीन भरतीचे दरवाजेही खुले झाले आहेत. त्रिवार तलाक विरोधातील कायदा आणून त्यांनी देशातील मुस्लीम महिलांना नवे हक्क प्रदान केले. त्यामुळे आज त्यांची स्थिती बदलली आहे. खरे तर, हे सर्व निर्णय म्हणजे आपल्या पंतप्रधानांच्या संवेदनशील वृत्तीचे आणि दूरदृष्टीचेच प्रतिबिंब आहेत. क्रीडा क्षेत्रातही आपल्या महिलांनी मोठी झेप घेतली आहे. आज विशेषत: ‘खेलो इंडिया’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांमधील नवनव्या प्रतिभा उदयाला येऊ लागल्या आहेत हे आपण सगळेच पाहत आहोत. त्यामुळेच तर ऑलिम्पिकसारख्या जागतिक व्यासपीठावर आपल्या महिला खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव उंचावून दाखवले आहे.
खरे तर, आपल्या स्वतंत्र भारताच्या या महत्त्वाच्या सुवर्ण युगात (स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत काळ) महिला सक्षमीकरण आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या वाढत्या सहभागासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी वचनबद्धतेच्या भावनेतूनच कार्यरत आहेत. महिलांचे राजकीय सक्षमीकरण आणि त्यांच्या राजकीय हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणलेला ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचीच साक्ष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महिला कल्याणकारी योजना सुरु केल्या. आता देशभरातील महिलांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचल्याचेही आपण पाहतो आहोत. पंतप्रधानांनी घेतलेल्या या पुढाकारामुळेच देशभरातील महिलांना आपले जगणे सुलभतेने जगण्याची संधी मिळाली असल्याचे आपल्याला नाकारता येणार नाही. खरे तर, आपल्या मुली या गंगा, गीता, गायत्री या नद्यांसारख्याच आहेत; त्या म्हणजे जणू काही सीता, सत्य आणि सावित्री आहेत. त्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती अशा देवींचे रुप आहेत. त्यांच्याशिवाय हे विश्व कार्यच करू शकत नाही. कुटुंबापासून पंचायतीपर्यंत, शिक्षणापासून अर्थकारण तसेच उद्योगांपर्यंत प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला आपली ही ‘नारी शक्ती’ नवे आयाम मिळवून देत आहे. स्टार्टअपपासून अंतराळ क्षेत्रापर्यंत प्रत्येक बाबतीत आपल्या देशातील महिलांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे आणि आपला तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.
आपल्या पंतप्रधानांचे आणखी एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ते अहोरात्र निर्धारपूर्वक अथक परिश्रम घेतात. आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी तीनपट अधिक उत्साहाने आणि ऊर्जेने काम करणार असल्याचे ते लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात बोलले, ते आपण सगळ्यांनीच ऐकले आहे. मी आपल्या सगळ्या ‘लखपती दीदीं’ना आवाहन करू इच्छितो की, ज्या प्रमाणे आज त्या स्वतःसाठी कार्यरत आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पंतप्रधानांच्या सोबतीने दुप्पट उत्साहाने काम करावे. आपल्या पंतप्रधानांनी संकल्प केला आहे की, देशाला दारिद्र्यमुक्त राष्ट्र बनवू. त्यांनी पाहिलेले हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, एवढे नक्की.
खरे तर, कोणताही यज्ञ हा स्त्री शिवाय अपूर्णच आहे ही कालातीत बाब आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलीच आहे. त्याचप्रमाणे महिलांचे सर्वंकष कल्याण, प्रगती आणि सक्षमीकरण हे विकसित भारताच्या ध्येयाशी जोडलेले आहे याची जाणीव आपल्या प्रत्येकालाच ठेवावी लागेल. या अनुषंगाने पाहिले तर एक गोष्ट ठळक आणि सुस्पष्ट आहे. ती म्हणजे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या माता, भगिनी आणि मुलींच्या कल्याणासाठी जे काम केले जात आहे, त्या कामातून विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला एक दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. आज आपल्या माता-भगिनी आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर होत असून या प्रक्रियेतूनच विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्ष साकारले जात असतानाचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत. त्यामुळेच तर आताची ही वेळ भारताच्या उदयाची आणि भारताच्या नारी शक्तीचीच असल्याचे अवघे जगही म्हणत आहे.
(या लेखाचे लेखक केंद्रीय ग्रामविकास तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहेत)