अव्यवस्थेचे सीमोल्लंघन होऊ द्या !

शेवटी भरती झाल्यापासून तिसेक तासानंतर श्वासासाठी तडफडणाऱ्या वैष्णवीची मृत्यूची झुंज संपली.
अव्यवस्थेचे सीमोल्लंघन होऊ द्या !

भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या इस्पितळांपैकी एक असलेल्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील वैष्णवी राजू बागेश्वर या अत्यवस्थ मुलीला १५ सप्टेंबरला या इस्पितळातील वॉर्ड क्रमांक ४८ मध्ये दाखल केले गेले. तिची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती. तिला श्वसनाचा त्रास होत होता. तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. तिच्यावर उपचार सुरू असताना तिला कृत्रिम श्वासोस्वास देण्याची गरज होती. पण त्या वॉर्डातील दोन्ही व्हेंटिलेटर बिघडले होते. इस्पितळातील अन्य वॉर्डातून व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपातील तिला अंबू बॅगची व्यवस्था पुरवण्यात आली. ही व्यवस्था तिचा जीव वाचवण्यास पुरेशी नसल्याने तिचे माता पिता तिचा जीव वाचवण्यासाठी 'व्हेंटिलेटर द्या' म्हणून विनवण्या करीत होते. अखेरपर्यंत तिला व्हेंटिलेटर पुरवण्यात आले नाही. शेवटी भरती झाल्यापासून तिसेक तासानंतर श्वासासाठी तडफडणाऱ्या वैष्णवीची मृत्यूची झुंज संपली. आणि प्रगत, समृद्ध, अत्याधुनिक, पुरोगामी महाराष्ट्रात एका कोवळ्या मुलीचा व्हेंटिलेटर अभावी नाहक जीव गेला ."

" परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात असलेले माहेर हे पाचशे लोकसंख्या असलेले गाव ! गाव तसं चांगलं, पण तेथे जाणे-येण्यास चांगला रस्ताच नाही. गावकऱ्यांनी रस्त्यासाठी उपोषण केले, आंदोलने केली, निवेदन दिली, भेटी घेतल्या, परंतु पदरी आश्वासनांपलीकडे काहीच पडले नाही. सद्य:स्थितीत बाणेगाव थांबा ते माहेर तीन किलोमीटर रस्त्यावर आठ महिने दोन-तीन फूट चिखल असतो. या चिखलातून वाट काढत तालुका,जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे, ग्रामस्थांना अवघड होऊन बसले आहे.आजारी रुग्णाला औषधोपचारासाठी गावाबाहेर नेणे केवळ अशक्य होते. तीच गत शाळकरी मुलांची ! अखेर संतापलेल्या गावकऱ्यांनी गावच विकायला काढले आहे गावासोबत घर, शेती वाडीवरही बोली लावण्याचा निर्णय माहेरकरांनी घेतला आहे. प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्रातील हे दुसरे विदारक वास्तव !"

"शाळांच्या धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील वाळवी गावात बांबूपासून बनवलेल्या भिंती व ताडीच्या झाडाच्या बुंध्याला फळ्यासारखा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची वेळ तेथील शिक्षकांवर आली आहे. शैक्षणिक दृष्ट्या विकसित आणि प्रगत राज्यातील शिक्षणाचे हे संतापजनक वास्तव !"

नाशिक आणि नगर जिल्ह्यात आदिवासी मुलांना वेठबिगारीसाठी राबविण्याचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी बालकांची ही पाचशे ते हजार रुपयांना विक्री झाल्याची उघड झाले आहे. जव्हारच्या दोन धनिकांनी मेंढ्या चारण्यासाठी बारा हजार रुपये, एका मेंढरूच्या बोलीवर दोन आदिवासी अल्पवयीन मुलींना गहाण ठेवून घेतले. त्यातील एका मुलीला त्यांनी अचानक जव्हारला परस्पर आणून सोडले तर दुसरी मुलगी बेपत्ता आहे. प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्रातील आदिवासींवर बतलेल्या परिस्थितीची ही संतापजनक आणि विदारक मन विषण्ण करणारी कहाणी !"

"महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता नागरिकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून गेल्या दोन वर्षात तब्बल ६० हजार ४३५ महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशला मागे टाकत महिला गायब होण्यामागे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असणे ही चिंतेची बाब आहे."

कळमनुरी तालुक्यातील धांडे पिंपरी खुर्द रस्त्यावरील ओढ्याला पूर आला आणि बाळापूर ते कानेगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. गावातील वृद्ध संभाजीराव धांडे यांना दवाखान्यात नेण्यासाठी चिखलाचा मार्ग निवडावा लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना झोळीत टाकून चिखल तुडवत बाळापुरच्या दवाखान्यात नेण्यात आले. परंतु त्या आधीच रस्त्यातच त्यांनी प्राण सोडला. गावाला जोडणारा चांगला रस्ता असता तर कदाचित संभाजीराव वाचले असते."

"मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा न्यावी लागत आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिवासह गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नदीतून जावे लागते. मृत्यूनंतरची परवड थांबण्यासाठी गावकरांनी प्रशासनाला अनेकदा साकडे घातले. पण अजून तरी न्याय मिळालेला नाही."

"एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडीला रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेची घरातच प्रसूती करण्याची वेळ आली. तिने जुळ्या बालकांना जन्म दिला. मात्र काही वेळात दोन्ही बालके उपचाराअभावी दगावली. मातेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला तीन किलोमीटर डोंगर कपारीतून भर पावसातून खोडाळा येथील उपकेंद्रात न्यावे लागले ."

"नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील देवळाचा पाडा गावाला जोडणारा कहांडोळ पाडा ते देवळाचा पाडा दरम्यान रस्ताच नसल्याने पालकांना आपल्या मुलांना शाळेत नेण्यासाठी कधी खांद्यावर तर कधी मोठ्या भांड्यात बसवून नदीच्या छातीपर्यंत लागणाऱ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करून शहर गाठावे लागत आहे."

" पिकाला हमीभाव नाही, देणेकरी मागे लागले आहेत, राज्य सरकार कांद्याला योग्य भाव देत नाही, टोमॅटोला भाव मिळत नाही, कोरोनामुळे झालेले नुकसान तसेच अतिवृष्टीचा फटका शेतीमालाला बसला आहे. हातात पैसे नाहीत, देणेकरी थांबायला तयार नाहीत, आम्ही करायचे तरी काय ते सांगा ? आम्ही दाद तरी कोणाकडे मागायची ? तुमच्या नाकर्तेपणामुळे मी आत्महत्या करीत आहे असे शुभेच्छापत्र पंतप्रधानांच्या वाढदिवसाला लिहून दशरथ लक्ष्मण केदारी या जुन्नर तालुक्यातील वडगावच्या शेतकऱ्याने वडगाव आनंद जवळ रानमळा परिसरात शेततळ्यात उडी घेऊन आपला जीवन प्रवास संपविला ."

वरील साऱ्या घटना काय सांगताहेत ? या राज्यातील साऱ्या व्यवस्था उत्तम आहेत अशा सांगणाऱ्या या घटना आहेत काय ? या घटना या राज्यातील अव्यवस्था दर्शविणा-या आहेत. महाराष्ट्र राज्य प्रगत, समृद्ध ,संपन्न, पुरोगामी आहे असे जे आवाजी दावे केले जातात त्यांना छेद देणाऱ्या या घटना आहेत. वरील घटना या केवळ प्रातिनिधीक आहेत. अशा घटना रोजच घडत आहेत. त्यांच्या मन विषण्ण करणाऱ्या आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या बातम्या रोजच येत आहेत. परंतु त्या राज्यकर्त्यांच्या खिजगणतीत ही नाहीत. त्यामुळे दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन करायचे असेल तर ते प्रथम या अव्यवस्थेचे करावयास हवे. राज्यातील ही अव्यवस्था लोकांच्या जगण्यावर उठलेली आहे. आरोग्य असेल, शिक्षण असेल, महिलांची सुरक्षा असेल, वेठबिगारी असेल, बालमजुरीची समस्या असेल, शेतकऱ्यांची समस्या असेल सर्वच क्षेत्रात अजून अंधःकारच आहे. जनतेच्या नशिबी सुराज्य नाही तर अजून भोगच आहे! स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असली तरी देखील त्या स्वातंत्र्याची फळे अजून राज्यातील कोट्यावधी लोकापर्यंत पोहोचलेली नाहीत हे दर्शवणारे या घटना आहेत. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील दैनावस्था तर अतिशय भीषण आहे. कोरोना महामारीच्या काळात राज्यातील आरोग्य सेवेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असल्या तरी त्यातून आम्ही अजून फारसा धडा घेतलेला दिसत नाही. तसा तो धडा घेतला असता तर नागपूर मध्ये एका निष्पाप जीवाचा व्हेंटिलेटर अभावी जीव गेला नसता. आरोग्य अनास्था व दैनावस्थेमुळे राज्यात कितीतरी बळी जात असतील. परंतु त्याची मोजदाद होत नाही. कारण सामान्य माणसाच्या जीवाची किंमत आहे तरी कोणाला ? स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील प्रगत, समृद्ध समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात तेही मुंबईच्या उंबरठ्यावर राहणाऱ्या आदिवासींवर पोटच्या पोरांना विकायची वेळ येत असेल तरीही राज्यातील सारी व्यवस्था उत्तम आहे असे म्हणायचे ? खरंतर अशा प्रकारच्या घटनांना रोज सामोरे जाणाऱ्या आणि त्या घटनांपासून हळहळणाऱ्या जनतेचा राज्यातील उत्तम व्यवस्थेवरील विश्वासच उडाला आहे. जनतेला काय हवे आहे? तर जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान मूलभूत सोयी सुविधा ! परंतु त्याही देण्यात आम्ही अपयशी ठरलोय हेच दर्शविणाऱ्या या घटना आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला आवश्यक असणा-या व्यवस्था पोहोचविण्यात जेथे जेथे म्हणून अडथळे असतील ते दूर करून त्या व्यवस्था जनतेपर्यंत पोहोचू द्या. दसऱ्यानिमित्त या अव्यवस्थेला झिडकारत व्यवस्थेकडे जाणारे सीमोल्लंघन होऊ द्या ! हेच जनतेच्या हिताचे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in