पत्र एका एकनिष्ठाचे

सुरुवातीला माझं नाव सोमाजी होतं; पण जशी मला थोडी समज आली, तसं माझ्या लक्षात आलं की
पत्र एका एकनिष्ठाचे

प्रति,

माननीय, आदरणीय, वंदनीय अजूनतरी) आजी पक्षप्रमुख, (तात्पुरते) माजी मुख्यमंत्री व सर्वात, सर्वात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे (आमच्या शाळेतले गुर्जी शिकवणीच्या मुलांना परीक्षेच्या आधी जसे वहीत vimp लिहून देत असत तसे) बाळासाहेबांचे एकमेवाद्वितीय सुपुत्र उधोजीराजे बाळासाहेब ठाकरे यांसी (मूळ पुरुषाच्या, मूळ गटाचा) एकनिष्ठ शिवसैनिक भास्करसुत भास्कर फुटकळ याचा कमरेत वाकून जय महाराष्ट्र. माझं नाव वाचून तुमचा थोडा गोंधळच उडाला असेल ना? (तसा तुमचा तो प्रत्येकच बाबतीत उडतो, असं ते नतद्रष्ट कमळ पार्टीवाले बोलतात. आपण लक्ष देऊ नये.) तसा माझ्या नावाचा थोडा गोंधळच आहे. सुरुवातीला माझं नाव सोमाजी होतं; पण जशी मला थोडी समज आली, तसं माझ्या लक्षात आलं की, बापाच्या नावाशिवाय आपल्याला कोणी ओळखत नाही; मग मात्र मी स्वतःहून माझं नाव बदलून भास्करसुत ठेवून घेतलं. लोकांना कळायला नको आपण कोणाचे पुत्र आहोत ते? तरी काही ‘अडाण्यां’च्या डोक्यात प्रकाश पडणार नाही, या भीतीपोटी मी नेहमीच माझं पूर्ण नाव लिहित आणि बोलत असतो, भास्करसुत भास्कर फुटकळ. साहेब, आमची पूर्ण खानदान तुमच्या खानदानीशी एकनिष्ठ आहे. (संदर्भासाठी व खात्री पटविण्यासाठी आम्ही लिहून दिलेले मूळ प्रतिज्ञापत्र पाहावे. सोबत आपल्या अवलोकनार्थ सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडलेली आहे.) आमचं नाव जरी ‘फुटकळ’ असलं तरी धंदे मात्र आम्ही मोठमोठे करतो. माझा बाप (अतिक्रमणाच्या जागेवर) ‘झुणका भाकर केंद्र’ चालवत होता. मी स्वतः (त्याच अतिक्रमणाच्या जागेवर) ‘शिव वडापाव’ची गाडी लावत होतो. आता माझं पोरगं ( त्याच अतिक्रमणाच्या जागेवर) ‘शिवभोजन थाळी’ विकतोय. समदी तुमची कृपा.

आता मला बी त्या दुसऱ्या गटात बोलवत होते; पण मी म्हटलं, ‘आम्ही (तुमच्यासारखेच) अडाणी असलो म्हणून काय झालं? आम्ही साहेबांशी गद्दारी नाही करणार. ज्यांनी आम्हाला रोजीरोटी दिली त्यांच्याशी आम्ही गद्दारी नाही करणार.’ साहेब, तुम्ही येवढे मालदार, दिलदार. तुम्ही किती जणांना काय काय दिलं.

ज्यांची डझनभर संत्री घ्यायची ऐपत नव्हती, त्यांना तुम्ही मंत्री केलं. जे रिक्षात ‘सिटा’ बसवत होते, त्यांना तुम्ही ‘सीट’ दिली. जे पानाच्या ‘गादी’वर बसत होते, त्यांना तुम्ही सत्तेच्या ‘गादी’वर बसवलंत. तरी त्यांनी घालायचा तो गोंधळ घातलाच. साहेब, हे सगळे ‘गोंधळी’ गोहाटीला त्या कामाक्षी देवीच्याच दर्शनाला का गेले होते, सांगू का? साहेब, गोंधळी समाजाची कुलस्वामिनी आहे ती कामाक्षी देवी! समजलं?

साहेब, त्या समोरच्या गटाचं चिन्ह मला काही चांगलं दिसत नाही. ते आता आपलंच ‘चिन्ह’ पळवतील, असं दिसतंय. तुम्ही काय बी काळजी करू नका साहेब, ‘चिन्हा’चा निकाल पितृपक्षात येणार आहे, म्हणजे तो नक्कीच आपल्याच बाजूने येणार आहे! कसं, ते आपल्या किशोरीताईंना विचारा. आणि जरी काही विपरीत घडलं तरी या येड्यांनी आपली ‘पेग्विन’ म्हणून इतकी प्रसिद्धी करून ठेवली आहे की, आता आपण ‘पेंग्विन’ हेच निवडणूक चिन्ह घेऊन टाकावं, असं मला वाटतं. तसं केलं तर पोस्टरवर बाळराजेंच्या फोटोची गरजच उरणार नाही. एकीकडे आपला फोटो आणि दुसरीकडे पेंग्विन आपण बघता बघता मैदान मारू (हे मैदान म्हणजे शिवाजी पार्क मैदान नाही, मी निवडणुकीचं मैदान म्हणतोय याची कृपया नोंद घ्यावी.) आणि एकदा का तुम्ही परत मुख्यमंत्री झालात की, पेंग्विनला आपल्या महाराष्ट्राचा ‘राष्ट्रीय पक्षी’ घोषित करून टाकू! (साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष जर ‘राष्ट्रीय पक्ष’ होऊ शकतो तर आपल्या महाराष्ट्राने घोषित केलेला पक्षी ‘राष्ट्रीय पक्षी’ का होऊ शकत नाही?)

साहेब, दसरा मेळाव्यासाठी त्या ‘शिवतीर्थ’चं काही टेन्शनच घेऊ नका. त्याचा फैसला व्हायचा तो होईल; पण आपल्या सैनिकांपर्यंत आपलं ‘विचारांचं सोनं’ पोहोचेलच याची मला पूर्ण खात्री आहे. आपल्याला ‘शिवतीर्थ’ देणं ‘ते’ नाकारू शकतात; पण ‘फेसबुक लाईव्ह’पासून आपल्याला कोण रोखणार आहे? आपण बाळासाहेबांचे पुत्र आहात, (हो, आहातच मुळी.) त्यामुळे ‘शिवतीर्था’वर आपलाच ‘वडिलोपार्जित’ हक्क आहे. (आमचंच उदाहरण बघा ना, तीन पिढ्यांपासून आम्ही एकाच अतिक्रमित जागेवर बसलो आहोत.) ‘शिवतीर्थ’ आपल्याला मिळालंच पाहिजे.

जय महाराष्ट्र.

आपला एकनिष्ठ सैनिक

भास्करसुत भास्कर फुटकळ

ता. क. - ‘त्यांनी’ दसरा मेळाव्यासाठी आपल्याला ‘शिवतीर्थ’ देण्याचं नाकारलं तर आपण आपला दसरा मेळावा चुलतराजेंच्या ‘शिवतीर्था’वर घ्यायचा का ? - भा.भा.फ.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in