सुनो द्रौपदी, अब गोविंद ना आएंगे...

सुनो द्रौपदी, अब गोविंद ना आएंगे...

बदलापूर येथील घटनेच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले असताना त्यांना पोलिसी बळाचा वापर करून पांगवण्यात आले आणि सत्ताधाऱ्यांनी याला विरोधकांचे राजकीय आंदोलन म्हणून संबोधले.
Published on

- ॲड. हर्षल प्रधान

मत आमचेही

बदलापूर येथील घटनेच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले असताना त्यांना पोलिसी बळाचा वापर करून पांगवण्यात आले आणि सत्ताधाऱ्यांनी याला विरोधकांचे राजकीय आंदोलन म्हणून संबोधले. यातच त्यांच्या विकृत मानसिकतेचा परिचय होतो. महाराष्ट्रातील मायभगिनी शासनाकडून ‘सुरक्षित बहीण’ असण्याची अपेक्षित करत आहेत आणि सरकार मात्र ‘लाडक्या बहिणी’ला दिलेल्या १५०० रुपयांचे स्तुतिपाठ म्हणण्यात मग्न आहेत. महाराष्ट्राची इतकी वाईट अवस्था यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. आता मायभगिनीच रस्त्यावर उतरून स्वसंरक्षणाचे हत्यार उपसतील, अशी स्थिती आहे.

सुनो द्रौपदी ! शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे,

छोड़ो मेहंदी खड्ग संभालो,

खुद ही अपना चीर बचा लो..

द्यूत बिछाए बैठे शकुनि, मस्तक सब बिक जाएंगे,

सुनो द्रौपदी ! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे...

कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से,

कैसी रक्षा मांग रही हो, दुःशासन दरबारों से...

स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं, वे क्या लाज बचाएंगे,

सुनो द्रौपदी ! शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे...

कल तक केवल अंधा राजा, अब गूंगा-बहरा भी है,

होंठ सिल दिए हैं जनता के, कानों पर पहरा भी है..

तुम ही कहो ये अश्रू तुम्हारे, किसको क्या समझाएंगे?

सुनो द्रौपदी ! शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे...

कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची ही कविता सध्या समाजमाध्यमावर चांगलीच चर्चेत आहे. या कवितेचा राजकारणासाठी उपयोग करू नये अशी भावना त्यांनी मागे निर्भया प्रकरण घडल्यानंतर व्यक्त केली होती. पण आता एका आठवड्यात दहा घटना घडल्यावर जनतेनेच उत्स्फूर्तपणे या कवितेला जनसागरापर्यंत नेले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्रात आठवड्यात दहा घटना

एका आठवड्यात महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचाराच्या दहा घटना समोर आल्या आहेत. शासन व्यवस्था कोलमडून पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तरीही शासन व्यवस्था सांभाळणारे यातही राजकारण करू पाहत आहेत. प्रशासनावर वचक नसलेले, स्वतःच्या राजकीय स्वार्थापलिकडे काही दिसत नसलेले राजकारणी सत्ता चालवू लागले की काय होते हे या निमित्ताने देशाने पाहिले. एका आठवड्यात अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या घटना ऐकताना राज्यातील प्रत्येकाचे मन विषण्ण झाले.

  • १३ ऑगस्ट, बदलापूर (दोन चिमुकल्या)

  • १५ ऑगस्ट, पुणे (अल्पवयीन मुलगी)

  • २० ऑगस्ट,अकोला (शिक्षकाकडून सहा विद्यार्थीनींचा विनयभंग)

  • ठाणे - गतिमंद मुलीवर अत्याचार

  • २० ऑगस्ट, लातूर (साडेचार वर्षांच्या मुलीची छेडछाड)

  • २४ ऑगस्ट, नाशिक (साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण व अत्याचार)

  • २१ ऑगस्ट, मुंबई (अपंग अल्पवयीन मुलगी)

  • २१ ऑगस्ट, पुणे (अल्पवयीन मुलगी)

  • २२ ऑगस्ट, नागपूर (८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार)

  • २२ ऑगस्ट, कोल्हापूर (१० वर्षीय मुलीवर बलात्कार व हत्या)

इतक्या खुलेआम राज्यभर या घटना घडत असताना प्रशासन आणि पोलीस यंत्रणा हे दोन्ही जबाबदार घटक सुस्तपणे याकडे पाहत राहिले आणि म्हणूनच बदलापूर येथे जनभावनेचा उद्रेक झाला.

भारतीय दंड संहिता अधिक कडक करण्याची हीच वेळ

भारतात बलात्कार हा दखलपात्र गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेमध्ये कलम ३७५ मध्ये बलात्काराची व्याख्या केली आहे. सदर कलमात गुन्ह्याची आणि शिक्षेची चर्चा करण्यात आली आहे. बलात्कार हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. बलात्कार स्त्रियांवरच होऊ शकतो. शारीरिक रचनेमुळे बलात्कारितेला भयंकर अशा शारीरिक, मानसिक यातनांना तोंड द्यावे लागते. बलात्कार कोणत्या स्थितीत झाला, कोणाकडून झाला, यानुसार भारतीय दंड संहितेत वेगवेगळी कलमे आहेत. कलम ३७६ - बलात्काराची शिक्षा. कलम ३७६ -२ ए - पोलीस ऑफिसरकडून करण्यात आलेला बलात्कार. कलम ३७६ (बी) - कामाच्या ठिकाणी वरिष्ठ असण्याचा गैरफायदा घेऊन केलेला बलात्कार. कलम ३७६(सी) - सशस्त्र सेनेच्या सदस्याकडून करण्यात आलेला बलात्कार. कलम ३७६ (डी) - जेलमध्ये, रिमांडहोममध्ये कर्मचाऱ्यांकडून केला गेलेला बलात्कार. कलम ३७६ (इ) - रुग्णालयातील व्यवस्थापन किंवा कर्मचाऱ्यांकडून केलेला बलात्कार. कलम ३७६ (एफ) - नातेवाईक, पालक, शिक्षक तसेच विश्वासू किंवा अधिकार असणाऱ्या व्यक्तीने केलेला बलात्कार. कलम ३७६ (जी) - जातीयवादी किंवा सांप्रदायिक हिंसाचारामध्ये केलेला बलात्कार. सामुहिक म्हणजे एकापेक्षा अधिक पुरूषांनी केलेला बलात्कार. कलम ३७६ (एच) - महिला गरोदर असल्याचे माहित असताना केलेला बलात्कार. कलम ३७६(आय) - १६ वर्षाखालील मुलीवर केलेला बलात्कार. कलम ३७६(जे) - संमती देण्यास सक्षम नसणाऱ्या महिलेवर केलेला बलात्कार. कलम ३७६ (के) - वर्चस्व किंवा नियंत्रणात ठेवता येणाऱ्या महिलेवर केलेला बलात्कार. कलम ३७६(एल) - मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व असणाऱ्या महिलेवर केलेला बलात्कार. कलम ३७६(एम) - बलात्कार करत असताना महिलेला भयंकर दुखापत किंवा विद्रुपता किंवा जीविताला धोका निर्माण करणे. कलम ३७६ (एन) - एकाच महिलेवर सतत बलात्कार. कलम ३७७ - अनैसर्गिक संभोग.

या सर्व गुन्ह्यांकरिता दहा वर्षे सक्तमजुरी अथवा जन्मठेपेची शिक्षा होवू शकते आणि वेगळ्या दंडाचीही तरतुद आहे. कलम २२८ (ए) नुसार बलात्कारित स्त्रीचे नाव गोपनीय ठेवणे बंधनकारक असून तिचे नाव जाहीर केल्यास दोन वर्षे तुरूंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. हे असे कायदे भारतीय दंड संहितेत आहेत. मात्र आज हे कायदे अधिक कडक करण्याची वेळ आली आहे .

छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला

महाराष्ट्र हे शिवछत्रपतींचे राज्य आहे. शिवछत्रपतींच्या काळात अशीच घटना घडली होती. त्या काळात एका भगिनीवर अत्याचार केल्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे गेली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या गुन्हेगाराचे हात कलम करण्याचे आदेश दिले आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली. पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. बदलापूरच्या घटनेमुळे राज्य हादरले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना ‘चौरंग’ शिक्षा दिली जात होती.

चौरंग शिक्षा म्हणजे हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कलम करण्यात येत होते. छत्रपती शिवाजी महाराज देत असलेल्या याच शिक्षेला ‘चौरंग’ शिक्षा असे म्हटले जाते. आज सामान्य माणसाच्या मनात हीच शिक्षा या नराधमांसाठी आहे. कायद्याच्या राज्याचा धाक आता राहिला नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या चौरंग शिक्षेची आठवण काढून माता भगिनीच आता कायदा हातात घेतील.

राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जर केवळ बघ्याची भूमिका घेणार असेल तर ‘सुनो द्रौपदी, शस्त्र उठालो.. अब गोविंद ना आएंगे..’ असे म्हणण्याचीच वेळ आली आहे.

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in