आरबीआयचे सांगत्ये ऐका

रायगड जिल्ह्यातील माणगांव इथे राहणारी २८ वर्षीय व्यक्ती दुबई येथील एका पेट्रोलियम कंपनीत काम करते
आरबीआयचे सांगत्ये ऐका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने आपल्या ग्राहकांचे शिक्षण करत असते. वर्तमानपत्रातून किंवा टीव्ही सारख्या माध्यमातून ग्राहक जागृतीच्या सूचना देत असते. पण फसव्या लोकांची जादू अशी काही चालते की ग्राहक फसवला जातोच जातो. अशा काही फसव्यांची जादू आणि ग्राहकांना पडणारा मोह यांच्या कहाण्या पाहू या. यात सोशल मीडियाचाही मोठा हात असतो हेही विसरून चालणार नाही.

रायगड जिल्ह्यातील माणगांव इथे राहणारी २८ वर्षीय व्यक्ती दुबई येथील एका पेट्रोलियम कंपनीत काम करते. ही व्यक्ती वर्षातून एकदा किंवा दोनदा आपल्या घरी येत असते. अशाच एका मुक्कामात त्यांना अनोळखी नंबरवरून एका महिलेचा व्हाट्सअप मेसेज येतो. ती स्वतःचे नाव प्रियांशी शर्मा आहे असे सांगते. पैसे गुंतवणुकीचा विचार आहे का? असे विचारते. माझ्याकडे जास्त परतावा देणाऱ्या स्कीम आहेत. त्यातील एकात जरी गुंतवले तर भरघोस परतावा मिळेल असे आश्वासन देते. खात्री करून घेण्यासाठी सुरुवातीला छोटी रक्कम गुंतवा. फक्त ५०० रुपये घाला. बघा तुम्हाला कसा आणि किती फायदा होतो ते. या व्यक्तीने त्याप्रमाणे पाठवलेल्या लिंकद्वारे ५०० रुपये भरले. दुसऱ्याच दिवशी याला ६५० रुपये मिळाले. विश्वास बसला. काही वेळातच प्रियांशी बाई फोनवर हजर. अभिनंदन वगैरे करून झाल्यावर आणखी पैसे गुंतवा म्हणू लागली. याने विचार केला आपल्या खात्यात गुंतवणूक करण्यासाठी ३ लाख रुपये आहेत. आपले 'लक ट्राय' करू या. याने परत ५००० रुपये टाकले, त्याचे त्याला ७००० रुपये मिळाले. आता तर त्याला अलिबाबाची गुहाच सापडल्यासारखे वाटले विश्वास पक्का होत होता. तरी सुद्धा पुढील गुंतवणूक एका दमात न करता १५ हप्त्यात थोडी थोडी करत २ लाख ८५ हजार रुपयांची करत गेला. यावेळी मात्र गुहेचे दार उघडण्याचा मंत्र विसरल्याप्रमाणे, बाहेर येता न आल्याप्रमाणे, अडकून पडला. आता पोलिसांच्या मदतीची अपेक्षा मनात धरून बसला आहे.

मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला व्हाट्सअपच्या माध्यमातून एका अनोळखी बाईचा मेसेज आला. तिने मी जपान येथे रहाते आणि माझे नाव डोरिस आहे असे सांगितले. नंतर सर्वसाधारण मेसेजचे आदान प्रदान होऊ लागले. काही दिवसानंतर डोरिसने सांगितले की युक्रेन आणि रशिया यांच्या मधील युद्धामुळे जागतिक पातळीवर सोन्याचे भाव खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे सोन्यातील आणि हिऱ्यांमधील गुंतवणूक लाभदायक ठरेल. आज गुंवणूक केली तर भरपूर फायदा होईल. या दोन्हींना मरण नाही, त्यांचे भाव वाढतच जाणार इथपर्यंत सर्व काही ठीक होते. नंतर तिने विचारले की सोन्यात गुंतवणूक करायची आहे का? माझ्याकडे चांगली स्कीम आहे. ५० हजार रुपये गुंतवले तर प्रत्येक दिवसागणिक २ हजार रुपये मिळतील. या व्यक्तीला ही एक चांगली संधी वाटली आणि त्याने डोरिसने पाठवलेल्या लिंकद्वारे ४ लाख रुपये गुंतवले. काही दिवसांनी त्याने गुंतवणूक काढून घेण्याचे ठरवले. शिवाय प्रत्येक दिवसाचे दोन हजार रुपयांच्या भावाने परतावाही मिळणार होता. पण कसले काय? पैसे परत मागितल्यावर डोरिसकडून टाळाटाळ सुरु झाली. पैसे मिळत नाही म्हटल्यावर पोलिसांकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय उरला नाही.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बहुतेक वेळेला व्हाट्सअप, फेसबुक या माध्यमांचा ओळख करून घेण्यासाठी उपयोग केला जातो. आधी हवा पाण्याच्या गप्पा होतात. सावज अडकायला तयार आहे अशी खात्री पटली की जाळे टाकायला सुरुवात केली जाते. म्हणूनच अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर कधीही विश्वास ठेऊ नये. त्यांची 'फ्रेंड रिक्वेस्ट' ही स्वीकारू नये. निर्दयपणे असे नंबर ब्लॉक करावे हेच उत्तम.

आपल्या सायबर सुरक्षेसाठी आर. बी. आय. च्या सूचना कायम लक्षात ठेवाव्या.

 आकर्षक परंतु अवास्तव प्रस्ताव कधीही स्वीकारू नये. गुंतवणूकीसाठी तर नक्कीच नाही. बक्षीस, कॅश बॅक आदी प्रस्ताव धोकादायकच असतात हे कायम लक्षात ठेवावे.

 धमकीवजा मेलकडे पूर्ण दुर्लक्ष करावे. उ.दा. विजेचे बिल भरलेले नाही. विजेची जोडणी कापली न जाण्यासाठी जी लिंक पाठवली आहे त्यावरून ताबडतोब बिल भरा. अशा लिंक आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटरचा ताबा मिळवतात आणि त्यात साठवलेली वैयक्तिक माहिती मिळवतात. यात आपल्या बँकेची माहितीसुद्धा येते. यामुळे आपले खाते साफ होण्यास अनवधानाने आपणच भामट्यांना मदत करत असतो.

 महत्वपूर्ण व्यक्तिगत माहिती सांगणे, अनधिकृत वेबसाइटवर जाणे किंवा अॅप डाउनलोड करणे हे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक असते. हे टाळलेच पाहिजे

 सुरक्षेच्या दृष्टीने अँटी व्हायरस सॉफ्टवेअर आपल्या कॉम्पुटर किंवा मोबाईल मध्ये असणे अत्यावश्यक आहे.

 लॉगिन आय डी, पासवर्ड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डबद्दल माहिती, कार्डचा CVV नंबर, ओटीपी कधीही कोणाकडे उघड करू नये.

 माहिती मिळवण्यासाठी अधिकृत आणि सुरक्षित वेबसाईटवरच जावे.

 पूर्ण काळजी घेऊनसुद्धा काही नुकसानदायी अघटित घडलेच तर www.cybercrime.gov.in इथे किंवा टोल फ्री नंबर १९३० या नंबरवर ताबडतोब कळवावे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in