लक्षवेधी
डॉ. संजय मंगला गोपाळ
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात सुरू झालेल्या ‘लिव्हिंग लॅब’ उपक्रमातून ग्रामीण भागात शाश्वत तंत्रज्ञानाचे शिक्षण, संशोधन आणि प्रसार यांना नवी उंची मिळत आहे. हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देत हरित तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभवातून ओळख करून देतो त्याबद्दल-
करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे’, अशी व्यापक आणि समर्पक भूमिका असलेल्या साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात, १९९९ साली साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची स्थापना झाली. राज्यभरातील विविध शाळांमधील मुलांच्या खाऊच्या पैशातून जमा झालेल्या विशाल देणगीतून, स्मारकासाठी रायगड जिल्ह्यात माणगावजवळ ३७ एकरची अत्यंत निसर्गरम्य जागा खरेदी करून तिथे स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाच्या परिसरात मागच्या आठवड्यात मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घालू शकेल अशा, ‘लिव्हिंग लॅब’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. उन्नत महाराष्ट्र अभियानमधील सल्लागार राजाराम देसाई हे मुंबईतील आयआयटी या प्रसिद्ध तंत्रवैज्ञानिक संशोधन आणि शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या ‘आऊटरीच प्रकल्पा’च्या अंतर्गत, शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाची ‘लिव्हिंग लॅब’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्मारकाकडे हस्तांतरण करण्यात आले. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रतिकृतिकरण आणि तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी संशोधन व प्रशिक्षणाला चालना मिळेल.
राजाराम देसाईंच्या मते, सध्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षणाचे मॉडेल हे अधिकाऱ्यांनी हस्तिदंती मनोऱ्यात बसून तयार केल्यासारखे आहे. यामुळे शिक्षण खात्याचा आकृतीबंध आणि प्रत्यक्ष विद्यार्थी व विशेषत: ग्रामीण भागातील सामान्य जनता यांच्यात दरी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पाणी, ऊर्जा, उपजीविका-रोजगार, शेती, आरोग्य आणि शिक्षण या प्रमुख बाबतीत आम जनतेला विकासाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. नावाप्रमाणेच प्रोजेक्ट आऊटरीचची संकल्पना, अशा वंचित असलेल्या जनसमूहांपर्यंत विज्ञान–तंत्रज्ञान व त्याचे लाभ पोहोचविणे हा आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात दरवर्षी हजारो किशोरवयीन व युवा विद्यार्थी यांसाठी उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर अन्य नागरिक हे विविध शिबिरे, छावणी, संमेलने, मित्र मेळावा, अनुवाद कार्यशाळा, साहित्य संवाद, कला कार्यक्रम आदींच्या निमित्ताने येत असतात. इथे चार पाच दिवस किंवा आठवडाभर राहत असतात. त्या सर्वांना याचा लाभ होईल.
पर्यावरण भान, निसर्ग प्रेम, प्रदूषणाशी सामना आणि शाश्वत विकासवादी तंत्रज्ञान या सध्याच्या कळीच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या स्मारकाच्या जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्राने पुढाकार घेत, साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांसाठी सध्याच्या काळातील अत्यंत समयोचित अशा या प्रकल्पाची कल्पना अंमलात आणली. पाणी, ऊर्जा, शिक्षण आदी प्रमुख विकास क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून, प्रस्तावित प्रकल्पाचा उद्देश साने गुरुजी स्मारक ट्रस्टच्या कॅम्पसला ‘हब’ बनवणे असा आहे. या ठिकाणी हरित तंत्रज्ञानाच्या प्राथमिक पातळीवरील प्रयोगांचे प्रदर्शन केले जाईल. यातून नवनवे उपक्रम राबावत किशोर-युवापिढीतील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाला चालना मिळावी, अशी अपेक्षा आहे. राजाराम देसाई याबाबत सांगतात की, “हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे महत्त्वाचे असले तरी, शाश्वत विकासाचा प्रमुख घटक म्हणजे ‘शाश्वत कचरा व्यवस्थापन’. अर्थात वर्तुळाकार अर्थव्यवस्था समाविष्ट करून काटकसर वा निव्वळ वापर कमी करणे. यामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. म्हणूनच, घरगुती, व्यावसायिक आणि कृषी क्षेत्रात पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ऊर्जा कार्यक्षमता महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.”
विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी उपलब्ध संच
सध्या या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांसाठी सूर्यापासून वीजनिर्मिती करणारा ४ किलोवॅट क्षमतेचा सोलर विद्युत प्रकल्प व त्यावर नेट मीटरिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. ग्रीडमधून येणारी वीज आणि स्मारकात पडणाऱ्या मोफत सूर्यप्रकाशाचा वापर करून आपली आपण तयार केलेली वीज, यातील तंत्रवैज्ञानिक फरक, त्यामुळे स्मारकाला होणारे आर्थिक लाभ आणि परिसराचे होणारे पर्यावरणीय संवर्धन याची प्रत्यक्ष हाताळणी आणि शास्त्रीय आकडेमोड करून विद्यार्थी त्याचा धांडोळा घेऊ शकतील, आपापल्या भागात असा प्रकल्प राबविण्याची प्रेरणा घेऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.
नळाचे पाणी पिण्यायोग्य असेल याची खात्री नसल्याने एकीकडे सीलबंद बाटलीतले पाणी विकत घेऊन, पर्यावरण-विनाशी आणि कॉर्पोरेट कंपन्यांना प्रचंड नफा देणारी महागडी व्यवस्था बळकट केली जात आहे, तर दुसरीकडे विजेवर चालणारी पाणी शुद्धीकरणाची संयंत्रे सर्वत्र बसवली जात आहेत. या संयंत्रात होणारा विजेचा वापर आणि पाण्याचा होणारा अपव्यय टाळणारे गुरुत्वाकर्षण आधारित वॉटर फिल्टर हे या ‘लिव्हिंग लॅब’मधले दुसरे आकर्षण आहे. या उपकरणाबाबत बोलताना शेप फाऊंडेशनचे प्रसाद कुलकर्णी म्हणतात, “या प्रकल्पाचा गाभा आहे- स्थानिकांनी स्थानिकांसाठी विविध सेवा उभारणे. हा प्रकल्प म्हणजे महात्मा गांधीजींनी पाहिलेल्या ग्रामीण औद्योगीकरणाचे पुढचे पाऊल आहे. यासाठी विकेंद्रित पद्धतीने तंत्रज्ञान शिक्षण व संशोधन व्यवस्था आवश्यक आहे. जिज्ञासा, जागरूकता आणि त्यातून उत्कर्ष ही त्रिसूत्री अर्थात ‘जिजाऊ’ हा या प्रकल्पाचा पाया आहे. जिजाऊंचे पुत्र अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापित व्यवस्थेशी बंड करत स्थानिक रयतेला ताकद देणारे स्वातंत्र्य मिळवले, तसेच या प्रकल्पातून अपेक्षित आहे. साने गुरुजींनी सांगितलेली आणि आचरणात आणलेली नैतिकता, निसर्गासह सर्वांभूती प्रेम ही मूल्ये या उपक्रमातून पुढे जात आहेत!’
सार्वजनिक स्थळांवर हात धुण्याच्या जागी अनेकदा ताटात उरलेले अन्न व खरकटे पदार्थ साचून बसते. ते आरोग्याला हानिकारक आहे. म्हणून पाण्याच्या संवर्धनासह हात धुण्याचे स्टेशन हे तिसरे उपकरण विद्यार्थ्यांना निश्चितच विचारप्रवृत्त करेल. सुलभ तंत्रज्ञान हे काही रॉकेट सायन्स नसून, जरा डोके लावले तर सामान्यांच्या कल्पकतेतून स्थानिक स्तरावर सुविधाजनक व्यवस्था निर्माण करणे सहज शक्य आहे. ग्लोबल वाॅर्मिंगमुळे तापमानवाढीचे चटके सर्वांनाच बसत आहेत. उष्ण हवामानात फळे-भाज्या ताज्या ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना वीज न वापरणारी, बाष्पीभवनावर आधारित थंडकरण प्रणाली दाखवली जाते. या उपकरणात पाण्याचे बाष्पीभवन होऊन नैसर्गिकरीत्या थंडावा तयार होतो आणि वस्तू जास्त काळ टिकतात. त्यामुळे विद्यार्थी सहज समजू शकतात की महागडे, वीजखाऊ फ्रीज वापरण्यापेक्षा साधी, पारंपरिक आणि निसर्गाशी जुळणारी तंत्रे अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक असू शकतात.
आऊटरीच प्रकल्पाची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये
पाणी, ऊर्जा इत्यादी प्रमुख क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे, स्मारकाच्या कॅम्पसला हरित तंत्रज्ञानाचे केंद्र आणि प्रदर्शन बनवण्यासाठी पायलट-स्केलवर उपकरणे बसवणे, उच्च आणि तांत्रिक शिक्षणासाठी एक पथदर्शी मॉडेल म्हणून ‘लिव्हिंग लॅब’ संकल्पना विकसित करणे आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रसार, क्षेत्रस्तरीय अनुभवाद्वारे नवनवे उपक्रम आणि संशोधनाला चालना देणे, ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत. आजूबाजूच्या शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षक, गावपाड्यातील आदिवासी, शेतकरी, महिला स्मारकात येऊन हे सुलभ व स्वस्त तंत्रज्ञान समजून घेऊ शकतील. त्याचा वापर आपापल्या ठिकाणी सुरू करू शकतील. स्वत:ही असे तंत्रज्ञान विकसित करू शकतील. जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्र अशा विविध समुदाय गटांशी त्यांच्या नियमित उपक्रमांद्वारे संबंध वाढवण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी येथे ‘लाइव्ह चाचण्या’ करतील. त्याच्या विश्लेषणाद्वारे निर्माण केलेल्या मौल्यवान डेटावर आधारित संशोधनास हातभार लावतील. ग्रामीण आणि दुर्गम भागातील समाजातील वंचित घटकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतील.
‘लिव्हिंग लॅब’च्या माध्यमातून, नागरिकांच्या सहभागातून स्थानिक क्षमता-वृद्धी, प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच समुदाय आधारित निरीक्षण प्रणाली विकसित होईल व यामुळे हवामान बदलाशी संबंधित निर्णय प्रक्रियेला गती मिळून शाश्वत आणि तंत्रज्ञान-आधारित विकासाला चालना मिळेल. आयआयटीसारख्या प्रगत संस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्राच्या सहकार्याने योग्य ते तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रवासाची ही निव्वळ सुरुवात आहे. पुढील प्रवास निश्चितच फलदायी असेल!
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्राचे अध्यक्ष
sansahi@gmail.com