इंडिया आघाडीचा सूर्य उगवणार, रयतेचे राज्य येणार

देशातील गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. शेती अरिष्टात आहे.
इंडिया आघाडीचा सूर्य उगवणार, रयतेचे राज्य येणार

- रघुनाथदादा पाटील

मत आमचेही

देशातील गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. शेती अरिष्टात आहे. जातधर्मावर आधारित विद्वेष वाढत आहे. या अशा स्थितीत पंतप्रधान मोदी महागाईविषयी मौन धारण करुन आहेत. देशात धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण केलेल्या काँग्रेसवर सातत्याने टीका करत आहेत. जातधर्मआधारित विद्वेष समाजात पराकोटीला पोहोचलेला आहे. मतदान प्रक्रिया संशयास्पदरित्या धीम्या गतीने पार पाडली गेली. पण नागरिक आता जागे होत आहेत. सहा जूनला शिवराज्याभिषेकदिनी रायगडावर इंडिया आघाडीचाच झेंडा फडकणार आहे. राज्य रयतेचेच असणार आहे. उद्योगपतींचे, धनदांडग्यांचे नाही.

कधी नव्हे ते देशाची अवस्था आज सैरभैर झाली आहे. कोंडलेल्या काळोख्या दिशेने प्रवास सुरू झाला की काय, अशी अव्यक्त भीती सर्वत्र जाणवत आहे. असंयत वैर आणि अहंकार यांचे मिश्रण देशाला हुकुमशाहीकडे ढकलत आहे. देशातील गरीब अजूनच दारिद्र्याच्या खाईत ढकलला जात आहे, तर श्रीमंतांच्या श्रीमंतीमध्ये अधिकच वाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था इंग्रजीमधील 'के' या अक्षरासारखी झाली आहे. यावर पंतप्रधानांना पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, ‘मग काय सगळे गरीब व्हावेत का? सगळे गरीब झाले तर काहीच फरक राहणार नाही. असे हवे का?’ त्यांचे उत्तर ऐकून माडाच्या झाडाची आठवण होते. माथ्याएवढ्या उंचीवर पोहोचलेल्या माडाच्या झाडाखाली मात्र उघडी पडलेली खुरटी मुळे असतात. गरीब गरीब होताहेत ह्याबाबत पंतप्रधानांना काहीच आक्षेप नाही, उलट श्रीमंत गरीब व्हावेत का असा प्रतिप्रश्न ते करतात, तेव्हा काय बोलावे असा प्रश्न पडतो. बहोत हो गयी महंगाई की मार... असे म्हणत सत्तेत आलेले मोदी आज महागाईचा ‘म’ देखील उच्चारत नाहीएत. वाढत्या महागाईने गरिबांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे.

गरीब आणि श्रीमंतांमधील भेद अधिकच ठळकपणे दिसून येत आहे. राज्यकर्त्यांच्या कलाने वागणारी यंत्रणा आणि न्यायव्यवस्था अजूनच नागडेपणाचे दर्शन घडवत आहे. पुण्यात धनिकपुत्राच्या बेदरकारपणामुळे झालेल्या अपघात प्रकरणात दोन जीवांचा हृदय पिळवटून टाकणारा मृत्यू झाला. जनता या प्रकाराने अस्वस्थ आहे. बड्या बिल्डरला वाचवायला समोर आलेला आमदार, पोलिसांनी लावलेली सौम्य कलमे आणि अल्पवयीन म्हणून बाल न्यायालयाने तातडीने मंजूर केलेला जामिन हे सगळेच हास्यास्पद असून यामुळे जनतेत आत्यंतिक रोष निर्माण झाला आहे.

दुसरीकडे राज्यात भयंकर स्फोटक परिस्थिती आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. ग्रामीण भागातील युवकांचे जगणे भयावह वळणावर आले आहे. अत्यल्प जमीन, दुष्काळ, वाढते खतांचे दर, बी बियाणे यांचा वाढलेला खर्च, न परवडणारी शेती आणि या सगळ्याच्या परिणामांमुळे तरुणांची रखडलेली लग्ने ही ग्रामीण भागातील परिस्थिती आहे. वाढणारे वय, नोकरी नाही, व्यवसाय करायला पैसा नाही, अशा स्थितीत सैरभैर झालेले तरुण स्वस्त नशेच्या आहारी जात आहेत. एकंदरीत भयंकर स्फोटक परिस्थिती आहे. अशा वातावरणात धार्मिक आणि जातीय उन्माद कळसाला पोहोचला आहे. जातीशिवाय कुणी बोलत नाही. समाज माध्यमांवरील चर्चा, कमेंट्स आणि राजकीय लोकांची विधाने आगीत तेल ओतत आहे. शिक्षणाचा घसरलेला दर्जा, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, वाढलेली महागाई ह्याने जगणे पार कोलमडून पडलेले असताना निवडणुका आणि त्या निमित्ताने वाटप होणारी दारू आणि स्वस्त नशा यामुळे ग्रामीण जीवनाची घडी विस्कटली आहे.

लग्नाच्या बाजारात मुलांची घसरलेली किंमत आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा यांनी आधीच मेटाकुटीला आलेले जगणे, वाढलेले वय या बाबी तरुणांमध्ये कमालीची निराशा पेरत आहे. आई वडील आपले वार्धक्य सांभाळत सग्यासोयाऱ्यांना लग्नासाठी मुली शोधायला सांगून चिंतेने ग्रस्त झालेले दिसत आहेत. अशा हतबल मंडळींना कालसर्प किंवा अशीच काही निरर्थक धार्मिक कर्मकांड सांगून त्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण केले जात आहे. अशा पूजाअर्चा करून किंवा हात दाखवून, नाहीतर पत्रिका दाखवून लग्न होईल या भाबड्या आशेने वृद्ध आईबाप जमेल तसे उपाय करताना दिसत आहेत आणि अजूनच हताश होत आहेत.

यावर आज तरी कुणाकडेच काही उपाय नाही. राज्यात नवनवे उद्योग यायला हवेत. सहकार बहरायला हवा. बियाणे आणि खतांचे दर कमी व्हायला हवेत. परवडणारी शेती करता यायला हवी. पण याकडे लक्ष द्यायला सत्ताधारी लोकांना वेळ नाही. निवडणुकीत मिळणारी बाटली रिचवून रात्रीच्या झोपेची सोय झाली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर समोरचे प्रश्न तसेच असतात. निराशेच्या गर्तेत ढकलला गेलेला तरुण आज भयावह स्थितीत दिवस कंठीत आहे. हिंदू-मुसलमान, पाकिस्तान, मंदिर-मस्जिद आणि कलम ३७० करून तो थकला आहे. ह्यातील एकही प्रश्न आपले जगण्याचे प्रश्न सोडवू शकत नाही ह्याची त्याला जाणीव झाली आहे.

महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आता पार पाडलेले आहे. मुंबईमधील मतदान प्रक्रिया संशयास्पदरीतीने सावकाशपणे पार पाडली गेली. कित्येक मतदार रांगेत उभे राहून शेवटी मतदान न करता माघारी गेले. एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जाहिरातबाजी करणारा आयोग प्रत्यक्षात मात्र सपशेल अयशस्वी झाल्याबाबत राज्यातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जाणून-बुजून दिरंगाई करत मतदानाची गती कमी केली गेली, असा अनुभव त्यांना आला.

या पाचव्या टप्प्यासाठी तथाकथित विश्वगुरुने मुस्लिम समाज आणि आपले नाते कथन करताना हिंदू मुस्लिम भाईचारा याबाबत ईद सणाला आम्ही घरी स्वयंपाक करत नव्हतो, हे सांगत त्यांच्या लहानपणी असलेला बंधुभाव त्यांनी कथन केला. एका अर्थाने काँग्रेसने काय केले ह्याचे हे उत्तम उदाहरण मोदींनी स्वतः मान्य केले. हा बंधुभाव जोपासण्याचेच काम स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने केले होते. त्यावर बोळा फिरवण्याचेच काम भाजपा आणि संघाने या दहा वर्षात केले. लोकसभेच्या प्रचारात उघड-उघड हिंदू-मुस्लिम करत भेदभाव निर्माण करण्याचे काम करणारे आज स्वतःच गतकाळातील देशात असलेला बंधुभाव मान्य करून आपली गोंधळलेली अवस्था जाहीर करत आहेत. देशाची निर्मिती ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यात सर्व घटकांचा समावेश आहे. धार्मिक, सांस्कृतिक, वांशिक भेद अधोरेखीत केल्याने देशाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते. विविधतेने नटलेल्या या आपल्या देशाला एकाच साच्यात फिट करण्याचे ह्यांचे उद्योग सहिष्णुतेचा गळा घोटणारे आहे. धार्मिक उन्मादाने सत्ता मिळाली. पण धार्मिक उन्माद निर्माण करण्याचे प्रयत्न देशाला मागे घेऊन जाणारे आहेत, ह्याची जाणीव आता इथल्या सर्वसामान्य माणसाला प्रकर्षाने झाली आहे आणि प्रत्येक टप्प्यावर ह्यांचा आधार निसटत चालला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शेती, उद्योगधंदे, एकोपा, बंधुभाव हाच या देशाचा आत्मा आहे. यासाठी हरित क्रांती, दुग्ध क्रांती, संगणक, सेवा क्षेत्राचा विकास, शेतीला जोडधंदा, मोफत किंवा अल्पदरात शिक्षण, शेतमालाला भाव, महिलांचा आदर म्हणून महिला आरक्षण अशी धोरणे आखणारी काँग्रेस हीच देशाची खरी धरोहर आहे याची खात्री जनतेला पटली आहे. परिणामी देश आणि इथला सर्वसामान्य माणूस देशाची अशी जातीय, धार्मिक आणि आर्थिक स्तरावर विभागणी होऊ देणार नाही. ही निवडणूक जनतेने हाती घेतल्याचे चित्र देशभर पाहायला मिळाले आहे. त्याचे परिणाम चार जूनला दिसून येतील. ही काळरात्र आणि हे द्वेषपर्व संपेल या उमेदीवर कोंडलेल्या काळोख्या विदीर्ण मध्यावरून चार जूनला ‘इंडिया’ आघाडीचा सूर्य विजयी पताका फडकावत सहा जूनला रायगडावर राज्याभिषेकाचा जल्लोष करणार, हे निश्चित. पुन्हा एकदा रयतेचे राज्य येईल! तुतारीचा आवाज दरीखोऱ्यात गर्जत राहील! धार्मिक द्वेषाला काही काळ बळी पडलेले साधेभोळे जीव शपथ आडवी करत, जे हात छातीजवळ घेऊन आपले क्षुद्रपण कुरवाळत होते, तेच हात आता लांब सरळ रेषेत पुन्हा एक शपथ घेतील, ‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत!’

(लेखक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in