भाजपाने केले, अनैतिकतेच्या सीमांचे उल्लंघन

भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करत अत्यंत निर्लज्जपणे विरोधी पक्षांवर कपोलकल्पित आरोप केले आहेत. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत, केवळ 'मी पुन्हा येईन' च्या व्यक्तिगत हट्टासाठी सगळे षडयंत्र रचले गेले. या सर्व घडामोडींच्या मागे असलेला कमालीचा नीच माणूस उभ्या महाराष्ट्राने पाहिला.
भाजपाने केले, अनैतिकतेच्या सीमांचे उल्लंघन

- रघुनाथदादा पाटील

मत आमचेही

‘अच्छे दिनचे गाजर’ दाखवत दिलेला नशेचा डोस आता उतरला आहे. वास्तव फार भयानक स्वरूपात समोर आले आहे. आता बँकेतले पैसे सुरक्षित तर नाहीतच, वरून वेगवेगळे चार्जेस आकारत बँक खात्यातून पैसे काढून उद्योगपतींनी बुडवलेले कर्ज जनतेकडून वसूल केले जात आहे. सर्व आघाड्यांवर भीषण अपयशी ठरलेले हे सरकार माध्यमांच्या आणि इलेक्टोरल बाँडच्या पैशांच्या बळावर आपल्या देशाच्या माथी बसून फसव्या स्वप्नांची आरास मांडत आहे. ह्या सर्व अवस्थेत ‘अच्छे दिन कुठे आहेत?’ असा प्रश्न विचारला की समाज माध्यमांवर भाजपाचे ट्रोल्स चक्क आई-बहिणीवरून शिवीगाळ करताना दिसत आहेत.

भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करत अत्यंत निर्लज्जपणे विरोधी पक्षांवर कपोलकल्पित आरोप केले आहेत. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत, केवळ 'मी पुन्हा येईन' च्या व्यक्तिगत हट्टासाठी सगळे षडयंत्र रचले गेले. या सर्व घडामोडींच्या मागे असलेला कमालीचा नीच माणूस उभ्या महाराष्ट्राने पाहिला. केवळ सत्ता हवी यासाठी सगळे षडयंत्र रचत, जनतेच्या प्रतिनिधींना वेठीस धरत त्यांना ‘जेलमध्ये टाकू’ ची भीती घालत आपल्या कळपात सामील करून घेतले. काही नेत्यांना दोन-दोन वर्षे जेलमध्ये टाकले गेले. त्यांची जनमानसातील प्रतिमा उध्वस्त करून, त्यांच्या सर्व कुटुंबांची अपरिमित हानी केली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना समाजात वावरताना मान खाली घालावी लागली. पुढे यथावकाश हे लोक निर्दोष असल्याची कबुलीही द्यावी लागली. जाती-जातीत तेढ निर्माण व्हावी यासाठी स्क्रिप्ट लिहून, या वेठीस धरलेल्या नेत्यांना बोलायला भाग पाडले. आपण नामानिराळे राहून सामाजिक घडी विस्कटून टाकली.

सध्या जनतेने निवडलेल्या प्रतिनिधींचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आणून लोकशाहीची विटंबना केली जात आहे. पक्ष निधी उभारताना ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या शासकीय यंत्रणांचा भयंकर गैरवापर केला जात आहे. त्यातून उद्योगांना ब्लॅकमेल करत ‘इलेक्टोरल बाँड’ सारखा जगातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा केला गेला. या निवडणूक रोख्यांबाबत निर्मला सीतारामन ह्यांचे पती 'परकला प्रभाकर ' ह्यांनी जाहीर विधाने केली आहेत.

भाजपाची दारे सर्व प्रकारच्या भ्रष्ट, गुंड आणि अनैतिक लोकांसाठी बेधडक खुली आहेत. पक्ष फोडले, कुटुंब फोडले. जनतेचे प्रतिनिधी व विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून घटनेच्या कलम २१ नुसार मिळालेल्या स्वातंत्र्याचा संकोच केला. सत्तेत येण्यासाठी निवडणुका जिंकणे आणि बहुमत असणे ह्याची गरजच उरली नाही, असे एकंदरीत वातावरण आज देशात आहे. त्यासाठी केवळ केंद्रात सत्ता असणे पुरेसे आहे, असे दिसते. त्या आधारे केंद्रीय तपास यंत्रणांच्या सहाय्याने कुणालाही जेलमध्ये टाकून किंवा जेलची भीती घालून आपल्यासोबत यायला भाग पाडले जाऊ शकते. मग जनमताची किंमत ती काय उरते? ही कसली लोकशाही? ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने काँग्रेसचे खाते गोठवणे, त्यांना हजारो कोटींच्या नोटिसा बजावणे आणि निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, ह्याची काळजी घेणे ही हुकुमशाहीची चाहूल नाही का? इकडे उमेदवारी जाहीर केली की लगोलग दोन तासांच्या आत त्या उमेदवारावर शासकीय यंत्रणेने धाडी टाकून त्यांचे उद्योग-व्यवसाय उध्वस्त केल्याने रोजगार कसा निर्माण होईल? मग ह्यांच्याविरुद्ध उमेदवार देऊच नये की काय? निवडणुका जिंकणे अशक्य आहे हे समजताच विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी अनैतिकतेच्या सगळ्या सीमांचे बेशरमपणे उल्लंघन करणे हे कुठल्या साधनशुचितेचे लक्षण आहे? अभद्र भाषा आणि कुत्सित व्यक्तिमत्त्व यांचे जाहीर प्रदर्शन करत कळसच गाठला गेला आहे. विरोधकांसाठी वापरलेली भाषा, महिलांसाठी उपयोगात आणलेली विशेषणे ह्यांनी तर सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार केल्या. विरोधी पक्षातील महिलांसाठी चक्क ‘जर्सी गाय’, ‘बार बाला’, ‘५० करोड़ की गर्ल फ्रेंड’, ‘काँग्रेस की विधवा’, ‘दीदी ओ दीदी’ हे असले महिलांच्या सन्मानाचे धिंडवडे काढल्याचे पुरावे यूट्यूबवर उपलब्ध आहेत. महिलांचा सन्मान करण्याची या देशाची महान परंपरा अशी पायदळी तुडवली गेली.

महाराष्ट्रातील एकमेव बलाढ्य नेता 'शरद पवार ' ह्यांना संपवणे हेच आमचे ध्येय आहे असे म्हणत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील ह्यांनी भाजपा सरकारची विरोधी पक्षाबाबत तसेच बहुजन समाजाबाबत किती द्वेषाची भावना आहे, हे दाखवून दिले आहे. ह्यांची विचारसरणी काय पद्धतीची आहे, याची कल्पना देशाला आली आहे.

आर्थिक स्तरावर देशात काय सुरू आहे ह्याचा कानोसा घ्यायचा तर आपल्या कुटुंबातील अथवा परिचित असलेल्या निवृत्तीवेतनधारक किंवा लघु बचत करणाऱ्या लोकांशी संवाद साधा. काँग्रेसच्या काळात पैसे फिक्स्ड डिपॉझिट केले की, ७२-७५ महिन्यांत म्हणजे सहा-साडेसहा वर्षांत दामदुप्पट परतावा मिळत होता. ‘अच्छे दिनचे गाजर’ दाखवत दिलेला नशेचा डोस आता उतरला आहे. वास्तव फार भयानक स्वरूपात समोर आले आहे. आता बँकेतले पैसे सुरक्षित तर नाहीच; वरून वेगवेगळे चार्जेस आकारत बँक खात्यातून पैसे काढून उद्योगपतींनी बुडवलेले कर्ज जनतेकडून वसूल केले जात आहे. सर्व आघाड्यांवर भीषण अपयशी ठरलेले हे सरकार माध्यमांच्या आणि इलेक्टोरल बाँडच्या पैशाच्या बळावर पुन्हा आपल्या देशाच्या बोकांडी बसून अशा फसव्या स्वप्नांची आरास मांडत आहे. जनता हवालदिल झालेली आहे. आता केवळ मतदानाचा दिवस कधी उजाडतो ह्याची ही जनता चातकासारखी वाट पाहत आहे. इलेक्टोरल बाँड वसुलीमुळे त्रस्त कंपन्यांनी आपले उत्पादनांचे आणि औषधांचे दर गगनाला भिडवले आहेत. रस्त्यावर जागोजागी टोलच्या नावाने दरोडेखोर बसवून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू आहे. ह्या सर्व अवस्थेत ‘अच्छे दिन कुठे आहेत?’ असा प्रश्न विचारला की समाज माध्यमांवर भाजपाचे ट्रोल्स चक्क आई-बहिणीवरून शिवीगाळ करताना दिसत आहेत.

अशा स्थितीत शरद पवार यांनी व्यक्त केलेली चिंता वाजवी वाटते. आपली लढाई आता लोकशाही वाचवण्यासाठी आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे. नरेंद्र मोदी काँग्रेस नेत्यांबाबत बोलताना ते मुख्यमंत्री असतानादेखील अभद्र भाषेत टीकाटिप्पणी करायचे. त्यावेळी काँग्रेसचे मंत्री त्यांच्याविषयी नाराज असायचे. म्हणून त्यांना फारसे कुणी वेळ देत नसत. पण प्रश्न गुजरातचा आहे, मोदींचा नाही, हा शरद पवार यांचा द्दष्टिकोन होता. म्हणूनच मोदींना वेळ देत गुजरातचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी स्वत: गुजरातला भेट दिली. तिथे जाऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायचे आश्वासन दिले. याबाबत मोदींनी स्वतः जाहीर कबुली दिलेली आहे. विरोधक असले तरी आधी देशहित महत्त्वाचे आणि विरोधकांची लोकशाहीतील स्पेस महत्त्वाची ह्याबाबत शरद पवार कमालीचे संवेदनशील आहेत. आज त्याच शरद पवारांना संपवायचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ही मानसिकता किती कृतघ्न आणि लोकशाहीसाठी घातक आहे ह्याची कल्पना कुणाही सुजाण भारतीय नागरिकास येईल. इथल्या जनतेच्या भवितव्यासाठी पक्षांच्या सीमा ओलांडून आज पुन्हा 'आयुष्याच्या मशाली पेटवायला' पुढे येणे गरजेचे आहे.

या काळोख्या अंधारात टागोरांच्या कवितेतील 'पणती' प्रमाणे हा काळोख दूर करण्याची क्षमता नसेल, तरी ह्या अंधाराला छेद देण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात आहे. आज देश तुमच्याकडे आशेने पाहत आहे. भाजपासारख्या धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करत इथली लोकशाही उध्वस्त करू पाहणाऱ्या पक्षाला सपशेल नकार द्यायला हवा. अन्यथा आपल्या पुढील पिढ्यांना आपण मध्ययुगात नेऊन सोडणार यात मुळीच शंका नाही.

(लेखक राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार महाराष्ट्र यांचे नेते आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in