अस्तित्वाच्या लढाईचा पहिला अंक समाप्त

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील मतदान सोमवारी संपणार आहे.
अस्तित्वाच्या लढाईचा पहिला अंक समाप्त

- अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील मतदान सोमवारी संपणार आहे. महामुंबईतील १० लोकसभा मतदारसंघ व उत्तर महाराष्ट्रातील तीन लोकसभा मतदारसंघांतील लढाई आज संपत आहे. या लोकसभा निवडणुकीतून आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत मिळत असतात. या दृष्टीने काँग्रेस, उबाठा, शरद पवार राष्ट्रवादीबरोबर सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) या सहा राजकीय पक्षांच्या अस्तित्वाची लढाईत मतदार कुणाचे अस्तित्व ठेवते, कुणाचे संपवते हे ४ जूनला निकालाच्या दिवशी कळेल. या संदर्भात शरद पवारांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य पवारांनी केले. हे दोन प्रादेशिक पक्ष कोणते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शरद पवारांनी निवडणुकीपूर्वी असे वक्तव्य पूर्वीही केले आहे. २०१४ मध्ये निवडणुकांचे पूर्ण निकाल हाती येण्यापूर्वीच शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते.

महाराष्ट्रात निवडणुकीचे पाच टप्पे पाडले होते. पहिल्या टप्प्यात ५, दुसऱ्या टप्प्यात ६, तिसऱ्या टप्प्यात ११, चौथ्या टप्प्यात ११ व पाचवा या शेवटच्या टप्प्यात महामुंबईतील १० व उत्तर महाराष्ट्रातील ३ मतदारसंघांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र पालथा घातला.

महाराष्ट्रातील निवडणूक निकालाबाबत सर्व्हेचा अहवाल आला. तो सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने धोकादायक होता. २८X२१ असा अंदाज आल्याने दिल्लीतील नेते खडबडून जागे झाले. महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट आल्यास भाजप, मित्रपक्ष झोपणार? आणि त्यामुळेच दुसऱ्या टप्प्यापासून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. नांदेडची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाणांवर टाकली. घाटकोपरमध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो, कल्याणमधली विराट सभा, तर शिवाजी पार्कवर १५ मे रोजी झालेल्या सभेने वातावरण बदलू शकते. त्याचबरोबर ‘उबाठा’चे उद्धव ठाकरे, शरद पवार हे मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये सभा घेत आहेत. लातूर, पुणे, बीड येथे मोदींच्या पाच जाहीर सभा झाल्या. शिवाजी पार्क येथील सभेने संपूर्ण मुंबई ही मोदीमय झाल्याचे दिसून आले.

नैतिकता संपल्याने आज राजकारणाचा चिखल झाला आहे, असे म्हटले जाते. परंतु ही नैतिकता महाराष्ट्राच्या राजकारणात १९७८ मध्येच संपुष्टात आली होती. १९९९ ला काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर काही महिन्यांतच महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श गृहनिर्माण घोटाळ्यानंतर पदाचा राजीनामा द्यावा लागला. दिल्लीश्वरांनी पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवले. त्यावेळी पृथ्वीराज हे मनमोहन सिंग मंत्रिमंडळात मोठ्या पदावर होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा लोकसभेतील पराभव अखंड काँग्रेस असताना १९९१ मध्ये शरद पवारांनीच घडवून आणला होता. हे पृथ्वीराज चव्हाण विसरले नाहीत. म्हणून तर राष्ट्रवादीबरोबर सत्तेत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेवर प्रशासक नेमून चौकशीही लावली होती. त्याचा परिणाम २०१३ मध्ये राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार कोसळले.

१९५७-६२ च्या निवडणुकीत वाजपेयी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवीत होते. तेव्हा त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या शीला कौल या उमेदवार होत्या. परंतु नेहरू हे वाजपेयींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी गेले नाहीत. कौल यांनी नेहरूंकडे प्रचारासाठी तगादा लावला तेव्हा बलराज सहानींना तेथे पाठविले.

महाराष्ट्रातील राजकारण, निष्ठा, नैतिकता संपुष्टात आली आहे. परंतु दोष कुणाला द्यायचा. पक्षनेतृत्वाविरुद्ध उठाव होतो तेव्हा नेतृत्वाने शस्त्रे खाली ठेवणे आवश्यक होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सत्ता सोडून ७ मंत्री व ४० आमदार बाहेर पडतात. त्याला काय म्हणणार? राष्ट्रवादीमध्ये नैतिकता, निष्ठा कुठे राहिली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ४२ आमदार बाहेर पडतात. तेव्हा हे सर्व ईडी, सीबीआय चौकशीमध्ये होते का? खोके-खोके घेतले असे सांगून स्वतःचे हसे करून घेतले आहे. शिवसेना-राष्ट्रवादीत हे झाले. काँग्रेसमध्ये काय? स्व. शंकरराव चव्हाणांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणीबाणी काळात सांभाळले. पुढे ते केंद्रात गृहमंत्री झाले. त्यांचे पुत्र अशोक चव्हाण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात होते. देवरा कुटुंब हे इंदिरा, सोनिया गांधींचे एकनिष्ठ होते? अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेवर स्थान मिळवले. मिलिंद देवरा हे शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करून राज्यसभेवर गेले. हे सर्व कशासाठी झाले. ४०-४२ आमदार, १३ खासदार पक्ष सोडून जातात तेव्हा या सर्वामागे ईडी लागली होती का? मुळात नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर हे घडले आहे.

महाराष्ट्रात सत्तांतराच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताना काँग्रेसने शरद पवारांवर विश्वास दाखविला नव्हता. त्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि अहमद पटेल यांनी एकत्र येऊन खात्री केल्यानंतरच महाविकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही विविध राजकीय पक्षांमध्ये फूट पडली होती. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात तीव्र मतभेद होते. महात्मा गांधींनी नेहरूंच्या नावास झुकते माप दिल्यानंतर काँग्रेस हायकमांडचे त्यावेळी काही चालले नाही. राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसे खर्चावेच लागतात. सध्या निवडणुकीसाठी कोटीच्या काेटी उड्डाणे उमेदवारांना घ्यावी लागत आहेत. स्वातंत्र्य चळवळीत कमल नयन बजाज, जमनालाल बजाज, बिर्ला, गोदरेज हे उद्योगपती महात्मा गांधींना मदत करीत होते. निवडणूक रोख्यातून सर्वांना पैसे मिळाले. परंतु विरोधकांकडून भाजपला लक्ष्य करण्यात आले.

या लोकसभेचे निवडणूक निकाल आल्यावर सर्वांची पोलखोल होईल. परंतु मूलभूत प्रश्नावर चर्चाच नाही, केवळ आरोप-प्रत्यारोप. ३७० (३५) रद्द केले यावर चर्चा का नाही? फारुख अब्दुल्ला हे इंडिया आघाडीत आहेत. मेहबुबा मुफ्तीही आहेत. मग त्यावर चर्चा नाही. आज काश्मीरमध्ये सलोख्याचे वातावरण तयार करण्यास हे नेते पुढे आले नाहीत.

महाराष्ट्रात सोशल मीडियावर जो धिंगाणा चालला आहे तो अजब आहे. एका गावातील पत्रकाराने देशात कुणाला किती जागा मिळतील याचा म्हणे सर्व्हे केला. त्या पत्रकाराने आपल्या मतदारसंघातील सर्व्हे मांडला तर आपण समजू शकतो. परंतु बंगालमध्ये, ओदिशात किती जागा कोणाला मिळतील हे म्हणणे आश्चर्यकारक नाही का. यापूर्वी जनतेची कामे करताना ‘वैयक्तिक नैतिकता’ हा सर्वोच्च निकष असायचा. तो अत्यंत काटेकोरपणे पाळला जात होता. आता केवळ वैयक्तिक पातळीवर चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यावेळी काका-पुतण्यातील भांडण इतक्यापुरते मर्यादित होते असे वाटत होते. परंतु दिग्गज नेते शरद पवारांची साथ सोडून जातात. तेव्हा त्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ अशी अनेक नावे घेता येतील. हे नेते शरद पवारांना सोडून गेले आहेत!

या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभेची, मुंबई तथा अन्य महानगरपालिका, ३६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीनंतर या चार पक्षांचे काय होणार? शरद पवारांनी तर अगोदरच भाकीत केले आहे, हे समजनेवाले को इशारा काफी है.

logo
marathi.freepressjournal.in