महाविकास आघाडीची सावध पावले

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादीत पडलेली फूट, महायुतीचे मजबूत सरकार, त्यात मनसेची महायुतीला मिळालेली साथ आणि काँग्रेसला साथीला घेऊन उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी जुन्या-नव्याची सरमिसळ करून नव्याने पक्षबांधणी करीत महायुतीसमोर उभे केलेले आव्हान हे पाहता राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीत चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून टोकाचे मतभेद झाले.
महाविकास आघाडीची सावध पावले

- राजा माने

राजपाट

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तरीही उमेदवार निवडीतील महायुती व महाआघाडीचा ‘तळ्यातमळ्यात’चा खेळ आजही सुरूच आहे. सांगलीसारख्या मतदारसंघातील धुसफुशीने महाआघाडी बेजार आहे, तर सातारा, नाशिक आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघांची कोंडी महायुती फोडू शकलेली नाही. असे असले तरी महाविकास आघाडीने महायुतीसमोर आव्हान निर्माण केले आहे. शरद पवार यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळलेली आहे. महायुतीतील गोंधळ पाहता महाविकास आघाडीची सावध पावले परिणामकारक ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादीत पडलेली फूट, महायुतीचे मजबूत सरकार, त्यात मनसेची महायुतीला मिळालेली साथ आणि काँग्रेसला साथीला घेऊन उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी जुन्या-नव्याची सरमिसळ करून नव्याने पक्षबांधणी करीत महायुतीसमोर उभे केलेले आव्हान हे पाहता राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीत चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून टोकाचे मतभेद झाले. अनेक बैठका झाल्या. परंतु तडजोड होऊ शकली नाही. तथापि, शरद पवार यांनी अत्यंत संयमाने आणि चाणाक्षपणे वाद हाताळून काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीने मन मोडून का असेना अंतर्गत धुसफूस कमी करायला भाग पाडले आणि ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करून ऐक्याची गुढी उभारत राज्यात सकारात्मक संदेश दिला. परंतु जी काही थोडीबहुत नाराजी आहे, ती विसरून अधिक एकजूट दाखवत मविआला लढण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. यानिमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत पहायला मिळणार आहे. सांगली-भिवंडीच्या जागावाटपावरून आघाडीत टोकाचा वाद झाला. विशेषत: काँग्रेसला स्थानिक पक्षीय बळ असतानाही ठाकरे गटाच्या हट्टापुढे दोन पावले मागे जावे लागले. खरेतर राज्यातील काँग्रेस नेते आपल्या भूमिकेवर ठाम होते. परंतु भाजपविरोधात मजबुतीने लढा देण्यासाठी कुठलीही जोखीम नको, या भूमिकेतून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे स्थानिक पातळ‌ीवर काँग्रेस नेत्यांना मोठी किंमत मोजावी लागली. परंतु नाइलाजाने का होईना नाराजीचा आवंढा गिळून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीचा संदेश दिला. यावेळी जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला गेला. त्यानुसार महाविकास आघाडीतील शिवसेना २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी १० जागा लढवणार आहे. आता सक्षमपणे लढा देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे.

सांगली, भिवंडी, दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेसमधील नाराजी कायम आहे. माजी मंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री तथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड अजूनही अडून बसले आहेत. परंतु महाविकास आघाडीने जागावाटपाचे सूत्र जाहीर केल्याने मित्रपक्षांना नाराज करून हट्ट धरता येत नाही. त्यामुळे तडजोडीचा मार्ग म्हणून मुख्य प्रवाहात येत नव्याने ताकद उभी करावी लागेल, याची कल्पना नाराज नेत्यांना आहे. परंतु काँग्रेस पक्षाचे मजबूत संघटन असतानाही मित्रपक्षांनी या ताकदीचा विचार न करता एकतर्फी जागा घोषित केल्याने काँग्रेसची नाराजी वाढली. तथापि, समोर मोठे आव्हान असताना सध्या तरी आपापसातील मतभेद बाजूला सारून आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने विचार करणे महत्त्वाचे आहे, याची कल्पना दूरदृष्टी असलेल्या शरद पवार यांना आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय संयमाने हा वाद हाताळला आणि नव्या जोमाने कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे काही बोटावर मोजण्याइतके नेते वगळता आता सर्वच नेते कामाला लागले आहेत.

महाविकास आघाडीने बऱ्याच जागांचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यामुळे मोजक्याच जागांचा वाद तत्काळ मार्गी लागेल आणि सर्वच पक्षांचे समाधान होईल, असे मित्रपक्षांना वाटत होते. परंतु आघाडी म्हटले की तडजोडी आल्याच. त्या स्वीकारून पुढे जात आघाडीला मजबूत करण्याच्या दृष्टीने एकजुटीने योगदान देणे महत्त्वाचे आहे. मित्रपक्षांचा विजय हा आपला विजय समजून पुढे चालण्यातच सर्वांचे हित आहे. अर्थात याचा अंदाज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या विश्वजीत कदम यांना संयमाचीच भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे टोकाचे मतभेद असले तरी सक्षम असलेल्या प्रतिस्पर्ध्यांचा एकजुटीने सामना करण्यासाठी नाराज मंडळी लवकरच सक्रिय होतील, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आशा आहे.

महायुतीचे नेते मनमानी करून विरोधकांना संपविण्यासाठी वाट्टेल त्या टोकाला जाण्याची तयारी ठेवत आहेत. एखादा नेता कोणत्या तरी चुकीत सापडला, तर त्यांची वाट अडवण्याचीच भूमिका घेतली जात आहे. रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची जात प्रमाणपत्राची चूक सापडताच सरकारने तातडीने पाऊल टाकत छाननीच्या दिवशीच प्रमाणपत्र रद्द करून त्यांना निवडणुकीच्या मैदानातून बाहेर काढले. हुकूमशाही, विरोधक संपविण्याची रणनीती, सत्तेच्या जोरावर मनमानी याची प्रचिती विरोधकांना पावलोपावली येत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सर्वच विरोधी पक्षांना कुठल्याही चुका न करता मजबुतीने पुढे वाटचाल करावी लागेल, असा सूर उमटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने बऱ्याच ठिकाणी तडजोडी स्वीकारून एक पाऊल पुढे टाकले आहे. हे अतिशय कौतुकास्पद आहे. कुठे ना कुठे नाराजी असते. परंतु ती जास्त काळ धुमसणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल.

महाविकास आघाडीने पाडव्याचा मुहूर्त साधून ऐक्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. मात्र, सर्व काही आलबेल असल्याच्या आविर्भावात आत्मविश्वासाचे प्रदर्शन करणाऱ्या महायुतीला सर्वात मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. सर्वांच्या दबावापोटी काही ठिकाणी धुसफूस सुरू असली, तरी ऐनवेळी स्फोटाची शक्यता अधिक आहे. महाविकास आघाडीत ठरावीक जागांवरून वाद आहे. परंतु महायुतीत भाजपची जागा राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीची जागा शिवसेनेला असे प्रकार बऱ्याच ठिकाणी झाले आहेत. भाजपने छोट्या पक्षांना सोबत घेऊन मोठी ताकद लावली असती तर बऱ्याच जागा हाती लागल्या असत्या. परंतु महायुतीतील अंतर्गत धुसफूस, नेते, पदाधिकाऱ्यांची नाराजी कुणाच्या पथ्यावर पडणार, हे आता जरी सांगता येत नसले, तरी बऱ्याच ठिकाणी महायुतीत नाराजीचे वारे आहेत. आतापर्यंत महायुतीचे तारणहार देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच मतदारसंघांतील बंड मोडून काढले. परंतु पक्षांतर्गत नाराजी खूप मोठी आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवाराचे कोणती व्यक्ती आधीचा खुन्नस ठेवून उट्टे काढेल, हे सांगता येत नाही. त्याचीच युतीला भीती आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटप अजूनही रखडले आहे.

महायुतीत नाशिक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई यासह आणखी काही जागांचा तिढा कायम आहे. महायुतीच्या बैठकीत थोडी कठोर पावले उचलली की, कदाचित या सर्व जागांचा प्रश्न मार्गी लागेलही. परंतु महायुतीच्या जागावाटपात भाजपचा वाढता दबाव, शिंदे सेनेच्या उमेदवार निश्चितीतील भाजपचा हस्तक्षेप, विद्यमान खासदार असताना आणि उमेदवारी निश्चित झालेली असताना त्यांची उमेदवारी रद्द करण्यास मित्रपक्षांना भाग पाडणे, यात स्थानिक पातळीवर भाजप नेते-पदाधिकाऱ्यांकडून होत असलेली मित्रपक्षांची कोंडी याचा जर ऐनवेळी स्फोट झाला, तर तो महायुतीला खूप महागात पडू शकतो. प्रमुख तिन्ही पक्षांचे नेते हा प्रश्न किती चतुराईने हाताळू शकतात, यावर महायुतीचे भवितव्य ठरणार आहे, यात शंका नाही. हे सर्व पाहता महाविकास आघाडीची सावध पावले परिणामकारक ठरण्याची चिन्हे आहेत.

(लेखक नवशक्ति व फ्री प्रेस जर्नल समूहाचे राजकीय संपादक आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in