ठाणे, पालघरसह चार जागांवर महत्त्वपूर्ण लढती

ठाण्यात उबाठाचे राजन विचारे विद्यमान आमदार आहेत. भिवंडीत भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे खासदार असून त्यांना भाजपने तिसऱ्यांदा रणांगणात उतरविले आहे. पालघरमध्ये भाजपने आयात उमेदवार, काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार ॲड. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली.
ठाणे, पालघरसह चार जागांवर महत्त्वपूर्ण लढती

- अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन १५ दिवस उलटून गेले. मात्र अजूनही ठाणे, भिवंडी, कल्याण व पालघर या मतदारसंघांमधील उमेदवारीबाबत अनिश्चितता दिसत आहे. ही अनिश्चितता सर्वपक्षीय आहे. युती आणि आघाडीमधील प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारासाठी आग्रही आहे. त्यासाठी मागील उमेदवारीचे, विजयाचे दाखले दिले जात आहेत. एकूणच २०२४ ची निवडणूक वेगळ्या ट्रॅकवर उभी आहे.

ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी व कल्याण हे लोकसभेचे तीन मतदारसंघ असून पालघर हा चौथा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. भिवंडी मतदारसंघातील चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. मात्र ठाणे का रखडले आहे, हे कळत नाही. ठाण्यात उबाठाचे राजन विचारे विद्यमान आमदार आहेत. भिवंडीत भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे खासदार असून त्यांना भाजपने तिसऱ्यांदा रणांगणात उतरविले आहे. पालघरमध्ये भाजपने आयात उमेदवार, काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार ॲड. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली. वनगा यांना उमेदवारी देण्यामागे त्यांच्या मृत्यूनंतर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता. या अटीतटीच्या लढतीत भाजपने राजेंद्र गावित यांना निवडून आणले. २०२४ ची निवडणूक ही एका वेगळ्या वळणावर उभी आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन १५ दिवस उलटून गेले. मात्र अजूनही ठाणे, भिवंडी, पालघरमधील उमेदवारीबाबत अनिश्चितता दिसत आहे. १९७५ च्या आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचे (मूळचे जनसंघाचे) रामभाऊ म्हाळगी हे सव्वा लाख मतांनी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या देशमुख यांचा पराभव केला होता. १९७८ च्या दरम्यान म्हाळगींचें निधन झाल्याने त्यावेळी जनता पक्षाचे (मूळचे जनसंघाचे) जगन्नाथ पाटील हे विजयी झाले. विशेष म्हणजे त्याकाळी शिवसेना ही काँग्रेसबरोबर होती. १९७८ मध्ये काँग्रेसने ठाण्याचे प्रसिद्ध कायदे पंडित ॲड. प्रभाकर हेगडे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वतः आले होते. हेगडेंच्या प्रचारार्थ ठाकरे यांनी सेंट्रल मैदानावर जाहीर सभाही घेतली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जगन्नाथ पाटील निवडून आले आणि त्यादिवसापासून ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे राहिला. नंतर १९९५ च्या भाजप-शिवसेना युतीमध्ये भाजपचे प्रमोद महाजन यांना ईशान्य मुंबईची जागा हवी असल्याने त्याच्या बदल्यात ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडला. पुढे या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे दोन वेळा व गणेश नाईक यांचे चिरंजीव संजीव नाईक हे एक वेळा निवडून आले. त्यानंतर ही जागा कायम सेनेकडे राहिली. आता २०२४ मध्ये भाजपला ठाणे मतदारसंघ हवा आहे, म्हणून उमेदवार जाहीर होत नाही. तिथून उबाठाने विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आता भाजपचे संजीव नाईक किंवा अन्य नेते उभे राहतील असे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे असल्याने ते ही जागा भाजपसाठी सोडण्यास तयार नाहीत. त्या बदल्यात सेनेकडे असलेली पालघरची जागा सोडण्यास ते तयार आहे. परंतु भाजपला ठाणे हवेच आहे. कारण पुनर्रचनेनंतर त्यात बेलापूर, कळवा, कोपरी, वर्तकनगर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ठाणे महापालिकेवर शिवसेनेचे, तर नवी मुंबई महापालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे.सोमवारी हे वृत्त प्रसिद्ध होत असताना त्या जागेवरचा निर्णय अपेक्षित आहे.

शिवसेनेकडून (शिंदे गट) ठाण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक व माजी आमदार रवींद्र फाटक यांची नावे घेतली जात आहेत. हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला समाजाला जात असला तरी आता सगळ्या पक्षांमध्ये विभाजन झाल्याने मतदार गोंधळून गेला आहे. शिवसेना (उबाठा) यांच्यासाठीही ही जागा महत्त्वाची आहे. शिवसेनाप्रमुखांचे ठाण्यावर असलेले प्रेम ही सहानुभूती विचारेंना पुरी पडणार नाही. ठाण्यातील बहुतेक शिवसैनिक शिंदे गटाकडे गेले आहेत.

कल्याण या मतदारसंघातही मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर एक वेगळेच समीकरण तयार झाले आहे. लोकसभेच्या या मतदारसंघात कल्याण महानगरपालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका येतात. यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात आहे. डोंबिवली ही नगरपालिका कल्याण महापालिकेमध्ये विलीन झाल्याने त्याचाही समावेश आहे. कल्याण मतदारसंघात शहरी वस्तीबरोबर ग्रामीण वस्तीही महत्त्वाची आहे. या मतदारसंघात आगरी समाज हा फॅक्टरही महत्त्वाचा आहे.

भिवंडी हा लोकसभा मतदारसंघ संवेदनशील आहे. या मतदारसंघावर २०१४ पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व होते. दिवंगत भाऊसाहेब धामणकर, दिवंगत सोनुभाऊ बसवंत यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात मुख्य भिवंडी शहर, भिवंडी ग्रामीण, भिवंडी मध्य याचबरोबर शहापूर, मुरबाड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. भाजपने विद्यमान केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे नाव दुसऱ्या यादीतच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांचा प्रचार सुरू होऊन २० दिवस होऊन गेले, तर शुक्रवारी राष्ट्रवादी (शरद पवार) तर्फे बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. बाळ्यामामाचा पूर्व इतिहास पाहिला तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख होते. पुढे त्यांनी मनसे सोडली आणि ते शिवसेनेत गेले. नंतर शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी चौथी उडी राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये मारली आणि उमेदवारी मिळवली. मुख्यतः ही जागा पारंपरिकरीत्या काँग्रेसची होती व आहे आणि म्हणूनच या जागेवरचा दावा नाना पटोले यांनी सोडलेला नाही. काँग्रेसच्या चोरघे यांनी इथून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय वंचित आघाडीचाही उमेदवार येथे दिला जात आहे. यामुळे या मतदारसंघातल्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होण्यापूर्वी डहाणू हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. विभाजन होण्यापूर्वी या मतदारसंघावर डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व होते. इथून दिवंगत श्यामराव परुळेकर ते लक्ष्मणभाऊ मातेरा यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले. पुढे इथून जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे हे काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले. पुढे मुकणेंचे निधन झाल्यानंतर काँग्रेसचे ल. का. दुमडा हे खासदार झाले. त्यानंतर सलग दोनवेळा काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत शंकर नम यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर या मतदारसंघाची पुर्नरचना होऊन पालघर हा लोकसभा मतदारसंघ झाला. सध्या वसई पट्ट्यात बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. त्यांचे तीन विधानसभा सदस्य आहेत. आता राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये जाण्याचे जाहीर केले असून पालघरची जागा भाजपकडे जाईल असा अंदाज असताना गावित भाजपमध्ये उडी मारण्याच्या तयारीत आहेत.

ठाणे, पालघर या दोन जागांच्या उमेदवारीचा निर्णय महायुतीकडून शनिवारपर्यंत झालेला नाही. परंतु सध्या तरी पालघरची जागा भाजपला देऊन शिवसेना (शिंदे गट) ठाणे व कल्याण आपल्यासाठी घेईल, अशी स्थिती आहे. ठाणे-पालघर हे मुंबईला लागून असलेले जिल्हे असून तेथील शहरी वस्तीचे प्रमाण ६०% आहे. पालघरमध्ये ४०% आदिवासी व इतर समाज आहे. आजही तलासरी-डहाणूमध्ये मार्क्सवाद्यांचा वरचष्मा आहे. पालघरमध्ये गावितांबरोबरच इतर चार-पाच नावेही घेतली जात आहेत. राजकीयदृष्ट्या हा जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी उलटापालटा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण गावित हे भाजपचे खासदार असताना २०१९ मध्ये युती असताना शिवसेनेने पालघरची एक जादा जागा भांडून घेतली. मात्र त्यावेळी त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. शेवटी गावित यांनाच शिवसेनेत घेऊन २०१९ ची निवडणूक लढवली होती. आता तेच गावित भाजपच्या तिकिटावर येऊ पाहत आहेत. सध्याचे हे चित्र पाहता ठाणे, कल्याण, भिवंडी व पालघर या चार लोकसभा मतदारसंघांचे आहे. पाहू या, पुढे काय होते ते.

logo
marathi.freepressjournal.in