सत्ता गेल्यावर मागे राहिल, कटकारस्थानांची कुरुपता

२०१४ ला भाजपाची सत्ता आली तेव्हा हिंदुत्वाची सत्ता आली, असा भ्रम पसरवण्यात आला.
सत्ता गेल्यावर मागे राहिल, कटकारस्थानांची कुरुपता

- रघुनाथदादा पाटील

मत आमचेही

२०१४ ला भाजपाची सत्ता आली तेव्हा हिंदुत्वाची सत्ता आली, असा भ्रम पसरवण्यात आला. पण ती प्रत्यक्षात अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची फलश्रुती होती. आजही राम मंदिराच्या मुद्द्याचा निवडणुकीसाठी फारसा उपयोग होताना दिसत नाहिए. याची जाणीव असल्यानेच भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत सत्तेसाठी विधिनिषेधशून्य मार्गांचा वापर केला जात आहे. पक्षात भ्रष्ट नेत्यांची खोगीरभरती केली जात आहे. ज्यांच्यावर पूर्वी आरोप केले त्यांचेच आता समर्थन केले जात आहे. उद्या सत्ता गेल्यानंतर या कटकारस्थानांची कुरुपताच मागे उरणार आहे.

केंद्रीय यंत्रणेचा वापर करत मांडलेला खेळ आणि त्यायोगाने निर्माण झालेली अपरिमित शक्ती याचा भास फडणवीसांना एवढा मोठा झाला की, सर्व शक्तिमान काय तो मीच, चाणक्यानीती काय ती आपलीच, राजकीय मर्यादा म्हणजे मी जी ठरवेन तीच! पुस्तकी हुशारपण असलेल्या उद्दाम आणि रोगट वृत्तीच्या माणसात ज्ञानाचा संयम आणि विनम्रता यावी तरी कुठून? याच अनुदार आणि आत्मकेंद्री वृत्तीचे निदर्शन पुढील कार्यकाळात वरचेवर दिसून आले. युतीमध्ये पारडे वर असणारी शिवसेना फडणवीस यांना सहन होत नव्हती. आपल्या आणि मुख्यमंत्रीपदाच्या आड कुणी येत असेल तर, ती या महाराष्ट्रात मोठा भाऊ असलेली शिवसेना आणि उद्धव ठाकरे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रती असलेला मत्सर त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणूनच अमित शहा यांना सांगून केंद्रीय सत्तेच्या अमर्याद शक्तीच्या आधाराने उद्धव ठाकरे यांचा अंगठा कापून सत्ता हिसकावली.

वरकरणी शिवसेना संपली आणि मरणपंथाला लागली या भ्रमात यांनी फासे टाकायला सुरुवात केली. कुठलीही कुरकुर न करता अगदी सहजपणाने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडले. इथे त्यांची पूर्वकथा संपली. पण जिथे उद्धव ठाकरे यांची पूर्वकथा संपली, तिथूनच फडणवीस यांच्या उत्तरकथेला आणि पतनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. राजकारणात आपली प्रतिष्ठा कायम राहावी या हेतूने केलेली कारस्थाने, क्रौर्याची परिसीमा आणि अन्यायाचे डाग लागत असतानाही आपण जिंकत आहोत, या भ्रमात त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या.

एकीकडे महाराष्ट्रात केलेल्या खेळी आणि नाना तऱ्हेच्या घडामोडी यामुळे बिघडलेली प्रतिमा, विरोधात जाणारे जनमत या पाठलागातून आता भाजपाला सुटका मिळणे कठीण आहे ह्याची जाणीव मोदी-शहांना प्रकर्षाने होऊ लागली. जनतेच्या मनात एकंदरीत भाजपा, फडणवीस आणि मोदी-शहा यांच्याबद्दल निर्माण झालेली कटुता कमी झालीच नाही.

मुख्यमंत्री पदावरील उद्धव ठाकरे जिथे सहन झाले नाही, तिथे शिंदे सहन होणेही शक्य नव्हते. परिणामी महाराष्ट्रातील दुसरी ताकदवर आसामी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांना सोबत घेण्याची खेळी फडणवीस यांनी केली. जेणेकरून शिंदेंचे महत्त्व कमी व्हावे तसेच वजनदार, तालेवार आणि खानदानी मराठा नेते आपल्या सोबत सतत राहावेत आणि आपला राज्यातील दबदबाही कायम राहावा, यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. आत्मकेंद्री दृष्टीने पाहणे ही राजकीय नेत्याची कमकुवत बाजू असते. अशा नेत्याला इतर सर्व मूल्ये पारखी होतात. म्हणूनच पक्षाने दिलेला आदेश मान्य करण्याशिवाय फडणवीसांकडे कुठलाही पर्याय राहिला नाही.

मुख्यमंत्रीपद मिळवायचेच या ईर्षेने पेटलेल्या या नेत्याने आपल्याहून कोणी सर्वोच्च नेता राज्यात असूच नये, असलाच तर त्याचाही काटा कसाही काढावा या उद्देशाने आपल्याच पक्षातील नेत्यांचा काटा काढण्याचे धोरण अवलंबिले. प्रवासाची दिशा चुकली की येणारे प्रत्येक स्टेशन चुकीचे लागते. याच न्यायाने पुढे काँग्रेसमधील अशोक चव्हाण, ज्यांना कधीकाळी या मंडळींनीच ‘डीलर’ म्हणून बदनाम केले होते त्यांनाच सोबत घेण्याची बुद्धी यांना सुचली. आता परपक्षातून घेतलेल्या या नेत्यांना प्रामाणिक आणि विकास पुरुष म्हणून स्थापित करण्याची जबाबदारी भाजपाच्या माथ्यावर येऊन पडली आहे. बाहेरून दिसायला भलेही भाजपा बलिष्ठ झाला असे वाटत असले, तरी पण जनतेच्या मनातील भाजपाची भ्रष्टाचारविरोधी प्रतिमा आतून खंगत आहे. केंद्रात सत्ता आल्यावर भाजपाला विशेषतः संघाला जो भ्रम झाला की, सत्ता हिंदुत्वाच्या बळावर आली; त्याला तडा देणारी ही निवडणूक ठरत आहे. या विधानामागचे कारण स्पष्ट आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप, देशभर उभे राहिलेले आंदोलन, अण्णा हजारे यांच्या स्वरूपात उभा केलेला प्रतिगांधी आणि आता देश भ्रष्टाचारमुक्त केला जाणार अशी मोदींची उभी केलेली प्रतिमा या कारणांमुळे देशभरात काँग्रेसविरोधाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी २०१४ मध्ये भाजपा निर्विवाद बहुमताने सत्तेत आला. एकंदरीत परिस्थितीचा विचार करता लक्षात येते की, २०१४ मध्येही भाजपाला मिळालेले यश हे हिंदुत्वाचे यश नव्हतेच; भाजपाला मिळालेले यश हे ‘भ्रष्टाचारविरोधी चळवळ’ याअर्थी होते. याचा प्रत्यय आजही वेगवेगळ्या गोष्टीतून येतो. आज ‘राम मंदिर’ हा निवडणुकीतील मुद्दा होऊ शकलेला नाही. मागील दहा वर्षांच्या काळात मोदी सरकारने घेतलेले निर्णय, एका रात्रीत केलेली नोटबंदी, देशावर लादलेला जीएसटी, भयंकर प्रमाणात वाढलेली महागाई, असंवैधानिक असलेल्या इलेक्टोरल बाँडचा घोटाळा, सगळे भ्रष्टाचारी पक्षात गोळा करण्याची सुचलेली दुर्बुद्धी, अशा प्रकारे सर्व न्यूनत्व वेशीला टांगून पुढील निवडणुका जिंकण्याची रणनीती हीच मुळात त्यांच्या पतनाची सुरुवात होती. ज्यांना आपण भ्रष्ट म्हटले त्यांच्याच एकेका कृत्याचे समर्थन, मनात नसतानाही त्यांना आता करावे लागत आहे. ज्या मातब्बर नेत्यांना वेठीस धरून सोबत आणले, आज त्यांची बाजू मांडत फिरावे लागत असल्याने मोदींची विश्वासार्हता लयाला गेली आहे. आता विरोधकांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायला काहीच उरले नाही, तेव्हा पुन्हा चावून-चावून पार चोथा झालेला हिंदू-मुस्लिम मुद्दा बाहेर काढावा लागत आहे. तरीही परिस्थिती हाताबाहेर गेल्याची जाणीव झाल्याने चक्क आपल्या अरबपती मित्रांची नावे आणि त्यांनी जमा केलेले काळे धन याबाबत कबुली देत ‘काँग्रेसला टेम्पो पाठवला’ असे विधान मोदींना करावे लागले. त्याचवेळी ‘नोटबंदीने काळे धन संपुष्टात आले’ या आपणच केलेल्या दाव्यातील हवा आपणच काढून टाकल्याची जाणीवही मोदींना झाली नाही. लिहून दिलेली भाषणे वाचून कार्यकाळ कंठताना टेलिप्रॉम्प्टरच्या मदतीने आणलेला आव केव्हाच गळून पडलेला आहे.

कुठलाही मुद्दा आपल्याला तारायला उपयोगाचा नाही हे लक्षात आल्याने सहानुभूतीसाठी आता पुन्हा एकदा अश्रू ढाळणे एवढाच पर्याय उरलाय असे समजून पुढील टप्प्यात त्याही कार्यक्रमाचा इव्हेंट पायाशी लोळण घेणाऱ्या माध्यमांच्या आधारे पार पाडला. सत्तेच्या कैफात केलेला उन्माद या देशाला पचनी पडणारच नव्हता. न्यायालये आणि निवडणूक आयोग या संस्थादेखील आपली विश्वासार्हता गमावण्याच्या सीमारेषेवर आल्या आहेत. माध्यमातील तथाकथित विचारवंत आणि बुद्धिवंतांची संवेदनक्षमता बधीर होऊन काळवंडली आहे.

सत्ता भोगत असताना आतली कुरुपता फार काळ लपवता येत नाही. हेकेखोर आणि वैफल्याने ग्रस्त मने भव्यदिव्य असे काही निर्माण करू शकत नाही, याची प्रचितीच जणू आपल्याला वारंवार येते. कुरुप आणि संकुचित वृत्ती कायम संशयाने पोखरलेली असते.

संकुचित व्यक्तित्त्वाची शोकांतिका जर कशात असेल तर ती आपल्याला सत्ता भोगायची संधी देणाऱ्या जनतेशी आपण प्रतारणा केली आहे, या जाणीवेत असते. केवळ अंगी संयम नसल्याने बेजबाबदार वर्तनाने आपण आपला सुरेख भविष्यकाळ असा विपरीत दिशेला वळवल्याचे दुःख त्यांना आयुष्यभर सोसावे लागणार आहे. आपल्याच पक्षातून वाट्याला येणारी वंचना, विरोधकांचा राग आणि जनतेत उद्ध्वस्त झालेली प्रतिमा, या तिहेरी दोषांचे आपण वारस ठरलो, ही जाणीव त्यांना सतत छळणार आहे.

(लेखक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in