कार्यकरता हरवलाय

कुणाचा तरी आदर्श आपल्या जीवनात घ्यावा असं नेतृत्वही त्याला दिसत नाही
कार्यकरता हरवलाय

आजच्या तरुणांचा कोणत्याच राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही; तो राजकीयदृष्ट्या भांबावल्यासारखा, दिशाहीन झालाय. कुणाचा तरी आदर्श आपल्या जीवनात घ्यावा असं नेतृत्वही त्याला दिसत नाही. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या आंदोलनात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते, त्यांना अण्णांसारखा साधासुधा माणूस आकर्षित करू शकला. इतका स्वच्छ निस्वार्थी माणूस असू शकतो याचं आश्चर्य आणि कुतूहल त्यांना वाटलं होतं. पण कधीकाळी आपल्याकडं अशी माणसं शेकड्यांनीच नव्हे तर हजारोंनी होती; त्यावेळी त्यांनाच कार्यकर्ते संबोधलं जाई. त्यांच्याकडं कोणी त्यागी, निस्वार्थी म्हणून आदरार्थी बघत असला तरी त्यांना कोणी साधुसंत समजत नव्हतं. आपण प्रामाणिक असावं ही भावना समाजात सर्वत्रच रूढ होती. अशी निस्वार्थी माणसंही 'कार्यकर्ते' म्हटली जायची. आज अशी माणसं दुर्मिळ होताहेत. तसे आदर्श आजच्या पिढीसमोर नाहीत. त्यांना कार्यकर्ता म्हणजे काय, कसं समजावं असा प्रयत्न राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून होताना दिसत नाही. पूर्वी सर्वच पक्षात असे निष्ठावान कार्यकर्ते होते. *गांधी टोपी डोक्यावर घालण्यापूर्वी त्यावर कपाळ टेकवून वंदन करणारे काँग्रेस कार्यकर्ते होते, नेहरू सदऱ्‍याला ठिगळ लावून खांद्यावर शबनम बॅग लटकवून देशात समाजवाद आणण्याच्या निश्चयानं वठलेले साथी समाजवादी होते. उच्चविद्याविभूषित पदवीधर द्विपदवीधर झालेले अनेक जण राष्ट्रवादाच्या विचारानं भारून देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार पोचवणारे स्वयंसेवक होते. शिवसेनाप्रमुखांचा आदेश येताच जीवाचीही पर्वा न करता दे धडक बेधडक भिडणारे शिवसैनिक होते! आता अशा कार्यकर्त्यांची सर्वत्र वानवाच दिसून येतेय.

सगळ्याच पक्षनेतृत्वाला हे जाणवतं. याचं कारण, आजचं पक्षीय राजकारण लोकांच्या सुखदुःखाशी निगडीत राहिलेलं नाही. कोणत्याही विचारांशी वाहिलेलं नाही. केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि निवडणुकीसाठीच! असं ह्या पक्षांचं स्वरूप राहिलेलंय. साऱ्यांच्या निष्ठा या सत्तेला आणि खुर्चीला वाहिलेल्या असल्यानं सारे नेते हे सत्ताधारी पुढारी होण्यासाठीच सज्ज झाले आहेत. कार्यकर्ता व्हायला कोणीच तयार नाही. याचं कारण राजकारण हा व्यवसाय बनलाय आणि नेते, कार्यकर्ते हे व्यावसायिक झालेत. पूर्वीचा तो निरलस, निरपेक्ष, निस्वार्थी कार्यकर्ता आज गायब झालाय, हरवलाय!

कार्यकर्त्यांची मोजणी ज्या काळापासून राजकारण्यांनी अर्थकारणात, पैशात केली त्या क्षणापासून कार्यकर्ता वृत्तीचा ऱ्हास होत गेला. आताशी नवे कार्यकर्ते कार्यक्रमानंतर मिळणाऱ्या पाकिटांबरोबरच मटणासह ओल्या पार्टीची वाट पाहू लागलेत. विविध चळवळीत भक्तिभावानं झोकून देणं आता दूर झालंय. आणीबाणी सोसत प्रसंगी भूमिगत राहून ध्येयासाठी लढणाऱ्यांना तुरुंगवासाची भीती नव्हती की, पोटापाण्याची चिंता नव्हती. समाजरचनेसाठी आवश्यक त्या यज्ञात अशा कार्यकर्त्यांच्या हजारो समिधा होऊन लढल्या. आजही विविध मोर्चे, सभा, संमेलन, मेळाव्याला गर्दी होते. पण तळहातावर ठेवलेल्या नोटांच्या हिशोबानं! टाळ्या वाजतात त्याही त्याच हिशेबानं! कार्यक्रमानंतर पाण्याचा पाऊच, पोळीभाजीची पाकीटं हजारोंनी अंगावर फेकली जातात. ठरलेल्या वेळात आलेल्या माणसाच्या लोंढी पुन्हा ट्रकमध्ये चढविल्या जातात. आजच्या एखाद्या पक्षाची सभा संपल्यानंतर उद्या कोणत्या पक्षाच्या सभेला माणसं न्यायची, यावर चर्चा झडतात. कोणत्यातरी विषयावर भाळून संपूर्ण जीवन कारणी लावण्याचा वेड गेल्या दोन दशकापर्यंतच्या पिढीत होतं. परंतु या दरम्यान घडलेल्या नेत्यांनी अशा भावनिक कार्यकर्त्यांचा गैरवापर करून घेतला. हा कार्यकर्ता वर्ग चपला सांभाळणारा ठरला. जुन्या कार्यकर्त्यांना अलगद बाजूला सारलं जातं आणि सुरू होतो नव्या पिढीच्या हिशोबी कार्यकर्त्यांचा खेळ! यात तत्त्व, विचार, निष्ठा, आदर्श, ध्येयं याला थारा नसतो की तत्त्वासाठी, निष्ठेसाठी, सत्यासाठी, प्राणांची आहुती देण्याची भूकही नसते. अशा व्यावसायिक मनोवृत्तीचा आताशी शिरकाव झाला आहे तो 'इव्हेंट मॅनेजमेंट'चा!

सध्या राजकीय फडावर हाच भंगार मालाचा लिलाव सुरु आहे. मतदारांचं या दलालांना काही घेणं देणं नाही. त्याला गृहीत धरुन सगळा नासवा-नासवीचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. मतदार थिएटरमध्ये बसल्यासारखं हे बघतो अन टाळ्या पिटतो. कपट कारस्थानाला हुशारी समजतो. कोणाला तरी शिव्या घालतो. कोणाला तरी मत देतो. पुन्हा पुढच्या खेळाचं तिकीट काढतो. आपल्या समाजाची मनोदशाच समजत नाही.

सकाळी उठून पोटाची खळगी भरण्यासाठी त्याची रोजगार यात्रा सुरु होते. तो मजूर अड्डयावर स्वतःला भाकरीच्या भावात भाड्याने देतो. आणि राजकारणी तिकडं तारांकित हॉटेलात जनतेच्या पैशावर डुकरासारखे चरतात गाढवासारखे लोळतात. समाज हताशपणे कोणातरी सद्विचारी नेत्याची वाट पाहात बसतो.

दररोज साने गुरुजी पैदा होत नसतात. समाज पुरुषानंच गांधी बनायचं असतं. पण आपला समाज पराभूत मनोवृत्तीचा आहे लढाईच्या आधीच हत्यार खाली ठेवणारा. कितीही दुर्धर प्रसंग आला तरी कोपऱ्यातल्या कोपऱ्यात जागा करून राहणारा. पण मानेवरचं जोखड भिरकावून देत नाही. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान! परिस्थिती शरण समाजाचा निस्तेज चेहरा पाहावत नाही. गलितगात्र लोळागोळा झालेल्या समाजात दंगली घडविण्यासाठी प्राण कोण फुंकतो कोण जाणे. पण तो नक्कीच देशाचा हितचिंतक नाही.

सामान्य नागरिकाला जोपर्यंत लोकशाहीतल्या मतांचं मूल्य समजत नाही. घटना साक्षर होत नाही. तोपर्यंत फडावर तमाशाची रंगीत तालीम होतच राहणार, दलाली आणि लिलावही होत राहतील. कोणीही शहाजोग नाही. सगळे एका आळीत आणि एकाच चाळीत राहतात. त्यांची संस्कृतीही एकच आहे. हे आम्ही नेहमीच म्हणतो आणि मतदार जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत म्हणत राहणार. राजकीय पक्षाची विचारधारा ह्या त्यावर चढवलेले पोषाख असतात. जात आणि पैसा याचं वास्तव राजकीय नेते कधीही दुर्लक्षित करत नाहीत. ते अधिक जोमानं त्याकडं पाहतात. मात्र पत्रकार आणि राजकीय विश्लेषक ते ठळकपणे मांडत नाहीत. राजकीय पक्षांच्या विचारधारेनुसार त्यांची धोरणं आणि कार्यक्रम असतात.

हे इथं विसरलं जातं. मूल्याधिष्ठित राजकारणाचे तीनतेरा वाजवले जातात. 'निवडून येण्याची क्षमता' या गोंडस नावाखाली तमाम ध्येय, तत्व, निष्ठा ह्या पायदळी तुडविल्या जातात. पक्षविचारांशी बांधिलकी, कार्यकर्त्यानं तळागाळापासून केलेलं पक्षाचं काम मातीमोल ठरवलं जातं. पैसा खर्च करण्याची क्षमता, निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही आयुधं वापरण्याची ताकद असेल तर मग पक्षनिष्ठा हवी कशाला? आयुष्यभर अपमान, निंदा, टिंगलटवाळी प्रसंगी मार खाऊन काम केलेल्या संघाच्या स्वयंसेवकांना, जनसंघ, भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षाची झालेली ही अधोगती पाहून काय वाटत असेल? पक्षांत झालेल्या या भाऊगर्दीनं ती सुखावली असतील का? ज्या काँग्रेसी मार्गाला कार्यकर्त्यांनी आयुष्यभर विरोध केला त्याच मार्गावर आता पक्षाची सुरू असलेली ही वाटचाल आत्मक्लेश करणारी आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in