महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा!

महायुतीची उमेदवारी मिळाली की, ७५ टक्के विजय साकारला, असेच सगळीकडे वातावरण आहे.
महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा!

-केशव उपाध्ये

मत आमचेही

महायुतीची उमेदवारी मिळाली की, ७५ टक्के विजय साकारला, असेच सगळीकडे वातावरण आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरळीत सुरू असताना महाआघाडीच्या जागावाटपामध्ये अनेक तिढे आहेत. महाआघाडीने कितीही उसने अवसान आणले तरी त्यांची उमेदवारी स्वीकारायलाही कोणी तयार नाही, तर सुरळीत जागावाटपामध्येच महायुतीचा निम्मा विजय साकारलेला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीतील जागावाटपाची पहिली लढाई महायुतीनेच जिंकली आहे.

लोकसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून महायुती आणि महाआघाडी यांचे कुरघोड्यांचे राजकारण जोर धरू लागले आहे. महायुतीच्या जागावाटपासंदर्भातील महत्त्वाची बैठक झाली असून राज्यामध्ये ४८ पैकी ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणारच, हे समीकरण मांडून ‘युती’ची पावले पडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे परिपूर्ण नियोजन आणि ‘महाचाणक्य’ अमित शहा यांचे मार्गदर्शन, या माध्यमातून अंतिम यादी बाहेर पडणार आहे. महायुतीची उमेदवारी मिळाली की, ७५ टक्के विजय साकारला, असेच सगळीकडे वातावरण आहे. मीडियामध्ये पेरले गेलेले अपरिपक्व गणित नजरेआड करण्याची ही वेळ आहे, हे प्रथम लक्षात घ्यायला हवे!

एकीकडे महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरळीत सुरू असताना (मीडियाचे आकलन वेगळे असू शकते!) दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे मात्र धिंडवडे निघाले आहेत. शिल्लक सेनेच्या प्रवक्त्याची रोज माध्यमांपुढील बकवास, रोज करण्यात येणारे नवनवीन दावे, काँग्रेसने फेटाळलेले अनेक मुद्दे, शरद पवार राष्ट्रवादीच्या मनातील मांडे.. आणि हे वातावरण बरे मानावे, असे वाटत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी टाकलेले बाऊन्सर्स! महाआघाडीच्या जागावाटपामध्येच एवढे गोंधळ सुरू आहेत की, या आघाडीच्या बिघाडीमध्ये केव्हा काय घडेल याचीच डोकेदुखी असणार!

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची ताकद कित्येक पटीने वाढली आहे, हे कोणीही मान्य करेल. त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती, तर त्या वेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार ठिकाणी विजय मिळवता आला होता. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती असल्यामुळे आणि सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असल्यामुळे युतीला ४३ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेच्या १८ जागांचा समावेश होता. कालांतराने शिवसेनेची शकले झाली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यातील १३ खासदार त्यांच्याबरोबर गेले, जे आता भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. उद्धव ठाकरे यांनी कितीही दावा केला की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला तरी सर्वसामान्य मतदार हे जाणतो की, भारतीय जनता पक्षाची ताकद आणि नरेंद्र मोदींचा चेहरा यामुळेच शिवसेना तग धरू शकली होती.

आता पाच वर्षांत परिस्थिती खूप बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे गट फुटून भारतीय जनता पक्षाबरोबर महायुतीमध्ये आले आहेत. बहुसंख्य खासदार आणि कार्यकर्ते हे त्यामुळे अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याबरोबर आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या लोकसभेमध्ये महायुती एक प्रचंड ताकद म्हणून पुढे येणार असून ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याच्या ईर्षेने लढत आहे. या उलट शिल्लक शिवसेना, शिल्लक राष्ट्रवादी आणि संपूर्ण पाया खचलेली काँग्रेस यांच्या आघाडीचे अवसान आधीच गळून पडले आहे. त्यांनी आपापसात कितीही उसने अवसान आणले तरी आघाडीची उमेदवारी मनापासून स्वीकारण्यास कोणीही तयार नाही. त्यांची उमेदवारी घेणे म्हणजे अपयशाचा धोंडा गळ्यात बांधण्यासारखे आहे, हे तीनही पक्षांना कळून चुकले आहे.

महाआघाडीतील जागांवरून रस्सीखेच सुरू असली तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांचे दावे हास्यास्पद वाटू लागले आहेत. शरदचंद्र पवार गटाची नेहमीप्रमाणे ‘ज्येष्ठ नेते पवार साहेब काहीतरी चमत्कार करतील’ यावर सगळी मदार आहे. मोठमोठ्या घोषणा आणि आव्हान देणारे, टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यांमध्ये मुळीच धार आणि जोर नसतो. त्यात केवळ फुशारक्या आणि बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई मदतीला येईल, हा आशावाद असतो, हे मतदारांना आता कळून चुकले आहे. त्यातच जागावाटपाचे गणित निश्चित झालेले नसताना बारामतीमधून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी तसेच उबाठा गटाकडून अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने अंतर्गत धुसफूस वाढली आहे. महाआघाडीतील तीनही पक्ष एकसंध नाहीत, हे त्यामुळेच क्षणोक्षणी जाणवत आहे. हा सर्व गोंधळ कमी की काय म्हणून वंचित बहुजन आघाडी त्यांना रोज वेठीस धरत आहे. त्यांच्या डावपेचामुळे महाआघाडीच्या बिघाडीत बहुमोलाची भर पडत आहे. महाआघाडीचा रुतलेला रथ वंचितमुळे आणखी गाळात चालला आहे.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, महायुतीचा प्रचार हा विकासकामांचा आढावा घेण्यावर आहे. तर आघाडीकडे शिव्याशाप, टोमणे, विकृत वक्तव्य याशिवाय काहीही नाही. दूरदृष्टी तर मुळीच नाही. यामुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाचा वारू आता चौफेर उधळू लागेल, हे सर्वांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच कबूल करून टाकले आहे. महायुतीमधील बैठकांचा धडाका आणि शिस्तबद्धता पटकन लक्षात येत आहे, तर दुसरीकडे महाआघाडीमधील विस्कळीतपणा लपून राहिलेला नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे परस्पर निर्णय, राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या हातात काहीच नसल्यामुळे दिल्लीशी संपर्क यात एकसूत्रता कुठेच दिसत नाही. महायुतीने ‘उमेदवाराचा विजय’ हाच एकमेव धागा पकडल्यामुळे आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादीनेही ते मान्य केले असल्यामुळे जागावाटपाचा प्रश्न सुरळीत सुटणार आहे. या उलट महाआघाडीचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाहू या, घोडा मैदान जवळच आहे. सुरळीत जागावाटपामध्येच महायुतीचा निम्मा विजय साकारला जाणार आहे, हे नक्की!

(लेखक भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in