मेकॉले आणि शिक्षणातील जातीवाद

मेकॉलेच्या १८३५च्या शिक्षण धोरणातून भारतात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला, पण त्यामागे जातवर्गीय व साम्राज्यवादी अजेंडा होता. शिक्षण हे ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी ब्राह्मणी विचारसरणीसोबत हातमिळवणी करून वापरले. या धोरणातून निवडकांना शिक्षण, इंग्रजी भाषेचा पुरस्कार आणि आधुनिक ज्ञानाचा प्रसार केला गेला, परंतु हा बदल तळागाळातील सुधारणेसाठी नव्हता, तर सत्ताधाऱ्यांच्या हितसंबंध रक्षणासाठी होता.
मेकॉले आणि शिक्षणातील जातीवाद
Published on

शिक्षणनामा

रमेश बिजेकर

मेकॉलेच्या १८३५च्या शिक्षण धोरणातून भारतात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झाला, पण त्यामागे जातवर्गीय व साम्राज्यवादी अजेंडा होता. शिक्षण हे ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी ब्राह्मणी विचारसरणीसोबत हातमिळवणी करून वापरले. या धोरणातून निवडकांना शिक्षण, इंग्रजी भाषेचा पुरस्कार आणि आधुनिक ज्ञानाचा प्रसार केला गेला, परंतु हा बदल तळागाळातील सुधारणेसाठी नव्हता, तर सत्ताधाऱ्यांच्या हितसंबंध रक्षणासाठी होता. त्यामुळे एक ब्राह्मो-आंग्ल बुद्धिजीवी वर्ग उदयास आला.

भारतातील सामंती (जातीगत) उत्पादनसंबंध कायम ठेवून औद्योगिक (वर्गीय) उत्पादनसंबंधांचे रोपन ब्रिटिशांनी केले. त्यामुळे जातवर्गीय उत्पादनसंबंध अस्तित्वात आले. या नव्या व्यवस्थेने जातवर्गीय दृष्टिकोन, रचना व संस्कृतीला जन्म दिला. राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था, संस्कृती, न्यायव्यवस्था, शिक्षण या महत्त्वाच्या क्षेत्रांसह मानवी जीवनाकडे बघण्याचा पुरुषसत्ताक जातवर्गीय दृष्टिकोन या व्यवस्थेने दिला. व्यवस्थेच्या समर्थनासाठी जनतेची विचारसरणी व संस्कृती ब्रिटिश सत्ताधारी आणि ब्राह्मणी विचारसरणीने एकमेकांशी हातमिळवणी करून क्रमाक्रमाने घडवली. त्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन म्हणून सत्ताधाऱ्यांनी वापरले.

ब्रिटिशांची निरंकुश सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. जातीय मूल्ये व रचनेचे पोषण करत साम्राज्यवादी शिक्षणाचा पुरस्कार ब्रिटिश सत्तेने केला. त्यांचा शिक्षण दृष्टिकोन १८१३चा चार्टर कायदा, १८३५चे मेकॉले धोरण, १८५४ चा वुडचा खलिता व हंटर कमिशन यांतून स्पष्ट होतो. ईस्ट इंडिया कंपनीच्या १८१३च्या चार्टरमध्ये बदल करून मेकॉलेच्या नेतृत्वाखाली पहिले व्यापक धोरण १८३५ मध्ये जाहीर करण्यात आले. भारताच्या जातीय समाजातील शिक्षणबंदीच्या पार्श्वभूमीवर हे धोरण महत्त्वाचे होते. तळागाळातील जातींनी ब्रिटिश धोरणाचे स्वागत केले. त्यांच्या मते, इंग्रज आले नसते, तर शिक्षण खुले झाले नसते. या खुलेपणाकडे दुर्लक्ष करता येत नसले, तरी टीकेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या धोरणावर आजतागायत वेगवेगळ्या विचारप्रवाहांतून मुख्यतः दोन आक्षेप घेतले जातात. यातील पहिला व सर्वात परिचित आक्षेप ब्राह्मणी प्रवाहाकडून घेतला जातो. मेकॉलेचे धोरण कारकून बनवणारे व पाश्चात्य भोगवादी संस्कृतीचा पुरस्कार करणारे आहे, असा त्यांचा आक्षेप आहे. दुसरा आक्षेप डाव्या विचारसरणीचा आहे. त्यांच्या मते, हे धोरण साम्राज्यवादी असून, वर्गीय समाजरचनेला बळकटी आणणारे आहे. या दोन्ही आक्षेपांतील तथ्य तपासणे गरजेचे आहे.

मेकॉलेच्या शिक्षण धोरणाचे प्रमुख चार बिंदू आहेत- शिक्षणाचे माध्यम इंग्रजी, आधुनिक व साम्राज्यवादी ज्ञानप्रणाली, मध्यस्थ तयार करणे आणि निवडकांना शिक्षण देणे. मेकॉलेच्या शिक्षण धोरणाला १७९२ मध्ये चार्ल्स ग्रांटने भारतीयांना नैतिक व इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार करून पायाभूत भूमिका मांडली होती. हीच भूमिका मेकॉलेने सुधारित स्वरूपात पुढे आणली. त्याच्या नैतिक शिक्षणाच्या आशयातून व इंग्रजी भाषेच्या पुरस्काराच्या उद्दिष्टातून कमिटीत झालेल्या वादात हे स्पष्ट होते. ‘लनिड नॅटिव्हस ऑफ इंडिया’ यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी १८१३च्या चार्टर कायद्यात तरतूद करण्यात आली होती. संस्कृत व अरेबिक साहित्याच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे, असा अर्थ चार्टर कायद्याचा काढला जात होता. त्यामुळे कमिटीत याविषयी वाद उभा राहिला. ‘लनिड नॅटिव्हस ऑफ इंडिया’ म्हणजे नेमके कोण? आणि संस्कृत-अरेबिक की इंग्रजीचा पुरस्कार? या दोन मुद्द्यांवर कोलकातातील ‘कमिटी ऑफ एज्युकेशन’मध्ये वाद झाला. या वादात पाच-पाच मतांची दुही झाली. या कमिटीचे अध्यक्ष मेकॉले होते. त्यांनी निर्णायक मत दिले. ‘लनिड नॅटिव्हस ऑफ इंडिया’ या संज्ञेचा अर्थ संस्कृत व अरेबिक या ऐतद्देशीय वाङ्मयाच्या पुनर्जागरणाशी संबंधित असावा, असा अर्थ आजतागायत काढला जातो. असे मांडून मेकॉलेने या धारणेशी असहमती दर्शवली आणि पुढील तर्क मांडला- “मिल्टनची कविता, लॉकचे तत्त्वज्ञान, न्यूटनचे पदार्थविज्ञान अभ्यासणाऱ्या ऐतद्देशीयांना ‘सुशिक्षित ऐतद्देशीय’ या उपाधीने संसदेने सन्मानित केले नसते.” (स्वैर भाषांतर)

शिक्षित ऐतद्देशीयांची पुनर्व्याख्या करून इंग्रजी शिक्षणाच्या बाजूने मेकॉलेने मत दिले. भारतातील पुरुषसत्ताक वर्ण-जाती व्यवस्था, मूल्ये व सामाजिक रचना कायम ठेवण्याची ही भूमिका होती. इंग्रजीच्या पुरस्कारातून जात-बंदिस्त समाजरचनेत बदल घडवण्याचे उद्दिष्ट मेकॉलेचे नव्हते, तर औद्योगिक उत्पादनाच्या गरजेतून आणि सरकार व जनता यामधील मध्यस्थाच्या आवश्यकतेतून आधुनिक ज्ञान व इंग्रजीचा पुरस्कार करण्यात आला. साम्राज्यवादी धोरणाच्या बाजूने जनमत घडवण्यासाठी इंग्रजीच्या अभ्यासक्रमात बायबल, धर्मशास्त्र, इलियड, शेक्सपियर यांचा समावेश करण्यात आला. तो म्हणतो -

“We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals and in intellects.”

संस्कृत, अरेबिकमधील ब्राह्मणी व पुराणमतवादी साहित्य मेकॉलेला टाकाऊ व निकृष्ट वाटत होते. त्याचवेळी तो बायबलचे समर्थन करत होता. मेकॉलेची ही विसंगती लक्षात घेणे गरजेचे आहे. जातीव्यवस्था वर्धिष्णु राहिलेली नव्हती. तिच्या पर्यायासाठी औद्योगिक उत्पादनाची सुरुवात झाली होती. जातीउत्पादनाची जागा औद्योगिक उत्पादनाने घेण्याचा अवकाश निर्माण झाला होता. औद्योगिक उत्पादनाला आधुनिक ज्ञानाची गरज होती. अशा वेळी आधुनिक ज्ञानाच्या पुरस्कारातून मेकॉलेने पुढारलेली भूमिका घेतली, तर आधुनिक ज्ञान व बायबलचे समर्थन साम्राज्यवादाच्या समर्थनासाठी केले - हे त्याचे प्रतिगामित्व होते.

मेकॉलेच्या शिक्षण धोरणाचा परिणाम पुढील वाटचालीवर होत राहिला. मुंबई सरकारचे सदस्य जे. फैरिश यांच्या भूमिकेतून हे स्पष्ट होते. जे. फैरिश १८३८ मध्ये म्हणतो - “आम्ही अशा एका असाधारण परिस्थितीत आहोत, की एका मोठ्या जनसमूहावर निरंकुश सत्ता प्रस्थापित केली. त्यांचा रंग, वंश, धर्म, भावना, सवयी या आमच्याशी जुळत नाहीत आणि त्यांची निष्ठा अजूनही त्यांच्या राजांशी जुळलेली आहे. अशा जनतेला अंकीत करण्याचे दोन मार्ग आहेत - सैनिक बळ व विचारसरणी. यापैकी विचारसरणीने आपल्या बाजूने घडवण्यासाठी शिक्षणाचा वापर केला जावा. हे शिक्षण देताना त्यांच्या स्व-अस्तित्वाची चेतना जागृत होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.” (सांस्कृतिक साम्राज्यवाद और शिक्षा - मुक्त भाषांतर )

यातून स्पष्ट होते की, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण किंवा आमूलाग्र परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट मेकॉलेचे नव्हते, तर साम्राज्यवादी धोरणाला बळकटी देणे हेच उद्दिष्ट होते. या साम्राज्यवादी धोरणाचा लाभार्थी ऐतद्देशीय अभिजन वर्ग ठरला. हे मार्टिन कानाॅय यांनी पुढीलप्रमाणे मांडले-

“...अभिजनों के लिए शिक्षा की व्यवस्था हुई। अंग्रेज भारतीयों को अर्थशास्त्र, प्रौद्योगिकी, विज्ञान और राजनीति के मूल सिद्धांतों की गंभीर समझ देने का प्रयत्न नहीं कर रहे थे; वे तो छात्रों को अंग्रेजी साहित्य, दर्शन, तत्त्वज्ञान का पाठ तोता-रटंत की शैली में गुलामों के लिए उपयुक्त तरीके से पढ़ाकर... संतुष्ट थे।... अत्यंत महत्त्वपूर्ण बात यह भी थी कि उसके द्वारा उनमें महान अंग्रेजी भाषा और संस्कृति के अभिजातीय सद्गुणों के प्रति आदर और विस्मय की भावना उमड़ती थी, और समानांतर अपनी जातीय पृष्ठभूमि के प्रति निराधार और घृणा का भाव पनपता था।...”

हा नवा ‘ब्राह्मो-आंग्ल’ बुद्धिजीवी वर्ग उदयाला आला, जो जातवर्गीय रचनेचे प्रतीक होता.

ramesh.bijekar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in