
भ्रम-विभ्रम
सम्राट हटकर
गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही वेगवेगळ्या स्यूडो सायन्सवर आधारलेल्या उपचार पद्धती पुढे आल्या आहेत, त्यात चुंबकीय उपचार पद्धतीचा समावेश होतो. ही पद्धती ग्रह-ताऱ्यांच्या चुंबकीय क्षेत्राच्या तर्कावर आधारलेली आहे. माणसाच्या शरीरातील विद्युत चुंबकीय बल लोहचुंबकाच्या वापराने नियंत्रित करता येते, या तत्त्वाच्या आधारे ही भोंदूगिरी सुरू असते.
आजार दूर करण्याच्या अनेक उपचार पद्धती जगभरात अस्तित्वात आहेत. त्यामध्ये आजारांच्या कारणांचाही शोध घेतला जातो. आजाराची वेगवेगळी कारणे आहेत. दूषित अन्नपाण्यातून रोगजंतू, घातक रसायने तसेच श्वसनाद्वारे धूर, धूळ व वायूचा शरीरात प्रवेश होणे. प्राणी, कीटक यांनी चावा घेणे. वेगवेगळ्या प्रकारची प्रकाशकिरणे व रसायने याचा शरीराशी संबंध येणे. हवामानातील बदल, मानसिक ताणतणाव, अनुवांशिकता हीसुद्धा आजाराची कारणे आहेत. अनेक उपचार पद्धतीमध्ये हे सांगितले जाते.
परंतु ‘चुंबकीय उपचार पद्धती’ ही या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. ही पद्धती असं मानते की, सर्व ग्रहतारे यांना आपले स्वतःचे असे एक चुंबकीय क्षेत्र आहे. तसे ते पृथ्वीलाही आहे. त्याचा परिणाम सर्व सृष्टीवर म्हणजे मानव, पशू, पक्षी, कीटक, कृमी, वृक्ष, वेली तसेच हवा, पाणी, वायू, दगड, धोंडे, माती अशा सर्व निर्जीव वस्तूंवर होत असतो. म्हणजे आपण सर्व कायमच या चुंबकीय लहरीत वावरत असतो. या शक्तीला प्राणिज चुंबकत्व (Animal Magnetism) असे नाव दिले आहे. यामध्ये सतत बदल होत असतो. हे बदल सूर्यावर होणारे चुंबकीय वादळे, पृथ्वीअंतर्गत हालचाली, अणुचाचणी इत्यादींमुळे होतात. या सर्वांमुळे पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्राच्या सुव्यवस्थेत बदल होत असतो. पण याचे अस्तित्व ज्ञानेंद्रियांनी जाणवत नाही. मानवाच्या शरीरामध्ये विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) असते. वरील बदलाचा परिणाम मानवी शरीरातील विद्युत चुंबकीय क्षेत्रावर होतो. शरीरातील विद्युत चुंबकीय बलात बदल झाला की शरीराच्या स्नायूंची, अवयवांची कार्यक्षमता कमी होते व रोग उद्भवतो, म्हणजे आपण आजारी पडतो. हे कमी जास्त झालेलं विद्युत चुंबकीय बल कृत्रिम लोहचुंबकाद्वारे नियंत्रित करता येते. हे बल संतुलित केले की आपले आजार बरे होतात.
दुसऱ्या वैशिष्ट्यानुसार रक्तातील लाल कणांमध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक पदार्थ असतो. त्यामध्ये लोहतत्त्व असते. या लोहतत्त्वावर चुंबकाचा परिणाम होतो. लोहचुंबकाने हे लाल कण एकत्रित करता येतात. याला ध्रुवीकरण (Polarization) म्हणतात. हे कण एकत्रित करून त्यांची शक्ती वाढवता येते. तसेच चुंबकाचे काही गुणधर्म आहेत. त्यामध्ये, दक्षिण ध्रुव वेग मंद करतो, तो थंड असतो, पाण्यातील क्षार वाढवतो, तर उत्तर ध्रुव उष्णता व शक्ती देतो. त्यामुळे शरीराला उत्तेजन मिळते, पाण्यातील आम्ल वाढवतो.
चुंबकीय उपचारांमध्ये तीन प्रकारे रोग्यावर उपचार केले जातात. पहिला प्रकार आहे चुंबकांकित पाण्याचा वापर.
पाणी चुंबकांकित केल्यामुळे त्याची घनता, चिकटपणा, क्षार, विद्युत वाहकता इत्यादी भौतिक व रासायनिक गुणधर्मात बदल होतो. हे पाणी औषधी म्हणून गुणकारी असते. लोहचुंबकांकित पाणी नियमितपणे प्राशन केल्यास माणसाला आजार होत नाहीत व झालेले आजार बरे होतात. हे पाणी गाईला पाजलं तर गाय जास्त दूध देते, झाडाला घातल्यास झाडाची वाढ लवकर होते, त्याला मुबलक चविष्ट फळे येतात. बांधकामासाठी वापरलं तर बांधकाम मजबूत होते. इंजिनमध्ये कुलंट म्हणून वापरल्यास त्यांची कार्यक्षमता व आयुष्य वाढते.
पाणी चुंबकांकित करण्यासाठी पाणी बॉटल किंवा काचेच्या भांड्यात घ्यावे. ही बॉटल किंवा भांडे त्यांच्या आकाराचा साचा असलेल्या २००० ते ३००० गॉस (चुंबकत्वाचे एकक) शक्तीच्या चुंबकास स्पर्श होईल अशा पद्धतीने २४ तास ठेवावे. हे पाणी चुंबकाने प्रभावित होते, असे सांगितले जाते.
दुसऱ्या प्रकारात केसांना लावायचे, शरीर मालिशचे किंवा इतर तेल, टॉनिक व औषधी चुंबकांकित करता येते. ते चुंबकांकित करून वापरल्यास अधिक उपयुक्त ठरते. चुंबकांकित दूध कामशक्ती वर्धक व अधिक पौष्टिक असते. तेल चुंबकांकित करण्यासाठी बाटलीमध्ये तेल घ्यावे. बाटलीच्या एका बाजूला उत्तर व दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुवाचे लोहचुंबक २४ तास ठेवावे, असे सांगितले जाते.
तिसऱ्या प्रकारात चुंबकीय उपकरणे येतात. यामध्ये आजारानुसार १५ ते ४५ मिनिटे वेगवेगळ्या शक्तीचे चुंबक शरीराच्या संपर्क ठेवावे. शरीराच्या अवयवानुसार, आजारानुसार या वस्तू मिळतात. जसे मानदुखीसाठी मानेचा पट्टा, कंबरदुखीसाठी कमरपट्टा, तसेच हातात, गळ्यात घालावयाच्या माळा, ब्रेसलेट, चप्पल, लाटणं, डोळ्यावरचा चष्मा, झोपण्यासाठी गादी, साधी चकती इत्यादी. जिथे पट्टा लावता येत नाही तिथे चकती वापरावी. या वस्तूतून बाहेर पडणारी चुंबकीय ऊर्जा अपेक्षित परिणाम देते. गादी सर्वच आजारासाठी उपयोगी पडते, असे सांगितले जाते.
टक्कल वर केस येण्यासाठी, पिकलेले केस काळे होण्यासाठी, वृद्धत्वाला रोखण्यासाठी, निरोगी व्यक्तींना रोग होऊ नये यासाठी, मोडलेले हाड जुळणे, वेदना शमविणे, जखम भरून येणे व तिचा व्रण नाहीसा होणे यासाठी, एलर्जी, कावीळ, थायरॉईड, मूळव्याध, पोलिओ, किडनी, लिव्हर, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर या आजारासाठी, लैंगिक समस्यांपासून ते व मानसिक आजारापर्यंत तसेच गोवर, कांजण्यासारखे साथीचे रोग म्हणजे जवळजवळ सर्व प्रकारचे कितीही जुनाट आजार या उपचार पद्धतीने बरे करता येतात. ही पद्धत पूर्णपणे वैज्ञानिक आहे. त्याला शास्त्रीय आधार आहे. या उपचारपद्धतीचा कोणताही साइड इफेक्ट नाही, असे अनेक दावे करण्यात येतात.
चुंबक दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात येथे धातूपासून बनवलेले नैसर्गिक चुंबक. याचा प्राणीज चुंबकत्वाशी काहीही संबंध नाही. तरीपण त्याच्या चुंबकीय ऊर्जेमुळे आजार बरे होतात, असा प्रचार केला जातो. दुसरा प्रकार म्हणजे लोखंडी कांबीवर विद्युत रोधक बसवलेली तार (winding wire) गुंडाळून त्यामधून विद्युत प्रवाह सोडल्यास त्याभोवती चुंबकत्व (electromagnetic field) तयार होते. याला विद्युत चुंबक म्हणतात. हे विद्युत चुंबकत्व अनेक विद्युत उपकरणे, मोटार, जनरेटर ई.मध्ये असते. मानवाच्या शरीरात नाही. विद्युत उपकरणांच्या सान्निध्यात आल्यामुळे तब्येतीवर परिणाम झाल्याच आढळून आले नाही.
रक्तातील लोह हे हिमोग्लोबिनमध्ये रेणूशी बंधित असते. त्यामुळे हे लोहकण चुंबक आकर्षित करू शकत नाही. याचप्रमाणे पाणी, तेल यावरही त्याचा कुठलाही प्रभाव पडत नाही.
कोणत्याही उपचार पद्धतीचे इफेक्ट असतातच. ते उपायकारक, अपायकारक किंवा निरूपद्रवी असतात. साइड इफेक्ट नसतात म्हणजे आमची उपचारपद्धती चांगली असे त्यांना म्हणायचे असते. पण जिथे साइड इफेक्ट नसतात तिथे इफेक्ट नसतोच. हे मान्य करायला पाहिजे.
चुंबक चिकित्सा पद्धतीची सत्यता पडताळणीसाठी नेमलेल्या कमिशनने प्राणीज चुंबकत्व नाकारले आहे. चुंबकत्वामुळे आजार बरे होत नाहीत, मग रुग्णांना बरं का वाटतं? याचं कारण आहे उपचारकर्त्याचे संवाद व सूचना कौशल्य. चुंबकीय ऊर्जा परिणामकारक आहे, याने अनेक रुग्ण बरे झालेत, तुम्हाला तुमच्यात होत असेला बदल जाणवत असेल, अशा प्रकारच्या सूचना स्वीकारल्यामुळे काही मनोकायिक आजार बरे होतात. संमोहन किंवा प्लासीबो हेच त्याचे कारण आहे. काही आजार औषधी न घेताही बरे होणारे असतात, याचाही फायदा होतो.
अनेक देशांच्या शास्त्रज्ञांनी यावर रिसर्च केला आहे, अनेक प्रयोगशाळांत प्रयोगाने हे सिद्ध झाले आहे, अनेक संस्थांची मान्यता आहे, अनेकांना याचा फायदा झाला आहे किंवा होत आहे, अशी मोघम माहिती दिल्याने कोणतीही उपचारपद्धती शास्त्रीय ठरत नाही. यासाठी चाचण्यांचा तपशील, शोधनिबंध यांच्या प्रसिद्धीची माहिती द्यावी लागते. ज्या उपचारपद्धतीत उपचार करणाऱ्याला शरीररचनेचे किंवा औषधी शास्त्राचे ज्ञान नसते, जो कुठल्यातरी संस्थेने दिलेली ‘डॉक्टर’ ही पदवी आपल्या नावापुढे लावतो तो रुग्णांच्या जीवाशीच खेळत असतो.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व अभ्यासक