महाशिवरात्री विशेष : अंबरनाथचे शिवमंदिर वास्तुकलेचा सुंदर आविष्कार!

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात शिलालेख आहे. या शिलालेखात शक सवंत ९८२ श्रावण शुद्ध नवमी, (सोमवार दिनांक ९ जुलै इसवी सन १०६०) यादिवशी शिलाहार राजा माम्वाणी याने या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला, अशी नोंद आहे.
महाशिवरात्री विशेष : अंबरनाथचे शिवमंदिर वास्तुकलेचा सुंदर आविष्कार!
Published on

-गिरीश वसंत त्रिवेदी

महाशिवरात्री विशेष

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात शिलालेख आहे. या शिलालेखात शक सवंत ९८२ श्रावण शुद्ध नवमी, (सोमवार दिनांक ९ जुलै इसवी सन १०६०) यादिवशी शिलाहार राजा माम्वाणी याने या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला, अशी नोंद आहे. म्हणजे सुमारे हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक, सांस्कृतिक अभिसरणाची साक्ष देणारा वास्तुकलेचा हा सुंदर आविष्कार आहे. महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास योजनेत या मंदिराचा समावेश केला आहे. आजच्या महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिराचा हा प्राचीन वारसा उलगडून दाखवत आहोत.

अंबरनाथ येथील शिवमंदिरात मंदिराच्या बाह्य भागावर अप्रतिम अशी चित्रशिल्पे साकारण्यात आली आहेत. ती पाहताना चकित व्हायला होते. त्यांचा अर्थ काय असावा, असा प्रश्नही पडतो. या चित्रशिल्पांचा उद्देश अध्यात्म आणि तत्त्वज्ञान समजावून सांगणे हा आहे. अंबरनाथच्या मंदिरात ब्रह्मदेवाचीही मूर्ती आहे. पूर्वीच्या काळी सती जाणाऱ्या महिलांच्या स्मृत्यर्थ सती शिळा उभारीत. युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकाची आठवण म्हणून ‘वीरगळ’ उभारत. सती शिळा आणि वीरगळ अशा या दोन्ही प्रकारच्या शिळा अंबरनाथच्या मंदिर परिसरात पहायला मिळत आहेत. या शिव मंदिराची काही जुनी छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्यावरून अगदी १९५० च्या दशकापर्यंत हे मंदिर चांगल्या अवस्थेत अस्तित्वात होते. पहिल्या भारतीय वृत्तपत्र छायाचित्रकार होमाई व्यारावाला यांनी शिवमंदिर परिसरात वालधुनी नदीचे टिपलेले एका सहलीचे छायाचित्र उपलब्ध आहे. मंदिरालगत वाहणारी वालधुनी नदीसुद्धा शुद्ध होती, हे त्या छायाचित्रावरून दिसून येते. साधारणत: १९६० नंतर वाढती लोकसंख्या, वाढलेले वायू आणि ध्वनी प्रदूषण या कारणांमुळे मंदिर परिसरातील शांतता हरपली व या भागात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले. नैसर्गिक आपत्ती आणि परकीयांची आक्रमणे यापासून अबाधित राहिलेल्या या प्राचीन वास्तूची मागील काही वर्षांत अधिक हानी होत गेली, हे इथे अत्यंत खेदाने नमूद करावेसे वाटते.

अंबरनाथचे मंदिर हे शैव सिद्धांताचे मंदिर आहे. प्रत्येक मंदिर बांधण्यामागे वेगवेगळे कारण असते, हेतू वेगळा असतो. हे मंदिर बांधले त्या काळात सर्वसामान्य माणसांना मंदिरात प्रवेश नसायचा आणि माणसं निरक्षर होती. त्यांना काही ज्ञान, तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी मंदिराच्या बाह्य भागातील शिल्पकलेचा उपयोग व्हावा, म्हणजे चित्रांवरून त्यांना अभ्यास करता यावा हा हेतू या मंदिराच्या उभारणीमागे असावा, असे प्राच्यविद्या संशोधक डॉ. कुमुद कानिटकर यांनी निदर्शनास आणले आहे. या मंदिरात जाताना बाहेरच्या भागाचा अभ्यास करून गेल्यास आत गर्भगृहात दर्शन घेताना समाधान मिळते. मंदिराच्या मागच्या बाजूस लिंगोद्भव मूर्तीच्या शेजारी उजव्या बाजूला असलेली विष्णू मूर्ती आता तिथे नाही. त्याचप्रमाणे अंतराळाच्या उजव्या खांबावरची सुरेख सूर्यमूर्तीही आता तिथे नाही. त्या काळात काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये बऱ्यापैकी दिसत असलेल्या अनेक शिल्पांची आता वाताहात झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. साडेनऊशे वर्षे ऊन-वारा, पाऊस झेलून उभ्या असणाऱ्या या वास्तूची गेल्या चार-पाच दशकांत सर्वाधिक हानी झाल्याचे डॉ. कानिटकर यांचे निरीक्षण आहे.

या मंदिराच्या बाह्य भागावरील ज्या मूर्ती आहेत त्या पूजनासाठी नसून मननासाठी आहेत. गेल्या चार दशकांत कळत-नकळतपणे या प्राचीन ठेव्याची बरीच हानी झाली आहे. आता शासन आणि प्रशासन ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. अलीकडे या शिवमंदिराच्या परिसरात तशी सुधारणा केलेली दिसून येत आहे. या शिवमंदिरालगत असलेल्या वालधुनी नदी आणि पुष्करणीलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा हा ठेवा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत जपून ठेवण्यासाठी आपणही आपला खारीचा वाटा उचलायला हवा. केवळ सरकार करेल अशी भावना किंवा मानसिकता नसावी. केवळ महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यात जाऊन आपली जबाबदारी संपत नाही, तर आता या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या प्राचीन शिवमंदिराची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास योजनेत या मंदिराचा समावेश केला असून पहिल्या टप्प्यातील अडीच कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. त्यात वालधुनी नदीकाठी संरक्षक भिंत बांधली आहे. घाट बांधला आहे. भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे. वाहनतळाची जागा करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेले लहान पूल पाडून भव्य प्रशस्त पादचारी पूल बांधणे, सध्या असलेली लहान दुकाने हटवून त्याजागी योग्य नियोजन करून सुशोभित अशी दुकाने बांधणे, लहान मोठी उद्यान उभारणे, वाहनतळ उभारणे अशी विविध विकासकामे प्रस्तावित आहेत.

आता शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठीचा सुमारे दीडशे कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी देशभरातील अनेक स्थळांचा अभ्यास करण्यात आला आहे. विकास आराखड्याच्या या प्रस्तावाला पुरातत्त्व खात्याची परवानगी मिळाली आहे. निविदा काढण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी तज्ज्ञ अभ्यासकांची टीम कार्यरत आहे. येत्या दोन वर्षांमध्ये या प्राचीन शिवमंदिर परिसराचा कायापालट करण्यात येईल. शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपनीला अठरा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या सर्व आराखड्यात मंदिराकडे जाणारे मार्ग प्रशस्त करणे, कमानी उभारणे, मंदिराची माहिती मिळेल अशी वास्तू आणि त्यात अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून हे दालन विकसित करण्यात येणार आहे. वालधुनी नदी पुनरुज्जीवित करणे, भव्य वाहन तळ उभारणे, प्रशस्त स्वच्छतागृह उभारणे, एमपी थिएटर बांधणे, आदी अनेक योजनांचा यात समावेश आहे.

प्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी अनेक वेळा येऊन या मंदिराचा आणि शिल्पांचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे पद्मश्री स्वर्गीय डॉ. सदाशिव गोरक्षकर यांनीसुद्धा या मंदिराचा अभ्यास केला आहे. ते केंद्र सरकारच्या समितीवर सदस्य असताना त्यांनी या मंदिराविषयी पाठपुरावा केला होता. अंबरनाथ येथील ज्येष्ठ नागरिक स्वर्गीय लक्ष्मणराव कुलकर्णी हे तर सतत या मंदिरात जाऊन अभ्यास करीत असत आणि आपल्याला असलेली माहिती ते शिवमंदिराच्या अभ्यासकांना देत असत. एक विशेष बाब म्हणजे येथील भगिनी मंडळाच्या विद्यार्थ्यांना या शिवमंदिराची बऱ्यापैकी माहिती आहे. ते या मंदिरात येणाऱ्या अभ्यासकांना आपल्याकडे असलेली माहिती मंदिरात जाऊन सांगत असतात. त्यामुळे भावी पिढीलाही या मंदिराची माहिती आणि महती कळू शकते. शिवमंदिराची अधिकृत माहिती छायाचित्रांसह दाखवता येईल असे स्लाइड शोची व्यवस्था असलेले म्युझियम उभारले जायला हवे. यामध्ये शिवमंदिराचे पुरातत्त्व खात्याने जतन करून ठेवलेले भग्नावशेष ठेवण्याची व्यवस्था व्हायला हवी.

logo
marathi.freepressjournal.in