
-भवताल
-ॲड. वर्षा देशपांडे
पाण्यावरचा आपला मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ ला महाड इथल्या चवदार (चौदार) तळ्यावर सत्याग्रह केला. तळ्याच्या काठावर उतरत, ओंजळीत पाणी घेऊन ते पित बाबासाहेब आणि सत्याग्रहींनी पाण्यावरचा अस्पृश्यांचा हक्क अधोरेखित केला. पाणी पिणारी ओंजळ आणि त्यामागचा मेंदू आपलाच असेल तर प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देता येते, हे सांगणाऱ्या या दिनाचे महत्त्व, त्याचा हेतू आज आपण विसरत आहोत का?
“महाड क्रांती मधी, दिलं मर्दाचं जिनं
आपल्याच ओंजळीनं,
शिकविलं पाणी पिनं...
वादळी वाऱ्यामदी, तोफेच्या माऱ्यामदी,
पाहिला भीम आम्ही, आमच्या तरुणपणी...”
म्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी समजून घेत चळवळीत सामील झालो. पण आता यावेळच्या २० मार्चच्या ‘महाड क्रांतिदिनी’ मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं आहे. महाडचा तलाव आहे तिथेच आहे. पाणीही तिथेच आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांतिदिन साजरा झाला. आंबेडकरी जनता भक्तिभावात रंगली. शासकीय, राजकीय संघटनांनी आपल्या पद्धतीने या दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रम आखले आणि पारही पाडले.
आपण हे दिवस साजरे का करतो? मरण दिवसाला स्मरण दिवस का म्हणतो? तर ज्या विचारवंतांनी, नेत्यांनी जो वैचारिक वारसा आपल्याला दिला त्याचा आजच्या काळाशी काय संबंध आहे, हे या दिवशी आपण तपासून पाहतो. त्यातूनच ऊर्जा घेऊन आपल्यासमोर आज उभ्या असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो. महात्मा गांधींच्या विचारांना ज्यांनी विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा सहभाग नव्हता, स्वातंत्र्य दिन ज्यांनी काळा दिन म्हणून साजरा केला, ज्यांनी महात्मा गांधींची हत्या घडवली अशांच्या मांडीला मांडी लावून आपण देश पुढे कसा नेणार? किंबहुना मागे नेण्याच्या प्रक्रियेत तर आपण सहभाग देत नाही आहोत ना? दलित म्हणून जन्माला आलेल्या बाबासाहेबांना आयुष्यभर अस्पृश्यत्वाची वेदना सोसावी लागली. दलितांचे हित जोपासत असताना सुद्धा बाबासाहेब राष्ट्रीय एकात्मतेला अधिक महत्त्व देतात. या देशात सामाजिक समता, राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक संपन्नता आणण्यासाठी जगातील सर्वोत्तम असे लिखित स्वरूपातील संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिले. हा देश घडवण्यासाठीचा राष्ट्रीय महामार्ग त्यांनी आपल्या अभ्यासाने आणि कष्टाने निर्माण केला. मात्र या संविधानाची आणि संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संस्थांची आज मोडतोड होते आहे. संविधानाला धोका निर्माण झाला आहे. अशा काळात क्रांतिदिनी महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन, ओंजळीने पाणी घेऊन पिताना कोणाला सोबत घेऊन अभिवचन द्यावे हा प्रश्न आहे. ज्या ओंजळीने डॉ. बाबासाहेबांनी पाणी प्यायला शिकवलं ती ओंजळ, त्यामागचे हात आणि ते हात चालवण्याची क्षमता देणारा मेंदू जर आज कार्पोरेट व्यवस्थेच्या दरबारी गुलाम झाला असेल, धर्मांध-जात्यांध शक्ती शिवाजी महाराज, संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे भांडवल करत हिंसा घडवत असतील आणि या सगळ्या विरुद्ध सामूहिक शहाणपण असणारा हा भारतीय समाज आपली क्षमता हरवून बसला असेल, महाराष्ट्र धर्माचा आपल्याला विसर पडला असेल, तर कोणती नैतिक ताकद घेऊन महाडच्या चवदार तळ्यावरचे पाणी आपण आज प्यायचे, हा मला प्रश्न पडतोय.
या लेखाचा हेतू हा टीकेचा नसून आत्मचिंतनाचा आहे. आम्ही ‘जय भीम’ म्हणणार असू तर धर्म-जात-लिंगभेदापलीकडील समानतेला विरोध करणाऱ्या विचारांसोबत आम्ही कधीही असू शकत नाही. धर्माची गरज डॉ. बाबासाहेब आणि महात्मा गांधी दोघांनाही मान्य होती. म. गांधी स्वतःला सनातन हिंदू म्हणवून घ्यायचे आणि त्याचवेळी सर्वधर्मसमभावाची मांडणी करायचे. हिंदू धर्मातील अस्पृश्यता आणि जातीच्या उतरंडीला विरोध करणाऱ्या बाबासाहेबांनी मनुस्मृतीचेच दहन केले. ‘हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही’ अशी घोषणा करणारे डॉक्टर बाबासाहेब त्याआधी अनेक वर्षे हिंदू धर्म सुधारण्याची, संवादाची, बदलाची वाट पाहून आयुष्याच्या शेवटाकडे जाताना बुद्ध धर्म स्वीकारतात, हा इतिहास आपण सर्व जाणताच. समानता मान्य नसणारेच ‘समरसता मंच’ काढतात. यातील राजकारण न समजण्याएवढे आपण संविधानाला मानणारे बावळट नाहीत.
एखाद्या धर्मातील पारंपरिक रूढी-परंपरा आणि कर्मकांडाप्रमाणे महाडच्या चवदार तळ्यावरील क्रांतिदिनाचा कार्यक्रम हा एक कर्मकांड होता कामा नये. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्म मान्य असणाऱ्या गोरगरीब, ग्रामीण, महिला, बालक, अल्पसंख्यांक यांच्यासह आपल्याला विकासाचे राजकारण घडवायचे आहे. त्यासाठी संविधान सोबत घेऊन महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वानुसार लोक चळवळ उभी करण्याचे बळ आणि ऊर्जा या दिवसाच्या निमित्ताने आपण मिळवायला हवी. ज्या काळात संविधानासारखं भक्कम शस्त्र हाती नव्हतं, परकीय सत्ता होती, संसाधनांची आणि संपर्काची आजच्या एवढी प्रगत साधन उपलब्ध नव्हती, त्या काळात भयावह अशा दारिद्र्यात खितपत असणाऱ्या मागास जनजातींना सोबत घेऊन आपल्या ओंजळीने पाणी प्यायला शिकविणारे डॉ. बाबासाहेब आणि त्यांनी उभारलेला तो लढा खरोखरीच ऐतिहासिक होता. आजच्या काळात संविधान हाती असताना, आपण निवडून दिलेले आपल्यातीलच लोक सरकारमध्ये असताना, प्रशासनात ३० टक्के तरी आपल्यातीलच लोक खुर्चीवर विराजमान असताना आणि एवढी मोठी संसाधने आणि संपर्काची व्यवस्था असताना आपल्याच ओंजळीने पाणी पिताना आपले हात का थरथरतात? डॉ. बाबासाहेबांची क्रांतिदिनाची परंपरा, आपल्याच ओंजळीने पाणी पिण्याची क्षमता देणारी परंपरा आम्ही पुढे नेणार आहोत का नाही? की प्रस्थापितांसमोर ओंजळ धरून त्यांनी पाणी वाढण्याची वाट बघत आपण उभे राहणार आहोत? महाडच्या क्रांतिदिनानिमित्त हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारूया.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक