कोर्टाच्या आवारातून
ॲड. विवेक ठाकरे
कोल्हापूरमधील नांदणीच्या प्रसिद्ध करवीर मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण गुजरातच्या वनतारा प्रकल्पामध्ये पाठवण्यात आली आहे. याला निमित्त ठरली आहे ती उच्चाधिकार समिती आणि पेटा संस्था! या जनमताची धग महाराष्ट्रभरात पसरली आहे.
गेले काही दिवस कोल्हापूरमधील भावनात्मक वातावरण पेटले आहे. त्याला कारणही तसेच आहे. कोल्हापूरमधील नांदणीच्या प्रसिद्ध करवीर मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण गुजरातच्या वनतारा प्रकल्पामध्ये पाठवण्यात आली आहे. या जनमताची धग महाराष्ट्रभरात पसरली आहे. कोल्हापूरकरांनी आपली लाडकी माधुरी परत आणण्याचा जणू चंगच बांधला आहे. “जगात भारी आमची कोल्हापुरी” ही कोल्हापूरकरांची खरी ओळख. कोल्हापूरकरांनी एकदा ठरवले की, ते खटका पडल्याशिवाय राहत नाहीत. ‘प्राडा’ या जगप्रसिद्ध कंपनीने नुकताच कोल्हापुरी चपलेचा दणका अनुभवला आहे. आताही कोल्हापूरसह महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाल्याने ही महादेवी ‘जनतारा’ बनली आहे. यानिमित्त पुन्हा चर्चेत आला आहे तो गुजरातच्या भावनगरमधील प्रसिद्ध ‘वनतारा’ प्रकल्प!
‘काय’ आहे हे महादेवी हत्तीण प्रकरण?
कोल्हापूरमध्ये सन १९५० साली स्थापन झालेला प्रसिद्ध स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ आहे. करवीर मठ या नावानेही हा मठ प्रसिद्ध आहे. १९९२ पासून महादेवी नावाची हत्तीण ट्रस्टकडे आहे आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मठात हत्ती ठेवण्याची धार्मिक परंपरा असल्याचे म्हटले जाते. हत्तीची देखभाल करणे ही ट्रस्टच्या उपक्रमांचा अविभाज्य भाग आहे. या पेटा संस्थेने संस्थानात असणाऱ्या महादेवी उर्फ माधुरीवर अत्याचार होत असल्याची तक्रार उच्चाधिकार समितीकडे केली. या तक्रारीची दखल घेत समितीने २८ डिसेंबर २०२३ रोजी महादेवीला राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्ट (वनतारा)ला सोपवण्याचे आदेश दिले.
करवीर संस्थान उच्च न्यायालयात
महादेवी हत्तीण वनताराला सोपवण्याच्या निर्णयाविरोधात करवीर संस्थानने उच्च न्यायालयात दाद मागितली. यात आपल्याकडे या हत्तीणीची मालकी असून, तिची नोंदणीही आहे. तसेच उच्चाधिकार व वनविभागाचे अधिकारी नियमितपणे मठाला भेट देऊन हत्तीणीची तपासणीही करतात. समितीचा निर्णय एकतर्फी असून, आपण दिलेल्या निवेदनाचा विचार करण्यात आला नाही. यावर न्यायालयाने समितीला पुन्हा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. समितीने तपासणीसाठी एक उपसमिती स्थापन केली आणि त्या उपसमितीने दि. १२ जून २०२४ आणि २५ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या अहवालावरून उच्चाधिकार समितीने दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा महादेवी हत्तीणीला वनताराला सोपवण्याचे आदेश दिले.
न्यायालयाचा निर्णय काय?
करवीर संस्थानने पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने समितीला मठाचे म्हणणे ऐकण्यास सांगितले. समितीने मठाचे म्हणणे ऐकून याचिका प्रलंबित असतानाही दि. ३ जून २०२५ रोजी तिसऱ्यांदा महादेवीला वनताराला सोपवण्याचे आदेश दिले. ट्रस्टने याचिकेत दुरुस्ती करून न्यायालयाकडे आपले म्हणणे मांडले. संस्थान या हत्तीचा सांभाळ करण्यास सक्षम आहे; मात्र केवळ वनतारामधील हत्तींमध्ये भर घालण्यासाठी आणि करवीर संस्थानाला हत्तीपासून वंचित ठेवण्यासाठीच पेटाकडून या खोट्या तक्रारी करण्यात आल्याचे तसेच जामनगर वगळता राज्यातील इतर कोणत्याही अभयारण्यात हत्ती हस्तांतरित करण्याऐवजी केवळ वनताराला हत्ती हस्तांतरित करण्याची पेटाची विनंती पेटाच्या हेतूवर शंका घेणारी आहे, असा गंभीर आरोपही संस्थानच्या वतीने केला. “धार्मिक गरजेसाठी हत्तीला ताब्यात ठेवण्यात मठाचा केवळ व्यावसायिक हितसंबंध आहे. मोहरमच्या सार्वजनिक मिरवणुकीत मिरवणुकीसाठी तेलंगणा राज्य वक्फ बोर्डाला चार लाख रुपयांना भाड्याने हत्ती दिला होता. धार्मिक कार्यक्रमात मोठ्या आवाजात हत्तीला अंकुश कानाला लावून माहूत कान टोचत असतात. महादेवीला साखळ्यांनी दोन्ही पायांनी बांधलेले असते. तिला सांधेदुखीचा आजार असून, पायाला जखमा झाल्या आहेत. तिला घाणेरड्या शेडमध्ये ठेवले जाते,” असे आरोप पेटाने केले.
मठाने हत्तीणीची अधिक काळजी घ्यायला पाहिजे होती. वनतारा येथे हत्तीला सर्व सुविधा आहेत. महाराष्ट्रात कोणतेही हत्ती अभयारण्य नाही. केरळ आणि इतर राज्यांमध्ये केवळ हत्तींची काळजी घेणारी अभयारण्ये आहेत. वनतारा हे महाराष्ट्राच्या जवळ आहे. तसेच धार्मिक विधींसाठी हत्तीचा वापर करण्याच्या अधिकारांपेक्षा त्याच्या दर्जेदार जीवनाच्या अधिकाराचा विचार केला आहे. मठ यांचा हत्तीला इजा करण्याचा जाणूनबुजून हेतू नव्हता, तथापि, धार्मिक कार्यात हत्तीचा वापर करण्यापेक्षा हत्तीच्या कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आणि समितीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
वनतारा प्रकल्प काय आहे?
जामनगरच्या ग्रीन बेल्टमध्ये वनतारा प्रकल्पासाठी ३००० एकर जागा देण्यात आली आहे. या केंद्रात अत्याधुनिक रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र असून, त्यात आयसीयू, एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, एंडोस्कोपी, डायलिसिससह सर्व सुविधा आहेत. प्रशिक्षित डॉक्टर, कर्मचारी आहेत. हायड्रोथेरपी पूल आणि अनेक तलाव आहेत. वनतारा प्रकल्प संचालित राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टसाठी ६०० एकर हत्तीसाठी राखीव आहे.
प्रकल्प उभारायला कुणाची परवानगी?
भारतातील कोणत्याही क्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी प्राणी संग्रहालय किंवा पुनर्वसन केंद्र उभारण्याकरिता केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची परवानगी लागते. वकील आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. सौमितकुमार साळुंखे यांनी ‘केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणा’कडे रिलायन्स इंडस्ट्रिजचे अनंत अंबानी यांच्या गुजरातमधील जामनगर येथे उभारलेल्या वनतारा प्रकल्पाविषयी माहिती मागवली होती. मे २०२५ रोजी माहिती अधिकारांतर्गत प्राप्त माहितीनुसार, ‘वनतारा नावाने कुठलेही प्राणी संग्रहालय अस्तित्वात नाही,’ असे कळवले आहे. इतका मोठा प्रकल्प उभारताना संबंधित विभागाच्या परवानग्या आणि कायदेशीर बाबींची पूर्तता झालीच असणार आहे; मात्र त्याची वाच्यता कुठेही नाही. वनतारा प्रकल्पाची माहिती सांगणारी अधिकृत वेबसाइटही उपलब्ध नाही.
वनताराची वाढ विस्मयकारी
वनतारामध्ये देश-विदेशातून रेस्क्यू केलेले २३८ हत्ती, ३००हून अधिक वाघ, सिंह, बिबटे, जग्वार आहेत. ३०००हून अधिक शाकाहारी प्राणी तर १२००हून अधिक मगर, साप यांसारखे सरपटणारे प्राणी आहेत. यात अरुणाचल प्रदेश, आसाम व अन्य राज्यातून ताब्यात घेतलेले अनेक हत्ती, तमिळनाडूतून आणलेल्या १०००हून अधिक मगरी यांच्या समावेश आहे. तब्बल एक हजार किमीचा प्रवास करून महादेवी हत्तीणीलाही याच ठिकाणी आणले. येथे वन विभागातील सेवानिवृत्त आणि अनेक तज्ज्ञ असे २,१००हून अधिक कर्मचारी नेमले आहेत. वनतारा हे जगातील सर्वात मोठे पुनर्वसन केंद्र करण्याचे अनंत अंबानी यांचे स्वप्न आहे.
कोल्हापूरनजीक नांदणी परिसरातच माधुरीसाठी वनतारा पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावही वनताराने मांडला आहे. महाराष्ट्राची महादेवी सांभाळण्यास मठ आणि सरकार कमी पडल्यास वनताराच्या नव्या केंद्राचा पुढाकार असेल. जामनगरमधील वनतारा फुलवण्यासाठी अनेकांचा हातभार आहे. सरकारी यंत्रणांचे पाठबळ आहे. शेवटी ‘अनंत एवढी अनंत काळजी’ या मुक्या प्राण्यांची कोणीच घेऊ शकत नाही याची खात्री या सर्वांनाच असावी. वनताराची भारत आणि जगभरातून प्राणी गोळा करून त्यांचे पुनर्वसन करण्याची इच्छाशक्तीही थक्क करणारी आहे. रिलायन्सचे साम्राज्य सोडून एक राजकुमार एका वर्षाच्या अल्प काळात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खासगी वनतारा प्रकल्प उभे करत समृद्ध करतो आणि त्याचे कौतुक करायला खुद्द पंतप्रधानांना यावे लागते, यासारखे दुर्लभ नाही. वनखात्यानेही याचा आदर्श घेऊन आपले प्राण हरपलेले सरकारी प्राणी संग्रहालय जिवंत केले आणि आपले जल, जंगल, जमीन आणि जमीर जपले, तर तेथील पशूपक्षीही सरकारला अनंत दुवा देतील. वनतारा प्रकल्पाचा हा वाढता आलेख ‘गरवी गुजरात’साठीही एक मानाचे पान असेल.
वकील, मुंबई उच्च न्यायालय