
लक्षवेधी
डॉ. संजय मंगला गोपाळ
छत्रपतींचा वारसा जपत महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, यशवंतराव, प्रबोधनकार, मृणाल गोरे, आदींनी राज्यहिताच्या विचारांनी आणि नैतिक वर्तनाने उज्ज्वल केलेल्या महाराष्ट्राच्या लौकिकाला, आजचे भ्रष्ट राजकारणी धुळीला मिळवत आहेत!
मागच्या आठवड्यात राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. तीन आठवड्यांत एकूण १५ दिवस चाललेल्या कामकाजात, १६ विधेयके व ५७ हजार करोड रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. राज्यातील बहुसंख्य संवेदनशील नागरिक, समाजसेवी संस्था-संघटना, लोकांच्या प्रश्नांवर सनदशीर मार्गाने काम करणाऱ्या जनआंदोलनकारी संघटना, पत्रकार, विचारवंत आदींचा प्रखर विरोध असतानाही बहुचर्चित असा ‘जनसुरक्षा कायदा’ संबंधित नागरिकांची जनसुनवाईची मागणी धुडकावून लावत, एकतर्फी पद्धतीने व जबरदस्तीने पारित करण्यात आला. महिलांची सुरक्षा, बेरोजगारीला प्रभावी अटकाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी या तातडीच्या प्रश्नांवर मात्र विधानभवन अधिवेशनकाळात मौनच राहिले! विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन काळातील एकेका दिवशी उजागर झालेल्या घटना, विधानमंडळ परिसरात झालेली हाणामारी, प्रत्यक्ष सभागृहातील आमदार, मंत्री यांचे वर्तन हे कधी खेदजनक, कधी आश्चर्यकारक तर बहुतेकदा धक्कादायक आणि निषेधार्ह होते.
राज्यातील बहुसंख्य जनता शेती वा शेतीशी संबंधित बाबींवर अवलंबून आहे. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यात रोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशावेळी एका व्हिडीओनुसार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळत होते. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावर उलटसुलट मतमतांतरे व्यक्त झाली. त्यानंतर जाग आलेल्या मंत्री महोदयांनी या प्रकरणाचा जो खुलासा केलाय तो चीड आणणारा आहे. व्हिडीओ खरा असल्याने मंत्र्यांना मोबाइलवर रमी असा काही प्रकार घडलाच नाही, हे तर सांगणे अशक्य होते. मग त्यांनी मखलाशी अशी केलीये की, मी कामकाजासाठी मोबाइल उघडला. त्यावेळी रमीचे ॲप उघडले गेले. ते मी बंद करत असतानाचा व्हिडीओ असावा! प्रत्यक्षात तो व्हिडीओनीट पाहिला, तर कोकाटे साहेबांच्या हातातील मोबाइलमध्ये रमीचा खेळ व्यवस्थित सुरू असल्याचे आणि तो ते खेळत असल्याचे, स्पष्ट दिसत आहे. वर पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे याचा निषेध करायला गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
अधिवेशन काळातच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांच्या नावे असलेल्या मुंबईतील कांदिवली येथील सावली बार अँड रेस्टॉरंटमध्ये अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या डान्स बारचा मुद्दा उपस्थित झाला. इथे पहिला मुद्दा उपस्थित होतो तो वैयक्तिक हितसंबंधांचा. ज्या खात्याचे मंत्री त्याच्याच अंतर्गत व्यवसाय करण्यास मंत्र्यांना वा त्यांच्या नजीकच्या नातेवाईकांना अनुमती नाही. त्याबाबत अद्याप कारवाई का झाली नाही? पोलिसांना त्या ठिकाणी अश्लील नृत्ये सुरू असल्याचे आढळले. नाचणाऱ्या महिलांवर लाखो रुपयांचा दौलतजादा उधळला जात होता. अश्लील हावभाव केले जात होते. महिलांची प्रतिष्ठा जपण्याच्या राज्यातील कायद्यानुसार या सगळ्याला बंदी आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी खुलासा केलाय की, सदर हॉटेल त्यांनी कंत्राटदाराला चालवायला दिले आहे. कायद्यानुसार, यामुळे मूळ मालकाची जबाबदारी संपत नाही.
अधिवेशन सुरू असताना अजून एक अश्लाघ्य प्रकार घडला. आमदार निवासाच्या उपहारगृहात सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवले. या सबबीखाली उपहारगृह कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याच्या नावाखाली केलेले उद्धट वर्तन. उपहारगृह व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणाबाबत, अयोग्य अन्नपुरवठा केल्याबद्दल रीतसर कायदेशीर कार्यवाही करण्याचा सनदशीर मार्ग सोडून त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. कायदेमंडळात बसून कायदे करणाऱ्या सदस्यानेच कायदा हाती घेणे लोकशाहीला मारक आहे.
उपहारगृहातला हा राडा कमी म्हणावा, असा प्रकार प्रत्यक्ष विधिमंडळाच्या प्रांगणात झाला आणि राज्याची उरलीसुरली लाज उन्मत्त राजकारण्यांनी वेशीवर टांगली. सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या वैयक्तिक खुन्नसच्या पोटी विधानभवनासमोरील रस्त्यावरून चाललेल्या आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांना भेटायला आलेल्या अन्यायग्रस्त दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना गाडीच्या दरवाज्याचा धक्का देत कळ काढली. याबाबत पत्रकारांनी नंतर छेडल्यावर पडळकर हसत हसत गाडीच्या वाटेत आले तर असे होणारच, असे म्हणाले. आव्हाडांना धमकीचे एसएमएस पाठवण्यात आले आणि अखेरीस, अधिवेशन संपायच्या आदल्या दिवशी विधानभवनाच्या आवारातच भाजपचे आमदार पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ सर्जेराव बबन टकले व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नितीन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना गाठून चक्क हाणामारी केली. यात नितीन देशमुखांचा शर्टही फाटला. या मारामारीच्या वेळी आमदार पडळकर घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरले नाही. उलट एक प्रकारे प्रोत्साहनच दिले. त्यांच्या कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्याखाली गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही नंतर अटक झालेल्यात मारहाण करणारा भाजप समर्थक फक्त एक आणि मार खाणारे विरोधकांचे पाच लोक होते!
भाजप समर्थक अट्टल गुंडाला पोलीस कोठडीत एक पोलीसच तंबाखू मळून देताना दिसला! याचा अर्थ, सरकार आणि प्रशासन यंत्रणा मारेकऱ्यांसोबत असल्याचे दिसून आले. या साऱ्या अन्यायाविरुद्ध उशिरा रात्री पोलीस स्टेशनमध्ये उग्र रूप धारण करणाऱ्या आमदार आव्हाडांना नंतर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलमे लावण्यात आली! मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांवर चपलांचा मारा केला.
या सर्वांवर कडी म्हणावी, असे प्रकरण उघडकीस आले ते हनीट्रॅपचे! राज्यातील अनेक आजी-माजी मंत्री, आमदार, राजकारणी, उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अशी ७२ तथाकथित उच्चभ्रू मंडळी यात अडकलेली आहेत. या ट्रॅपमुळे जे ब्लॅकमेलिंग झाले, त्यामुळे अनेक मंत्री-अधिकाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेतले. राज्याची मालमत्ता लुटली. संवेदनशील माहिती असामाजिक तत्त्वांकडे पोहोचली. भ्रष्टाचार झाला. सदनात पेनड्राईव्ह दाखवत विरोधकांनी आरोप करूनही, मुख्यमंत्री याबाबत सारवासारव करताना दिसले. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, हे राज्यातील जनतेला कळायलाच हवे.
मुख्यमंत्र्यांनी नंतर विधिमंडळात बोलताना, ‘अशा वागण्याने सर्व आमदार माजले आहेत’, असा संदेश जनतेत जात असल्याचे कबूल केले; मात्र यात आपल्या पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांची चूक दिसत असतानाही तसे म्हणणाऱ्या विरोधी पक्षीयांना, अशा घटनेचे राजकारण न करण्याचा शहाजोग सल्लाही दिला. मुळात अशा उद्दाम वर्तणुकीचे मौखिक परवाने व अभय सत्ताधारी नेत्या, कार्यकर्त्यांना द्यायचे आणि विरोधक व सनदशीर सामाजिक कार्यकर्त्यांना जनसुरक्षा कायद्याचा बडगा दाखवायचा, या दुटप्पी राजकारणाचे हे परिणाम आहेत. सगळे घडून गेल्यानंतर, विधिमंडळाची ‘नैतिकता समिती’ गठित करण्याचा अध्यक्षांचा फतवा म्हणजे ‘बैल गेला नि झोपा केल्या’चाच प्रकार आहे! शाहू-फुले-आंबेडकरांपासून अनेक समाजसुधारक, राजकारण्यांनी समाजकारण व राजकारणात राज्यहितांच्या विचारांनी आणि नैतिक वर्तनाने उज्ज्वल केलेले महाराष्ट्राचे लौकिक आजचे भ्रष्ट राजकारणी धुळीला मिळवत आहेत! जनतेलाच त्यांचा हा माज उतरवावा लागेल!
जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय कार्यगटाचे सदस्य
sansahil@gmail.com