
चौफेर
- प्राजक्ता पोळ
राज्याच्या राजकारणात गेल्या दहा वर्षांत अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची पक्ष अदलाबदल काही नवीन नाही. अलीकडे कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. राजकीय विचारसरणीच्या नावाखाली पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची आणि मतदारांची विचारधारा पुसट झाली आहे. बहुसंख्य नेते आणि मतदार काळानुसार बदलले आहेत.
अगर किसी को दल बदलना है तो उसे जनता की नजर के सामने दल बदलना चाहिए। उसमें जनता का सामना करने का साहस होना चाहिए। हमारे लोकतंत्र को तभी शक्ति मिलेगी जब हम दल बदलने वालों को जनता का सामना करने का साहस जुटाने की सलाह देंगे" अटलबिहारी वाजपेयी यांचे हे शब्द आजच्या राजकीय परिस्थितीबाबत बरंच काही सांगून जातात.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची पक्ष अदलाबदल काही नवीन राहिलेली नाही. पूर्वीही हे होत असे, पण पक्ष बदलताना आपल्याशी संलग्न राजकीय विचारसरणीची किनार त्याला निश्चितपणे असायची. कमीतकमी राजकारण- अर्थकारण आणि जास्तीत जास्त समाजकारण या मूल्यांवर आधारित ही वाटचाल ठरलेली होती. पण हळूहळू ही वाटचाल विरुद्ध दिशेने होऊ लागली. २०२४पर्यंत तर महाराष्ट्राच्या राजकारणातली उलथापालथ इतकी टोकाला गेली की, त्यातली विचारधारा मागे पडत गेली.
हिंदुत्वाची कास धरल्याचे सांगून पक्ष सोडून गेलेले नेते धर्मनिरपेक्ष पक्षाचा मुलामा असलेल्या पक्षात प्रवेश करताना दिसू लागले. धर्मनिरपेक्ष पक्षाचा वारसा असलेले लोक हिंदुत्वाचे विचार प्रेरित करतात. यासाठी हिंदुत्ववादी पक्षात जाऊन बसले. याच आता मतदारांनाही आश्चर्य वाटत नाही. ब्रिटीश लेखक सीएस लुईस म्हणतात, "दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यासाठी तुम्ही कधीही वृध्द नसता. पण त्याला खऱ्याची जोड हवी."
महाराष्ट्राच्या राजकारणात अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. २०२२ साली एका नेत्याने ठाकरेंशी एकनिष्ठ न राहणाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यानंतर ते ढसाढसा रडले आणि दुसऱ्या दिवशी हिंदुत्व आठवत समोरच्या पक्षात सामील झाले. प्रत्येकजण हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी बंडखोरी केली हे सांगणाऱ्या नेत्यांमध्ये अब्दुल सत्तार नावाचे नेते शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले. त्यांना हिंदुत्वाच्या विचारधारेबाबत विचारले असता त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरून पळ काढला. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका बड्या नेत्याने मी शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये गेलो. पण हिंदुत्व माझी पाठ सोडत नव्हते. मला अस्वस्थ वाटत होते. म्हणून मी त्यानंतर भाजपमध्ये आलो असे सांगितले. पण त्याआधीची १५ वर्ष काँग्रेस सरकारमध्ये पदे भूषवली. तेव्हाच्या विचारधारेचे काय? या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
अगदी वर्षभरापूर्वी काकांची साथ सोडत पुतणे पक्षातील आमदारांसह सत्तेत सामिल झाले. तेव्हा त्यांनी विकासासाठी सत्तेत राहणे गरजेचे आहे. त्या विकास कामांसाठी आम्ही सत्तेत आलो असल्याचे त्यांनी जाहीर केले. १५ वर्ष तुमचा पक्ष सत्तेत होता. तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा अशी अनेक मंत्री पद भूषवली आहेत. मग तेव्हा विकास झाला नाही का ? यावर उत्तर न देता पुतणे उठून गेले.
त्यासाठी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जनतेत जायचे असेल, साहसी वृत्तीने ते केले पाहीजे. जनतेला ते पटवून दिले पाहिजे. "भाजपमध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो. मी इथे आल्यापासून शांत झोप लागते. कुठलीही चौकशी नाही. कुठल्या रेड नाहीत." हे जाहीरपणे सांगणारे नेते आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुतारीची साथ घेऊन निवडणूक लढतायेत. तर अजून एक विकासासाठी सत्तेत गेलेले नेते जिल्हा बँकेची माझी अडचण होती म्हणून चूक झाली आता पदरात घ्या म्हणत तुतारीकडे परतले. या भूमिकांमध्ये स्वार्थापलिकडे खऱ्याची, विकासाची, लोकशाहीची, विचारधारेची, तत्वांची पुसटशीही रेषा दिसत नाही.
ही परिस्थिती राजकारण्यांची आहे. या परिस्थितीतीमुळे मतदारांचीही मानसिकता बदलत चालली आहे. लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही याचा विसर पडल्याचे निवडणुकीच्या वातावरणात दिसून येते. निवडणुकीवेळी एका दौऱ्यानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावात गेले होते. साधारण तीन-चार हजार लोकसंख्या असलेले ते गाव. एका घरात एकत्र कुटुंब पद्धतीत किमान ३४ मतदार होते. त्यातले अनेक शहरात किंवा इतर गावात नोकरी आणि कामासाठी बाहेर होते. ३४ मते पूर्ण मिळाली पाहीजेत. यासाठी त्या घरातील संपूर्ण टॉयलेट आणि बाथरूमचे काम एका उमेदवाराने करून दिले होते. तर दुसऱ्या घरात प्रत्येक मताचा 'रेट' ठरल्याचे त्याच गावकऱ्यांनी अगदी हसत सांगितले. पण हे एका गावापुरती मर्यादित राहिलेले नाही. शहरी भागातील महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रार्थना स्थळांच्या टूअर्स, सोसायटीमधील कामे करून देणे हा त्याचाच प्रकार आहे. एक उमेदवार मते मागण्यासाठी गेला असता, एका घरातील वृध्द व्यक्तीने त्याला मतांची ऑफर दिल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "माझ्या एका मुलाचा घटस्फोट होत नाहीये. त्यांच्यासाठी चांगला वकील देऊन ती प्रक्रिया पूर्ण करून द्या. याच सोसायटीमध्ये माझी तीन मुले आणि त्यांची कुटुंब राहतात. ती सगळी मते आम्ही तुम्हाला देऊ." त्या उमेदवाराला घाम फुटला आणि तिथून कशीबशी सारवासारव करत तो निघाला. लोकांच्या अशा मागण्यांची भीती वाटत असल्याचे त्याने सांगितले.
त्यामुळे जितका निवडणुकीतील उमेदवार किंवा नेता बदलत गेला तसा मतदारही बदलत चालला आहे. निवडणुकांमध्ये रकमेच्या वजनावर मतांचे पारडे जड बनत असल्याचे चित्र जागोजागी दिसू लागले आहे. त्यामुळे मतदान वैचारिकता 'मतविक्री'त हरवत चालली आहे. केवळ पैशांच्या गणिताचे समीकरण असंख्य लोकांना जवळचे वाटू लागले आहे.
जातीधर्माच्या राजकारणात मतदार अडकत चालला आहे. ग्रामीण भागातील हे हे लोण शहरांपर्यंत येऊन पोहचले आहे. घटनेने दिलेले अधिकार आणि हक्क बजावण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणं शहरी मतदाराला अधिक समाधान देते. निवडणुकांचे हे बदलते स्वरूप केवळ, पद, सत्ता यांच्यापाशी घोंगावत असल्याचे दिसते आहे. यातील नेत्यांची आणि मतदारांची विचारधारा पुसट झाली आहे. बहुसंख्य नेते आणि मतदार काळानुसार बदलले आहेत. नेता ही विकासाची दूरदृष्टी असलेला आणि सर्व क्षेत्राला स्पर्श केलेला असावा, असे सांगणारे यशवंतराव चव्हाणांसारखे नेते महाराष्ट्राने पाहिले. जर मतदारांबाबत बोलण्याची वेळ येते, तेव्हा महाराष्ट्रातील मतदार हा सुजाण आहे. त्याने नेत्यांना सत्ता दाखवलीही आणि त्या सत्तेचा माज केल्यावर खाली खेचायला कमी केले नाही. नेत्यांनी हा 'महाराष्ट्राचा इतिहास' जपला पाहिजे. पण काळानुसार हे चित्र बदलत चालले आहे हे नाकारता येणार नाही.
"जो कल थे वो आज नही है जो आज है वो कल नही होंगे. होने ना होने का क्रम इसी तरह चलता रहेगा. हम है हम रहेंगे, ये भ्रम भी सदा पलता रहेगा."
prajakta.p.pol@gmail.com