सह्याद्रीचे वारे
- अरविंद भानुशाली
महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधी गेले नव्हते; परंतु अलीकडे वैयक्तिक द्वेषातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मधल्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना 'एक तर तू राहणार नाहीतर मी राहणार' अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. जरांगे-पाटील यांनी तर वैयक्तिक भावनेतून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आसूड ओढले होते. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी किती जबाबदारीने बोलायला, वागायला हवे याची प्रचिती वारंवार येऊनही काही व्यक्ती त्यांचा बोध घेतांना दिसत नाहीत.
आपल्या बेताल वक्तव्याने वैयक्तिक जीवनात अडचणीत आणणारे महाभाग कमी नाहीत. त्यानंतर खुलासे होतात; मात्र प्रतिमेला तडे जातात याचे कुणाला सोयरे-सुतक नसते. सत्ता डोक्यात गेली की काय-काय होऊ शकते हे महाराष्ट्रात नवे नाही. सत्ता जाते पक्ष आणि माणसे बदलतात; मात्र सत्तेचा हा अवगुण काही केल्या थांबत नाही. सत्तेचा गुण व अवगुण हा अनेकांना भारी पडला आहे. १९६० ते १९७० या दहा वर्षातील राजकारण ते आता २०१० ते २०२४ पर्यंतचे राजकारण यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. सत्ता ही लोककल्याणासाठी असते हे मानायचे दिवस केव्हाच संपले. सत्ता ही केवळ स्वार्थ साधण्याची सुवर्णसंधी असते असे समीकरण झाल्याने लोककल्याणाच्या योजना बाजूला पडतात. सत्ता परत हस्तगत करायची म्हंटली की सर्व राजमार्ग सुरळीत करायचे. तिजोरीत पैसे नसले तरी कोट्यवधी रुपयांच्या योजना जाहीर करून पुन्हा सत्ता मिळवायची ही फसवणूक नाही का?
महाराष्ट्रात पूर्वी एक पक्षीय राजवट १९९५ पर्यंत होती. १९९५ ते २०२४ या तीस वर्षात आघाड्यांचे राजकारण सुरु झाले. सुरुवातीला या आघाड्यांमध्ये दोनच राजकीय पक्ष असायचे; परंतु आता २०व्य शतकात तीन आणि चार पक्षांची सरकारे अस्तित्वात आली आहेत. तत्व व राजकीय गणिते बाजूला ठेऊन केवळ सत्तेसाठी परस्पर विचारांची मंडळी एकत्र आली आहेत. विविध पक्षांत धार्मिक व सामाजिक भावना वेगवेगळ्या असतात. परंतु ते आम्हाला चालते केवळ सत्ताकारण हा एवढाच मार्ग. एकदा आचार्य अत्रे यशवंतरावांना निपुत्रिक असे म्हणाले. ती परंपरा नव्हती; मात्र अत्रेंच्या या उद्गारावर यशवंतरावांनी केवळ एकाच सूतोवाच केले वेणूताई या सत्यग्रह करत असताना त्यांच्यावर प्रचंड लाठीहल्ला झाला आणि या लाठी हल्ल्यात गर्भाशयाची पिशवी निघून गेली. आचार्य अत्रेंना हे जेव्हा कळले तेव्हा ते यशवंतरावांच्या घरी गेले आणि डोळ्यात पाणी आणून मला हे माहिती नव्हते, माझी चूक झाली, मला माफ करा असे आचार्य अत्रे म्हणाले. तेव्हा यशवंतराव म्हणाले, तुम्हाला हे कळावे म्हणून सांगितले. एवढ्यात वेणूताई अत्रेंच्या जवळ आल्या व त्यांना आत नेऊन चहा पाणी दिले. ही संस्कृती ६० वर्षांपूर्वीची होती आत्ता ती संपली.
या सत्तालोभासाठी एकाच घरातील २-२, ४-४ मंडळी सत्ताकारणात येण्यासाठी धडपडत आहेत. बाप एका पक्षात, तर मुलगा/मुलगी दुसऱ्या पक्षात तिकीट मिळवून सत्तेच्या गंगाजलात सर्व कुटुंब न्हाऊन निघत आहे. असे पूर्वी कधी नव्हते. सर्वच राजकीय पक्षातील समीकरणे बदलली आहेत. मग यातून पुण्यातील अपघाताच्या घटना, बदलापूर येथील लहान मुलींवर प्रसंग व त्यानंतर झालेला आरोपीचा एन्काउंटर हा अंगाला मुंग्या आणणारा प्रकार घडत आहे. बापाची आर्थिक सुबत्ता व त्याचे अनुकरण मुलाकडून होणे आणि त्यामधून निरपराध माणसांचा बळी जाणे हे प्रकार वारंवार घडत आहेत.
मुळात राजकारणात येण्याचा हेतूच जेथे दूषित आहे तिथे यापेक्षा वेगळे वर्तन कसे असू शकते. राजकारण आणि त्यातून मिळणार पैसे सत्ता टिकवण्यासाठी घ्यावा लागणार गुन्हेगारांचा आसरा आणि निवडणूक जिंकण्यासाठी मते अशा सर्व बेकायदा आणि असंवैधानिक बाबी सर्वच राजकीय पक्षांत होऊ लागल्या मग कोण कोणाचे झाकलेले कोंबडे उघडे पाडण्याच्या भानगडीत पडणार नाही. राज्यात विधानसभेच्या निवडणूक जवळ आल्याने विरोधी पक्षाने हे संकेत झुगारून राजकीय खेळी खेळणे पसंत केली आहे.
राज्यातील जनतेला राजकीय उणीदुणी काढण्याच्या प्रकाराचा तिटकारा आला आहे. राज्यात आज अनेक मुख्य प्रश्न बाजूला पडले आहेत. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. त्या मानाने विधानसभा निवडणूक जवळ आल्याने महायुतीने निर्णयाचा धडाका लावला आहे तो कायम राहील का? मोफत धान्य, मोफत एसटी प्रवास सर्व काही मोफत हे तरी योग्य आहे का याचे पुढच्या काळात राजकीय संकेत चांगले जाणार नाहीत.
यावेळी आणखी एक महत्वाचा मुद्दा घराणेशाहीच्या ऐरणीवर आला आहे. हरियाणामध्ये अपक्षांनी काँग्रेसचे स्वप्न धुळीला मिळवले म्हणून आता एकाच घरात सत्ता असावी, घराणेशाहीचा उद्रेक सुरू आहे. याला कोणताच पक्ष अपवाद नाही. काका-पुतण्या, वडील-मुलगा हे दोन शेजारच्या मतदार संघात वेगवेगळ्या पक्षांचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवीत आहेत याची तर आता किळस वाटू लागली आहे. एकाच घरातील मंडळी जेव्हा राजकारण व सत्ताकारण यासाठी एकत्र येतात तेव्हा इतर समाजातील तरुणांचा राजकारण प्रवेश होत नसतॊ. सर्वच राजकीय पक्षांनी यापूर्वी नवीन चेहरे देण्याचे घोषित केले होते; परंतु प्रत्यक्षात घराणेशाहीचेच चेहरे पुढे आले आहेत. सत्तेची लालसा ही प्रत्येक राजकीय कुटुंबात वसली असल्याने सर्वत्र तोच प्रकार दिसत आहे. त्याला अपवाद कुठलाही राजकीय पक्ष मागे नाही. सत्तेसाठी काहीही करण्यास तयार आहोत. असा संदेश सर्वच राजकीय पक्ष देत आहेत. याकडे आता मतदारांनी पाहण्याची गरज आहे. असे किती दिवस चालणार. शेवटी याचा न्याय-निवडा जनतेच्या मत पेटीतून दिसायला हवा.
यावेळी काही महत्वाचे फॅक्टर बाहेर पडले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने बिनशर्त पाठिंबा महायुतीस दिला होता. परंतु यावेळी त्यांनी आपले बरेच उमेदवार उभे करून अडचण वाढवली आहे. आयाराम-गयारामची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उमेदवारी अर्ज भरायचा दिवस जवळ येत असतांना अजूनही उमेदवार निश्चित होत नाही. महाविकास आघाडीचा फार्मुला ८५ चा होता तो ९० झाला. प्रत्येक राजकीय पक्षात बंडखोरीची स्थिती दिसत आहे. महाविकास आघाडीबरोबर असलेले इतर प्रादेशिक पक्ष आज उघड्यावर पडले आहेत. त्यामध्ये शेकाप, समाजवादी पार्टी व इतरांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाला काही मोजक्या जागा न सोडल्यास आम्ही २५ उमेदवार उभे करू असा इशारा अबू आझमी यांनी दिला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा त्याचाच एक भाग आहे.
सत्ता ही स्वार्थासाठी सुवर्णसंधी असते असे समीकरण स्थिर झाल्यावर लोककल्याणाचा विषय मागे पडत गेला. त्यामुळे नेते ही वाट्टेल तसे वागू लागले. त्याचे अनुकरण करणारे त्यांचे कार्यकर्ते व कुटुंबातील मंडळीही सत्तेमुळे मिळणारा परवाना समजून धुमाकूळ घालू लागली. सत्ता हाती असल्यावर कारवाईचा प्रश्न उध्दभवत नाही. त्यामुळे गैरवर्तनाचे प्रकार अधिक वाढू लागले आहेत. या साऱ्यात राज्यापुढील शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रश्न मागे पडले आहेत. (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)