चौफेर
प्राजक्ता पोळ
आपण मतदान केले नाही तरी आपल्या एका मताने काय फरक पडतो, असा विचार अनेक जण करत असतात. हा असा नकारात्मक विचार करणाऱ्या मंडळींना एका मताची ताकद माहीत नसते. एका मतानेही सत्ता पलटू शकते, महत्त्वाच्या मातब्बर उमेदवाराचाही पराभव होऊ शकतो. लोकशाही निवडणुकांच्या इतिहासात एका मताने केलेल्या अशा अनेक करामती आहेत. म्हणूनच कोणीही स्वत:च्या एका मताला कमी लेखू नये.
आज महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. मतदान हा आपला महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार मतदार आहेत. त्यात ७ कोटी २२ हजार ७३९ पुरुष आणि ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. महिला मतदारांच्या नोंदणीत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. पुरुष, महिला, तृतीयपंथीय, दिव्यांग हे सर्व मिळून १९.४८ लाख तरुण पहिल्यांदा मतदान करणार आहे. ही आकडेवारी बघून एका सुदृढ आणि जागरूक समाज व्यवस्थेचे हे लक्षण असल्याचे जाणवते. पण ही आकडेवारी फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्षात मतदान करून जागरूकता दाखवणे हे खरे सुजाण नागरिक असल्याचे लक्षण आहे.
३५ वर्षांचा विजय मोबाईलवर वनडे पिकनिकसाठी रिसॉर्ट शोधत होता. यंदा मतदानाचा आणि सुट्टीचा दिवस जोडून न आल्याने पंचाईत झाली होती. त्यामुळे आदल्या दिवशी हाफ डे टाकून निघायचे आणि दुसऱ्या दिवशी आरामात यायचे, असा ग्रुप प्लॅन बनत होता. रिसॉर्टची विचारणा करत असताना, ‘अरे, मतदानाच्या दिवशी कुठे बाहेर जातोस’ किंवा ‘सकाळी मतदान करून बाहेर पडूयात’, असे एका मित्राने सुचवले. तेव्हा तुझ्या एका मताने काय तुला हवे ते सरकार येणार आहे की पडणार आहे? असा प्रश्न विजयने त्याला विचारला. एका मताने काय फरक पडतो?
लग्न करून सासरी गेलेली पूजा. मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन सगळे घरीच थांबणार असल्यामुळे खाण्यापिण्याचे वेगवेगळे बेत आखत होती. सगळे मतदानाला जाणार आहेत. तुझे मतदान केंद्र कोणते आहे? हे शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीने विचारले तेव्हा माझे मतदान हे गावी असते. मी इथे अजून बदलून घेतलेले नाही, असे पूजाने सांगितले. एरव्ही इतर घरगुती कार्यक्रमांसाठी आधी नियोजन करून गावी जाणारी मंडळी मतदानासाठी कुठे गावी जाणार, हा विचार करत घरी थांबतात. त्यात आपल्या एका मताने काय फरक पडतो? ही मानसिकता आहेच. ही मानसिकता आज अनेक लोकांमध्ये दिसून येते. पण याच एका मताने अनेक लोकप्रतिनिधींना घरी बसावे लागले आहे, तर काहींना संधी मिळाली आहे. एका मताची किंमत खूप मोठी असते, हे इतिहासातल्या अनेक उदाहरणांमधून दिसून आले आहे.
डॉ. सी. पी. जोशी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते राजस्थानमधील नाथद्वारा विधानसभा मतदारसंघातून १९८०, १९८५, १९९८ आणि २००३ मध्ये निवडून आले होते. पक्षातील वरिष्ठ नेता म्हणून २००८ च्या निवडणुकीत ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही होते. त्यांनी निवडणुकीत मोठ्या जोशाने सहभाग घेतला, परंतु जे घडले ते कुणालाही अपेक्षित नव्हते. डॉ. जोशी केवळ एका मताने भाजप उमेदवार कल्याणसिंह चौहान यांच्याकडून पराभूत झाले. विशेष म्हणजे डॉ. जोशी यांची मुलगी आणि पत्नी मतदानाला उशिरा पोहचल्यामुळे त्या मतदान करू शकल्या नाहीत. जर त्या वेळेवर पोहचल्या असत्या तर कदाचित सी. पी. जोशी हे जिंकून मुख्यमंत्री बनू शकले असते. त्यांनी स्वतः मान्य केले की त्यांची पत्नी आणि मुलगी मंदिरात गेली होती. त्यामुळे त्या वेळेवर मतदान करू शकल्या नाहीत. परिणामी, जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला.
१९९८ मध्ये वाजपेयींचे सरकार १३ महिन्यांत कोसळल्याचे अनेकांना माहिती आहे. पण इथेही एका मताची किंमत वाजपेयी सरकारला मोजावी लागली होती. १९९८ मध्ये भाजपने विविध पक्षाच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन केले होते. त्यात जयललिता यांचा एआयडीएमके हा पक्ष पण होता. मंत्रिपदे, लोकसभेतील अध्यक्ष निवडीवरून वाद, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे सरकारमध्ये कुरबुरी सुरू होत्या. जयललिता यांच्या मागण्या वाढत होत्या. त्यांनी नाराज होऊन सरकारचा पाठिंबा काढून घेतला. वाजपेयींचे सरकार अल्पमतात आले. अविश्वास ठरावाला सामोरे जाताना सरकारच्या बाजूने २६९ आणि सरकारच्या विरोधात २७० मते पडली. फक्त एका मतामुळे वाजपेयींचे पंतप्रधानपद गेले. सरकार कोसळले. इतिहासातील या घटना एका मताचे महत्त्वच अधोरेखित करतात.
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये घटत्या मतदानाची टक्केवारी रोखण्यासाठी सक्तीच्या मतदानाचा विचार आणि मागणी समोर येत आहे. काहींनी हा कायदा टप्प्याटप्प्याने लागू करण्याचाही प्रस्ताव मांडला आहे. ज्यामुळे मतदारांची सवय हळूहळू विकसित होईल आणि मतदानाचा दर वाढेल. पण मतदारांना मतदान सक्तीचे करण्यापेक्षा जागरूकता वाढवून मतदान ही जबाबदारी असल्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे.
आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजावलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते. येथे चांगले राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाला वाटले पाहिजे. जो कोणी येईल तो भ्रष्टाचारीच असणार आहे, आपल्या रोजच्या आयुष्यात या माणसांच्या येण्याने काय फरक पडतो, आपण मतदान केले तरी हा नेता अमूक पक्षात जातो, दुसरा तिसऱ्याला पाठिंबा देतो, मग आपल्या मतांना काय अर्थ राहतो? असे प्रश्न मागच्या पाच वर्षातली राजकीय परिस्थिती पाहता मतदारांना पडणे स्वाभाविक आहे. पण मतदानाचा दिवस हा अशाच राज्यकर्त्यांना नाकारायचे की स्वीकारायचे हे ठरवण्याचा आहे. जे मतदान करत नाही त्यांना राज्यकर्ते कसे आहेत, नव्या योजना योग्य आहेत की अयोग्य हे बोलण्याचा अधिकार राहत नाही. आपल्याला काय हवे आहे ते ठरविण्यासाठीही मतदानाची मदत होऊ शकते, कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर आपल्याला जे हवे आहे, त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात. मात्र त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.
prajakta.p.pol@gmail.com