लक्षवेधी
डॉ. संजय मंगला गोपाळ
उद्या विधानसभेचे मतदान आहे. आपले मत धर्म-जात आणि त्याच्या नावाने पिटल्या जाणाऱ्या भयगंडाच्या आधारे द्यायचे की व्यापक देश हित, राज्य हित जपण्यासाठी द्यायचे? याचा निर्णय घ्यायचा आहे. एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून हिंदू खतरें में है, बटेंगे तो कटेंगे असा खोटा प्रचार केला जात आहे. शिवरायांचा महाराष्ट्रद्वेष नाही, तर प्रेम करायला सांगतो.
आपल्या या भारत देशात ८५ टक्के लोकसंख्या हिंदू धर्मीय आहे. म्हणजे इतर सर्व धर्मीय लोकसंख्येच्या कितीतरी पटीने हिंदू अधिक आहेत. त्यामुळे कोणत्याच अर्थाने हिंदूंना घाबरण्याची वा भयकंपित होण्याची अजिबात आवश्यकता नाही. गेली दहा वर्षं देशात आणि गेल्या दहापैकी साडेसात वर्षं राज्यात, भारतीय जनता पक्षप्रणीत सरकारे राज्यकारभार करीत आहेत. तरीही अद्याप ‘हिंदू खतरें मे’च असेल, तर विद्यमान डबल इंजिनला यार्डात पाठवायला हवे.
आज राज्यात सर्वांना व त्यातही हिंदूंचे बहुमत असल्याने राज्यातील अनेक हिंदूंना अनेक जीवनावश्यक बाबी दुरापास्त झालेल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, परिवहन यासारख्या दैनंदिन गरजेच्या सेवा सामान्यांच्या आवाक्यात उरलेल्या नाहीत. गेल्या अडीच वर्षांत आधीचे खासगीकरणाचे धोरण अधिक आक्रमकतेने रेटल्यामुळे, महाराष्ट्रातील सरकारी आरोग्य-सेवा पार रोडावली आहे. ती गरजेच्या निम्मी सुद्धा नाही! खासगी हॉस्पिटल्स बेसुमार महागडी आहेत. हिंदू हिताची भाषा करणाऱ्या महायुतीच्या या मोकाट खासगीकरणामुळे आपले प्रश्न सुटतील का, याचा विचार राज्यातील बहुसंख्य असलेल्या नागरिकांनी करायला हवा. तरुण-तरुणींमध्ये अभूतपूर्व बेरोजगारी आहे. सरकारी सेवा, रेल्वे इ. ठिकाणी भरती बंद आहे. महाराष्ट्रातील पोलीस भरती पदे १७ हजार आणि अर्ज १७ लाख किंवा एअर इंडियात एअरपोर्ट लोडर पदे ६००, तर अर्ज २५,००० अशी भीषण परिस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ या वर्षात रोजगार हमीसाठी जिल्ह्यांना निधीच पुरवलेला नाही. महाराष्ट्रातील २२,००० कोटी रुपयांचे उद्योगधंदे गुजरातला जाऊ दिल्याने पाच लाख नोकऱ्यांपासून राज्यातील युवा वंचित राहिला. अशा परिस्थितीत जनतेचा असंतोष व्यक्तच होऊ नये, यासाठी महायुती सरकार केंद्रातील भाजप सरकारच्या मदतीने संसदीय लोकशाहीचीच मोडतोड करत सुटले आहे.
भारताच्या धर्मनिरपेक्ष घटनेच्या आधारे सत्तेवर येऊनही भाजप सतत हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र याचे तुणतुणे वाजवत असतो. मुस्लिम, ख्रिश्चन या गैर हिंदू समाजातील आपल्या देशबांधवांबद्दल अत्यंत आक्रमक आणि हिणकस भाषा सर्रास वापरली जाते. देशातील संवैधानिक मूल्ये विशेषत: सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता यांची बाजू लावून धरणाऱ्या कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट संघटनांबाबतही भ्रम पसरवत त्यांना टार्गेट केले जाते. राज्यात अनैतिक पद्धतीने महाविकास आघाडी सरकार पाडले गेले आणि त्यानंतर राज्यपाल कोश्यारी व विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आपल्या संवैधानिक पदाचा बिनदिक्कतपणे दुरुपयोग केला. भाजपशासित गुजरात, आसाम राज्य सरकारांच्या मदतीने लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार भरवत महाराष्ट्रात ‘खोके सरकार’ स्थापन करण्यात आले. त्यावेळी पक्षांतर-बंदी कायदा धाब्यावर बसवून भाजपच्या शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली. त्यानंतर थोड्याच दिवसांत ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेले अजितदादा यांना तुरुंगात टाकण्याऐवजी त्यांनी शरणागती पत्करल्यामुळे त्यांना थेट उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद बहाल करण्यात आले. राज्यातील जनता हा इतिहास विसरलेली नाही. किंबहुना देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला जो न्याय देण्यात हात आखडता घेतला, तो न्याय आता जनतेच्या न्यायालयात करण्यास जनता उत्सुक आहे!
घटनेने दिलेल्या जबाबदारीनुसार आपल्या लोकशाही देशातील सत्ताधाऱ्यांनी, आपल्या देशातील तमाम जनतेला त्यांच्या जीवनावश्यक गरजा सुखासमाधानात आणि स्वाभिमानाने भागवता येतील, सर्वांना शिक्षण, आरोग्य, रेशन, संडास, पाणी या किमान गरजा विनासायास भागवता येतील, अशी व्यवस्था निर्माण करण्यास कटिबद्ध राहायचे असते. हे करताना समाजातील जातीभेद व धर्मभेद यांचा बाऊ न करता सर्वांशी समतेने व्यवहार करणे इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्य-देशपातळीवरील सर्व सत्ताधाऱ्यांसाठी बंधनकारक आहे. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे बंधन उघड-उघड धाब्यावर बसवत आले आहेत. सांगण्यासारखे फारसे भरीव काही नसल्यामुळे लोकांना धर्म-जातीची गोळी चढवली की आपल्याला सत्तेची खुर्ची मिळणार, असा भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जुना फॉर्म्युलाच त्यांनी यावेळी महाराष्ट्रातही चालवला. धर्मनिरपेक्षता पायदळी तुडवून द्वेषाचे राजकारण चालवले. सॉफ्टवेअर इंजिनिअर मोहसीन शेखची हडपसर येथे २०१४ मध्ये झुंडीकडून हत्या करण्यात आली, पण कोणालाही शिक्षा झालेली नाही! अलीकडे किल्ले ‘विशाळगड’च्या पायथ्याशी मुस्लिम वस्तीवर हिंस्त्र हल्ला झाला. दंगली घडवण्यात आल्या. यात सत्ताधाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग राहिला. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात मुस्लिमांना टार्गेट करण्याची १३ प्रकरणे उघडकीला आली आहेत आणि तरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ‘बटेंगे-कटेंगे’ची आग लावायला इथे येऊन गेले. पण यावेळी महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजितदादा आणि स्वपक्षातल्याच पंकजाताईंनी अशा प्रचाराबाबत नाराजी व्यक्त करून, त्यांना घरचाच आहेर दिला. धार्मिक विद्वेषाचे संघ, भाजपचे कारनामे पाहून राज्यातील अनेक लोकशाहीप्रेमी लेखक, पत्रकार, विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी अलीकडेच भाजपचा जाहीर निषेध करणारे आवाहन पत्र प्रसिद्ध केले.
लोकशाहीप्रेमी नागरिकांनी मतदारांना केलेले हे आवाहन पत्रक म्हणते, “महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचारात एक नागरिक म्हणून अस्वस्थ वाटावे, चिंता वाटावी अशी भयंकर गोष्ट जाणवली. भाजपने या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात ‘व्होट जिहाद’ वगैरे म्हणून केली आणि त्यानंतर ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा देत धार्मिक द्वेष पसरवत आपला प्रचार केला. दरम्यानच्या काळात या पक्षाला कापूस आणि सोयाबीनचे पडलेले दर, प्रचंड वाढलेली महागाई, घराघरात पोहोचलेली बेरोजगारी, मध्यमवर्गीयांना न परवडणारे शिक्षण आणि आरोग्य उपचार याबद्दल अवाक्षर काढावेसे वाटले नाही. हा साधारण एक महिना चाललेला तमाशा आम्ही बघत होतो. महाराष्ट्र बघत होता. पण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तर भाजपच्या तमाम नेत्यांनी इथली सामाजिक वीण उसवून टाकायचा जणू काही चंगच बांधला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे वरिष्ठ नेत्यांपासून ते गावपातळीच्या नेत्यांपर्यंत भाजप आणि महायुती नेत्यांनी विद्रूप, ओंगळवाणी वापरलेली भाषा. ही भाषा धार्मिक तेढ पसरविणारी आहे, गलिच्छ आहे, शिसारी आणणारी आहे. महाराष्ट्राला हे विकृतीकरण मान्य नाही आणि हेच आता नागरिक म्हणून आम्ही सांगत आहोत. जर राज्याच्या सुसंस्कृत लोकशाहीवादी राजकारणाची परंपरा आपल्याला राखायची असेल, वाढवायची असेल तर नागरिक म्हणून आपण भाजपचा हा गलिच्छ प्रचार नाकारला पाहिजे. महाराष्ट्र धर्म हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. तो विकास आणि प्रगतीची भाषा बोलतो. हा शिवरायांचा महाराष्ट्र, द्वेष नाही तर प्रेम आणि पराक्रम करायला शिकवतो.” असे सांगत शेवटी या आवाहनपत्रात सर्व नागरिकांना प्रेमाची विनंती करण्यात आली आहे की, लोकशाहीमध्ये मतदानाचा मिळालेला अधिकार कुठल्याही दबावाला आणि प्रलोभनाला बळी न पडता वापरा. महाराष्ट्र धर्म वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, उद्या बाहेर पडा! मोठ्या संख्येने मतदान करा!! धार्मिक द्वेष करणाऱ्यांचा संपूर्ण पराभव करा.
लेखक ‘भारत जोडो अभियान’ चे राज्य समन्वयक आणि ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वया’चे राष्ट्रीय समन्वयक आहेत.
sansahil@gmail.com