भारत जोडोबाबत भ्रम पसरवणे बंद करा!

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो अभियानाबाबत खोटेनाटे आणि भ्रम निर्माण करणारे आरोप सुरू केले आहेत. 'भारत जोडोमध्ये शंभरच्यावर संघटना अराजक पसरवणाऱ्या आणि कट्टर अतिडाव्या विचारसरणीच्या आहेत,' असा आरोप त्यांनी केला आहे. विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेल्या भाजोअने निषेध व्यक्त करीत संघटनांची यादी जाहीर करा व त्यांच्यावर कारवाई करा, असे जाहीर आव्हानच देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी यांचे संग्रहीत छायाचित्र
भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी यांचे संग्रहीत छायाचित्र
Published on

लक्षवेधी

डॉ. संजय मंगला गोपाळ

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो अभियानाबाबत खोटेनाटे आणि भ्रम निर्माण करणारे आरोप सुरू केले आहेत. 'भारत जोडोमध्ये शंभरच्यावर संघटना अराजक पसरवणाऱ्या आणि कट्टर अतिडाव्या विचारसरणीच्या आहेत,' असा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेल्या भाजोअने निषेध व्यक्त करीत संघटनांची यादी जाहीर करा व त्यांच्यावर कारवाई करा, असे जाहीर आव्हानच देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

राज्यातील ठगबंधन महायुती सरकारने अडीच वर्षांत अभिमानाने दाखवता येईल, असे नवे आणि जनहिताचे फारसे काही केलेले नाही. राज्यातील जनतेने त्याचा हिशोब लोकसभा निवडणुकीत पुरा केला. त्यामुळे केंद्र सरकारच्या मदतीने विधानसभा निवडणूक दोन महिने पुढे ढकलण्यात आली. त्या काळात राज्याच्या जनतेचा पैसा वारेमाप उधळण्यात आला. त्यानेही भागेल की नाही असे दिसत असल्याने, आता सत्ताधाऱ्यांनी आपले ठेवणीतले धर्म-जातीचे कार्ड वापरण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षीयांबाबत अनुदार शब्दात टीका सहन करणार नाही, असा दम युतीतील दोन नंबरच्या उपमुख्यमंत्र्यांनी थेट मोदींपासून महायुतीतील सर्व नेत्यांना दिला आहे. यावरून महायुती महा घसरलेली आहे, हे स्पष्ट होते.

तशातच आधी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कामात देशातील सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, ‘संविधान बचाओ-देश बचाओ’, असा नारा देत प्रभावी काम करत असल्यामुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भारतीय जनता पक्ष-महायुती हादरली आहे. विशेषत: समाजात आदराचे स्थान असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेमक्या प्रचाराने, संघाच्या ढोंगी सोज्ज्वळ प्रतिमेला चांगलेच तडे बसत असल्यामुळे, युती हवालदिल झालेली आहे. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस-महाविकास आघाडीसोबतच संघ- भाजपने भारत जोडो अभियान (भाजोअ) या कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी न मानता, देशातील लोकशाही, संविधानातील मूल्ये आणि महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार यापासून सामान्य जनतेचे संरक्षण, यासाठी कार्यरत मंचाबाबत खोटेनाटे आणि भ्रम निर्माण करणारे आरोप सुरू केले आहेत.

संघाच्या मुशीत घडलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेय की, भारत जोडोमध्ये दीडशे-दोनशे संघटना आहेत. त्यातल्या शंभरच्यावर संघटना अराजक पसरवणाऱ्या संघटना आहेत. या संघटना कट्टर वा अतिडाव्या विचारसरणीच्या आहेत. यांची ध्येयधोरणे आणि कार्यपद्धतीनुसार ते अराजकता पसरवणारे आहेत. राहुल गांधी लाल संविधान का दाखवतात? ते कोणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर किंवा व्यवस्था आणि अनार्किचा अर्थ असतो डिसऑर्डर किंवा अव्यवस्था व अराजकता. तुम्ही अराजक पसरवत आहात. शहरी नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाहीये. शहरी नक्षलवादाचा अर्थ असा आहे की, लोकांची मने कलुषित करायची, दूषित करायची आणि त्यांच्यात अराजकतेचे रोपण करायचे, जेणेकरून देशातल्या ज्या संस्था आहेत, व्यवस्था आहेत याच्यावरील त्यांचा विश्वास उडेल आणि कुठेतरी देशाच्या एकतेला आणि एकात्मकतेला, देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. या संदर्भात एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीत, अशा अतिडाव्या १३३ संघटना असल्याचा तपशील उजेडात आला असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या हातात लाल पुस्तक आहे म्हणून ते अर्बन नक्षल आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. हे लाल पुस्तक आहे भारताचे संविधान, ज्याचे शिल्पकार आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा स्वत:च्या हाताने लाल रंगाचे संविधान मा. राष्ट्रपतींना आणि अन्य महानुभावांना देत असल्याचे फोटो प्रसारित झालेले आहेत! हातात बाबासाहेबांचे संविधान असेल, तर त्या व्यक्तीला शहरी नक्षलवादी आणि अराजकवादी म्हणणारे संघ स्वयंसेवक, मोदी आणि शहांना सुद्धा शहरी नक्षलवादी म्हणणार आहेत का? संसदेत एका प्रश्नाद्वारे शहरी नक्षलवाद्यांची माहिती विचारली असता, गृहमंत्री अमित शहा यांच्या मंत्रालयाने लेखी उत्तरात म्हटले आहे की, शहरी नक्षलवाद असे कोणतेही वर्गीकरण सरकारने केलेले नाही. त्यामुळे शहरी नक्षलवाद्यांची यादीही सरकारकडे नाही. बहुदा फडणवीस शहांपेक्षा वरिष्ठ झालेले दिसतात! १९४९ साली जेव्हा संविधान स्वीकारले गेले, तेव्हा फडणवीसांची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानावर हल्ला केला होता. अजूनही संघ-भाजपला बाबासाहेबांचे संविधान खुपते आहे. अशाप्रकारे अपप्रचार करून देवेंद्र फडणवीस आणि संघ-भाजप संविधानाचा आणि बाबासाहेबांचा अपमान करत आहे.

या संदर्भात विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेल्या भाजोअने प्रसिद्धीपत्रकाद्वारे, अराजक माजवणाऱ्या अर्बन नक्षल संघटनांची यादी जाहीर करा व त्यांच्यावर कारवाई करा, असे जाहीर आव्हानच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, ‘अलीकडेच राज्याचे मा. गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी‌ केलेल्या, भाजोअत अराजक माजवणारे अर्बन नक्षल आहेत या आरोपाचा भाजोअ तीव्र निषेध करत आहे. भाजोअमध्ये महाराष्ट्रातील संतपरंपरांमधून रुजवलेले विचारांचे बीज घेऊन, गौतम बुद्ध व महात्मा गांधी यांनी दिलेल्या अहिंसेच्या तत्त्वावर चालणारे नागरिक आहेत.‌ आम्ही महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर गाढ श्रद्धा असलेले नागरिक आहोत. कष्टकरी समाजाला सन्मान मिळावा, म्हणून आयुष्य वेचलेले हजारो कार्यकर्ते संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आज निवडणूक प्रचारात उतरले आहेत. सरकारला जाब विचारत आहेत. भ्रष्ट नेत्यांची पोलखोल करत आहेत. त्यांचे समाजात भेद व धर्मांधता वाढवणाऱ्या, जातीयवाद पसरविणाऱ्या धोरणाचा पर्दाफाश करत आहेत. कष्टकरी समाजाला जागवत आहेत. संविधानिक जबाबदारीचे भान देत आहेत. यातून भाजपच्या विकृत, धर्मांध व संविधानविरोधी राजवटीला आव्हान दिले जात आहे. म्हणून फडणवीस सैरभैर झाले आहेत, त्या मानसिकतेतून अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत. कोणाला तुम्ही अराजक माजवणारे व अर्बन नक्षल म्हणता त्यांची यादी जाहीर करा व कारवाई करा,‌ म्हणजे महाराष्ट्रातील नागरिकांना कळेल, की तुम्ही कोणाच्या विरोधात संभ्रम निर्माण करत आहात.

तसेच गृहमंत्री या नात्याने तुम्हाला हे आधीच माहीत होते, तर यापूर्वीच कारवाई का केली नाही? निवडणुकीच्या तोंडावर ही विधाने का केली जात आहेत? ज्या लाल रंगाला फडणवीस विरोध करत आहेत तो परिवर्तनाचा, क्रांतीचा रंग आहे. त्याच लाल रंगाच्या कपड्यात ज्ञानेश्वरी व संत तुकारामांच्या अभंग गाथांसारखे ग्रंथ घरोघरी ठेवले जातात. तोच रंग संविधानात अभिप्रेत असणाऱ्या मूलगामी परिवर्तनाचा आशय मांडणारा आहे. तोच रंग उगवत्या सूर्याचा आहे. फडणवीस या नव्या सूर्योदयाला, नागरिकांच्या मनात जागणाऱ्या उजेडाला घाबरत आहेत, म्हणून ही निरर्थक विधाने करत आहेत. आम्ही अशा दिशाभूल करणाऱ्या विधानांनी विचलित होणार नाही. संघ, भाजपने भाजोअबाबत भ्रम पसरवणे बंद करावे. संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी काम सुरूच राहील, असा निर्धार भाजोअने व्यक्त केला आहे.

समतेच्या लाल, सामाजिक न्यायाच्या निळ्या, जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनांच्या हिरव्या व धर्मनिरपेक्षतेच्या सप्तरंगी संविधानिक मूल्यांप्रती संघ-भाजपचा द्वेष लपलेला नाही. शेतकऱ्यांबाबतची अनास्था, कामगारक्षेत्राचे कंत्राटीकरण, शिक्षण-आरोग्य-रेशन क्षेत्रातील खासगीकरण आणि महिला-दलित- अल्पसंख्यांकांवरील अत्याचार हे सर्व डबल इंजिन सरकारच्या काळात वाढत आहेत. भविष्यातही त्यांची तीच दिशा असणार आहे. म्हणूनच संविधान वाचवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत, विद्यमान ठगबंधन सरकारला हरविणे आवश्यक आहे. त्यासाठी महाविकास आघाडीला आज तरी पर्याय नाही!

लेखक ‘भारत जोडो अभियान’ या नागरिकांच्या राजकीय मंचाचे राज्य समन्वयक व राष्ट्रीय सचिव आणि ‘जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वया’चे राष्ट्रीय समन्वयक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in