हलगर्जीपणाचे बळी! उष्माघाताने श्री सदस्य मृत्युमुखी; यात दोष कुणाचा?

गेल्या काही दिवसांत दुपारच्या रणरणत्या उन्हातून ये-जा करणे टाळले तर बरे अशीच एकूण परिस्थिती होती.
हलगर्जीपणाचे बळी! उष्माघाताने श्री सदस्य मृत्युमुखी; यात दोष कुणाचा?

राज्याच्या काही भागाला अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे. त्यातच कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. याशिवाय, उन्हाचा पारा चढल्याने दुपारच्या सुमारास बाहेर पडणेही जिकरीचे होऊन बसलेले आहे. अशा वेळी एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन नामक यंत्रणेने खुल्या मैदानातील कोणतेही भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून त्यात जमावाचे शक्तिप्रदर्शन करणे खरे तर टाळण्याची आवश्यकता होती. पण, प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारची सर्व यंत्रणा महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या भव्यदिव्य सोहळ्यासाठी कामाला लागली. त्यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्था, सफाई व्यवस्था, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला. या सोहळ्याचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे, हा सोहळा अभूतपूर्व गर्दीच्या साक्षीने दणक्यात पार पाडण्याची सर्व सिद्धता शासनामार्फत करण्यात आली. दुसरीकडे या सोहळ्याच्यानिमित्ताने काही नेत्यांनी आपल्या छब्या पोस्टर्सच्या माध्यमातून संपूर्ण शहरभर कशा झळकतील, याची पुरेपूर व्यवस्था केली होती.

गेल्या काही दिवसांत दुपारच्या रणरणत्या उन्हातून ये-जा करणे टाळले तर बरे अशीच एकूण परिस्थिती होती. पण, या पुरस्कारासाठी आयती गर्दी जमवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचेही अंतस्थ मनसुबे आखण्यात आले. श्री सदस्यांची ने-आण करण्यासाठी गावागावातून बसेसचीही व्यवस्था करण्यात आली. अशातऱ्हेने ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यासाठी खारघर नगरी सज्ज झाली. हा सोहळा भव्यदिव्य व्हावा व त्यासाठी लाखो श्री अनुयायी यावेत यासाठी सर्वच आपापल्या परीने कामाला लागले होते. त्यासाठी व्यासपीठाचा भव्य मंडप सजला होता. शेजारी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीही मंडप टाकून सावलीची व्यवस्थाही केली होती. या कार्यक्रमासाठी काही लाख अनुयायांनी सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यक्रमस्थळी ठिय्या मांडला होता. पण दुसरीकडे, ज्या मैदानावर जमलेल्या लाखो श्री सदस्यांची व्यवस्था भर उन्हात केली होती, तेथे खालून जमीन तापली होती, तर वरून सूर्य आग ओकत होता. त्यामुळे ४२ अंश सेल्शिअसच्या रणरणत्या उन्हाचा त्रास असह्य होऊन अनेक श्री सदस्य अगदी घामाघूम झाले. काही जण पाण्यासाठी व्याकूळ झाले. काही जणांना चक्कर आली. एकीकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा सुरू असताना, त्याचा आनंद घेण्याऐवजी उन्हाच्या त्रासाने समोर बसलेली गर्दी अस्वस्थ झाली होती. अनेकांना गर्दीतून बाहेर पडणेही अवघड होत होते. परिणामी, उष्माघाताचा तडाखा वर्मी बसून त्यात १३ श्री सेवकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. याशिवाय, पन्नासहून अधिक जण अत्यवस्थ झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेवरून आता राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे रण पेटले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी घेतला असता तर श्री सदस्यांना घरी जाण्यास विलंब झाला असता, म्हणून हा कार्यक्रम सकाळी घेण्यात आल्याचे खुलासे सरकारच्या वतीने केले जात आहेत. मुळात गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढीच्या बातम्या येत आहेत. तसे, अनुभवही सर्वच जण घेत असताना, दुपारच्या रणरणत्या उन्हात कार्यक्रम घेण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. दुसरा मुद्दा असा की, हा कार्यक्रम घ्यायचाच होता, तर तो राजभवन वा अन्य ठिकाणी घेता आला असता, त्यासाठी रणरणत्या उन्हात मोकळ्या मैदानावर गर्दी जमविण्याची आवश्यकता नव्हती.

तिसरा मुद्दा असा की, व्यासपीठावर मंडप, अतिथींसाठी वेगळा मंडप होता, तर तो श्री सदस्यांसाठी का नव्हता? आपल्या समोर बसलेल्या लाखो नागरिकांना ऊन अक्षरश: भाजून काढत आहे, याची किमान जाणीव तरी व्यासपीठावर बसलेल्या सर्वच अनुभवी व संवेदनशील नेत्यांनी ठेवायला हवी होती. चौथा मुद्दा असा की, जर तुम्हाला एवढी गर्दीच जमवायची होती, तर मग गर्दीतील प्रत्येकाला किमान पिण्याच्या बाटल्या अथवा टोप्या का दिल्या नाहीत? काही लाख लोक कार्यक्रमाला येणार असतील, तर आणीबाणीच्या परिस्थितीत त्या शहरातील वाहतूक, रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांची चोख व्यवस्था आधीच करणे अपेक्षित असते. या ठिकाणी श्री सदस्यांना ना वेळेत पाणी मिळाले, ना त्यांना वेळीच रुग्णालयात पोहोचता आले, मग यात दोष कुणाचा? ही दुर्घटना घडत असताना ना गर्दीचे व्यवस्थापन कामी आले, ना कुठे आणीबाणीपश्चात यंत्रणा सक्रिय असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे राज्य सरकारच्या निष्काळजीपणाचे बळी आहेत असे विरोधक म्हणत असतील, तर ते चुकीचे म्हणता येणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in