

मत आमचेही
केशव उपाध्ये
राज्यातील प्रकल्पाबद्दल राजकीय विरोधापोटी खोटीनाटी माहिती पसरवणे हा विकृतीचा कळस आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी त्याला भेट देऊन त्यात काही उणिवा असतील तर त्या प्रशासनाच्या लक्षात आणून देणे हे जबाबदार विरोधकांचे लक्षण ठरले असते.
नुकत्याच झालेल्या पावसात मुंबई-पुणे रस्ते मार्गावरील कनेक्टिंग लिंकभोवती दरडीचा भाग कोसळला. परिणामी या बोगद्यातून होणारी वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली. रस्ते विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे ही वाहतूक १८ तासांनी पूर्ववत सुरू झाली. मात्र तोपर्यंत या मुद्द्यावरून महायुती सरकार, भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि समाज माध्यमांवरील भाजप विरोधकांच्या टोळक्यांनी अपप्रचार आणि अफवांच्या माध्यमातून अक्षरश: नंगानाच घातला. कनेक्टिंग लिंक पडली, कनेक्टिंग लिंकला भगदाड पडले, राज्य सरकारने यासाठी खर्च केलेले सात हजार कोटी पाण्यात गेले, अशा प्रकारच्या नाना अफवा पसरवून विरोधकांनी तसेच भाजप विरोधकांचे कंत्राट घेतलेल्या समाज माध्यमांवरील टोळ्यांनी आपली विरोधाची विकृत हौस भागवून घेतली. कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक बंद पडली याचा या मंडळींना असुरी आनंद झाला होता. त्याचे निमित्त करून या मंडळींच्या पोटात साचलेली भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या विरोधातील सगळी घाण बाहेर पडली. यात इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांतील काही मंडळींचाही समावेश होता. अनेक प्रयत्न करूनही विधानसभा आणि नंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्या आघाडीला यश मिळू न शकल्याने प्रसार माध्यमांतील अनेक जुनेजाणते कोमात गेले होते. त्यांनाही आपली भाजप विरोधाची मळमळ बाहेर काढण्याची संधी मिळाली. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात तडाखेबंद उत्तर दिल्यावर अनेकांना मिरच्या झोंबल्या. सरकारच्या कामावर टीका करायची नाही का, प्रश्न उपस्थित करायचे नाहीत का, असे म्हणत या मंडळींनी कांगावा सुरू केला. मुळात प्रश्न असा आहे की कनेक्टिंग लिंकबद्दल प्रश्न उपस्थित केले म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला नव्हता. आक्षेप होता तो कनेक्टिंग लिंकचा बोगदा कोसळला वगैरे वगैरे अफवा पसरवून या मंडळींनी एका चांगल्या प्रकल्पाबद्दल खोटी माहिती जनतेमध्ये पसरविण्याचा उद्योग केला. महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने बांधकामे करून महायुती सरकार जनतेचा कररूपी पैसा पाण्यात घालत आहे, या प्रकारांना देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, असा खोटा प्रचार या मंडळींनी समाज माध्यमांवर केला. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या नैसर्गिक दरड कोसळण्याच्या घटनेनंतर काही मविआ नेत्यांनी कोणतीही तांत्रिक माहिती न घेता या प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरुवात केली. मिसिंग लिंक प्रकल्पाचा बोगदा फुटलेला नव्हता, बोगद्यामध्ये पाणी शिरलेले नव्हते. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या मुख्य संरचनेला कोणतेही नुकसान झालेले नव्हते. दरड कोसळली ती बोगद्याच्या बाहेरील डोंगराच्या उतारावर. ही पूर्णपणे नैसर्गिक भूगर्भीय घटना होती. जगातील सर्वात आधुनिक रस्ते आणि बोगद्यांच्या प्रकल्पांमध्येही अशा नैसर्गिक घटना घडतात. त्याचा अर्थ निकृष्ट बांधकाम किंवा भ्रष्टाचार असा होत नाही. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर बोलतानाही याच पद्धतीने खोटी माहिती अशा तऱ्हेने सांगितली की, सामान्य माणसाने या लिंकचा वापर करणेच थांबवले पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची बदनामीच आहे. आपल्या विरोधाचा कंड शमविण्यासाठी विरोधकांनी आणि समाज माध्यमांवरील सुपारीबाजांनी कनेक्टिंग लिंक कोसळला असे वातावरण तयार करून सामान्य माणसाच्या मनात घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटात नुकसान टाळणे जवळपास अशक्य असते. कारण निसर्गाचा रुद्रावतार कोणत्याही मानवी नियोजनापेक्षा मोठा असतो. हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप अधिक अनियमित आणि तीव्र झाले आहे. काही तासांत महिनाभराचा पाऊस कोसळत असल्याने नदी-नाले तुडुंब भरतात, धरणांचे विसर्ग वाढतात, डोंगरांच्या दरडी कोसळू लागतात. लोणावळ्यात अवघ्या काही तासांत ५०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे मिसिंग लिंकच्या बोगद्यावरील डोंगराची दरड कोसळली. मुंबई-पुणे लोहमार्गावरही दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद पडली. मानवाने विज्ञानाच्या जोरावर कितीही प्रगती केली असली, तरी निसर्गाच्या अफाट ताकदीपुढे माणूस आजही थिटा पडतो. अतिवृष्टी ही अशीच एक आपत्ती आहे, जिचा अचूक अंदाज आणि पूर्वतयारी करूनही नुकसान पूर्णपणे शून्यावर आणणे अनेक कारणांमुळे अशक्यप्राय होते. अतिवृष्टीची सर्वात मोठी समस्या म्हणजे अतिशय कमी वेळात होणारा अवाढव्य पाऊस. काही तासांतच महिन्याभराचा पाऊस कोसळतो. इतक्या कमी वेळात पाण्याचा निचरा करणारी कोणतीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित यंत्रणा जगात अस्तित्वात नाही. त्यामुळे अचानक येणाऱ्या पुराचा सामना करणे मानवी क्षमतेच्या पलीकडे जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि पश्चिम घाटातील डोंगराळ भागाची रचना अशी आहे की, अतिवृष्टीमुळे माती सैल होते आणि संपूर्ण डोंगरपायथा कोसळतो. २०१३ मध्ये आंबेगाव तालुक्यात (जि. पुणे) माळीण येथे डोंगराखाली अख्खे गाव गाडले गेले होते. ही दुर्घटना असो की महाडचे तळये गाव असो किंवा इर्शाळवाडीची दुर्घटना, अशा ठिकाणी भौगोलिक रचनेमुळे आधुनिक यंत्रसामग्री पोहोचवणेही कठीण होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पावर खऱ्या माहितीऐवजी अफवांचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. ‘कनेक्टिंग लिंक’ (पूर्वीचा मिसिंग लिंक प्रकल्प) हा आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत चमत्कार आहे. जगातला सगळ्यात मोठा, सगळ्यात रुंद बोगदा असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राचे वैभव आहे. या २२.३३ मीटर रुंदीच्या बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल हा या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण आहे. सुमारे १२५ मीटर उंचीवर आणि १८२ मीटर उंचीच्या दोन स्तंभांच्या आधारावर उभा असलेला हा पूल आधुनिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. अशा प्रकल्पाबद्दल राजकीय विरोधापोटी खोटीनाटी माहिती पसरवणे हा विकृतीचा कळस आहे. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी त्याला भेट देऊन त्यात काही उणिवा असतील तर त्या प्रशासनाच्या लक्षात आणून देणे हे जबाबदार विरोधकांचे लक्षण ठरले असते. तसे न करता एखाद्या घटनेचे निमित्त करून अफवांचा बाजार सुरू करून विरोधकांनी आपल्या अकलेचे बारा वाजल्याचे दाखवून दिले आहे.
प्रदेश उपाध्यक्ष, भाजप