निवडणूक रंजक पटकथेप्रमाणे बदलते तेव्हा...

महाराष्ट्रातील निवडणुका या केवळ मतांच्या आकड्यांची लढाई न राहता आता सूक्ष्म राजकीय गणिते आणि नेपथ्यरचनेने भरलेल्या रंजक पटकथा बनत चालल्या आहेत. प्रत्येक निवडणूक निकालामागे दिसणाऱ्या बदलत्या समीकरणांतून राज्याच्या राजकारणाची नवी दिशा स्पष्टपणे समोर येते.
निवडणूक रंजक पटकथेप्रमाणे बदलते तेव्हा...
Published on

मुलुख मैदान

रविकिरण देशमुख

महाराष्ट्रातील निवडणुका या केवळ मतांच्या आकड्यांची लढाई न राहता आता सूक्ष्म राजकीय गणिते आणि नेपथ्यरचनेने भरलेल्या रंजक पटकथा बनत चालल्या आहेत. प्रत्येक निवडणूक निकालामागे दिसणाऱ्या बदलत्या समीकरणांतून राज्याच्या राजकारणाची नवी दिशा स्पष्टपणे समोर येते.

अनेक मराठी जातसमूहांचे, विशेषतः इतर मागास वर्ग (ओबीसी) संघटन करणाऱ्या शिवसेनेने १९८९ साली तेव्हाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) महानगरपालिका निवडणुकीत जोरदार विजय मिळविला आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेली मुस्लीम लोकसंख्याबहुल पालिकाही ताब्यात घेतली. याआधी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पाठबळावर रमेश प्रभू विजयी झाले होते. विविध मराठी जातसमुहांचे- विशेषतः इतर मागास वर्ग (ओबीसी) संघटन करणाऱ्या शिवसेनेची ही कामगिरी भाजपाच्या प्रमोद महाजन यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या लक्षात आली होती.

तेव्हा त्यांनी तातडीने शिवसेनेसोबत युती करून टाकली. भाजपाला ओबीसी हाच मोठा जनाधार वाटत होता. कारण महाराष्ट्रातील मराठा व इतर तालेवार समूह काँग्रेससोबत शेती-सहकार याच्याशी संबंधीत साखळीने बांधून टाकलेला होता. अल्पसंख्याक आणि दलितवर्ग विशेषतः

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायीवर्गही काँग्रेसकडे होता. आपल्या मतपेढीत आणखी फूट नको तेव्हा शिवसेना बरी हा विचार झाला. ९० च्या विधानसभा निवडणुकीत शिवेसना-भाजपा युतीने जोरदार कामिगिरी केली व प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवत डाव्या विचारसरणीच्या पक्षांना बाजूला सारले.

९० नंतर मराठी भाषा, संस्कृती आणि प्रादेशिकतावाद यावर वाढत चाललेली शिवसेना हिंदुत्वाकडे अधिक झुकू लागली होती. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे असे एकदा स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणाले तेव्हा एक साक्षेपी व सव्यसाची संपादक म्हणाले होते की, कधीतरी हाच श्वास तुमचा घात करील. तेव्हा त्या संपादकांशी ठाकरे यांनी चर्चाही केली होती. शिवसेना ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या सडेतोड विचारांनी म्हणजेच कर्मठ व सनातनी हिंदुत्वाला विरोध करत सर्वसमावेशक भुमिकेने वाटचाल करणारी होती. त्यामुळे ही टिप्पणी त्यांना आश्चर्यकारक वाटली असावी.

दुसरी गोष्ट- २०१२ च्या नांदेड महानगरपालिका निवडणुकीत अखील भारतीय मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात एमआयएम ह्या हैदराबाद येथील संघटना वा राजकीय पक्षाने

११ जागा जिंकत प्रथमच महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यावेळी नांदेडमधील मुस्लीमवर्ग काँग्रेसवर प्रचंड नाराज होता व तो इतर पक्षांचे भले करण्याची शक्यता होती. ध्रुविकरणासाठी म्हणून त्यांना तेथील काँग्रेस नेतृत्वानेच आमंत्रित केले अशी टीका झाली. निकाल अपेक्षित आला, काँग्रेसने पालिका जिंकली. नंतर ११ पैकी ७ जण काँग्रेसमध्ये सामील झाले आणि ही पटकथा स्पष्ट झाली. आता नांदेडमध्ये भाजपाने ४५ जागा जिंकल्या व एमआयएमने १४ जागा जिंकल्या. २०१२ साली एमआयएमच्या मदतीने काँग्रेसने शिवसेना-भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले. आता भाजपा व एमआयएमची घोडदौड होत असताना काँग्रेस १० जागांवर व शिवसेना शुन्यावर आटोपली. विशेष म्हणजे २०१२ मध्ये काँग्रेसच्या आणि आता भाजपाच्या विजयाचे श्रेय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जाते.

महाराष्ट्राचे राजकारण कशी वळणे घेतेय हे यातून स्पष्ट होते. एकीकडे भाजपा १४०० हून अधिक नगरसेवक निवडून आणत असताना दुसऱ्या क्रमांकावरील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ३९९ जागांवर थांबते. म्हणजे हा फरक हजाराहून जास्त आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण अलीकडे फारसा चर्चेत नसलेला एमआयएम हा पक्ष साधारणतः १२५ जागा मिळवत सर्वांच्या चर्चेचा विषय बनतो. हे असे कसे घडले?

याचे उत्तर एका वाक्यात द्यायचे झाले तर महापालिका निवडणुकीनंतर आठवडा होत आला तरी ‘वोट जिहाद’ हा शब्द कानावर आलेला नाही. मात्र हाच शब्द २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरात चर्चेचा विषय बनला होता. असे कसे? याचे कारण त्यावेळी महाविकास आघाडी- मविआला ४८ पैकी ३० व १ जागा काँग्रेस बंडखोर उमेदवाराने जिंकली होती. धुळे मतदारसंघात केवळ मालेगाव विधानसभेने दिलेल्या आघाडीमुळे काँग्रेसचा उमेदवार जिंकला होता. म्हणजेच मविआला मतदान केले की, वोट जिहाद होतो, कर्मठ-कडवट एमआयएमला केल्यास होत नाही, हा ‘संदेश’ पोचला.

पुढे कशी परिस्थिती बदलत गेली हे पाहिले तर हे लक्षात येते की, ज्या बहुसंख्य मुस्लीम मतदारांनी भाजपाविरोध म्हणून मविआला म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांना मतदान केले ते आता एमआयएमच्या पाठीशी उभे ठाकले. हे का घडले तर मधल्या काळात उद्धव ठाकरे राजकीय मिथकानुसार ‘औरंगजेब फॅन क्लब’चे सदस्य झाले. त्यांनी हिंदुत्व सोडले, सोडले हा हल्ला २०२२ नंतर प्रखर झाला. त्यांचा हिंदू मतदार जाणीवपूर्वक कमी करणे व मुस्लीम मतदार दूर करणे हा राजकीय कार्यक्रम होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते राज ठाकरे प्रार्थनास्थळावरील भोंग्याविरोधात बोलू लागले. त्यांना हा विषय हाती घ्यायला कोणी सांगितले असावे, यामुळे मनसेला राजकीय फायदा होणार आहे का, ही चर्चा सुरू झाली. यात मशिदीवरील भोंगे हेच टार्गेट आहे असा श्लेष निघताच मुस्लीमवर्ग अधिकच अस्वस्थ होत गेला.

त्यात मराठी भाषा सक्तीचा विषय पुढे आला. तो आताच का आला याची चर्चा सुरू असतानाच ठाकरे बंधू एकत्र आले ते ‘एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी’ असे म्हणतच. तेव्हा राज ठाकरे यांच्या भोंगाविरोधी मोहिमेने दुखावलेला मुस्लीम प्रचंड वेगाने दूर गेला. उद्धव ठाकरेंना दिलेल्या पाठिंब्यामुळे ते भाजपाकडून टार्गेट होतात आणि आपली बाजू उघडपणे घेऊ शकत नाहीत याची अस्वस्थता मुस्लीमवर्गात होतीच. यात काँग्रेस हा जुनाच पर्याय चाचपडून पाहिला जात होता. काहींनी तो निवडला त्यामुळेच मुंबईत काँग्रेसचे २४ पैकी सर्वाधिक नगरसेवक मुस्लीम आहेत. पण त्याआधी एमआयएमचा पर्याय वस्त्यावस्त्यांमध्ये शिरला होता.

तोच पर्याय, छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात चालला. परिणाम काय झाला तर १९८९ पासून तिथे मजबूत असणारी शिवसेना बाजूला फेकली गेली आणि भाजपा क्रमांक

१ व एमआयएम क्रमांक २ चा पर्याय बनला. २०१९ साली एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा तेथील लोकसभेतला विजय शिवसेनेच्या ताब्यातले हे शहर काढून घेण्याचा पहिला सफल प्रयत्न होता.

बहुजनवर्गातील अनेकांना आकर्षित करणारी शिवसेना ज्या मुस्लीम लोकसंख्याबहुल शहरांमध्ये आक्रमक हिंदुत्वाच्या आधारावर विस्तारली होती तिथे आता भाजपा पर्याय बनला आहे. हे चित्र धुळे, अमरावती, नांदेड, सोलापूर आदी शहरांत आहे. मालेगावच्या १८ जागा या शिवसेनेसाठी बुडत्याला काडीचा आधार आहे.

दुसरीकडे मुस्लीम समुदायाला एक संदेश मिळालेला दिसतो तो म्हणजे आपल्या कोषातून बाहेर पडून सर्वसमावेशक तोंडवळा असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा यासारख्या पक्षांकडे झुकाल तर टार्गेट व्हाल पण एमआयएमकडे जाल तर तसे होणार नाही. यातही काँग्रेसने आपले उच्चाटन थोडेफार रोखले पण दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीच्या तर चिरफळ्या उडाल्या.

या निवडणुकीत एमआयएमचा जाहीरनामा होता का, त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत काही भूमिका मांडली का, हे कोणाला ठाऊक असण्याचे काही कारण नाही. तो त्यांच्या प्रचाराचा भागही नसावा.

एकीकडे मुस्लीम मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, त्यांच्यात प्रगल्भता आली पाहिजे अशी भाषणे दिली जातात. दुसऱ्या बाजूला ते कर्मठ एमआयएमकडे कसे वळतील याची राजकीय नेपथ्यरचनाही आखली जाते. महाविकास आघाडी तर विशविशीत झालीच, शिवाय इंडिया आघाडी कमकुवत झाली पाहिजे या भूमिकेनुसार समाजवादी पार्टीचाही या निवडणुकीत ‘कार्यक्रम’ झाला.

ravikiran1001@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in