महाराष्ट्राला ‘गुंडा’राष्ट्र बनवू नका!

कधी काळी राज्याच्या राजकारणात विकासाला महत्त्व होते. नेत्यांना प्रश्न आणि समस्यांची जाण होती, ते सोडविण्याची तळमळ होती. अशा नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. उद्योगधंदे आले. महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली.
महाराष्ट्राला ‘गुंडा’राष्ट्र बनवू नका!
Published on

मत आमचेही

ॲड. श्रीनिवास बिक्कड

कधी काळी राज्याच्या राजकारणात विकासाला महत्त्व होते. नेत्यांना प्रश्न आणि समस्यांची जाण होती, ते सोडविण्याची तळमळ होती. अशा नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. उद्योगधंदे आले. महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली.

महाराष्ट्राची ओळख ही सहिष्णुता, प्रगती आणि सामाजिक न्याय यांच्या संगमातून उभी राहिलेली आहे. महाराष्ट्र ही शिवछत्रपतींची, शाहू-फुले-आंबेडकरांच्या समतेच्या चळवळींची, ज्ञानोबा-तुकोबांच्या शिकवणीवर चालणारी पुरोगामी भूमी आहे. सहकार, शिक्षण, विज्ञान, उद्योग आणि समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दिली. परंतु आज या पावन भूमीवर गुंड, माफिया, दलालांनी उभे केलेले दहशतीचे सावट फोफावत आहे. रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनाला लवकर साइड दिली नाही म्हणून एक दुचाकीस्वाराला गोळ्या मारल्या जात असतील तर महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. शहरांपासून गावापर्यंत गल्लोगल्ली गुंड तयार झाले असून त्यांना राजकीय राजकीय संरक्षणही मिळत आहे. त्यामुळे उत्तरेतल्या राज्यांबाबत वापरली जाणारी “गुंडराज” ही संज्ञा महाराष्ट्रातील जनता दररोज अनुभवत आहे. सर्वांगीण सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या भोवती फिरणारे महाराष्ट्राचे राजकारण हे गुंड आणि त्यांना पोसणाऱ्या नेत्यांभोवती फिरू लागले आहे हे आजच्या महाराष्ट्राचे कटू वास्तव आहे.

जनतेचा नाही गुंडांचा विकास

कधी काळी राज्याच्या राजकारणात विकासाला महत्त्व होते. नेत्यांना प्रश्न आणि समस्यांची जाण होती, ते सोडविण्याची तळमळ होती. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, अशा नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. कोयना, जायकवाडी, उजनीसारखी धरणे अस्तित्वात आली, शेतीची उत्पादकता वाढली. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्यांमुळे शेतकऱ्यांना समृद्धी आली. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षण मिळवून डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासकीय अधिकारी झाली. उद्योगधंदे आले. महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली. या महान नेत्यांनी सत्तेसाठी विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही. गुंडांची मदत घेणे सोडा, गुंडांची सावलीही आपल्या जवळपास फिरकू दिली नाही. त्यांच्या राजकारणाला नैतिकतेचे अधिष्ठान असल्याने गुंड, माफियाही त्यांच्या जवळपास फिरकण्याचे धाडस करत नव्हते. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली. मंत्र्यांच्या बंगल्यापासून ते मंत्रालयापर्यंत सगळीकडे गुंड, माफियांचा मुक्त संचार सुरू आहे.

‘आपला आपला गुंड’

गुंड, दलाल आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यातील सीमारेषा अंधुक झाली आहे. सत्तेची जवळीक साधून अनेक गुंड ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणून राजकीय क्षेत्रात मिरवत आहेत. सत्ताधारीही त्यांच्या मदतीने आपले राजकीय डावपेच साधत आहेत. राजकीय पक्षांनी गुंड वाटून घेतले आहेत, अशी चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात ‘वर्षा’ बंगल्यावरील पुण्यातील कुख्यात बाबा बोडके याच्यासोबतचा फोटो राज्यभर चर्चेत होता. ज्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी, धमकी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत असा व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचतो आणि मुख्यमंत्री त्यांच्यासोबत फोटो काढतात, याचा अर्थ सत्ता आणि गुंडगिरी यांच्यातील सीमारेषा पुसली गेली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा गजा मारणे या पुण्यातील कुख्यात गुंडासोबतचा फोटो व्हायरल झाला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या एका नेत्याच्या गुंडगिरीला कंटाळून कल्याणचे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करून आपण गुंडापेक्षा कमी नाही हे दाखवून दिले.

राजकारण्यांचा लाडका ‘घायवळ’

सध्या निलेश आणि सचिन घायवळ हे दोन भाऊ राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरात घायवळचा मुक्त संचार आहे. सामान्य माणसाला सगळी कागदपत्रे असूनही पासपोर्ट लवकर मिळत नाही. पण खोट्या पत्त्यावर पासपोर्ट मिळवून हा घायवळ युरोप पर्यटन करत आहे. यावरून त्याची पोहोच कुठपर्यंत आहे, याचा अंदाज येऊ शकतो. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेच घायवळचे पालक असल्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. विधान परिषद सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बीडच्या गुंडगिरीबाबत रान उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धसही घायवळच्या मांडीला मांडी लावून बसल्याची छायाचित्रे समोर आली. माजी मंत्री तानाजी सावंतांसाठी या निलेश घायवळने लोकांना दिलेल्या धमक्यांच्या ऑडिओ क्लीपही वृत्तवाहिन्यांनी चालवल्या. निलेश घायवळचा भाऊ एका व्हिडीओमध्ये आपण अजित पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत आहे. सत्ताधीशांशी एवढे जवळचे संबंध असल्यामुळेच गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचा रिपोर्ट डावलून सचिन घायवळला पिस्तुलचा परवाना दिला. या घायवळची दहशत एवढी की याच्याबाबत प्रश्न विचारताच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पत्रकार परिषद सोडून पळाले.

गुन्हेगारांची राजधानी

राज्याची सास्कृंतिक राजधानी शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची गेल्या काही वर्षांतील स्थिती पाहता पुण्याला आता गुन्हेगारांची राजधानीच म्हणावे लागले. अंदेकर-कोमकर टोळीयुद्धातले हत्यासत्र, कोयता गँग, गल्लोगल्लीचे दादा त्यांचे पालक राजकीय नेते हे पुण्यातले सध्याचे चित्र आहे. पुणे गुन्हेगारीच्या मगरमिठीत अडकले आहे. अजितदादा आणि चंद्रकांतदादा हे दोन दादा गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याचे पालकमंत्री पद सांभाळत आहेत, पण ते गुन्हेगारीवर वचक बसवू शकले नाहीत. उच्च तंत्रशिक्षण खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा कोथरूड मतदारसंघ हा तर पुण्यातील गुन्हेगारीचे केंद्र झाला आहे. या गुंडांच्या टोळ्यांना त्यांचेच पाठबळ आणि संरक्षण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नाही तर त्यांच्या पक्षातही आहे. लोक मतं देतील अशी काही चांगली कामे केली नसल्याने गुंड पाळून निवडणुका जिंकण्याचा नवा पुणे पॅटर्न सुरू झाला आहे.

भाजप गुंडांना पावन करून घेणारी गंगा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकचा नेता सुधाकर बडगुजर याचे दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताशी संबंध असल्यावरून भाजपने आरोपाची राळ उठवली होती. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत तडाखेबंद शैलीत भाषण केले होते. त्याला भाजपने पावन करून घेतले. त्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्ची याच्याशी संबंध असल्याचे आरोप केले. त्यांनाही सन्मानाने सोबत घेतले. आरोप करायचे आणि त्याच लोकांना पावन करून आपल्यासोबत घ्यायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे. नाशिक शहरात तीन वेगवेगळ्या खुनांच्या प्रकरणात भाजपच्या दोन माजी नगसेवकांना आणि एका पदाधिकाऱ्याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या लोकांनी जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळात मारहाण केली. यावरून गुन्हेगारीचे लोण कुठपर्यंत पसरले आहे याचा अंदाज येतो.

गुंडांना पोसणारे, त्यांच्यासोबत फोटो काढणारे, त्यांना संरक्षण देणारे राजकारणी महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावत आहेत. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांची पहिली जबाबदारी भयमुक्त समाज निर्माण करणे आहे, पण भीती हीच सत्ता मिळवण्याचे शस्त्र बनली आहे. महाराष्ट्राने संत आणि समाजसुधारक निर्माण केले, पण आज त्याच महाराष्ट्रात गुंड आणि दलाल सत्तेचे आधारस्तंभ होत आहेत. ही स्थिती आपल्याला विचार करायला लावणारी आहे. सत्ता आणि गुंड यांचे नाते तोडले नाही, तर महाराष्ट्राची ओळखच बदलून जाईल. महाराष्ट्र गुंडाराष्ट्र व्हावे की विचारांचे आणि प्रगतीचे केंद्र राहावे, हा प्रश्न आता प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःला विचारायची वेळ आली आहे.

माध्यम समन्वयक,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

logo
marathi.freepressjournal.in