महाराष्ट्र राज्य असे नव्हते...

महाराष्ट्राला स्वतःची आगळीवेगळी ओळख आहे. जे- जे उज्वल आणि भव्य ते-ते या राज्याने पाहिले इतका गौरवशाली इतिहास या राज्याला आहे. अशा भव्यदिव्य इतिहासाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची आज देशपातळीवर काय ओळख झाली असावी?
महाराष्ट्र राज्य असे नव्हते...
Published on

मुलुख मैदान

रविकिरण देशमुख

महाराष्ट्राला स्वतःची आगळीवेगळी ओळख आहे. जे- जे उज्वल आणि भव्य ते-ते या राज्याने पाहिले इतका गौरवशाली इतिहास या राज्याला आहे. अशा भव्यदिव्य इतिहासाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची आज देशपातळीवर काय ओळख झाली असावी?

देशाचे राजकारण, समाजकारण, धर्म आणि संस्कृती, पौराणिक आणि अध्यात्मिक वारसा, सामाजिक सुधारणा, विज्ञान आणि संशोधन, कला आणि क्रीडा यासह अन्य क्षेत्रांत महाराष्ट्राचे योगदान लिहायचे झाले तर एक स्वतंत्र ग्रंथ तयार होतो. या क्षेत्रांमध्ये ज्यांचे अतुलनीय योगदान आहे त्यांचा उल्लेख करायचा झाला तरी शब्दसंख्या फार मोठी होईल. जे-जे उज्वल आणि भव्य ते- ते या राज्याने पाहिले इतका गौरवशाली इतिहास या राज्याला आहे.

राज्यनिर्मितीचा इतिहास अनेक घटनांनी भरलेला आहे. त्यामागे मराठी भाषा, संस्कृतीची विचारधारा आहे. महाराष्ट्राला स्वतःची आगळीवेगळी ओळख आहे. एका मुंबईचा इतिहास पाहिला तर ब्रिटिश काळात आणि स्वातंत्र्यानंतर अनेक भव्य वास्तू अस्सल मराठीजनांनी बांधल्या आहेत. मुंबईची पायाभरणी कोणी केली याचा इतिहास लिहिताना ब्रिटिशांसोबत मराठी बहाद्दरांचा उल्लेख करावाच लागतो.

केवळ मुंबई, कोकण नव्हे, तर वऱ्हाड प्रांतातील अनेक मान्यवरांचे नाव आदराने घ्यावे लागेल, अशी कर्तबगारी या राज्यातील मान्यवरांनी नोंदविली आहे. पण पक्षीय राजकारणाने जसजशी उचल खाल्ली व सामान्यांच्या दैनंदिन जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली तशी इतर क्षेत्रे मागे राहू लागली. सर्वांवरच सत्ताकारण, सरकार, मायबाप सरकार याभोवती पिंगा घालण्याची वेळ आली. सर्व गोष्टी मंत्रालयातून नियंत्रित होऊ लागल्या, तसतसा समाजजीवनाचा पोत बदलत गेला.

हे फार आक्षेपार्ह आहे असेही नाही. पण इतर क्षेत्रांत राजकारण व सरकार यांनी किती लुडबुड करावी याला मर्यादा राहिली नाही. त्यामुळे सत्तापक्षापेक्षा वेगळी विचारसरणी असलेली माणसे शांत राहणे पसंत करू लागली. राजकारणात दंडेलशाही वाढली तशी वैचारिक मोठेपण असलेली माणसे खुजेपणात समाधान मानू लागली. वेगळा विचार मांडला तर आपल्याला संरक्षण मिळेल का, याची धास्ती वाटू लागली. सर्व प्रकारच्या विचारधारांना सामावून घेणारा, सर्वांना त्यांचे आवश्यक ते स्वातंत्र्य बहाल करणारा महाराष्ट्र आता राहिलाय का, हा प्रश्न आहे. मराठी केवळ महाराष्ट्रात बोलली जाते किंवा मराठीच्या श्रीमंतीत केवळ महाराष्ट्रानेच भर घातली आहे असे नाही. गोवा राज्य, तसेच कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यातील मराठीबहुल भागांनी आपापल्या परीने साहित्य, संस्कृती यात योगदान दिले आहे.

अशा भव्यदिव्य इतिहासाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची देशपातळीवर आज काय ओळख असावी? तर मंत्र्यांचे, नेत्यांचे, त्यांच्या समर्थकांचे वागणे-बोलणे, त्यांच्याकडून लोकांना मिळणारी वागणूक, त्यांची असहिष्णु विधाने, त्याचबरोबर पक्षापुरता संकुचित विचार, त्यातून निर्माण झालेले अनेक प्रश्न, उद्योग, रोजगार या विषयांच्या बातम्या देशाच्या इतर भागात महाराष्ट्राची नवी ओळख सांगत आहेत.

मराठीभाषिक प्रदेश हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे महात्मा गांधी म्हणत. आता त्याचे रुपांतर आग्यामोहोळात झाले आहे, असे म्हणावे लागते. कार्यकर्ते बेताल वर्तन करू लागले आहेत. दांडगाई करणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे. वात्रट, हिंसक प्रतिक्रिया देणे हे महत्त्वाचे काम झाले आहे. हे सारे कशासाठी, तर आपापल्या नेत्याचे महत्त्व कायम रहावे आणि वचक रहावा म्हणून. पण असा वचक चिरस्थायी असतो?

एकेकाळी महाराष्ट्रामध्ये शासन, प्रशासन यात कमालीची शिस्त होती. लोकांच्या नेमक्या गरजा काय आहेत हे पाहून धोरणे आखली जात. मोफतची संस्कृती नको म्हणूनच तर रोजगार हमी योजना आली व पुढे ती देशाने स्वीकारली. आता तर काम करा अथवा न करा, महिन्याला ठराविक रक्कम बँकेत जमा होईलच अशा योजना आल्या आहेत. जे प्रामाणिकपणे कष्ट करतात, वेळेवर कर देतात, त्यांचा आपण अवमान करतोय ही भावनाही कोणाच्या गावी नाही. पूर्वी लोकानुनय आणि गैरवाजवी मागण्या मान्य करण्याचा आग्रह कोणी धरला तर समोर खडसावणारे मंत्री, मुख्यमंत्री या राज्याने पाहिले. मंत्र्यांचे बेताल वागणे सोडाच. पण, शिस्तीच्या चौकटीबाहेर जाणेही कधी खपवून घेतले गेले नाही.

पूर्वी राज्यमंत्र्यांनाही मंत्रिमंडळ बैठकीत सामावून घेतले जाई. स्व. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा एक राज्यमंत्री मंत्रीमंडळाची बैठक असतानाही आपल्या गावी निघाले. जात असताना गैरहजेरीबद्दलचे कारण नमुद करणारे पत्र मुख्यमंत्री कार्यालयात दिले होते. ते पत्र चव्हाण यांना दाखवले गेले तेव्हा त्यांनी असे सांगितले की, मंत्रीमंडळाच्या बैठकीशिवाय काहीही महत्त्वाचे असू शकत नाही. मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहण्याची विनंती अमान्य करण्यात आली आहे, हा निरोप त्या मंत्रीमहोदयांना तत्काळ कळवा व त्यांना परत बोलवा. तेव्हा थेट रेल्वेगाड्या कमी होत्या. मनमाड, कुर्डुवाडी अशा जंक्शनवर रेल्वेगाडी बदलावी लागे. हे राज्यमंत्री गाडी बदलण्यासाठी जंक्शनवर उतरले तेव्हा रेल्वे पोलिसांनी वायरलेसवर मुंबईहून आलेला संदेश कानावर घातला. तेव्हा त्यांनी परतीची गाडी पकडून मुंबई गाठली.

तेव्हा मंत्रिमंडळ बैठक सुरू झाली की, सभागृहाचे दरवाजे बंद केले जात. उशीरा आलेल्या मंत्र्यांना आल्या पावली परत फिरावे लागे. ही होती शिस्त आणि दरारा. पुढे तर परिस्थिती एवढी बदलली की, अनेकजण बैठक सुरू झाल्यावर बऱ्याच विलंबाने बैठकीसाठी जाताना दिसतील. कोणी कोणाचा वाढदिवस, जिल्हा बँकेची निवडणूक, साखर कारखान्याची निवडणूक असे कारण सांगूनही गैरहजर राहिल्याचे आढळून येईल.

मंत्रीपदाचे गांभीर्य कसे जपले पाहिजे, त्यामागची भावना काय आहे, हाही एक मुद्दा आहे. मंत्री होण्याची हौस असेल, जनसेवा करण्याची इच्छा असेल, तर या पदाचा आबसुद्धा राखला गेला पाहिजे. आपल्या वागण्याने, बोलण्याने या पदाची प्रतिष्ठा कमी होईल, असा विचार केला तरच हे शक्य आहे. मागे एका बैठकीत तत्कालीन मंत्री एसएमआय असीर डुलक्या घेत होते, अशा बातम्या आल्या तेव्हा केवढा गदारोळ माजला होता. अलीकडे मंत्री कशा-कशासाठी बातम्यात येत आहेत, हे पाहिले तर डुलक्या हा फारच सौम्य विषय झाला.

मंत्री होण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. ४३ सदस्यांच्या मंत्रीमंडळात कोणाकोणाला सामावून घ्यावे हा प्रश्न आहे. एका विभागाचे चार-चार विभाग झाले आहेत. पूर्वी एकेका मंत्र्याकडे चार-पाच वजनदार खाती असत. मंत्रीपद मिळविणे हा राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेचा विषय आणि ध्येय झाले आहे. मंत्रीपद मिळविणे एकवेळ सोपे. पण ते टिकविणे तितके सोपे नाही. पण मंत्रीपद गांभीर्याने सांभाळले जाताना दिसत नाही. आपण राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली आहे याचेही भान काहीना दिसत नाही.

आपल्या धोरणांवर, निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना नामोहरम करत रहा, असा अजेंडा सगळ्यांनाच आवडू लागला आहे. आपल्यापुढे मांडले जाणारे विषय बरोबर की चूक हे पाहण्यापेक्षा अडचणीचा विषय कोणी आणला, त्याचा बंदोबस्त कसा करता येईल, यावर भर दिला जात आहे. एकेकाळी अनेक चांगल्या गोष्टींसाठी महाराष्ट्राकडे पाहिले जाई. अनेक कल्पक उपक्रमांची सुरूवात या राज्यात झाली आहे. आता प्रतिष्ठा वाढतेय की कमी होतेय, याचेही भान राहिलेले नाही. लोकजीवनातील अनेक चांगल्या गोष्टींना संरक्षण देणारे, सर्वांना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देणारे, विचारांची मोकळीक जपणारे राज्य संकुचित होऊ लागले आहे. खरे पाहता रसरशीतपणा, जीवंतपणा संपवून विदीर्ण झालेल्या समाजमनावर अधिकार गाजवण्यात कसले शौर्य आहे?

ravikiran1001@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in