

महाराष्ट्रनामा
गिरीश चित्रे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांचे परिणाम नगरपालिका व महानगरपालिकांच्या निकालांवर पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांवर कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा फडकणार, हे नगर पंचायत व नगर परिषदांच्या निकालांनंतर स्पष्ट होईल.
अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. पहिल्या टप्प्यात नगर पंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर नगरपालिका व महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात द्यायची हा संपूर्ण अधिकार मतदार राजाचा. मात्र नगर पंचायत व नगर परिषदेच्या निकालाचा थेट परिणाम आगामी मुंबई महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकवर कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा फडकणार यासाठी नगर पंचायत व नगर परिषदेच्या निकालांकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष असेल.
महाराष्ट्रातील नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. राज्यातील सर्वात महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत. नगर पंचायत व नगर परिषदेच्या निकालानंतर पुढील महानगरपालिका निवडणुकांतील जनमताची दिशा ठरणार आहे. सत्ताधारी भाजप व शिंदेंची शिवसेना या निवडणुकांकडे प्रतिष्ठेची बाब म्हणून पाहत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण आणि अर्धशहरी भागात मजबूत पायाभूत रचना उभी करण्यासाठी व्यापक प्रचार मोहीम हाती घेतली आहे, तर त्यांच्या तुलनेत विरोधक उद्धव ठाकरे यांचे शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांनी ‘महाविकास आघाडी’ म्हणून स्थानिक स्तरावर जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. परंतु नगर पंचायत व नगर परिषदेच्या निवडणुकांचे निकाल सत्ताधारी व महाविकास आघाडीसाठी जनमताचा प्राथमिक अंदाज देतील. जर भाजप–शिंदे गटाला या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले, तर ते मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी निर्णायक मानसिक व राजकीय बळ देणारे ठरणार आहे. परंतु जर विरोधकांनी ग्रामीण व नगर भागात चांगली कामगिरी केली तर मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्ये त्यांना प्रबळ आव्हान उभे करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नगर पंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका महायुती व मविआसाठी पुढील दिशा ठरवणाऱ्या ठरणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता स्थापनेचा बहुमान मिळाल्यानंतर महायुतीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेवर गेली २५ दशके ठाकरे सेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर ठाकरे सेनेचे ४५ हून अधिक माजी नगरसेवक शिंदे सेनेत गेले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे मतविभाजन ही निर्णायक बाब ठरू शकते, तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र राहिली तर त्यांना मुंबईत बहुमताची संधी आहे; पण जर अंतर्गत मतभेद वाढले, तर सत्ताधारी युतीला स्पष्ट फायदा होईल. परंतु नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचे निकाल महाराष्ट्राच्या आगामी महानगरपालिका निवडणुकांचा राजकीय पाया ठरतील. या निकालांनंतर जनमताचा कल स्पष्ट होईल आणि मुंबई महानगरपालिकेत कोणाला बहुमत मिळू शकते याचे आकलन अधिक ठोसपणे करणे शक्य होईल. त्यामुळे येणारे काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक अशा एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. नगर पंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका आधी पार पडणार असल्या तरी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळवणे ही सर्वच राजकीय पक्षांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंकडून ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढवली जाणार आहे. सध्या मुंबईतील राजकीय समीकरणे गुंतागुंतीची आहेत. भाजप, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सत्तेत आहे. भाजप व शिंदे सेना दोन्ही पक्ष महानगरपालिकेत एकत्र लढण्याची शक्यता जास्त आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई, ठाण्यात तितकेसे वर्चस्व नाही. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका, ठाणे, पुणे व नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा पेपर सोडवणे महायुतीसाठी सोपे असले तरी आव्हानात्मक ठरणार आहे, हेही तितकेच खरे.
मुंबईतील राजकीय समीकरणात मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या लहान पक्षांचाही परिणाम काही प्रभागात-विभागात जाणवू शकतो. मनसेने स्वतंत्रपणे किंवा भाजपसोबत हातमिळवणी केली तर मराठी मतांचे विभाजन निश्चित आहे, तर मनसे आणि ठाकरे सेना एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर ठाकरे बंधूंना निवडणुकीत सहानुभूती मिळेल असे वाटत असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई, ठाणेकर अधिक पसंती देतील. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणाला बहुमत मिळेल हे ठरवताना स्थानिक उमेदवारांची प्रतिमा, पक्षाचे संघटन आणि गठबंधनातील एकजूट निर्णायक ठरणार आहे. भाजप-शिंदे युतीसमोर सत्ता मिळवण्याचे आव्हान असणार आहे, तर महाविकास आघाडीला आपली एकता आणि जुनी पकड सिद्ध करावी लागणार आहे. एकूणच मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक महायुती व महाविकास आघाडीसाठी पुढील राजकीय दिशा ठरवणारी ठरणार आहे.
gchitre4@gmail.com