

सह्याद्रीचे वारे
अरविंद भानुशाली
आगामी काळात काँग्रेसला शह द्यायचा असेल, तर भाजप, शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने एकदिलाने, एकोप्याने काम करणे आवश्यक आहे. तसे चित्र आज तरी दिसत नाही.
राज्यात सध्या महायुतीचे सरकार अस्तित्वात आहे. परंतु गेले काही महिने अंतर्गत वाद उफाळून आला आहे. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्यात येत असून मित्रपक्ष महाराष्ट्रात भाजपला शह देतात आणि केंद्रात मात्र गुजगोष्टी करत असतात. शिवसेनेचा दसरा मेळावा व त्यानंतर सुरु असलेले वादविवाद हे आता वाढले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना नेते रामदास कदम, गुलाबराव पाटील, धनगेकर आदींनी भाजपाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निव्वळ भाजप विरोधीच नाही तर कदम यांनी दुसरा मित्रपक्ष राष्ट्रवादी यालाही आव्हान दिले आहे हे पाहता शिवसेना शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंडळींना चाप लावला पाहिजे अन्यथा हे सरकार, ही महायुती फार दिवस चालेल असे दिसत नाही.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा काही अर्थाने उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांना शह देणारा असणे आवश्यक होते. परंतु येथे तर चर्चा शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचीच सुरु होती. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशीच चर्चा जाहीरपणे सुरु होती. रामदास कदम यांनी तर दसरा मेळाव्यातच भाजप या मित्र पक्षावर शरसंधान केले. वास्तविक पाहू गेले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेथे उपस्थित असतांनाही त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणे आवश्यक होते; परंतु ती दिली नाही. त्यामुळे कदम आणि गुलाबराव पाटील यांचे बोलविते धनी शिंदेच आहेत की काय अशी चर्चा रंगू लागली होती. आता तर रामदास कदम यांनी अजितदादा यांच्या मृत्यूबाबत मित्र पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनाच जवळ जवळ आरोपी केले आहे. तटकरे यांना उपमुख्यमंत्री व्हायचे असल्या कारणाने हा अपघात त्यांनी घडवून आणला अशी जाहीर टीका कदम यांनी केली. वास्तविक पाहू गेले तर कदम यांचे चिरंजीव राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यांच्याकडे गृह व महसूल हे महत्वाचे राज्यमंत्रीपद आहे. दुसरे चिरंजीव हे प्रदूषण मंडळाचे प्रमुख आहेत असे असतांनाही रामदास कदम हे विरोधी पक्ष नेत्यासारखे बोलत आहेत. हा नुसता मिठाचा खडा नसून भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि सेना यांच्यात पडणारी उभी फूट आहे.
विधानपरिषद निवडणुकीत तर एकमेकांनी एकमेकांचे उमेदवाराचं पाडले. महायुतीचे पाचही उमेदवार निवडून येणे महत्वाचे होते. परंतु ते अवघे दोनच सदस्य निवडून आले. त्यात एक भाजाप व एक शिवसेना असे होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तर उघडपणे काँग्रेसचा प्रचार करून त्यांचा उमेदवार निवडून आणला. हे एकूण चित्र पाहता महायुतीचे काही खरे नाही अशीच चर्चा उघडपणे सुरु आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या विधानपरिषद निवडणुका त्यानंतर नगरपरिषद, महानगरपालिका व काही जिल्हा परिषदेचा निवडणूक आखाडा झालाय. त्यात महायुतीला यश मिळाले. परंतु ती स्थिती विधानपरिषद निवडणुकीत दिसून आलेली नाही. नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला, तेथे त्यांचा उमेदवार पराभूत व्हावा याची खंत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मात्र भाजपने अमरावतीमधील शिवसेनेची सीट जिंकून आणली. धंगेकर या शिवसेना नेत्याने महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध उघडपणे प्रचार केला. अशा परिस्थिती हे सरकार कसे टिकू शकते ?
दस्तुरखुद्द एकनाथ शिंदेही रागावून कधी मंत्रिमंडळाच्या बैठकीस, सार्वजनिक कार्यक्रमास गैरहजर असतात. जवळचा रास्ता म्हणजे महाबळेश्वर जवळील दरे या गावी तिथे तीन तीन - चार चार दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री राहतात. ते तिथे कोणाशीही संवाद करीत नाहीत. तीच परिस्थिती या युती सरकारमध्ये घडत आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असतांनाच शिंदे हे रुसून बसले होते. आत्ता तर नव्या खेळ्या सुरु झाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादीत एकत्र विलीनीकरण होण्याचे संकेत दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे अशी चर्चाही सुरु झाली आहे. त्याला शह म्हणून की काय देवेन्द्र फडणवीस व उद्धव ठाकरे हे एका स्टेजवर आले होते. त्यात जी जुगलबंदी झाली त्यावरून बरीच चर्चा महाराष्ट्रभर रंगली.
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. तेथेही शह काटशहाचे राजकारण सुरु आहे. तेथे एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्रिमंडळातील बहुसंख्य मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत. काही ठिकाणी मंत्री शेतकऱ्यांच्या बरोबर जेवतांना दिसत आहेत.
एकनाथ शिंदे हे मागील अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळातच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजपला १३७ जागा आणि शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. त्यावेळीही थोडी रस्सीखेच झाली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असतांना एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी निघून गेले होते. ते शेवटच्या क्षणाला आले. यापूर्वी शिंदे हे मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही खळखळ केली नव्हती. परंतु आता तर उघडपणे युतीतील उमेदवाराला पराभूत करण्याचे षडयंत्र मित्रपक्षातील काही मंडळींकडून केले जात आहे.
भाजपामध्ये एकनाथ खडसे हे पॉवरफुल नेते होते. ज्यावेळेला महाराष्ट्रात युतीचे सरकार नव्हते त्यावेळी त्यांनी जळगाव व खान्देश भाजपकडे शाबूत ठेवला होता. जळगावमधील लोकसभेच्या दोन्ही जागा, जिल्हा परिषद, जळगाव महापालिका व सर्व सत्तास्थाने ही भाजपाकडे ठेवली होती. परंतु पक्षविरोधी राजकारण होताच ते बाजूला पडले. आजही खडसेंचे वजन हे खान्देशमध्ये आहे. असे असतांना शिवसेनेचे मात्र तसे नाही. जळगावमध्ये त्यावेळी खडसे विरुद्ध गुलाबराव पाटील असे राजकारण होते. आता भाजपचे गिरीश महाजन विरुद्ध शिवसेनेचे नेते असा सामना रंगत आहे. खान्देशमधे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार हे जिल्हे मोडतात. या पाचही जिल्ह्यात यापूर्वी भाजपाचाच वरचश्माचे होता. परंतु या फुटीमुळे नंदुरबारची व आणखीन एक जागा लोकसभेची पडली . अंतर्गत राजकारण जेव्हा विरोधी होतंय तेव्हा त्या पक्षाला फटका बसतो. मात्र येथे तर उघडपणे एकमेकांच्या विरुद्ध जाहीरपणे मतप्रदर्शन केले जाते. हे महायुती म्हणून योग्य नाही.
एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा चंद्रकांतदादा पाटील सहजपणे म्हणाले आम्ही छातीवर दगड ठेवला आणि शिंदेंना मुख्यमंत्री केले, त्यावर राजकारण किती तापले होते. याची चर्चा त्या काळात खूप झाली. आता तर उघडपणे एकमेकांविरुद्ध प्रचार केला जात आहे. दिल्लीमधील नेत्यांनी त्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. युतीधर्म हा पाळला पाहिजे तो पाळला जात नाही. एकाबाजूला राहुल गांधी विरुद्द टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची हे दुहेरी राजकारण महागात पडल्याशिवाय राहणार नाही. त्याची अनुभूती विधान परिषद निवडणुकीत दिसून आली.
आता डिसेंबर अखेर २४ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूका येऊन थांबल्या आहेत. या निवडणुकीत मित्र पक्षात रस्सीखेच झाली तर त्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो.
देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राजकारण सुरु असतांना महाराष्ट्रात मात्र मोदींना बळ देण्याऐवजी त्यांचे हातपाय कसे कमजोर होतील असे चित्र निर्माण केले जात आहे. मध्यंतरी गोकुळची निवडणूक झाली. भाजपला व महायुतीला त्याचा मोठा फटका बसला. १३ जागा महाविकास आघाडीने व १२ जागा महायुतीने जिंकल्या. आता जरी गोकुळवर महायुतीची सत्ता आली असली तरी न्यायालयात हे प्रकरण टिकू शकत नाही. गोकुळच्या निवडणुकीने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चांगली संधी मिळाली. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा निघाला तो अभूतपूर्व असा होता. याचे भान महायुतीमधील घटक पक्षांना आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता आगामी काळात काँग्रेसला शह द्यायचा असेल तर महायुतीने एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. तसे चित्र आज तरी दिसत नाही.