
सह्याद्रीचे वारे
अरविंद भानुशाली
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. राज्यातील युती सरकारमध्ये अंतर्गत मतभेद आणि राजकीय पेच वाढले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीसह विविध मंत्र्यांच्या भूमिकांमुळे सरकारमध्ये तणाव आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने शरद पवारांवर निशाणा साधल्याने महाविकास आघाडीतही वादावादी झाली आहे.
महाराष्ट्रात युतीचे सरकार असले, तरी त्यामध्येही रुसवे-फुगवे सुरू आहेत, तर विरोधी असलेल्या महाविकास आघाडीमध्ये शिंदे यांच्या सत्कारानंतर शिवसेनेने (उबाठा) शरद पवारांना लक्ष्य केले आहे. आता त्याचे प्रतिध्वनी दोन्हींकडून निघत आहेत.
सत्ताधारी पक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासकीय बैठकांना गैरहजर राहत आहेत. गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्याप मिटलेला नाही, तर इकडे राष्ट्रवादीचे अन्न-नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न अजून तरंगतच राहिला आहे. भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आता धनंजय मुंडे यांची भेट घेतली असून, आपण त्यांचा राजीनामा मागितला नाही, असे म्हणत आहेत. एकूण या सावळ्यागोंधळामुळे या दोन्ही आघाड्यांमध्ये अस्थिरता आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष सक्षम व प्रभावी करण्यास घेतला आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या हजारो सैनिकांसोबत प्रवेश घेतला आहे. उबाठाचे पाच खासदार व चार आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात सामील होणार, अशी आवई उठताच उबाठाचे उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. एकही खासदार फुटला तर डोके फोडीन, असा दम देऊन नाराजी प्रकट केली आहे. तर खासदार सुरक्षित राहावेत म्हणून युवानेते आदित्य ठाकरे यांनी दिल्ली गाठली होती. नुकतीच त्यांनी संजय राऊत यांच्यासमवेत दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन एकही खासदार तुटणार नाही, असे म्हटले असतानाच शिवसेना मंत्री प्रतापराव जाधव व शिंदेपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीमध्ये खासदारांना भोजन ठेवले होते, त्या डिप्लोमसीमध्ये उबाठाचे काही खासदार जाण्यास निघाले असता त्यांना थांबवले गेले. हे सर्व रामायण सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या सत्कारामुळे मविआमध्ये ठिणगी पडली आहे. कालपर्यंत शरद पवार यांच्या ओंजळीने पाणी पिणारे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे. आता तर पवारांना डावलून शिवसेना नेते आदित्य ठाकरे व संजय राऊत हे नवी दिल्लीत राहुल गांधी व आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना भेटून पत्रकार परिषदेत सामील होत असल्याचे दिसते. एकूण हा वाद या पक्षांना कुठे नेऊन ठेवणार आहे, हेच कळत नाही.
सत्ता हे प्रमुख कारण असून, ती नसली तर तळमळ होते. बाजूचा सत्ताधारी पक्षाचा खासदार व आमदार राज्य सरकारकडून निधी घेत आहे, अशावेळी विरोधी असणाऱ्या खासदार- आमदारांमध्ये निधी नसल्याने अस्वस्थता असणे साहजिकच आहे आणि त्याचाच परिणाम सत्ताधाऱ्यांमध्ये इनकमिंग सुरू आहे. आता तर महायुतीमध्ये आता बाहेरच्यांना घेण्यास जागा नाही, एवढे संख्याबळ आहे. राज्यात आता काही निवडणुका नसतानाही इनकमिंग सुरू आहे. हे कशाचे लक्षण!
सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा सुपडासाफ झाला. आता त्यानंतर आठ महिन्यांनी प्रदेश नेतृत्वात बदल करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख, बंटी पाटील हे सर्व प्रदेशाध्यक्षपदासाठी मुंडावळ्या बांधून तयार असताना राहुल गांधींनी अचानकपणे हर्षवर्धन सपकाळ हा नवा चेहरा पुढे आणला आहे. जनतेने नाकारलेले पृथ्वीबाबा, बाळासाहेब थोरात या सर्वांना डच्चू देऊन नाना पटोले यांचीही विकेट घेतली. नवा चेहरा आणून काँग्रेस पक्ष जिवंत करण्याचा प्रयत्न वरिष्ठांनी चालविला असला, तरी महाराष्ट्रातील हे दिग्गज नेते नव्या प्रदेशाध्यक्षांच्या, सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, अशी शक्यता दिसत नाही.
राज्यात सध्या भाजपचा एक खांबी तंबू काम करीत असून, पक्ष सदस्य नोंदणीमध्ये आघाडीवर आहे. राजकारणात कोण कोणाचा मित्र व कोण कोणाचा शत्रू हा कायमचा नसतो. हे जरी सत्य असले, तरी सध्या जे चालले आहे, त्याचा लोकांना तिटकारा आला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी अधिकाऱ्यांच्या नाड्या आवळल्या आहेत. मंत्र्यांकडे कोण पीए असावेत, हे आता मुख्यमंत्री ठरवणार आहेत. मंत्र्यांपेक्षा हे स्वीय सहाय्यक भ्रष्टाचारात अग्रेसर असतात, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या नियुक्त्यांना चाप लावला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षं या मंत्र्यांकडून त्या मंत्र्यांकडे जाणारे-येणारे पीए अस्वस्थ झाले आहेत, यात शंका नाही.
आता एक निश्चित की, सरकार कधी पडणार अशी चर्चा कुठेही होत नाही. तीन पक्षांचे प्रचंड बहुमत असले तरी भाजप हा स्वबळावर सरकार चालवू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अथवा राज्यातील इतर अधिकारी हे सरकार टिकेल का? अशी चर्चा करताना दिसत नाहीत; मात्र एक निश्चित की, पदांच्या वाटण्यांवरून वादळ उठले. आपत्ती व्यवस्थापन हे फार काही मोठे पद नव्हते. परंतु त्यामध्ये शिंदे यांचे नाव न आल्याने ते रुसून बसले. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना त्यांनी दांड्या मारल्या. अखेर आपत्ती व्यवस्थापनामध्ये शिंदे यांचे नाव येताच ते पूर्ववत झाले. हे सर्व पाहिल्यानंतर बाबू-बाळूच्या खेळासारखे झाल्याचे चित्र महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. मुख्यमंत्री हे सर्वच खात्याचे प्रमुख असतात. त्याप्रमाणे त्यांनी नगरविकास विभागाची बैठक घेतली म्हणून त्या खात्याचे मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस बैठकीला आलेच नाहीत. त्यावरून अंतर्गत रणकंद झाले, हे योग्य नव्हते.
एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांनी सत्कार केल्यानंतर उबाठाची जी तडफड झाली त्याला सीमाच नव्हती. यासंदर्भात बोलताना खा. संजय राऊत म्हणाले, 'मराठी साहित्य संमेलन ही राजकीय दलाली आहे.' यापूर्वी विधानसभेचा हक्कभंग करताना अशाच पद्धतीची भाषा राऊत यांनी वापरली होती. शब्द हे शस्त्र आहेत, याचे भान राऊत यांना नाही. साहित्य संमेलनासंदर्भात जे भाष्य केले आहे, त्याच्या प्रतिक्रिया साहित्य संमेलनात उमटणार यात शंका नाही. नवी दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन होणार असून, त्याचे स्वागताध्यक्ष शरद पवार हे आहेत. अशावेळी खा. संजय राऊत यांनी जे शब्द वापरले आहेत ते कितपत योग्य आहेत? मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेचे कला मंदिर आहे. त्यावर टीका करताना आपली योग्यता तपासणे आवश्यक आहे. ती न तपासता वारेमाप तोंडात येईल तसे बोलणे हे योग्य नाही. साहित्य संमेलन म्हटले की, सर्वच पक्षाचे नेते त्यामध्ये असतात. हे काही आजचे नाही. साहित्य संमेलन ही मराठी माणसाची अस्मिता आहे, याचे भानही राऊत यांना नसावे ही शोकांतिका म्हटली पाहिजे. आता नवी दिल्लील साहित्य संमेलन होत असून, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दस्तुरखुर्द शरद पवार यांनी निमंत्रित केले आहे. तीच खरी पोटदुखी खासदार संजय राऊत यांना असावी.
ज्येष्ठ पत्रकार