सरकार सुस्त, विरोधक निष्प्रभ

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधी पक्षाची अवस्था दयनीय झाली असून विरोधकांच्या तिन्ही पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. सत्ताधारी जनादेशाला हरताळ फासत आहेत, तर विरोधक निष्प्रभ ठरत आहेत.
सरकार सुस्त, विरोधक निष्प्रभ
सरकार सुस्त, विरोधक निष्प्रभ'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी व विरोधी पक्षाची अवस्था दयनीय झाली असून विरोधकांच्या तिन्ही पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. सत्ताधारी जनादेशाला हरताळ फासत आहेत, तर विरोधक निष्प्रभ ठरत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी विधिमंडळ कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार स्वीकारला, तर राष्ट्रवादी श.प.च्या आमदारांची बैठकही त्याच कार्यालयात घेतल्याने उबाठाच्या संजय राऊत यांचा तीळपापड झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी श.प. भाजपमध्ये विलीन होण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी श.प.चे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगण्यात येते. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी श.प.चे ५-६ खासदार अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. या फाटाफुटीच्या प्रसंगामुळे आता उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. सहा खासदारांच्या मतदारसंघात त्यांनी स्वतः जाऊन जाहीर सभा घेतल्या. तसेच, उबाठाचे आमदार फुटू नयेत यासाठी ते आता वारंवार मातोश्रीवर आमदारांच्या जोरबैठका घेत आहेत.

सन २०२४ च्या विधानसभा निवडणुका होताना भाजपने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता राज्यात सरकार येऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. अशावेळी शेतकरी कर्जमाफीची अखेर घोषणा झाली. ३० जून २०२६ ही अंतिम डेडलाइन दिली होती; परंतु आता जून महिना संपला. आता शेतकऱ्यांनी आयकर भरला आहे अशांना कर्जमाफी देता येणार आहे की नाही यासाठी केंद्राचे मत मागितले आहे. वास्तविक पाहिले तर कर्जमाफीची घोषणा करतानाच याबाबतची माहिती घेणे आवश्यक होते. प्रत्यक्षात ते झाले नाही. आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही संपले. किमान डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनात तरी ही कर्जमाफी सरकार देणार का? कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतात हे यापूर्वी सिद्ध झाले आहे. निवडणुकीत शेतकऱ्यांचे मत मिळावे यासाठी अशा घोषणा केल्या जातात. ज्यावेळी कर्जमाफी द्यायची असते त्यावेळी राज्यावर ४२ ते ४५ हजार कोटींचा बोजा पडणार हे निश्चित झाल्याने आता सरकारची बोबडी वळली आहे. हे झाले सत्ताधारी पक्षाचे. विरोधक तर या प्रश्नावर निष्प्रभ झाल्याचे दिसून आले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे नुकतेच संपले. यामध्ये विरोधक व सत्ताधारी यांच्या कामाची तुलना पाहिल्यास सर्वत्र आनंदी आनंद होता. विरोधक फारसे आक्रमक नाहीत, तर सत्ताधारी मंत्रीच सभागृहात हजर नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊनही सत्ताधारी मंत्री व आमदार सभागृहात उपस्थित नसल्याचे दृश्य शेवटच्या दिवसापर्यंत दिसून आले. ही राजकीय परिस्थिती पाहता राज्याचे काय भले होणार आहे, असा प्रश्न पडतो.

सध्या बंडखोरीला राजाश्रय मिळू लागला आहे. नागरिकांमध्ये याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. सन २०२२ मध्ये शिवसेना उभी फुटली. होते नव्हते ते उद्धव ठाकरे यांच्या हातून गेले. नुकताच सहा खासदारांनी बंड करून शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर उबाठाचे आमदार व मुंबई महानगरपालिका तसेच इतर महापालिकेतील नगरसेवक मोठ्या प्रमाणात फुटणार अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेने उबाठामध्ये एकच खळबळ उडाली. यामध्ये दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी या सहा लोकसभा मतदारसंघांत जाऊन त्या खासदारांच्या विरोधात जाहीर सभा घेतल्या. उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर या खासदारांना अर्वाच्च भाषेत शिव्याही दिल्या. त्यामुळे फायदा हा बंडखोर खासदारांचाच झाला. हे खासदार मतदारसंघात गेले तेव्हा काही प्रमाणात विरोध झाला; परंतु अनेक मतदारसंघांत त्यांचे स्वागतही करण्यात आले. उद्धव ठाकरे यांचा ईशान्य मुंबई दौरा सुरू असताना बंडखोर खासदार संजय पाटील यांच्या स्वागताचे बॅनर लागल्याचे दिसून आले.

सन २०२२ मध्ये शिवसेना उभी फुटल्यानंतर जसा ढिम्मपणा उबाठामध्ये दिसला तसा तो यावेळी दिसला नाही. किमान उद्धव ठाकरे यांनी मुंबई, मराठवाड्यात या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात सभा घेतल्या. हे काम त्यांना २०२२ मध्ये ४० ते ५० आमदार फुटून गेल्यानंतर करता आले नव्हते. शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना स्थापन केली, ती शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातून निसटली. प्रबोधनकारांनी ठेवलेले शिवसेना हे नाव व बाळासाहेबांनी धनुष्यबाण ही निशाणी घेऊन निवडणुका लढवल्या हे सर्व एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. आता सर्वोच्च न्यायालयात गेली चार वर्षे तारीख पे तारीख हे सुरू आहे. वास्तविक पाहू गेले तर उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांना त्याकाळात शिवसेनेची वज्रमूठ बांधता आली नाही हे कटू सत्य आहे. ज्या पद्धतीत त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन घरी बसावे लागले तो काळ अत्यंत वाईट होता. पुढे एकनाथ शिंदे २०२४ पर्यंत मुख्यमंत्री झाले. आता त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. सध्या महाराष्ट्रात वादविवाद मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन केली. त्या दिवसापासून शिवसेनेचे हिंदुत्व गहाण पडले होते. आता दानपेटी चोरीचा मुद्दा पुढे करून हिंदुत्वाचे कार्ड पुढे रेटण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी चालवला आहे. त्यात त्यांना फारसे यश मिळेल असे चित्र दिसत नाही.

हे बघा ना, उबाठामध्ये बंडखोरीची शक्यता अजून दिसत असताना दुसऱ्या बाजूला शरद पवारांची राष्ट्रवादीही त्याच भोवऱ्यात अडकली असल्याचे चित्र दिसून येत आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार अशी चर्चा गेले आठवडाभर सुरू होती. त्यापूर्वी राष्ट्रवादी श.प. ही काँग्रेसमध्ये विलीन होणार अशीही चर्चा होती. हे सर्व विरोधी पक्षाच्या बाबतीतच का घडते, हा प्रश्न आहे. भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांचे दिल्ली, बिहारमधील राजकारणामुळे वजन वाढले आहे. त्यांची भेट श.प. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतल्याने ते एनडीएबरोबर जाणार, बोलणी अंतिम टप्प्यामध्ये झाली आहेत. इथपर्यंत झाले होते. याला भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींनी विरोध दर्शवला. कारणही तसेच होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत होते. त्यांनी आता चौथा भिडू घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी श.प. एनडीएबरोबर जाणार नाही, असे पत्रकार परिषदेत म्हटले. एकूण हा सर्व गोंधळ दोनच विरोधी पक्षांत सुरू होता व आहे. त्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मिठाचा खडा टाकला. राष्ट्रवादीचे ५-६ खासदार अस्वस्थ असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. एकूण हे राजकारण मुंबईमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना या फुटीच्या राजकारणावर चर्चा सुरू होती. त्यात आणखी भर पडली ती शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात दिलेली भेट व आपल्या आमदारांसह घेतलेली बैठक यावर उबाठामधून तीव्र प्रतिक्रिया आली. श.प. राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. त्यांनी गद्दारांचा सत्कार स्वीकारणे योग्य नव्हते. यावर उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून सारवासारव करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची संस्कृती, पाहुणे आपल्या घरी आल्यानंतर ठेवली जाते. त्या दृष्टीनेच शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्यानेच त्यांना शाल व पुष्पगुच्छ देणे ही आमची संस्कृती आहे. मात्र याचा दुरुपयोग उबाठाने केला असल्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकूण हे सर्व राजकारण व विधिमंडळ अधिवेशन पाहता निव्वळ करमणूक झाली असेच म्हणावे लागेल. यापूर्वी विरोधी पक्ष नगण्य होते. परंतु असे काही चेहरे होते की सरकारला ते खिंडीत पकडायचे. ते चित्र या अधिवेशनात कुठेही दिसले नाही. विरोधी पक्षाच्या बाकड्यावरून काँग्रेसचे नाना पटोले, विजय वड्डेट्टीवर व उबाठाचे भास्कर जाधव हेच तेवढे आक्रमक दिसले. मात्र त्यांनी सरकारकडून प्रश्न सोडवून घेतले नाही हे निश्चित.

logo
marathi.freepressjournal.in