मुलुख मैदान
रविकिरण देशमुख
राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची आणि पवार कुटुंबातील संबंध सुधारण्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस महाविकास आघाडीत राहून स्वतंत्रपणे मुंबई महापालिका लढण्याचा विचार करते आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेसला युतीत अडचण होऊ शकते. व्यवहारवादी राजकारण, सत्ता, जागावाटप आणि पक्षांचे स्वतंत्र अस्तित्व यांसारख्या मुद्द्यांवर सर्व पक्षांची भूमिका ठरवणे गरजेचे आहे. काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांच्यातील समीकरणं गुंतागुंतीची झाली आहेत.
एका बाजूला उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार का, शिवसेना आणि मनसे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र आलेले दिसणार का याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पुतणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार का यावर चर्वितचर्वण घडत आहे. तिकडे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर न पडता स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो का, यावर चर्चा करत आहे.
राज्यापुढचे सारे महत्त्वाचे प्रश्न जणू विरोधकांची एकी होणार का, यापुढे गौण ठरू लागले आहेत. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार साखर संकुल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे भेटले की बातम्या सुरू होतात. इकडे ठाकरे परिवारापैकी कोणी मंद स्मित केले तरी त्यावर चर्चा सुरू होते अन मध्येच कोणी सैनिक ठाकरे बंधूनी एकत्र यावे याबाबत आशावाद व्यक्त करतो. ते एकत्र येण्याची चर्चा सुरू होताच काँग्रेस कान टवकारते आणि आपण काय भूमिका घ्यावी यावर दिल्लीकडे कटाक्ष टाकते, असे सुरू आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अलीकडेच मातोश्रीवर जाऊन आले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बरेच दिवस ते मातोश्रीकडे फिरकत नव्हते तेव्हा दिल्लीहून काही सूचना असाव्यात असे वाटत होते. ते भेटले तेव्हा काँग्रेस नेते शिवसेनेपासून दूर राहू इच्छित नाहीत, हे स्पष्ट झाले. आता तर या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले आहेत की, काँग्रेस महाविकास आघाडीसोबत राहू इच्छिते. त्याचवेळी काँग्रेस याचीही चाचपणी करतेय की आपण मविआच्या बाहेर न पडता स्वतंत्रपणे मुंबई महापालिका लढू. म्हणजे यात दोन हेतू आहेत.
एक – स्वतंत्रपणे लढल्यास अनेक कार्यकर्त्यांना उमेदवार म्हणून संधी मिळते आणि स्थानिक नेत्यांची स्वतःची मतपेढी यावेळी कामाला येते. जे आपापल्या वार्डात प्रभावी ठरतील ते निवडून येतील. दोन - सत्तेसाठी गरज भासलीच तर मविआचा घटक म्हणून शिवसेनेसोबत सत्तेत बसायला अडचण येणार नाही. पण दोन्ही ठाकरे एकत्र आलेच तर मात्र काँग्रेस त्यांच्या सोबत युती करायला बिचकत आहे. याचे कारण जागा वाटपात फारसे काही हाती लागणार नाहीच, शिवाय बिहारच्या निवडणुकीत मुंबईतल्या शिवसेना-मनसेसोबत गेल्याचे काय पडसाद उमटतात व त्याचे इतर पक्ष काय भांडवल करतात याचाही विचार होत असेल.
बिहारमध्ये काँग्रेस राष्ट्रीय जनता दलासोबत युती करणार. पण त्याचवेळी मुंबईत शिवसेना-मनसेसोबत राहिल्यास लालूप्रसाद यादव आणि त्यांचे चिंरजीव तेजस्वी बहुदा ते पसंत करणार नाहीत. हे झाले दूरचे. पण मुंबई काँग्रेसमध्ये तर घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांची तोंडे अनेक दिशांना आहेत. असो.
ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी अनेक शिवसैनिकांची इच्छा दिसते. राजकारणात आता तत्त्वापेक्षा व्यवहाराला महत्त्व आले आहे. ठाकरेंच्या सैनिकांना आपल्याला सत्ता कधी मिळेल याची चिंता सतावू लागली आहे. आताच्या राजकारणात केवळ तात्त्विकतेवर पोट भरत नाही. राजकारणाची गाडी सुसाट पळविण्यासाठी इंधन लागते. त्यासाठी सत्ता लागते. कारण पदरमोड करून राजकारण किती काळ करणार हा प्रश्न असतो. त्यासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले तर जिवंत राहू, अन्यथा आहे तिथेच संपून जावे लागेल, असा विचार दोन्ही सेनेच्या सैनिकांमध्ये येत असेल तो चुकीचा आहे, असे म्हणता येत नाही.
केवळ दोन ठाकरे एकत्र येऊन प्रश्न सुटत नाही. दोन पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची ही युती असेल. ती करताना दोन्ही पक्षांचे अस्तित्व कायम ठेवून ती होईल. जागावाटप हा ही कळीचा मुद्दा असेल. याही पेक्षा काय महत्त्वाचे असेल तर दोन्ही पक्षांच्या विविध विषयांवरील भूमिका एकामेकांना मान्य व्हायला हव्यात आणि सत्ता मिळाली, तर निर्णयप्रक्रियेत दोघांनाही तुल्यबळ स्थान हवे असणारच. २०१७ साली शिवसेनेने चुरशीच्या लढतीत भाजपाला बाजूला ठेवून सत्ता मिळवली खरी. पण मनसेचे नगरसेवक फोडल्यामुळे काहीशी कटुता निर्माण झाली होती. मनसेचे स्वतंत्र अस्तित्व शिवसेनेला मान्य करावे लागेल आणि भविष्यात अशा गोष्टींपासून दूर रहावे लागेल, हे मान्य झाले, तर कदाचित राज ठाकरे टाळी देतील, असा रागरंग आहे.
दोन ठाकरे एकत्र येऊ नये, अशीच महायुतीची इच्छा असणार यात शंका नाही. एकनाथ शिंदे यांचे काही विश्वासू लोक शिवतीर्थवर जात आहेत ते यासाठीच. दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबईतली ठाकरे व्होटबँक स्वतंत्र अस्तित्व दाखवणारच. तिथे शिंदेंच्या सेनेची डाळ बहुदा शिजणार नाही. म्हणून काहीतरी घडामोडी होणारच होणार.
राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीयदृष्ट्या अत्यंत व्यवहारवादी लोकांचा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये आपली कुचंबणा होतेय हे लक्षात आल्यावर शरद पवार यांनी बाहेर पडत हा पक्ष स्थापन केला आणि पहिल्याच निवडणुकीत आपल्या समर्थकांना सत्तेत स्थान दिले. ते एकत्रित काँग्रेसमध्ये असताना शक्य नव्हते. सहकार, सिंचन, शेतमाल विक्री व्यवस्थापन यात पारंगत असलेल्या लोकांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या तिन्ही विषयांत या पक्षाचे लोक राजकारण करत आपापले सवते सुभे सांभाळण्याचा अटोकाट प्रयत्न करतात.
राजकीय तत्त्वज्ञानापेक्षा आपले समर्थक सोबत राहिले, ते निवडून आले तर आपले राजकारण टिकेल या हिशेबाने पवारांनी उक्ती आणि कृती यात चाणाक्षपणे अतंर राखत राजकारण केले. त्यांच्यापासून लोक दूर गेले तरी ते त्यांच्या राजकीय गरजांपोटी जातात आणि जेव्हा राजकारण बदलते तेव्हा ते सहजच एकत्र येतात. त्यांच्या राजकारणात भावनिकतेला स्थान नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फरक आहे हे हाच. पण शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा बातम्या सुरू झाल्या की शिवसेनेचे काही नेते बेफाट प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात.
पवारांचे राजकारण त्यांना समजत नाही, अशातला भाग नाही. पण मग बेफाट बोलून काय साध्य होते आणि त्यात सेनेचे काय भले होते, ते त्यांनाच ठाऊक. प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींचा चाणाक्षपणे वेध घेत असताना जिथे समोरचा चुकला तिथे डाव साधला, ही पवारांच्या राजकारणाची निती राहिलेली आहे. आता कन्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष काम करतो आहे. त्यांना व इतर सहकाऱ्यांना राजकारणात टिकून राहण्यासाठी जे- जे करता येईल ते पवार करत असतात. म्हणूनच त्यांनी आपण पक्षाच्या राजकीय निर्णयप्रक्रियेत नसल्याची सूचक विधाने केली आहेत. हे पटत नसेल तर शिवसेनेने ते लोकांसमोर तेवढ्याच चाणाक्षपणे आणत सध्याची जनभावना पाहता आपला काही फायदा होईल का, हे पाहिले पाहिजे. पण या पक्षात विचारप्रक्रिया, राजकीय व्यूहरचना यापेक्षा ‘आवाज कुणाचा’ यावरच भर असतो. या घोषणेला प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या वरचेवर घटत असताना, रोज एकेकजण शिंदेंच्या सेनेत जात असताना काही वेगळा विचार झाला तर ठीक; अन्यथा पुढचा काळ आणखीच आव्हानात्मक असणार आहे.
ravikiran1001@gmail.com