

सह्याद्रीचे वारे
अरविंद भानुशाली
खासगी फायनान्स कंपन्यांनी पाळलेल्या गुंडांकडून जो लोकांचा छळ चालवला जातो त्याला शब्द नाहीत. कुटुंबे बेचिराख होत आहेत. गृह विभागाने फायनान्स कंपन्यांच्या पाठीवर आसूड ओढण्याऐवजी त्यांना मोकळीक दिली आहे.
महाराष्ट्रात सध्या २४१ सावकारी फायनान्स कंपन्यांनी धुडगूस घातला असून गेली दोन-तीन वर्षे मुंबई-पुणे इत्यादी शहरातही २११ कंपन्यांनी दादागिरी चालवली आहे. अनेक ठिकाणी या जाचाला कंटाळून आत्महत्येचे प्रकार झाले आहेत. काहींनी आपला व्यवसाय, कंपन्या बंद केल्या आहेत. या कंपन्यांची वसुलीची पद्धत 'पठाणी' असून कर्जदारास उचलून नेत आहेत. कर्जदारांना उचलून नेल्यानंतर त्यांच्या घरातील बायका-मुलांना अर्वाच्च भाषा वापरून त्रास देतात. राज्य सरकारकडून याला आळा घातला जात नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
या कंपन्यांकडून कर्ज घ्यावे म्हणून प्रारंभी पायघड्या घातल्या जातात. आर्थिक अडचणीत आलेली व्यक्ती त्याला बळी पडते. फायनान्स कंपन्यांच्या नावावर खासगी सावकारी करणारी मंडळीही या धंद्यात पुढे आली आहेत. प्रारंभी १९% पुढे २९% व्याज आकारले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे एक लाख रुपये कर्ज घेतले असल्यास ते कर्ज फेडले जात असतानाही त्या व्यक्तीकडे एक लाख रुपये येणे दाखवले जाते. कर्ज देताना कागदोपत्री दाखविले जाते. मात्र वसुली केल्यानंतर त्याची एक रुपयाचीही पावती दिली जात नाही. या कंपन्यांनी गुंड ठेवले असून कर्ज घेणाऱ्या कुटुंबांना हैराण करीत आहेत. शिवीगाळ एवढी बीभत्स करतात की, कर्जदारांना सांगतात 'तुझ्या बायकोला उचलून नेईन, तुझ्या मुलीला उचलून नेईन'.
पालघरमधील एका व्यावसायिकाने कॉपर वायर व्यवसायात मंदी आल्याने या फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले. पुढे ते हळूहळू फेडले, पण..या फायनान्स कंपनीने दिलेले पैसे नाकबूल करून ती कंपनी ताब्यात घेतली आहे. त्या व्यावसायिकाने खूप संघर्ष केला. परंतु त्या गुंडांपुढे त्याचे काही चालू शकले नाही. त्याच्याकडे असलेल्या मोटारी, स्कूटर या कंपन्यांनी जप्त केल्या. आता हा एकेकाळी कोट्याधीश असलेला मालक त्याने उभारलेल्या कंपनीत नोकर म्हणून काम करतो. या कंपनीच्या गुंडांनी सारखे धमक्यांचे फोन करून त्याची बायकाे व मुलांना हैराण करून सोडले. अशी शंभर उदाहरणे सापडतील.
जुहूमधील एका व्यावसायिकाने वसईमध्ये फॅक्टरी टाकली. आर्थिक अडचणीत आल्याने त्याने फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले. पुढे पैशाचे हप्ते देत असतानाही गुंड पाठवून त्याच्या मुलाला उचलून नेले. जवळजवळ आठ दिवस त्याच्या मुलाला डांबून ठेवले. त्या काळात त्याच्या वडिलांना, आईला, बायकोला फोन करून भयानक त्रास देण्यात आला. पुढे या बापाने तेरा लाख रुपये भरल्यानंतर त्या मुलाला सोडले. पुढे घेतलेले कर्ज संपले असतानाही त्या कुटुंबाकडे ३५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. शेवटी त्याच्या बापालाही उचलून नेले. हा प्रकार कानी आल्याने तो मुलगा गाडीतून घरी येत असताना वयाच्या ३५ व्या वर्षी हार्ट अटॅकने एका हॉटेलबाहेर त्याचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत असताना बापाचाही झोपेतच मृत्यू झाला. आता त्या कुटुंबाचे होते नव्हते तेवढे गेले. फक्त त्या मुलाची आई, बायको आणि लहान मुलगा राहिले आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पोलिसांकडे जाऊनही त्याचा काही उपयोग होत नाही. याचे कारण म्हणजे प्रारंभिक कर्ज देताना जे कागदपत्र बनविले जातात तेच बोगस असतात. परंतु कायदेशीरदृष्ट्या २९ टक्के व्याजाचे कागद खरे ठरले.
आता या फायनान्स कंपनीचे जाळे गेली दोन-चार वर्षे ग्रामीण भागातही पोहचले आहे. हा व्यवसाय करणारी मंडळी विशिष्ट जाती व धर्माची आहेत. सध्या शेतकऱ्यांपुढे सरकारी कर्जापेक्षा या फायनान्स कंपन्यांनी आपले जाळे बऱ्याच ठिकाणी टाकले आहे. नुकताच एका शेतकऱ्याला उचलून नेल्यानंतर त्याचा या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृत्यू झाला. बोंबाबोंब झाली, लोक रस्त्यावर आले, परंतु या फायनान्स कंपनीला काही झाले नाही. या बोगस फायनान्स कंपनीचे जाळे एवढे प्रचंड आहे की पोलीस यंत्रणा काही करू शकली नाही. करीतही नाही. मग दाद कुणाकडे मागायची. हा प्रश्न राज्यातील अनेक कर्जदारांना पडला आहे. आम्ही घेतलेले पैसे फेडले असतानाही अनेक कंपन्या त्याचा हिशोब दाखवीत नाहीत. महाराष्ट्रात हा प्रकार गेली चार-पाच वर्षे अव्याहत सुरू आहे.
खरं पाहू गेल्यास सरकारचे हात मजबूत आहेत. पण कारवाई होऊ शकत नाही. या आठवड्यात तीन शेतकऱ्यांनी या फायनान्स कंपनीच्या दादागिरीमुळे आत्महत्या केली आहे. परंतु या प्रकरणी एकालाही अटक केलेली नाही. नुसते हवेत कागदी बाण उडवून ही दादागिरी थांबणार नाही. उलट त्यांना आधार मिळत आहे.
गेल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील एका खेड्यात असाच प्रकार झाला. या कंपन्यांनी शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब वेठीस धरले होते. वास्तविक उपलब्ध कायद्यांखाली या फायनान्स कंपन्यांवर छापे टाकून बंदी आणता येते. अनधिकृतपणे हे जाळे एवढे मोठे वाढले आहे की, अनेक कुटुंबांची अब्रू रस्त्यावर आली आहे. नुकताच मायक्रो फायनान्स कंपनीच्या विरोधात गावकरी रस्त्यावर उतरले होते. तेथील एका शेतकऱ्याचा या फायनान्स कंपनीच्या धाकाने मृत्यू झाला. दोन-चार दिवस वातावरण गरम झाले. पुढे ये रे माझ्या मागल्या. अडचण आली म्हणून लोक तात्पुरते कर्ज घेतात. मात्र त्यानंतर या फायनान्स कंपन्यांनी पाळलेल्या गुंडांकडून जो लोकांचा छळ चालवला जातो त्याला शब्द नाहीत. कुटुंबे बेचिराख होत आहेत. गृह विभागाने फायनान्स कंपन्यांच्या पाठीवर आसूड ओढण्याऐवजी त्यांना मोकळीक दिली आहे. कर्ज घेताना बनवली जाणारी मूळ कागदपत्रे महाभयानक असतात. अडचणीत असलेली व्यक्ती कर्ज घेऊन स्टॅम्प पेपरवर सह्या करून मोकळी होते. त्या कागदांचा गैरफायदा घेत या कंपन्या लोकांना लुटत आहेत. पोलीस यंत्रणा व या कंपन्यांचे साटेलोटे असल्याचे पुढे आले आहे. कर्जदार शेतकऱ्याला तो आजारी असल्याने दवाखान्यात दाखल असेल तरी त्याचा छळ केला जातो.
यापूर्वी गोरगरीब शेतकरी आपल्या कुटुंबाची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सावकारी कर्ज काढायचा. आता सावकारांची जागा फायनान्स कंपन्यांनी घेतली. व्याजाचे दर किती, त्याची कमाल मर्यादा किती, याकडे कोणाचेही लक्ष नाही व नियंत्रण नाही. दोन लाख कर्ज घेताना बळजबरीने त्याच्यावर एखादी इन्शुरन्स पॉलिसी लादली जाते, त्याचे व्याजदर भयानक असतात, त्याला काही परिसीमा नाही की कोणाचे नियंत्रण नाही. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला एखादा एजंट लुटतो. त्याचे कमिशन वेगळे. चक्रवाढ पद्धतीने व्याज लावतात व दंडासह पुढील हप्त्याची वसुली केली जाते. हे काळजीपूर्वक पाहिल्यास अत्यंत भयानक आहे. राष्ट्रीयकृत बँक किंवा सहकारी बँका एखाद्या व्यक्तीला कर्ज देताना त्याचे सिबिल तपासतात, त्यानुसार किंवा त्याचे वेतन मर्यादा तपासून मगच कर्ज देतात. अन्यथा प्रस्ताव फेटाळतात, परंतु या कंपन्या कुठलीही अट न ठेवता कर्ज देतात. त्यामुळे सामान्य कर्जदार त्यांच्याकडे वळतो हे सत्य आहे.