मत आमचेही
ॲड. श्रीनिवास बिक्कड
महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनाचा पाया संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या शिकवणुकीवर आधारित आहे. काही स्वार्थी घटक आणि तथाकथित कीर्तनकार राजकीय फायद्यासाठी याच परंपरेचा गैरवापर करत आहेत. ते समाजात द्वेष पसरवून महाराष्ट्राच्या मूळ संस्कृतीवर घाव घालत आहेत.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान खूप मोठे आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम अशा संतांनी घडवलेली ही परंपरा केवळ भक्तीमार्ग नसून, समानता आणि बंधुभावाचे सामाजिक आंदोलन आहे. वारकरी संप्रदायाने जातीभेद, लिंगभेद, पंथभेद बाजूला सारून सर्वसामान्यांमध्ये आध्यात्मिक लोकशाही रुजवली. संतपरंपरेचा हाच वारसा महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. पण दुर्दैवाने, राजकीय फायद्यासाठी याच आत्म्यावर घाव घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि वारकरी संप्रदायात घुसलेल्या त्यांच्या हस्तकांकडून सुरू आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी वेदांत, नाथपंथ आणि वैष्णव भक्तीचा समन्वय साधून भक्तीला विचारशीलतेची आणि समतेची जोड दिली. तुकाराम महाराजांनी प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधत चारित्र्याला जीवनाचे मूल्य मानले. एकनाथ महाराजांनी अस्पृश्यतेला विरोध करून सामाजिक सलोखा वाढवला. गोरा कुंभार, सावता माळी, सेना, चोखामेळा, जनाबाई यांनी आपलं रोजचं श्रमशील जीवन सांभाळून भक्ती करता येते हे दाखवून दिले. या सर्व महान संतांनी “जन्मावर नव्हे, तर चारित्र्यावर माणसाचे मोठेपण ठरते,” ही शिकवण दिली. वारीच्या सोहळ्यात कोणताही जातीभेद किंवा धर्मभेद नसतो; सर्वजण एकत्र चालतात, राहतात आणि जेवतात. म्हणूनच वारकरी परंपरेने समाजाला प्रेम, बंधुभाव आणि नैतिकतेची शिकवण दिली.
वारकरी संतांनी विद्वत्तेचा बोजा न टाकता जनभाषेला प्रतिष्ठा दिली. संस्कृत न समजणाऱ्या जनतेसाठी त्यांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा असे ग्रंथ रचले. अभंग, ओव्या, भारुडे, कीर्तन या माध्यमांतून त्यांनी अध्यात्मासोबतच लोकशिक्षणही दिले. “विठ्ठल हा सर्वांचा आहे; देव कोणाच्या मक्तेदारीत नाही,” ही आपल्या संतांची शिकवण आहे. यामुळेच वारकरी परंपरा सामाजिक सलोख्याचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पाया ठरली. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे कार्यही याच पायावर आधारलेले आहे. त्यांनी हीच समतेची शिकवण पुढे नेली. भारतीय संविधानही याच पायावर उभे आहे.
पण दुर्दैवाने, याच वारकरी परंपरेचा काही विकृत वापर आज होताना दिसतो. काही तथाकथित कीर्तनकार संप्रदायाच्या नावाखाली राजकीय पक्षांची सुपारी घेतात आणि समाजात द्वेष पसरवतात. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवानंतर ‘लव्ह जिहाद’सारख्या मुद्द्यांचा वापर करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. उत्तर भारतातून बागेश्वर बाबा, प्रदीप मिश्रा यांच्यासारख्या ‘बाबा-बुवांना’ आणून त्यांच्या कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. या कार्यक्रमांचा उद्देश आध्यात्मिक नव्हता, तर शुद्ध राजकीय होता. या धार्मिक व्यासपीठांचा वापर करून सत्ताधाऱ्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली.
विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळासोबतच सत्ताधाऱ्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाचा एक पॅटर्न राबवला. संगमनेरसारख्या एका विधानसभा मतदारसंघात, जिथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरातांनी सहकारातून समृद्धीचा आदर्श पॅटर्न उभा करत दुष्काळी पट्ट्याचे नंदनवन केले. शेती आणि दुधाच्या व्यवसायातून आर्थिक संपन्नता आणली. बाळासाहेब थोरातांच्या सुसंस्कृत राजकारणाने सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. पण तिथे असंस्कृत शक्तींची विकृत दृष्टी पडली. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र सुरू झाले. प्रत्येक घटनेला धार्मिक आणि जातीय रंग देऊन अपप्रचार आणि अफवांच्या माध्यमातून तणाव निर्माण केला. सामाजिक शांतता, सौहार्द आणि बंधुभावाचा बळी देऊन निवडणूक जिंकली. निवडणूक संपली, पण ती जिंकण्यासाठी निर्माण केलेली विखारी पिलावळ मात्र सामाजिक शांतता संपवण्यासाठी वळवळत आहे.
कीर्तन हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेने दिलेले एक अद्वितीय व्यासपीठ आहे. त्यातून केवळ आध्यात्मिक चिंतनच नव्हे, तर समाजप्रबोधन, लोकशिक्षण आणि नैतिक मूल्यांचा प्रसार झाला. शतकानुशतके कीर्तनाने सामान्य जनतेला सत्य-असत्याचा भेद शिकवला, अस्पृश्यतेला फाटा दिला आणि समतेची शिकवण दिली. पण संग्राम भंडारेसारख्यांनी या व्यासपीठाला कलंकित करत राजकीय उद्देशासाठी कीर्तनाचा वापर केला. “सर्वधर्म समभाव हे घाणेरडे तत्त्वज्ञान आहे,” असे अकलेचे तारे तोडणाऱ्या भंडारेला ज्ञानोबा-तुकोबा आणि वारकरी संप्रदाय कळलेलाच नाही. कीर्तनाचा पाया कीर्तनकाराने निवडलेला अभंग असतो, त्यावर कीर्तन असते; पण या बुवाचे कीर्तन राजकारण आणि द्वेषावर जाते. संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाची पोळी भाजून घेणारा हा राजकीय कथाकार चालू कीर्तनात गळ्यात वीणा असताना आमदारांच्या पाया पडतो. खोटीनाटी कारस्थाने रचून स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करतो. बाळासाहेब थोरांतासारख्या नेत्यांच्या विरोधात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावे लागेल असे म्हणून खून करण्याची धमकी देतो. हा प्रकार केवळ एका नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या संतपरंपरेवरचा आघात आहे. गांधीहत्या योग्य ठरवणारे, नथुरामचे उदात्तीकरण करणारे आणि संविधानविरोधी विचार पेरणारे यांना वारकरी संप्रदायात कोणतेही स्थान नाही. भंडारेसारख्या लोकांनी वारकरी संप्रदायाचा अपमान करण्यापेक्षा सरळ राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर जाऊन भाषणे द्यावीत. सत्ताधाऱ्यांनी सर्व स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्या आहेत. संवैधानिक पदांवर पात्र लोकांच्या ऐवजी संघ आणि सत्ताधाऱ्यांच्या विचारांच्या लोकांना बसवले जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केली जात आहे. संसदेत विधेयक आणून निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना वगळून त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करून आपल्या मर्जीतील आणि ऐकणारे निवडणूक आयुक्त नेमणे, राज्यपालांच्या माध्यमातून राजकारण करणे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करून विरोधकांना तुरुंगात टाकणे, पक्ष आणि चिन्ह पळवणे या सर्व गोष्टी संविधानाची पायमल्ली करणाऱ्याच आहेत. या सर्व कृती संविधान आणि लोकशाहीविरोधी आहेत.
द्वेष आणि दहशतीच्या बळावर लोकांना घाबरवून सत्तेवर येण्याची आणि सत्ता टिकवण्याची कार्यपद्धती फक्त सत्ता आणि राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सर्वच क्षेत्रांत त्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. उद्योग, क्रीडा, शिक्षण, सहकार, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रांत सत्ताधाऱ्यांच्या हस्तकांचा धुमाकूळ सुरू आहे. उत्तर भारतातल्या आध्यात्मिक क्षेत्रावरही त्यांनी कब्जा केला आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातही त्यांनी आता घुसखोरी केल्याचे संग्राम भंडारेच्या उदाहरणावरून दिसून येत आहे. सत्ताधारी पक्षाचा आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख वारंवार टीव्हीवर येऊन अत्यंत खालच्या पातळीवरून विषारी भाषेत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करत असतो यावरून यांना वारकरी संप्रदायाला कोणत्या दिशेला घेऊन जायचे आहे, याची कल्पना येते. आजच्या कलुषित वातावरणात महाराष्ट्राच्या संतपरंपरेला नथुरामच्या विषारी विचारसरणीपासून वाचवण्याचे कर्तव्य आपल्याला पार पाडावे लागणार आहे. प्रेम, समता आणि बंधुभाव हा संतांचा वारसा आहे; तर द्वेष आणि विभाजन ही नथुरामची परंपरा आहे. म्हणूनच आपण सर्वांनी जागरूक राहून ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची समतेची पताका फडकवत ठेवणे ही काळाची गरज आहे. भागवत धर्माच्या या दिव्य परंपरेला जपून समाजात ऐक्य, बंधुभाव आणि न्यायाची मूल्ये जपूया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल! श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ महाराज की जय!
माध्यम समन्वयक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी