महाराष्ट्रनामा
गिरीश चित्रे
महाराष्ट्र विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, आयटी, पर्यटन आणि पायाभूत सुविधा यांत राज्याने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरत आहे.
मेट्रोचे जाळे, महामार्ग, उड्डाणपूल, सागरीकिनारा मार्ग, पुण्यातील रिंग रोड अशी विविध कामे महाराष्ट्रात सुरू आहेत किंवा काही पूर्ण झाली आहेत. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढली आहे. विकासाची घोडदौड सुरू असून, महाराष्ट्र राज्य हे देशातील अग्रगण्य राज्य मानले जाते. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून विकासाला गती मिळाली आहे. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, वाहतूक, पर्यटन अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्राने गेल्या काही दशकांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. राज्याने विकासाच्या दिशेने सातत्याने वाटचाल केली असून भारताच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक योगदान देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते, ही तुम्हा- आम्हासाठी अभिमानाची बाब आहे.
सर्वप्रथम औद्योगिक क्षेत्राकडे पाहिले, तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांनी औद्योगिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून बँकिंग, वित्तीय सेवा, चित्रपटसृष्टी आणि व्यापार यामुळे मुंबईला वेगळी ओळख लाभली आहे. पुणे आयटी हब म्हणून विकसित झाले असून जगभरातील कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. नागपूर हे लॉजिस्टिक हब बनत आहे, तर औरंगाबाद व नाशिक येथे वाहन व वाईन उद्योगाला मोठे महत्त्व आहे. कृषी क्षेत्रात महाराष्ट्राने ऊस, द्राक्षे, कापूस, सोयाबीन, संत्री, डाळिंब अशा पिकांमध्ये आघाडी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. सिंचन प्रकल्प, शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे या उपक्रमांमुळे कृषी क्षेत्र अधिक बळकट होत आहे. विकासित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण असा उल्लेख राजकीय नेतेमंडळी आपल्या भाषणात नेहमीच आवर्जुन करतात. औद्योगिक, आर्थिक, सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्यात महाराष्ट्र राज्याचे नाव घेतले जाते. परंतु गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणाला आरोप-प्रत्यारोपाचा रंग चढला असून राज्य चालवणारेच सत्ताधारी असो वा विरोधक हमरीतुमरीवर आले आहेत. एकीकडे विकसित महाराष्ट्राच्या गोष्टी करायच्या तर दुसरीकडे याच महाराष्ट्रात गुंडशाहीचे वर्चस्व प्रस्थापित करायचे, असा कारभार सुरू आहे, हेही तितकेच खरे.
शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत देखील महाराष्ट्राने उल्लेखनीय कार्य केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे उच्च शिक्षणाची केंद्रे निर्माण झाली असून, ग्रामीण भागातही शैक्षणिक सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून सुरू आहे. तसेच, जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा विस्तारल्या जात आहेत. पर्यटन क्षेत्रही महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. अजिंठा-वेरूळ लेणी, गेटवे ऑफ इंडिया, रायगड-दौलताबाद किल्ले, कोकण किनारा, महाबळेश्वर, मळगावचे समुद्रकिनारे हे ठिकाणे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगारही मिळत आहे. राज्यातील पायाभूत सुविधांचे जाळे वेगाने विस्तारले जात आहेत. हरित ऊर्जा, डिजिटल इंडिया उपक्रम, ई-गव्हर्नन्स या क्षेत्रांत महाराष्ट्राने आघाडी घेत आहे.
एकूणच, महाराष्ट्राची वाटचाल औद्योगिक प्रगती, कृषी सुधारणा, शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा, पायाभूत प्रकल्प आणि पर्यटन यामुळे संतुलित पद्धतीने पुढे जात आहे. काही आव्हाने असली तरी राज्याची विकासाची गती सातत्याने वाढत असून महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा मुख्य आधारस्तंभ ठरत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्रात अनेक सक्षम, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेते आहेत, पण त्यांच्या प्रयत्नांना काही गैरवर्तनी नेत्यांच्या प्रतिमेमुळे धक्का बसतो. अशा वेळी नागरिकांनीच जागरूक राहून, मतदानात विचारपूर्वक सहभाग घेऊन आणि सामाजिक दबाव निर्माण करून चांगल्या नेतृत्वाला प्रोत्साहन द्यायला हवे. महाराष्ट्रातील जनतेला केवळ योजना आणि घोषणा नकोत, तर स्वच्छ चारित्र्य, सुशासन व विकासाची खरी बांधिलकी असलेले नेते हवेत. गुंडगिरीची छाया दूर करूनच महाराष्ट्र आपल्या संपूर्ण क्षमतेने प्रगतीच्या मार्गावर धाव घेऊ शकतो. पायाभूत सुविधा उभारणीत राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो रेल प्रकल्प, समृद्धी महामार्ग, नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे, सागरीकिनारी मार्ग यामुळे वाहतुकीचा वेग आणि संपर्क क्षमता प्रचंड वाढत आहे. तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नागपूर, पुणे, ठाणे आणि औरंगाबाद यासारख्या शहरांमध्ये नागरी सुविधांचा पाया अधिक मजबूत होत आहे.
gchitre4@gmail.com