
- दुसरी बाजू
- प्रकाश सावंत
समाजात जातीय तेढ, धार्मिक विद्वेष निर्माण करून पेटविलेल्या दंगलीच्या आगीत आपल्या स्वार्थाची राजकीय पोळी भाजणारे पुढारी मतांचे ध्रुवीकरण करून नेहमीच नामानिराळे राहतात. प्रत्यक्षात दंगलींच्या आगीत होरपळ होते, ती दोन्ही बाजूंकडील सामान्य नागरिकांचीच. त्यांच्या पोलीस ठाणे, कोर्टकचेऱ्या सुरू होतात. तुरुंगवारीने अनेकांचे शिक्षण अर्धवट सुटते. नोकरीधंद्याच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. नैराश्य, दारिद्र्य, अवमानकारक जीणे वाट्याला येऊन संपूर्ण जीवनच अंध:कारमय होते. मग, आपलेच समाजबांधव मदतीला धावणे सोडा; ते आपल्याकडे संशयाने बघतात तेव्हा प्रश्न पडतो, या दंगलींनी कुणाला काय दिले?
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेल्या ‘छावा’ सिनेमाचे काही उजव्या विचारांच्या मनुवादी प्रवृत्तींनी केवळ प्रमोशनच केलेच नाही, तर या सिनेमाचे प्रयोगसुद्धा आपल्या समर्थकांसाठी मोफत आयोजित केले. तसेच, संभाजी महाराजांचे हाल हाल करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाची खुल्ताबाद येथील कबर उखडण्याच्या मुद्द्याला जाणीवपूर्वक हवा दिली. भाजपच्या एका महाभागाने औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करण्याची मागणी करून आपल्या अकलेचे तारे तोडले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या संघटनांनी खुल्ताबादमधील औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याच्या मागणीसाठी नागपुरात मोर्चा काढला. या मोर्चानंतर महाल परिसरात दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. संचारबंदी जारी करण्यात आली. दोन्ही बाजूच्या दंगेखोरांची धरपकड करण्यात आली. एरव्ही शांत, निवांत सहजीवन जगणारे दोन्ही समाज सुडाने पेटून परस्परांच्या जीवावर उठले. सौहार्दाचे वातावरण गढूळ होऊन लोकमानस कलूषित झाले. या दंगलीने आता ज्या जखमा दिल्यात, त्या कधीही भरून येणार नाहीत.
नागपूर दंगलीत उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह जवळपास ३३ पोलीस जखमी झाले. या दंगलप्रकरणी १० अल्पवयीन मुलांसह सुमारे १०५ जणांना अटक झाली. नागपूर दंगलींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नावरून आपणच अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच, महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी स्वत:ला सावरले. नागपूरची दंगल हा पूर्वनियोजित कट असल्याची उपरती त्यांना झाली. दुसरीकडे सध्याच्या काळात औरंगजेबाचा मुद्दा गैरलागू असल्याचे सांगून संघाच्या नेतेमंडळींनीही आपले हात झटकले. त्यामुळेच नागपूर दंगलीचा विषय आणखी चिघळला नाही, हे राज्याचे सुदैवच म्हणायला हवे.
कोणतीही दंगल केवळ व्यक्तीचीच नाही, तर समाजाचीही मोठी हानी करते. एरव्ही परस्परांच्या हाकेला, मदतीला धावून जाणाऱ्या दोन समाजात विसंवाद निर्माण होतो. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. सूडबुद्धीने परस्परांच्या घरादारांची, दुकानांची जाळपोळ होते. तलवारी व अन्य प्राणघातक शस्त्रे परजली जातात. माणसेही पेटवून दिली जातात. त्यात होरपळते ती माणुसकी, सामाजिक बंधुभाव व धार्मिक सहिष्णुता.
एखादी दंगल घडते तेव्हा व्यक्ती, समाजाचीच नाही, तर त्या संपूर्ण शहराची, राज्याची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक वीण उसवते. वित्तहानी होते. दंगेखोरांचे शहर असल्याचा कलंक माथी बसतो. त्या शहरांची वस्त्या-मोहल्ल्यात फाळणी होते. दोन समाजात परस्परांविषयीचा संशय दुणावतो. दोन समाजांच्या लोकांचा परस्परांविषयीचा आदरभाव संपतो. मानसन्मान राहत नाही, उरतो तो केवळ सूड आणि धार्मिक विद्वेष.
दंगलींचे शहर म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या शहरात माणुसकीचीच अंत्ययात्रा निघते. कधी काळी हे शहर आपले होते, ही आपुलकीची भावनाही देशोधडीला लागते. दंगलींच्या शहरातील गुंतवणूक रोडावते. शहराला उद्ध्वस्त धर्मशाळेची अवकळा येते. ज्या शहराची संस्कृती धार्मिक विद्वेषाच्या आगीत जळून खाक होते, तिथे मग सौहार्दाची, सलोख्याची पालवी फुटणे अवघड होते. मग, ओसाड, उद्ध्वस्त आणि बेचिराख झालेली शहरे माणुसकीला पारखी होतात, ती कायमची.
कोणे एकेकाळी होऊन गेलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या नावाने आता आपल्याच देशातील दोन समाजाच्या लोकांनी सामाजिक बंधुभाव बाजूला सारून परस्परांमध्ये भांडत बसायचे काय? एकेकाळच्या आपल्याच मित्रांची, शेजाऱ्यापाजाऱ्यांची घरे जाळायची काय? आस्था, आपुलकीला तिलांजली देऊन विद्वेषाच्या भिंती उभारायच्या काय? हिंदू असो अथवा मुस्लिम यांच्याविषयी प्रक्षोभक, चिथावणीखोर वक्तव्ये चालू घ्यायची काय? माणसाला हैवान बनविणाऱ्या दंगली अशाच घडू द्यायच्या काय? ज्या मराठ्यांनी औरंग्याला मराठी मातीत गाडला, त्या शूरवीरांच्या अतुलनीय शौर्याचे प्रतीक असलेली खुल्ताबाद येथील औरंगजेबाची कबर उखडायची काय? मुळात, इतिहासातील जुनी मढी उकरून त्यातून आपण काय साध्य करणार आहोत, याचा विचार करायचा की नाही?
अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर मुंबईत धार्मिक दंगल उसळली. त्यापाठोपाठ साखळी बॉम्बस्फोटांनी सारी मुंबई हादरून गेली. या दंगलींचे दाहक व भयावह अनुभव मुंबईकरांनी याआधी घेतले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत संचारबंदी लागू झाल्यानंतर शाळा-महाविद्यालये बंद पडली. अनेकांचे शिक्षण थांबले. रोजगार बुडाला. व्यापार-उदीम पूर्णत: ठप्प झाले. अनेकांना आपल्या आप्तस्वकियांना गमवावे लागले. म्हणूनच बुद्धांनी, महावीरांनी, महात्मा गांधींनी जो शांततेचा मार्ग दाखवलाय तो आजही हवाय. परस्परांविषयी सूडभावना नको की विद्वेष नको. मुख्य म्हणजे माणसाला हैवान बनविणाऱ्या दंगली तर नकोच नकोत!
महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, दारिद्र्य, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचारच वाढलेले नाहीत, तर जातीय-धार्मिक वादविवादही वाढत चालले आहेत. राज्यापुढील मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी आता ‘औरंगजेबाच्या कबरी’च्या वादाला फोडणी देण्याचे प्रयत्न झाले असून त्यात सत्ताधारीच आघाडीवर होते, हे विशेष. कोणत्याही घटनेला धार्मिक रंग देऊन मतांची बेगमी करणारे पुढारी आपल्या गढीवर सुखनैव राहतात. त्यांच्या जीवनात काहीच फरक पडत नाही. म्हणूनच कुण्या धार्मिक अगर राजकीय पुढाऱ्याला वाटले म्हणून दंगली घडवायच्या काय?
दंगली म्हणजे क्रौर्य. मानवतेला कलंक. विद्वेष. सूड. असंवेदनशीलता. क्रौर्याची परिसीमाच. त्यातून नुकसानच नुकसान. दंगली म्हणजे अविचार. अविवेक. जेव्हा राज्यकर्त्यांचा स्वत:च्या कार्यकर्तृत्वावरील विश्वास डळमळीत होतो, ते राजकीयदृष्ट्या अस्थिर होतात, त्यांच्यामध्ये पश्चात्तापाची भावना निर्माण होते, त्यांच्यामधील अहंकार, जातीयता-धर्मांधता व सुडाची भावना वाढीस लागते, तेव्हाच दंगली होतात. कोणाही ‘आका’च्या राजकीय आशीर्वादाशिवाय दंगली घडणे तसे कठीण. या दंगली तेव्हाच मोडीत काढता येतील, जेव्हा राज्यकर्ते भारतीय राज्यघटनेच्या शपथेला अनुसरून आपला पारदर्शक राज्यकारभार करतील, सर्वांशी नि:पक्षपातीपणे वागतील, समानतेची वागणूक देतील. राज्यघटनेचा पाइक असलेले खंबीर राज्यकर्ते जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून लोकाभिमुख कारभार करून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना न्याय देतील, तेव्हाच दंगलींचे भूत समाजमनाच्या मानगुटीवरून उतरेल.
prakashrsawant@gmail.com