

वर्तमान
डॉ. प्रवीण बनसोड
शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मूळ सामाजिक विषमता आणि आर्थिक शोषणात असल्याने केवळ तांत्रिक सुधारणा पुरेशा ठरत नाहीत. शेती, सिंचन आणि शिक्षणाचा विकास झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास शक्य नाही. म्हणून महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ची आज पुन्हा गरज आहे.
'काया पुरती लंगोटी, फिरी नांगराचे पाठी, एका घोंगड्यावाचूनी स्त्रियां नसता दुजे शयनी; ढोरामागे सर्वकाळ, पोरे फिरती रानोमाळ’ या शब्दांत महात्मा जोतीराव फुले यांनी शेतकरी आणि शेतकामगारांची दयनीय अवस्था मांडली. सरंजामशाही, सावकारशाही आणि साम्राज्यशाहीमुळे शेतकरी नाडला गेला. इंग्रजांनी बंगालमध्ये कायमधारा, तर दक्षिणेत रयतवारी पद्धत लागू केली. जमीन मोजणी, मालमत्तेचे कायदे आणि खरेदी-विक्रीचे नियम यांमुळे सावकारांना शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणे सोपे झाले. उत्तरेत जमीनदार, तर महाराष्ट्र-दक्षिणेत सावकारांचा वर्ग समृद्ध झाला. शिक्षणापासून वंचित शेतकरी अज्ञानी राहिला; उच्चवर्गीयांनी कायद्याच्या आधारे जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या.
भारताचा कच्चा माल इंग्लंडला नेण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचे जाळे निर्माण झाले; इंग्लंडचा पक्का माल भारतात विकला जाऊ लागला. पाणी, शेती आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने दुष्काळ वाढले. १८०० ते १९०० या शंभर वर्षांत दुष्काळामुळे भारतात २१ लाख २० हजार लोक मृत्युमुखी पडले. लाखो लोक अन्न-पाण्यावाचून मरत असताना १८७७ मध्ये इंग्रज सरकारने ७ लाख ९० हजार पौंड गहू व भात निर्यात केला. साम्राज्य टिकवण्यासाठी शेतकरी-कष्टकऱ्यांचे शोषण करण्यात भारतीय अधिकारी, सावकार आणि उद्योगपतींनीही सहकार्य केले. आजही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी प्रशासकीय अधिकारी, सावकार, कारखानदार आणि व्यापारी प्रयत्नशील असल्याचे लेखक नमूद करतात.
फुले यांनी शेतकरी-कष्टकरी बहुजनांचे शोषण प्रत्यक्ष अनुभवले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुणे सार्वजनिक सभा भांडवली विकास, आधुनिक शेती, यंत्रे, बँका, कर्जबाजारीपणा आणि लग्नातील खर्च कमी करण्याचे उपाय सुचवत होती. जी. व्ही. जोशी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखे सदस्य सभेत होते. मात्र, फुले यांनी वरवरचे उपाय न मांडता शेतकऱ्यांची अवस्था का आणि कोणी निर्माण केली, याचा शोध घेतला. दुष्काळ व शेतकऱ्यांची स्थिती मांडण्यापेक्षा शोषणाची कारणे उघड करणे हे सत्यशोधक समाजाचे कार्य होते. ब्राह्मणी-भांडवली वर्चस्वामुळे शेतकरी आत्महत्या करतात, पण व्यवस्था परिवर्तनाचा विचार मांडला जात नाही. धर्म, जात, अर्थ आणि संस्कृतीच्या गुलामीतून मुक्त होऊन शेतकरी-कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण झाल्याशिवाय सन्मानाचे जीवन शक्य नाही, हा फुले यांचा विचार आजही महत्त्वाचा आहे.
१८८३ मध्ये ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहिताना फुले म्हणतात, हिंदुस्थानातील अज्ञानी आणि देवभोळ्या शूद्र शेतकऱ्यांची अवस्था इतर देशांतील शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट असून ती पशूंपेक्षाही खालच्या स्तरावर पोहोचली आहे. आजही शेतकरी प्रथा-परंपरा पाळत नशिबावर अवलंबून राहतो. विश्लेषण आणि चिकित्सक दृष्टिकोनाचा अभाव त्याला परिस्थितीशरण बनवतो. ज्ञानप्राप्ती म्हणजे केवळ लिहिणे-वाचणे नव्हे, तर विचार, विश्लेषण आणि चिकित्सा करणे होय. सावकाराच्या कर्जामुळे शेतकरी कसा गुलाम बनतो, हे ‘भट्ट धनको, शूद्र ऋणको’ या उदाहरणातून फुले दाखवतात; कर्ज, व्याज आणि गहाणखत यांमुळे जमीन सावकाराच्या वारसांकडे जाते.
१८८९ मध्ये मुंबईत भरलेल्या ऑल इंडिया काँग्रेस अधिवेशनाच्या प्रवेशद्वारासमोर सत्यशोधक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याचा पुतळा उभा करून प्रतिनिधित्वाचा प्रश्न उपस्थित केला. ‘वीस कोटी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी काँग्रेसमध्ये नसेल, तर तिला राष्ट्रीय सभा म्हणता येणार नाही,’ असा सवाल त्यांनी केला. आजही शेतकरी नेत्यांच्या नावाखाली काही जण शाळा, दारूची दुकाने आणि अन्य उत्पन्नाची साधने उभारून संपत्ती वाढवतात; शेतकरी मात्र आत्महत्या करतो. सरकारी पैशातून गायकांचे कार्यक्रम घेऊन मनोधैर्य वाढवण्याचे उपाय म्हणजे मूळ प्रश्नांपासून पळ काढणे होय.
१८७७ च्या दुष्काळात फुले यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बालकाश्रम सुरू केला. १८८२ मध्ये मुंबईत ‘हिंदी शेतकऱ्यांची स्थिती’ या विषयावर चार हजार लोकांसमोर भाषण केले. १८८३ मध्ये ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहून गावोगावी वाचन सुरू केले. १८८४ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा येथे शेती सुधारणा विषयावर भाषण व पत्र लिहिले. ‘ड्यूक ऑफ कॅनाॅट’च्या भेटीस शेतकऱ्याच्या वेशात जाऊन वास्तवस्थिती मांडली. वनखात्यामुळे जंगल, गायराने, डोंगर-दऱ्या आणि पडीक जमिनी शेतकऱ्यांच्या वापरातून गेल्याने जनावरांना चरायला जागा उरली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंग्लंडमधून स्वस्त माल आयात झाल्याने कोष्टी, साळी, जुलयी आणि मोमीन यांसारखे विणकर व हस्तकारागीर उद्ध्वस्त झाले. अनेकांना डाळीची चुणी, तांदळाचा-गव्हाचा कोंडा आणि आंब्याच्या कोयांवर जगावे लागले. एका ईस्ट इंडिया कंपनीने शेतकरी, कष्टकरी आणि कारागिरांना देशोधडीला लावले. आज ५५ हजारांपेक्षा अधिक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातून कच्चा माल घेऊन नफा कमावतात.
‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले,’ असे फुले सांगतात. बनावट जातीय-धार्मिक प्रथा, सरकारी खात्यांतील ब्राह्मणांचे वर्चस्व, विदेशी मालाच्या आयातीचे धोरण आणि सावकार-जमीनदारांना संरक्षण ही शोषणाची प्रमुख कारणे त्यांनी मांडली. ज्ञान, पैसा आणि कौशल्य नाकारल्याने बहुजन समाज गुलामीत जगू लागला. बहुजन समाजाला ज्ञान, कौशल्य आणि आर्थिक साधने उपलब्ध होऊ नयेत, अशी विषमतावादी व्यवस्था कार्यरत होती. लिहिणे-वाचणे निषिद्ध मानले गेले; मेहनतीचा पैसा अज्ञान, नियम आणि कायद्याची भीती दाखवून लुटला गेला. देशी हस्तकला आणि व्यवसायांना उठाव न मिळाल्याने रोजगार व कौशल्य दोन्ही संपुष्टात आले. त्यामुळे बहुजन समाजाचा आत्मविश्वास आणि संघर्षाची उर्मी कमी झाली.
भारतातील भांडवलशाही जात आणि वर्ग यांच्या प्रभावाखाली विकसित झाली. जमीन फेरवाटप झाले नाही; सरंजामी आणि खोती व्यवस्थेचे समर्थन झाले. कॉ. शरद पाटील यांनी भारतातील सत्ताधारी वर्ग ब्राह्मण बुद्धिजिवी, बनिया भांडवलदार आणि वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूंचा बनल्याचे विवेचन केले आहे. शेती व शेतीआधारित व्यवसाय कनिष्ठ जातींकडे राहिले, तर उच्च जातींनी राष्ट्रीय-महाबहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून भांडवलशाहीवर नियंत्रण ठेवले.
आज शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांवर अवलंबून आहे. शेतमाल विक्री दलाल आणि कंपन्यांच्या मर्जीवर चालते. सरकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सरकारी खात्यांतील ब्राह्मणांचे प्राबल्य शेतकऱ्यांच्या शोषणास कारणीभूत असल्याचे फुले यांनी १८८३ मध्ये मांडले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मूळ सामाजिक विषमता आणि आर्थिक शोषणात असल्याने केवळ तांत्रिक सुधारणा पुरेशा ठरत नाहीत. शेती, सिंचन आणि शिक्षणाचा विकास झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा विकास शक्य नाही. केरळ-कोकणातील मसाले उत्पादक, मका, कापूस, सोयाबीन उत्पादक, बागायतदार आणि पशुपालकांची अवस्था याचीच साक्ष देते. म्हणून महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ची आज पुन्हा गरज आहे.