शोध समाधीचा, जागर शिवरायांचा...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित समाधीचा शोध घेऊन तिचे जतन करण्याचे महान कार्य महात्मा जोतिराव फुले यांनी केले. या लेखात शिवरायांविषयी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर विचारवंतांनी व्यक्त केलेले विचार व त्यांचे ऐतिहासिक योगदान स्पष्ट केले आहे.
शोध समाधीचा, जागर शिवरायांचा...
शोध समाधीचा, जागर शिवरायांचा...
Published on

अस्वस्थ वर्तमान

डॉ. प्रवीण बनसोड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित समाधीचा शोध घेऊन तिचे जतन करण्याचे महान कार्य महात्मा जोतिराव फुले यांनी केले. या लेखात शिवरायांविषयी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर विचारवंतांनी व्यक्त केलेले विचार व त्यांचे ऐतिहासिक योगदान स्पष्ट केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका मोठा आहे की आजही देश-विदेशात त्यांना प्रेरणास्थानी मानले जाते. मात्र, एक काळ असा होता की, त्यांची समाधी दुर्लक्षित अवस्थेत होती. या समाधीचा शोध घेऊन तिचे जतन करण्याचे महान कार्य महात्मा जाेतिराव फुले यांनी केले.

शिवाजी महाराजांचे निधन १६८० साली रायगड किल्ल्यावर झाले. त्यानंतर त्यांची समाधीही रायगडावरच बांधण्यात आली. परंतु पुढील काळात मराठा साम्राज्याचा ऱ्हास, इंग्रजांचे राज्य आणि दुर्लक्ष यामुळे ही समाधी ओसाड व दुर्लक्षित झाली. लोकांमध्ये शिवाजी महाराजांविषयी कमालीचा आदर होता, पण त्यांच्या समाधीबद्दल जागरूकता नव्हती. अशावेळी १८६९ साली महात्मा जाेतिराव फुले रायगडावर गेले. तेथे त्यांनी मोठ्या शोधानंतर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यावेळी समाधीची अवस्था अतिशय वाईट होती. झाडाझुडपांनी वेढलेली, कोणीही देखभाल न करणारी. हे दृश्य पाहून महात्मा फुले अत्यंत व्यथित झाले. त्यांनी लगेचच त्या समाधीची स्वच्छता करून तिचे जतन करण्याचा संकल्प केला आणि शिवाजी महाराजांना ‘कुळवाडी भूषण’ म्हणून गौरविले. त्यांनी समाजातील सर्व घटकांना शिवाजी महाराजांच्या कार्याची जाणीव करून दिली. त्यांच्या मते शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, तर शोषित आणि पीडित जनतेचे रक्षण करणारे होते. म्हणूनच महात्मा फुले यांनी त्यांच्या समाधीचा शोध घेऊन त्याचे जतन करणे हे एक सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य मानले.

आज रायगड किल्ल्यावर असलेली शिवाजी महाराजांची समाधी ही एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. दरवर्षी हजारो लोक तेथे भेट देतात आणि महाराजांना अभिवादन करतात. या

सर्व गोष्टींचे श्रेय महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रयत्नांना जाते. महात्मा जोतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेऊन केवळ एक ऐतिहासिक कार्यच केले नाही, तर समाजात स्वाभिमान आणि इतिहासाबद्दलची जागरूकता निर्माण केली.

महात्मा जोतिराव फुले यांनी १८६९ मध्ये ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा’ लिहिला.

‘शिवस्मारका’ची कल्पना फुल्यांची, पण हे किती जणांना माहीत आहे? फुलेच स्वतः लिहितात- “पुण्यास आलो व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगडी जाण्यास निघालो. समाधीची जागा शोधण्यात २/३ दिवस गेले. घाणेरी व इतर जंगली झुडपे कुऱ्हाडीने तोडीत रस्ता काढावा लागला. शिवजन्म उत्सव साजरा करावा, म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुवून काढून त्यावर फुले वाहिली. त्यांचे स्मारक म्हणून मी अल्प काव्य केले आहे ते त्यांना समर्पण करतो...”

आज तर भारतातले ब्राह्मण-ब्राह्मणेतर-ख्रिश्चन -मुसलमान शिवछत्रपतींना राष्ट्रपुरुष मानतात. उच्चवर्णीय तर त्यांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ ही संज्ञा देतात. पण ज्या वेळी त्यांच्या स्मारकाची कल्पनाही कोणाला शिवली नाही, त्या वेळी फुल्यांनी तिला चालना दिली. (संदर्भ : बहुजन समाजाचा आद्य शिल्पकार : लेखक माधवराव बागल, महात्मा फुले गौरव ग्रंथ पान ४७ )

सावित्रीबाई या जोतिरावांप्रमाणेच तत्त्वनिष्ठ, विचारवंत होत्या, तसेच त्या १९ व्या शतकातील एक प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. ‘काव्यफुले’ हा त्यांचा काव्यसंग्रह सन १८५४ मध्ये मिशनरी छापखान्यात छापून प्रसिद्ध झाला. त्यावेळी सावित्रीबाईंचे वय अवघे २३ वर्षांचे होते. ‘छत्रपती शिवाजी’ या नावाची त्यांची कविता पुढीलप्रमाणे आहे :

‘छत्रपती शिवाजीचे प्रातःस्मरण करावे

शूद्रादी अतिशूद्रांचा प्रभू बंडू मनोभावे

नळराजा युधिष्ठिर द्रोपदीही जनार्दन

पुण्यश्लोक पुराणात इतिहासी शिवानन.’

छत्रपती शिवाजी महाराज यांची थोरवी सोप्या पण अचूक शब्दांत कशी साकार केली आहे हे कळून चुकते. शूद्र-अतिशूद्रांचा पालनकर्ता म्हणून त्यांनी गायिलेली थोरवी वैशिष्ट्यपूर्ण आहे, तर महात्मा जोतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचा कालखंड पोवाड्यांमधून रेखाटला आहे.

जोतिबांची लेखणी तशी ओबडधोबड पण बाल शिवाजीचे बालपण चित्रित करताना तिच्या लालित्याची थोडी झलक ते दाखवतात-

शिवनेरी किल्ल्यामध्ये

बाळ शिवाजी जन्मले।

जिजीबाईस रत्न सांपडले।।

हातापायांची नख बोट

शुत्र प्याजी रंगीले।

ज्यानी कमळा लाजविले।।

साल कटी सिहापरी

छातीमांस दुनावले।

नाव शिवाजी शोभले॥

अशा प्रकारे बाल शिवाजीचे सुंदर वर्णन जोतिबा करतात. त्यांच्या शुभ्र दातांना मोत्यांच्या लडीची उपमा ते देतात तर त्याच्या विशाल नेत्रांस पाहून मृगांना विषाद वाटून ते वनात निघून गेल्याचे सांगतात.

शिवरायांवर पोवाडा लिहून जोतिबांनी महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी बहुजनांचा खरा राजा म्हणून त्यांची प्रतिमा समाजासमोर उभी केली. याशिवाय जोतिबांच्या सत्यशोधक चळवळीचे खंदे पुरस्कर्ते दिनकरराव जवळकर यांनी शिवरायांवर छत्रपती पद्यसंग्रह रचले -

शिवाजी आमुचा राणा ।

मराठी आमुचा बाणा ॥ धृ०॥

शिवानें धर्म राखिला।

शिवानें शत्रु रगडिला ॥

जगविले हिंदू धर्माला।

जगविले मायभूमीला ॥ १॥

शिवाजी पालक धर्माचा।

शिवाजी क्षात्र हाडाचा॥

तयातें शूद्र वदण्याला।

नसावी लाज भटजीला ॥ २॥

शिवाच्या मर्द मराठ्यांनो।

म्हणति भट शूद्र तुम्हांलाहो ॥

आठवा मानी शिवबांहो।

जनाची लाज मानाहो ॥ ३॥

जगावे जीवन मानानें।

रहावें स्वाभिमानानें ॥

मराठी हाच हा बाणा।

शिवाचा बोल हा माना ।। ४।।

भटांचे प्रस्थ मोडावें।

रूढीचे पाश तोडावे ॥

शाहूचा हा असे बाणा।

शिवाजी शाहूला माना ॥ ५॥

(संदर्भ : दिनकरराव जवळकर समग्र वाङ्मय : संपादक डॉ. य. दि. फडके पान ९७ )

सध्या महाराष्ट्रात शिवरायांविषयी दोन विषयांवर चर्चा होत आहे. रायगडावरील शिव समाधीसमोर महात्मा जोतिराव फुले यांच्या नावाचा उल्लेख करावा यासाठी चळवळ सुरू आहे, तर दुसरीकडे अकारण उलटसुलट वक्तव्ये केली जात आहेत. महात्मा जोतिराव फुले यांनी स्वतः रायगडावरील शिवसमाधीच्या शोधाची घटना सांगितली आहे. विविध ग्रंथांतून त्याचा उल्लेख येत असतो. त्यामुळेच शिव स्मारकासमोर त्यांच्या नावाचा उल्लेख असणे काही गैर नाही, चळवळीतील कार्यकर्त्यांची ही इच्छा पुरातत्त्व विभागाने पूर्ण केली पाहिजे. एकीकडे शिवजयंतीच्या निमित्ताने प्रचंड जल्लोष करायचा, पण दुसरीकडे त्यांच्या विचार-कार्याचा जागर होऊ द्यायचा नाही, अशी दुहेरी रणनीती अवलंबली जात आहे. शिवरायांनी सामान्य कष्टकरी शेतकरी माणसांच्या स्वराज्याचे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे शिवराय हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आराध्य दैवत आहेत, शिवाय त्यांची दुर्लक्षित असलेली समाधी शोधून पुन्हा नव्याने इतिहास सांगण्याचा नवा प्रयत्न जोतिराव फुले यांनी केला.

पुस्तकातील शब्दांमधून आणि महापुरुषांच्या स्मारकांवरून प्रेरणा घेऊन समाज घडविला जात असतो. समाजाच्या बिघडण्याची कारणे समाजातच असली तरी समाज घडविण्याची कारणे पुस्तकातच सापडतात. त्यामुळे समाजाला सकारात्मक दिशेने घेऊन जायचे असेल तर पुस्तकांशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्याचप्रमाणे येणाऱ्या पिढ्यांना सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर महापुरुषांच्या स्मारक आणि प्रेरणास्थानांची निकड असते. त्याशिवाय नवीन पिढ्यांना इतिहास समजून घेता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र घडवायचा असेल तर पुस्तके आणि प्रेरणास्थळे या दोन्हींची आपण काळजी घेतली पाहिजे.

लेखक प्रगतिशील लेखक संघाचे विदर्भ समन्वयक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in