
- मत आमचेही
- ॲड. हर्षल प्रधान
राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या २० नोव्हेंबर २०२४ ला, निकाल लागला २३ नोव्हेंबरला, त्यानंतर तब्बल १३ दिवसांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात नवीन सरकारचा शपथविधी पार पडला. लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आणि त्यांनी १०० दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडा आखला. मात्र प्रशासन गतिमान होण्याऐवजी प्रत्यक्षात वेगळेच घडले आहे. वेगवेगळ्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. गतिमान शासनाला १०० दिवस झाले, कोणी नाही पाहिले, असेच सध्याचे चित्र आहे.
स्वारगेट स्थानकातील एसटीत तरुणीवर अत्याचार, भाजप कार्यकर्ता सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, सोमनाथ सूर्यवंशी मारहाण आणि मृत्यू, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लाडक्या बहिणींची फसवणूक, महापुरुषांचा भाजप परिवारातील सदस्यांकडून अपमान, मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर भ्रष्टाचारचे आरोप आणि राजीनामा देण्याची ओढवलेली नामुष्की यातच महाराष्ट्र शासन गेल्या शंभर दिवसांत गुरफटून राहिले आहे. ‘सोचा था क्या? क्या हो गया!’ असे म्हणण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे.
शंभर दिवसांचा हा कालावधी म्हणजे ६ डिसेंबर २०२४ ते १४ मार्च २०२५. या कालावधीत नेमके काय काय घडले? ते पाहायला हवे.
सरपंच देशमुख हत्या : १० डिसेंबर २०२४ :
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांची हत्या, ९ आरोपींना अटक (वाल्मिक कराडसह), मोक्का अंतर्गत कारवाई. बीडमध्ये ११ डिसेंबर २०२४ रोजी बंद.
सोमनाथ सूर्यवंशी हत्या १० डिसेंबर २०२४ :
१० डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीच्या कथित विटंबनेनंतर झालेल्या निषेधासंदर्भात अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला. परभणी हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्यात कोणालाही सोडले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
स्वारगेट बलात्कार : २५ फेब्रुवारी २०२५ :
स्वारगेट एसटी आगाराच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास परगावी निघालेल्या एका प्रवासी तरुणीकडे आरोपी गाडेने वाहक असल्याची बतावणी करून तिला एका शिवशाही बसमध्ये नेले. दरवाजा लावून घेत त्याने तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन दोनदा बलात्कार केल्यानंतर गाडे गुनाट (ता. शिरूर) गावी फरार झाला होता. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका २६ वर्षीय तरुणीवर डेपोमध्येच असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये २५ फेब्रुवारीच्या पहाटे ही बलात्काराची घटना घडली होती. अखेर २८ फेब्रुवारी रोजी पहाटे दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री : धनंजय मुंडे-माणिक कोकाटे :
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ते कृषिमंत्री असताना जवळपास २७५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे कृषिमंत्री होते. त्यावेळी कृषी साहित्य खरेदी करण्यात आले होते. कृषी साहित्य खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाला. बाजारभावापेक्षाही अधिक दराने साहित्य खरेदी करण्यात आले. त्याशिवाय, साहित्य खरेदीच्या निविदा खुल्या करण्याआधीच रकमेचे वाटप संबंधित कंपनीला करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला. संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.
महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये, अशी शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. १९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर असून त्याबाबतचा खटला सुरू होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने २० फेब्रुवारी २०२५ या प्रकरणात निर्णय सुनावला होता. १९९५ मधील एका प्रकरणात कोकाटेंना ही शिक्षा सुनावण्यात आली. तत्कालीन आमदार, खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटेंवर होता. माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाने याबाबत दिलासा दिला आणि त्यांचे मंत्रिपद वाचले.
राहुल सोलापूरकर वक्तव्य :
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असे ते एका पॉडकास्ट मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याविरोधात विविध स्तरांतून निषेध करण्यात आला.
प्रशांत कोरटकर पळून गेला : (शिवरायांचा अवमान प्रकरण)
प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता. हा फोन करून त्याने सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. सोबतच यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याचाही आरोप आहे. याच प्रकरणात कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कोरटकरने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मात्र हा अर्ज फेटाळला आहे. सोमवारीच कोरटकर याला तेलंगणा इथून अटक करण्यात आली आहे.
शेतकरी आत्महत्या :
२०२४ मध्ये एका वर्षात २,७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या १०० दिवसांत अंदाजे ६००-७०० आत्महत्या झाल्या.
लाडकी बहीण फसवणूक :
आतापर्यंत या योजनेंतर्गत २.३८ कोटी महिलांना १७५०५.९० कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. मात्र या योजनेतून विविध निकष लावत सुमारे पाच लाख बहिणींना बाहेर काढण्यात आले.
नागपूर दंगल :
१८ फेब्रुवारी २०२५. नागपूर शहर हे शांतताप्रिय शहर आहे. हिंदू-मुस्लिम दोघेही आजपर्यंत शांततेने रहात आहेत. राम नवमीला दोन्ही समाजाचे लोक उत्साहाने सहभागी होतात, तर ताजुद्दीनबाबाच्या उरुसामध्येही हिंदू-मुस्लिम एकोप्याने सहभागी होतात. अशा शहरात धार्मिक दंगल होतेच कशी? सरकारला याची काहीच कल्पना नव्हती का? हे सरकारचे अपयश आहे. पोलीस इंटेलिजन्स काय करत होते आणि पोलिसांवरच हल्ले होत असतील तर गृहमंत्रीपदावर फडणवीस राहतात कसे? त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मध्य नागपूरमध्ये ही घटना घडली असून याच भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे घर आहे. या अशा घटना म्हणजे राज्यावर सत्ताधाऱ्यांचा वचक राहिलेला नाही, याचा पुरावा आहे. मुख्यमंत्र्यांच्या मूळ गावी जर दंगल होत असेल तर त्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वतः जबाबदार आहेत. मात्र याबाबत सगळेच शांत आहेत.
औरंगजेबाच्या कबरीमागे दडलंय काय?
राज्यात अचानक औरंग्याची कबर उखडण्याचा मुद्दा महत्त्वाचा बनला. बजरंग दलाने तर त्याबाबत कार सेवा वगैरे करण्याचा इशारा दिला. बजरंग दलाला लागलीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खडे बोल सुनावून हा मुद्दा आता महत्त्वाचा नाही हे ऐकवले. म्हणून किमान त्याबाबत चर्चा थांबली. पण अचानक हा मुद्दा का पुढे करण्यात आला असावा याबाबत शांतपणे विचार केला तर काही गोष्टी सहज लक्षात येतात. सत्ताधाऱ्यांची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. त्यांना एखाद्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करायचे असेल तर ते नको ते विषय पुढे काढतात. तसलाच हा प्रकार होता. कारण त्यांना महत्त्वाच्या विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करायचे होते.
महाराष्ट्रावरील ९.५ लाख कोटींचे कर्ज, राज्यात एक वर्षात २७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, देशात ६४ हजार, तर राज्यात १५ हजार जिल्हा परिषद शाळा बंद पडणार, महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित, राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था व आर्थिक स्थिती, राज्यातून स्थलांतरित होणारे उद्योग व्यवसाय व शासकीय कार्यालये, वेळेवर पगार न झाल्यामुळे शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या, कुजबूज गँगकडून होणारी शिव छत्रपती परिवाराची बदनामी, जयदीप आपटे-कोरटकर-सोलापूरकर-कराड-मुंडे यांच्यामुळे सरकारची झालेली नाचक्की, परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू, नांदेडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाचे अपहरण, कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला बेदम मारहाण, कल्याणमध्येच चिमुरडीशी अश्लील चाळे करणाऱ्यास जाब विचारला म्हणून मराठी कुटुंबाला मारहाण, पुण्यात लोहगाव परिसरात कोयता गँगचा हैदोस, मुंबईत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड...अशा अनेक घटना गेल्या शंभर दिवसांत घडल्या. यावरून लक्ष विचलित करून गडे मुद्दे उखडून राज्यातील जनतेला भ्रमात ढकलले जात आहे. शंभर दिवस झाले कुणी नाही पाहिले, असे म्हणत राज्य जनतेला डोळेझाक करायला लावत आहे.
प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.