नाकापेक्षा मोती जड

महायुतीचे सरकार स्थापन होऊन नऊ महिन्यांचा कालावधी होत आला. पण या एकंदरीत महायुतीतील 'मोठा भाऊ' भाजप खरोखर समाधानी आहे का, हे भाजपच सांगू शकतो; मात्र शिवसेना व राष्ट्रवादी भाजपसाठी 'नाकापेक्षा मोती जड' झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
नाकापेक्षा मोती जड
Published on

महाराष्ट्रनामा

गिरीश चित्रे

महायुतीचे सरकार स्थापन होऊन नऊ महिन्यांचा कालावधी होत आला. पण या एकंदरीत महायुतीतील 'मोठा भाऊ' भाजप खरोखर समाधानी आहे का, हे भाजपच सांगू शकतो; मात्र शिवसेना व राष्ट्रवादी भाजपसाठी 'नाकापेक्षा मोती जड' झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून काहीच आलबेल नसल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. कधी निधी मिळत नसल्याची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री व आमदारांची नाराजी, तर रायगड व नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून शिंदेंच्या मंत्र्यांचा संताप. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंत्र्यांची बेताल वक्तव्ये. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन आमदारांचे कार्यकर्ते भिडले होते. या सगळ्या घटनांचा हवाला देत आमदार माजलेत अशी जनभावना असल्याचे दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात म्हटले होते.

त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन नऊ महिन्यांचा कालावधी होत आला. पण या सरकारच्या कामकाजावरून महायुतीतील "मोठा भाऊ" भाजप खरोखर समाधानी आहे का, हे भाजपच सांगू शकतो; मात्र महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी भाजपसाठी 'नाकापेक्षा मोती जड' झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे कडवे आव्हान उभे ठाकले असताना महायुती सरकारने बाजी मारली. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले, मुख्यमंत्रीपदावरून महायुतीतील धुसफूस समोर आली. मात्र अंतर्गत काहीच वाद नसल्याचा आव आणत ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिपदाची घोषणा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली, पण महायुतीतील अंतर्गत वाद, मंत्री, आमदारांची बेताल वक्तव्ये, गैरवर्तन यामुळे महायुतीतील मोठा भाऊ भाजपकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असणार. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येऊन जवळपास ९ महिन्यांचा कालावधी होत आला. मात्र आजही महायुतीतील अंतर्गत खदखद बाहेर येते. त्यामुळे सत्तेत एकत्र असले तरी खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महायुतीतील घटक पक्ष शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी डोईजड वाटत असणार यात दुमत नसावे.

महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होऊन नऊ महिने होत आले. भाजपकडे राज्यात सर्वाधिक जागा असूनही त्यांना सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही गटांना सोबत घ्यावे लागले. या दोन्ही गटांच्या अस्तित्वावर भाजपची सत्ता टिकून आहे. त्यामुळे मित्रपक्षांना खूश ठेवण्यासाठी भाजपला सतत तडजोड करावी लागत आहे. भाजपला एकहाती राज्य करायचे होते, पण सत्तेसाठी दोन-तीन गटांना सोबत घ्यावे लागल्याने त्यांचेच वजन आता फडणवीस यांना पेलेनासे झाले आहे. सत्ता टिकवण्यासाठी शिंदे सेनेला दिलेली सवलत आणि अजित पवार गटाला सामावून घेताना केलेले तडजोडीचे राजकारण यामुळे भाजपला आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. महायुतीत मोठा भाऊ असतानाही निर्णय लादण्याची ताकद भाजपला पूर्णपणे दाखवता येत नाही. शिंदे असो वा अजित पवार, दोघांची नाराजी ओढवून घेतली तर सत्ता कोसळण्याची भीती. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता कासवगतीने चाल करणे भाजपला फायदेशीर ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मोठा भाऊ मानला जाणारा भाजप या तिन्ही पक्षांच्या सहभागातून हे सरकार टिकून आहे. पण गेल्या नऊ महिन्यांत महायुतीतील तणाव, परस्पर संशय आणि सत्तावाटपातील संघर्ष यामुळे सरकारमधील वाद चव्हाट्यावर येत आहेत. शिंदे सेनेला सोबत घेत भाजपने सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी "खरा शिवसेना पक्ष" असल्याचा दावा केला. मात्र गेल्या काही महिन्यांत शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचे सूर, त्यांना मिळालेला अधिकार आणि मंत्रिपदांची विभागणी याबाबत असंतोष व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला सरकारमध्ये सामावून घेतल्यापासून भाजप आणि शिंदे गटात नवे समीकरण निर्माण झाले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी त्यांचा गट स्वतंत्र राजकीय वजन दाखवत आहे. त्यामुळे मोठा भाऊ असलेल्या भाजपला या दोन्ही लहान भावांना खूश ठेवावे लागते. सत्तेत राहण्यासाठी भाजपला मंत्रिपदे, निधी वाटप आणि निर्णय प्रक्रियेत सतत समन्वयाचा खेळ करावा लागतो. आम्ही बहुसंख्येत असूनही निर्णय आमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, अशी नाराजी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी फडणवीस यांच्यासाठी डोईजड होऊ लागली आहे.

महायुतीतील सत्ता संघर्ष या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेते सतत आरोप करत आहेत की, "महायुती सरकार म्हणजे तीन चाकी गाडी असून प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला ओढले जात असल्याने राज्याचा विकास ठप्प झाला आहे. हे सरकार टिकवण्यासाठीच महायुतीचा वेळ वाया जात असून जनतेच्या प्रश्नांकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही," असा टोला मविआच्या नेत्यांनी लगावणे स्वाभाविक आहे. शेतकरी, बेरोजगार तरुण, महागाईने त्रस्त जनता यांच्या समस्यांना केराची टोपली दाखवली आहे. महायुतीतील सत्ता संघर्ष यामुळे महाविकास आघाडीच्या आरोपांना आपसूकच वजन मिळत आहे. महायुतीने स्वतःचे राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने राज्यकारभार करावा, अन्यथा जनतेचा विश्वास ढासळेल याचा विचार महायुतीच्या नेत्यांनी करणे गरजेचे आहे.

पालिका निवडणुकीत भाजप सावध

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात तीन पक्षांचे मिळून महायुती सरकार सत्तेत आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वेळोवेळी नाराजी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्र्यांची बेताल वक्तव्ये, भ्रष्टाचाराचा आरोप यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.

gchitre4@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in