लग्न, चर्चा आणि ट्रोलिंग

तृणमूल खासदार महुआ मोईत्रा आणि बीजेडी नेते पिनाकी मिश्रा यांच्या विवाहामुळे समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चा आणि ट्रोलिंग सुरू आहे. महुआ यांचे खासगी आयुष्य, पूर्वीचे संबंध व सामाजिक छायाचित्रांमुळे त्या सतत लक्षात राहिल्या. स्त्रीविरोधी समाजविचारांची झळ त्यांना बसली. पन्नाशीत विवाह केल्याबद्दल त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तर पुरुष नेत्यांच्या अशाच कृतींकडे दुर्लक्ष केलं जातं.
 लग्न, चर्चा आणि ट्रोलिंग
Published on

चौफेर

प्राजक्ता पोळ

तृणमूल खासदार महुआ मोईत्रा आणि बीजेडी नेते पिनाकी मिश्रा यांच्या विवाहामुळे समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चा आणि ट्रोलिंग सुरू आहे. महुआ यांचे खासगी आयुष्य, पूर्वीचे संबंध व सामाजिक छायाचित्रांमुळे त्या सतत लक्षात राहिल्या. स्त्रीविरोधी समाजविचारांची झळ त्यांना बसली. पन्नाशीत विवाह केल्याबद्दल त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, तर पुरुष नेत्यांच्या अशाच कृतींकडे दुर्लक्ष केलं जातं. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि बीजेडी नेते पिनाकी मिश्रा यांचा विवाह सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ५० वर्षीय खासदार महुआ मोईत्रा यांनी ओदिशामधील पुरी येथून चार वेळा खासदार राहिलेले ६५ वर्षीय बीजेडीचे नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी ३० मे रोजी विवाह केला. महुआ आणि पिनाकी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये दोघंही हातात हात घालून हसतमुखाने उभे असल्याचे दिसत आहे. अचानक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नाच्या फोटोमुळे अनेकांना धक्का बसला. या फोटोंवर कमेंट्सचा खच पडू लागला. महुआ यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यानंतर या नवविवाहित जोडप्याचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ महुआ मोईत्रा यांनी स्वतः त्यांच्या व्हॉट्सॲॅप स्टेटसवर शेअर केला होता. त्यावरही असंख्य प्रतिक्रिया आल्या. यात पिनाकी मिश्रांपेक्षा महुआ यांना ट्रोल करणाऱ्या प्रतिक्रिया सर्वाधिक होत्या.

महुआ मोईत्रा या त्यांच्या संसदमधील मुद्देसूद आणि आक्रमक भाषणांसाठी ओळखल्या जातात. त्या पश्चिम बंगालमधील कृष्णानगरमधून दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या एक इन्व्हेस्टमेंट बँकर होत्या आणि आता सत्ताधाऱ्यांविरोधातील सर्वात ठाम आणि आक्रमक विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच स्वीकारल्याचा आरोप केला होता. मात्र, महुआ मोईत्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत निशिकांत दुबे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलावर मानहानीचा दावा दाखल केला. टीएमसीच्या या खासदार म्हणाल्या की, जेव्हा जेव्हा त्यांना बोलावण्यात येईल, तेव्हा त्या सीबीआय आणि लोकसभा आचारसंहिता समितीच्या प्रश्नांना आनंदाने उत्तर देण्यासाठी तयार आहेत. तेव्हा त्या सर्वाधिक चर्चेत आल्या. याच दरम्यान महुआ मोईत्रा आणि जय आनंत देहद्रई यांच्यातील वादामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यातील बाबींकडे जनतेचे लक्ष वेधले गेले. मोईत्रा यांनी स्वतःविरुद्ध बदनामीकारक आरोप केल्याबद्दल निशिकांत दुबे, देहद्रई आणि काही मीडिया संस्थांना कायदेशीर नोटीस पाठवली.

इतक्या आक्रमकपणे आपल्यावर हल्ला चढवणाऱ्या दिग्गजांना तितक्याच तोडीस तोड उत्तर देऊन त्या पुरून उरल्या. या सगळ्यात त्यांचं खासगी आयुष्य सातत्याने अधोरेखित केलं गेलं. फाइनान्सर लार्स ब्रोर्सन यांच्यासोबत झालेला पहिला विवाह, त्यांच्या घटस्फोटानंतर सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहद्रई यांच्यासोबत असलेले संबंध असोत किंवा एखाद्या पार्टीत काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याबरोबर मद्यपान करतानाचे फोटो असोत- महुआ यांचं खासगी आयुष्य नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी प्रकाशात आणलं गेलं. यामुळे महुआ या कायम चर्चेत राहिल्या.

राजकारणात एखादी महिला आक्रमकपणे तिची भूमिका बजावत असताना जर ती डोळ्यात खुपू लागली, की तिच्या खासगी आयुष्यावर चिखलफेक करायची. मग आपोआप ती माघार घेऊ लागते, हा राजकारणातला साधा नियम आहे. महुआ मोईत्रांच्या बाबतीतही हेच घडलं. त्यांनी कोणत्या पुरुषाशी संबंध ठेवायचे? त्यांनी कोणत्या वयात कोणाशी लग्न करायचं? हा त्यांचा खासगी प्रश्न आहे. या लग्नाच्या फोटोनंतर पिनाकी मिश्रांविषयी फार बोललं गेलं नाही. पण त्यांनी ट्रोलर्सची फार पर्वा न करता सोशल मीडियावर दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यावरून त्या अधिक ट्रोल झाल्या. याचं कारण, ६५ वर्षीय पिनाकी मिश्रा हे घटस्फोटित असून दोन मुलांचे वडील आहेत. महुआ मोईत्रा यांनी ६५ वर्षांच्या माणसाशी आता लग्न करण्याचं कारण फक्त पैसा असल्याचं काही लोकांनी ट्रोल करताना म्हटलंय. या वयात महागड्या वस्तू मिळवण्यासाठी महुआ यांनी सोय केली आहे, असंही बोललं गेलं. यात टार्गेट होत्या त्या फक्त महुआ मोईत्रा. एखाद्या स्त्रीने पन्नाशीत लग्न करणं हे फक्त पैशासाठी किंवा म्हातारपणाची सोय म्हणून असते असे समाजात आजही मानले जाते. एखादीचा नवरा गेला किंवा काही कारणास्तव घटस्फोट घेतला, तर दुसरं लग्न करण्याच्या वयाची चौकटही समाजाने ठरवलेली आहे. त्यांच्या पलीकडे जाऊन एखाद्या स्त्रीने तिच्या भावनिक गरजांना प्राधान्य दिले तर ते सहज स्वीकृत होत नाही.

एखादी महिला नव्याने जीवन सुरू करत असेल, तर समाज दोन्ही बाजूंनी बोलतो. चर्चा या समाजाच्या मानसिकतेबाबतही करण्यात आली पाहिजे. जेणेकरून आपला समाज दुसरं लग्न करणाऱ्या महिलांबद्दल काय विचार करतो, हे कळून येईल.

एकीकडे राजकारणातील नेत्यांचे विवाहबाह्य संबंध, कायदेशीर पत्नी असतानाही दुसऱ्या स्त्रीशी लग्न करणं, तिच्यापासून मुलं जन्माला घालणं, पण तिला सामाजिक आणि राजकीय जीवनापासून दूर ठेवणं हे सर्रास दिसून येतं. ‘पब्लिक फिगर’ म्हणून स्वच्छ प्रतिमेचा दिखावा करत हे नेते वावरत असतात. त्या नेत्याशी विवाहबाह्य संबंध ठेवणारी महिला मात्र चारित्र्यहीन ठरते. हाच नियम महिला राजकारण्यांना लागू होतो. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

prajakta.p.pol@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in