ममतादीदींच्या शरणागतीचे आश्चर्य

ममतांना राष्ट्रीय राजकारणात आधार हवा आहे. एका पराभवातच लढाऊ ममतादीदींनी शरणागती पत्करल्याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसच्या नेतृत्वालाही आधार हवाच आहे. एकंदरीत काय, 'सटवाईला नाही नवरा, म्हसोबाला नाही बायको' ही म्हण प्रत्यक्षात येताना दिसते आहे.
ममतादीदींच्या शरणागतीचे आश्चर्य
Published on

मत आमचेही

केशव उपाध्ये

ममतांना राष्ट्रीय राजकारणात आधार हवा आहे. एका पराभवातच लढाऊ ममतादीदींनी शरणागती पत्करल्याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसच्या नेतृत्वालाही आधार हवाच आहे. एकंदरीत काय, 'सटवाईला नाही नवरा, म्हसोबाला नाही बायको' ही म्हण प्रत्यक्षात येताना दिसते आहे.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर राष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ झपाट्याने बदलले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या आमदार, खासदारांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाविरुद्ध उघड बंड पुकारल्यावर देशातील समस्त विरोधकांच्या शिडातील हवाच निघून गेली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ममतांची तृणमूल या दोन काँग्रेसचे सोनिया-राहुलच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ममता आणि पवार या दोघांनी वेगवेगळ्या कारणांसाठी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पवारांनी १९९९ मध्ये सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून बंडाचे निशाण रोवले. सोनिया निष्ठावानांनी पवार, संगमा, तारिक अन्वर या तिघांची हकालपट्टी केली. पवारांच्या राष्ट्रवादीची १० जून १९९९ ला स्थापना झाली. या २६ वर्षांत १५ वर्षांतले काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार, १० वर्षे केंद्रातले कृषिमंत्रीपद, २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या दगाबाजीनंतर राज्यातले मविआ सरकार एवढाच पवारांचा प्रगती आलेख आहे. उद्धव ठाकरेंच्या दगाबाजीनंतर व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील मविआच्या यशानंतर पवारांच्या ताकदीविषयी पुन्हा भरभरून बोललं जाऊ लागलं होतं. विधानसभा निवडणूक निकालानंतर मात्र पवार यांच्याबरोबर उबाठाचाही फुगा फुटला. त्या आधी पवार जणू भाजपाला संपवूनच निवृत्त होणार असे वातावरण तयार केले गेले होते. शरद पवार कळायला तुम्हाला शंभर जन्म घ्यावे लागतील असे खा. संजय राऊत वारंवार तुच्छतेने म्हणत होते. उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस, राष्ट्रवादीशी पाट लावण्याची तयारी सुरू केली होती. या तिघांचे सरकार स्थापण्यात सोनिया गांधी प्रारंभी अनुकूल नव्हत्या. परिणामी सरकार स्थापनेत विलंब झाला होता. अशात पहाटेचा शपथविधी झाला. दादा पुन्हा 'साहेबां'च्या पंखाखाली आले. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भाजप यांची कशी जिरली याच्या कहाण्या पत्रकारांच्या लेखणीतून, वाणीतून रंगवून सांगितल्या जाऊ लागल्या. त्यावेळी राऊतांनी कमालीच्या गुर्मीमध्ये 'काका महिमा' वर्णन करताना 'साहेब कळायला शंभर जन्म घ्यावे लागतील', असे म्हणत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाची, राज्य नेतृत्वाचा अपमान करण्याची संधी सोडली नव्हती. हेच वाक्य राऊतांनी चार वर्षांनी २०२३ मध्ये पुन्हा उच्चारले होते. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मविआ ला ३२-३३ जागा मिळतील अशी भविष्यवाणी पवारांनी केली होती. ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली होती. त्यानंतर पवारांचा भाव एकदम वधारला होता. "सुजल्यावर कळतं...पवारांनी मारलं कुठे" यासारखे फलक झळकू लागले होते. उतारवयात पवारांना पुन्हा हुकमाचा एक्का बनून केंद्रातले मोदी सरकार चुटकीसरशी पाडणार अशा बढाया त्यांचे राऊतांसारखे झिलकरी खासगीत, जाहीरपणे मारू लागले होते.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआ सत्तेत येणार आणि पवार ठरवणार तोच मुख्यमंत्री बनणार, अशी हवा तयार केली गेली होती. निकालाच्या आदल्या दिवशी पवारांनी आपले आमदार मुंबईत आणण्यासाठी विमान, हेलिकॉप्टर तयार ठेवले असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मविआचा ससा आपण जिंकणारच या मस्तीत होता. पण विधानसभा निवडणुकीत 'परिवार' एकजुटीने कामाला लागला आणि महायुतीचे कासव विक्रमी जागा जिंकून गेले. तेव्हापासून पवारांचा चडफडाट अनेक वेळा दिसून आला. मरकटवाडीत फेरमतदान घेण्याची आचरट मागणी करणे, सरकारी यंत्रणा, मतदारयाद्यांवर शंका घेणे, पवारांचे वैफल्य वारंवार जाणवू लागलं होतं. ८० च्या दशकात ज्या पिढीने लढणारे पवार पाहिलेत त्यांना असे 'रडणारे' पवार पचत नव्हते. पालिका निवडणुका आल्या... काका बारामतीत सुद्धा गेले नाहीत... लेकही पालिका निवडणुकीत बारामतीमध्येही शांत होती. काकांनी पुतण्याला पुढे चाल दिलीय असे बोलले जात होते. पण विश्वास बसत नव्हता. महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आली तरी पवार मविआबरोबर जाणार की स्वतंत्र लढणार हे जाहीर केले नव्हते. त्यावेळी पवारांनी अजितदादांच्या पक्षाबरोबर अनेक ठिकाणी आघाडी करून लढले. त्यावेळी "पवार कळायला तुम्हाला शंभर जन्म घ्यावे लागतील" हे संजय राऊतांचे गुर्मीतले शब्द पुनः पुन्हा आठवत होते. परवाच विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मागण्यासाठी सुप्रिया सुळे काँग्रेस भवनमध्ये गेल्या आणि दुसरीकडे पवारांनी अजितदादांच्या पक्षाच्या विक्रम काकडेंना पाठिंबा देण्याची घोषणाही करून टाकली. याच काँग्रेसने पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता. पवार अनेकदा काँग्रेस नेतृत्वाला लाथाडतात तरीही काँग्रेस नेतृत्व पुनः पुन्हा त्यांच्यापुढे नमते घेते. अजितदादांच्या पक्षात विलीन होण्याचे अनेक प्रयत्न असफल ठरल्यानंतर पवारांच्या शिलेदारांची अस्वस्थता कमालीची वाढली आहे. हे शिलेदार केव्हा सोडून जातील याचा नेम नसल्यानेच पवारांनी पुन्हा काँग्रेसबरोबर पाट लावण्याचा प्रस्ताव स्वीकारला असू शकतो. ममतांना राष्ट्रीय राजकारणात आधार हवा आहे. एका पराभवातच लढाऊ ममतादीदींनी शरणागती पत्करल्याचे आश्चर्य वाटते. काँग्रेसच्या नेतृत्वालाही आधार हवाच आहे. एकेकाळी सत्तेत असताना परस्परांवर कुरघोडी करण्यास मागेपुढे न पाहणारे हे पक्ष व नेते आज सत्ता नसल्याने हतबल झाले आहेत. एकंदरीत काय, 'सटवाईला नाही नवरा, म्हसोबाला नाही बायको' ही म्हण प्रत्यक्षात येताना दिसत आहे.

प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

logo
marathi.freepressjournal.in